स्त्री एक दैवी आविष्कार

Story About Women's Power
कथेचे नाव - स्त्री एक दैवी आविष्कार


विषय - लघुकथा

स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असत का हो?

फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


आज विनय खूप खुश होता. कारण ही तसेच होते.आज त्याचा वाढदिवस.घरून लेकीचे फोन वर फोन येत होते.\"बाबा लवकर घरी या’ म्हणून.त्याने कॅफे चंदू आणि बाबू काकांवर सोपवून लवकरच घरी निघाला. “काय काय गोंधळ घालून ठेवला आहे कोणास ठावूक?” हसतच मनाशी पुटपुटला आणि घरी आला.

घरी येताच त्याची परी आणि भाचे मंडळींनी त्याच्यावर पुष्पवृष्टी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परीने त्याच्या बोटाला धरून सोफ्यावर बसविले आणि दिवसभरचा वृत्तांत त्याला कथन केला. त्याची नजर सजवलेल्या हॉलकडे आणि त्याचा वाढदिवस साजरा करणाऱ्या त्याच्या कुटुंबाकडे गेली.

आईला व्यवस्थित चालता ही येत नव्हते तरी देखील विनयला लाडू आवडतात म्हणून स्वतः तिने त्याच्यासाठी लगबगीने लाडू बनविले होते. तिची ती चालणारी लगबग, बहिणीने त्याला आवडती सोनपापडी आणली होती,तर बायकोने त्याच्या आवडीचे सुग्रास जेवणाचा बेत आखला होता, तर परीने त्याच्यासाठी छानसे ग्रीटिंग तयार केले होते. हे सारे पाहून आपसूक त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. ‘किती जीव लावतात ह्या चारही मला ,बिनाशर्थ प्रेम करतात,किती हळव्या मनाच्या आहे ह्या पण तरीदेखील तितक्याच खंबीर..!
सर्वांनी मिळून विनयचा वाढदिवस खूप छान प्रकारे साजरा केला. ताई (विनयची बहिण) जेवण करून मुलांना घेवून घरी गेली. आईने जेवणानंतर गोळ्या घेतल्या व तिच्या रूममध्ये झोपायला गेली. विनिता (विनयची बायको) किचन आवरत होती. विनय तिला मदत करत होता.
“ अहो, बसा तुम्ही मी आवरते, हे काय झालच माझं.” विनिता बोलली.

“ असुदे गं तेवढीच तुझी काम आटोपतील”. विनय उत्तरला.

“अहो,नाही बोलते ना मी………,जा आता परी झोपली का बघा. मी आलेच दहा मिनिटात” विनिता हसून म्हणाली.

काम आवरून विनिता तिच्या खोलीत आली तेव्हा परी झोपली होती आणि विनय बाल्कनीत उभा होता.विनिता त्याच्याजवळ येवून उभी राहिली तरीही तो आपल्याच विचाराच्या नादात होता.

“अहो….”

“अहो……काय झालं? कसला एवढा विचार करताय” विनिताने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले.

“अं…..काही म्हणालीस.?” विनय

“म्हटलं… तुम्ही कसला विचार करत आहात?” विनिता

“काही नाही गं. आयुष्यात जरा मागे पालटून पाहतोय.” विनय उत्तरला.

“अच्छा, मग काय दिसले?” विनिता जरा हसून म्हणाली.

विनयने तिचे हात हातात घेत म्हटले. \"नवदुर्गांचे दर्शन’

“ म्हणजे..?” विनिता आश्चर्याने म्हणाली.

“अगं, म्हणजे माझ्या आयुष्यात असलेल्या तुम्ही चारही जणी देवीपेक्षा कमी नाही.”
“देवाने तुम्हा स्त्रियांना किती विचारांती बनवले आहेस ना.बघ ना परिस्थिती कशीही असो तुम्ही अगदी चोखपणे कार्य करतात. स्वतः सर्व कार्य करण्यास सक्षम आहात, एकाचवेळी अनेक काम तुम्ही करू शकतात.एवढेच नव्हे तर विचार करण्याची भन्नाट शक्ती तुमच्याकडे असते,नुसते विचार करूनच तुम्ही थांबत नाही तर ते आमलात कसे येतील हा सुद्धा प्रयत्न तुम्ही करता.विधात्याने प्रेम,माया, वात्सल्य, दया,क्षमा, शक्ती,त्याग हे सारे गुण भरभरून तुम्हाला दिले आहे . नाजूक पण तितकीच खंबीर अशी देवाने बनवलेली एक अद्भुत रचना म्हणजे स्त्री.


अनेक रूपे अनेक नावे
अनेक शक्ती तुझ्या ठायी
दिसून येई अस्तित्व तुझे
कणाकणात तूच सामावी

कधी आई कधी ताई
कधी बनतसे प्रेयसी बावरी
वात्सल्याची मूर्ती तू
प्रेमाचा झरा तुझ्या अंतरी

अन्याय अराजकता माजताच
होई दुर्गा अन् भद्रकाली
शासन करून दुष्टांना
जन्माची अद्दल तू घडवी

“अहो बस… बस….किती ते कौतुक कराल.” विनिता उत्तरली

“ बोलू दे आज मला विनू,”

“तुला माहितेय..? मी आणि ताई लहान असतांनाच बाबा गेले. आणि आम्ही पोरके झालो. आई ने एकटीने स्वकष्टाने आम्हाला लहानाचे मोठे केले, ज्यावेळी नातेवाईकांनी पाठ फिरवली त्यावेळी ती सक्षमपणे उभी राहिली. आमचे माय आणि बाप दोघेही तीच बनली. आम्हा दोघी भावंडाना कधीही काही कशाची कमी भासू दिली नाही. तिच्या हातात अन्नपूर्णा असल्याने तिने पुरेपूर उपयोग करून घेतला. दिवाळीत मी आणि ताई तिला फराळाच्या ऑर्डरी पूर्ण करण्यासाठी मदत करत असे. संसाराचा गाडा तिने एकटीने हाकला आहे.आम्हाला मोठे करण्यासाठी तिने अनेक गोष्टींचा सहजगत्या त्याग केला आहे ग.”

हे सर्व सांगत असातांना विनयच्या डोळ्यातून पाणी गालावर ओघळले.

विनीताने ते तिच्या बोटांनी अलगदपणे पुसले. एक हात त्याच्या खांद्यावर ठेवून दुसरा हात त्याच्या पाठीवर थोपटत त्याला शांत करत होती.

त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

“आम्ही मोठं झालो तसे जमेल तशी मदत करत गेलो. ताईने शिक्षण पूर्ण झाल्यावर नौकरी केली आणि मी माझे शिक्षण करता करता पार्ट टाईम जॉब केला. अश्यातच राहुल जिजूचे स्थळ ताईसाठी चालून आले. सर्वकाही अलबेल आहे हे पाहूनच आईने होकार दिला.

नव्या नवलाईचे दिवस संपले आणि ताईच्या नशिबी वनवास आला.राहुल जीजुंना दारू पिण्याची सवय लागली आणि घरावर सर्वनाश ओढवला. रोज पिऊन यायचे,ताईला सतत काहीना काही कारणावरून बोलायचे,प्रसंगी हात पण उचलायचे.ताईने खूप काही सहन केले पण नवऱ्या विरुद्ध चकार शब्द तिच्या तोंडून निघत नसे. तिच्या दोन पिल्लांसाठी ती सहन करत आली.मुलांना चांगले संस्कार दिले.

एके दिवशी असेच राहुल जीजू पिऊन आले आणि ताईला काहीही बोलू लागले आणि तिच्यावर हात उचलला .शेवटी तिच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि तिने एक धाडसी निर्णय घेवून घराचा उंबरठा ओलांडला.

\"पंखात भरुनी बळ
पिल्लांना घेवून पोटाशी
झुगरूनी साऱ्या रूढी परंपरा
झाली सज्ज लढण्यास जगाशी’

अगदी याचप्रमाणे तिने मुलांना घेवून घरातून पाऊल बाहेर टाकल आणि एकट्याने जिद्दीने पुन्हा उभी राहिली.

या जगात वावरतांना समाजाकडून तिला किती काही सहन करावे लागले. तिने किती टोमणे सहन केले,नवऱ्याने टाकून दिलेली म्हणून नेहमी उपेक्षित राहिलेली,दररोज कितीतरी किळसवाण्या नजरा झेलणारी तरीही भक्कमपणे, निडरतेने लढणारी माझी ताई खरोखर एक आदर्श आहे.

ताई बद्दलचा एक आदर विनयच्या बोलण्यातून दिसून येत होता.तिच्याबद्दल सांगतानाही विनयचा स्वर गहिवरला होता.विनिता खूप समाधानाने त्याच्याकडे पाहत होती. ती त्याला म्हणाली…

“ ताईंना हे सर्व शक्य झाले ,कारण तुम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलात.”

अश्या कितीतरी जणी आसपास दिसून येतात की ज्यांना माहेरचा आसरा नसतो,त्यांना भावाची साथ नसते उलट त्यांनी असे काही पाऊल उचलले तर त्यांनाच दोष दिला जातो.मग त्या पण अबला म्हणून सहन करतात.

“ हो, मी नेहमी तिच्यासोबत होतो आणि तिच्यासोबत असणारचं” विनय म्हणाला.

“पण प्रत्येक स्त्रीने अगोदर स्वतः च्या आंतरिक शक्तीला ओळखले पाहिजे.तिची स्वशक्ती जर प्रकट झाली तर तिला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.ती जर स्वतः पुढे जायला तयार असेल तरच तिला साथ देणाऱ्या व्यक्ती तिच्यासोबत येतातच.” विनिता म्हणाली.

“ अगदी बरोबर बोललीस,विनू आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे तू ” विनय जरासा हसून बोलला.

“ मी कसे?” विनिता प्रश्नार्थक नजरेने विनयकडे बघत बोलली.

“माझी कंपनी बंद पडली आणि मी बेरोजगार झालो, ते दिवस आठव.तो काळ किती संकटाचा होता,त्यावेळी तू स्वतः किती उभारी दिली.एक नवीन उद्योग सुरू करायचा म्हणजे शून्यातून जग निर्माण करणे,आणि अश्यावेळी तूझी साथ मला खूप मोलाची ठरली.तू एखाद्या शक्ती प्रमाणे, सकारात्मक उर्जेप्रमाणे सदैव सोबत होतीस म्हणून आजचा हा दिवस आपला आनंदात घालवत आहोत.
आणि मला अभिमान आहे की माझी परी तुमच्या तिघींच्या तालमीत लहानाची मोठी होतेय. आणि माझी खात्री आहे की ती सुद्धा तुमच्याप्रमाणेच खंबीर,धाडसी, विचारी,आणि सक्षम बनणार.

‘ स्त्री जर पुरुषाच्या पाठीमागे असेल तर ती सन्मानपात्र असते आणि ती जर पुरुषाच्या पुढे असेल तर ती ढाल बनते.’

खरोखरच स्त्रीला समजणे किती अवघड असते ना..? तिला जेवढे समजत जावे तेवढी ती उलगडायला अवघड आहे. स्त्रीला समजणे म्हणजे समुद्राचा तळ शोधणे.

?सारिका सचिन गडे.
ठाणे विभाग