Dec 07, 2021
General

अजब नातं

Read Later
अजब नातं

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

#अजब_नातं

तनुने मनापासून प्रेम केलं अवीवर. अविनाश राजे..तिचा शाळेपासूनचा मित्र. कॉलेजातही दोघं सोबत. कॉलेजात त्यांची जोडी फेमस होती. अवी पुढे शिकण्यासाठी परदेशात गेला. जाताना तनुला सांगून गेला,"माझं शिक्षण पुर्ण होताच मी भारतात येईन. मग आपण लग्न करु."

"बघ हं. नाहीतर मी तुझी वाट बघता बघता म्हातारी होईन नि तू तिथं बिर्हाड थाटशील."

"हेच ओळखलंस मला. तुला तसं वाटतं तर मी नाही जात  परदेशात."

"कसला चिडतोस रे. तू पण ना. चेष्टा केली मी तुझी."

"तनू,नको अशी चेष्टा करुस. जिव्हारी लागते बघ," असं म्हणत अवीने तनुला जवळ घेतलं. तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. दोघंजणं अस्ताला जाणारा सुर्य बघत बसली. दोघांचेही कंठ दाटून आले होते. काही वर्षांपूर्वी एकामेकाला न ओळखणारे दोन जीव,एकमेकांत निर्भेळपणे गुंतून गेले होते..अलवार गुंता..भावनांचा..दोघांचेही पापणकाठ ओलावणारा."

दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. तनु त्या दिवशी रात्री झोपू शकली नव्हती. अवी तिच्यापासून दूर जाणार ही जाणीव तिला झोपू देत नव्हती. तनूने मम्मीपप्पांना अवीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. ती आता बीएड करत होती. तिच्यासमोर एकच ध्येय होतं..अवी परत येईस्तोवर अविवाहित रहायचं. जीव कशाततरी रमवायचा.

अवीचे इमेल अधनामधना यायचे. तो तिथे सेटल होण्याची खटपट करत होता. तिथल्या संस्क्रुतीशी जुळवून घेत होता. बघताबघता वर्ष सरुन गेलं. अवी आज येणार होता, काही दिवसांच्या रजेवर. तनुला फार आनंद झाला होता. हल्ली अवीचं इमेल करणं कमी होत चाललं होतं..भाषेतला दुरावाही जाणवत होता तिला. 

आठेक दिवसांपूर्वी मम्मीपप्पांच्या आग्रहास्तव ती अनुराग देशमुख नावाच्या तरुणाला भेटली होती. तनुने त्याला स्पष्टच सांगितलं होतं की ती फक्त मम्मीपप्पांचं मन दुखावू नये म्हणून त्याला भेटतेय. तिचा सध्यातरी लग्न करायचा मूड नाही.

अनुराग देशमुखने अवीचं नाव काढताच तनु जाम घाबरली. अनुराग तिचं भांबावलेपण,तिच्या कपाळावर डवरलेले घर्मबिंदू पाहून हसला.

 "तुला कसं कळलं," तनुने विचारताच"जग खूप छोटं आहे,म्हणत अनुराग पुन्हा मिश्कील हसला होता. अनुरागनेच मग तनुच्या मम्मीपप्पाकडे नकार कळवला होता.

तनूने आज गुलाबी रंगाचा टॉप व बाटीकचा लाँग स्कर्ट घातला होती. आज बऱ्याच महिन्यांनी ती मनापासून नटली होती कारणच होतं तसं.  तिचा अवी जो आला होता सातासमुद्राहून. नेहमीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ती अवीची वाट बघत थांबली होती. वाळूत तिने पिंपळाचं पान काढलं व त्यात अवी तनु अशी नावं कोरली. इतक्यात अवी आला. ती धावत गेली व त्याच्या मिठीत शिरली. वर्षभरात अवीचा रंग उजळला होता..अधिकच स्मार्ट दिसत होता तो. अवीने तनुचे केस एका बाजूला केले व तिच्या मानेवर ओठ टेकवले तशी ती शहारली मग त्याने तिच्या कमरेभोवती हात गुंफला व दोघंजणं चालू लागली..पुर्वी चालायची तशीच.

"अवी किती आठवण यायची रे मला तुझी!"

"आय नो तनु."

"अवी,तुला यायची का रे माझी आठवण? माझ्यासाठी ओलावायचे का रे तुझ्या पापण्यांचे काठ?"

अवीने तिचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत धरला. तिच्या डोळ्यांत एकटक बघत राहिला. 

पुढचे काही दिवस तो त्याच्या नातेवाईकांच्या,मित्रांच्या भेटीत रमला. त्याच्याभोवती इष्टांचा बराच गराडा होता. तनु अजुनतरी अवीवर तिचा हक्क सांगू शकत नव्हती. मम्मी आजारी असल्याने तिला अवीचा निरोप घेता आला नाही. 

बऱ्याच दिवसांनी अवीचा मेसेज आला. अवीचं शिक्षण पुर्ण झालं होतं अन् तिथंच त्याला जॉब मिळाला होता. सध्यातरी त्याला भारतात येणं जमणार नव्हतं.

इकडे मम्मीपप्पा दोघेही तनूचं लग्नाचं वय उलटत चालल्याने धास्तावले होते. तनूने त्यांना अवीशीच लग्न करणार हे सांगितलं तेंव्हा घरात एटमबाँब फुटला होता. पप्पा जाम रागावले होते तनूवर. मम्मी तिची समजूत घालत होती की त्याच्यापेक्षा सातपटीने उजवा साथीदार तुला मिळेल पण तनु कोणाचंच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

एकदा तनुला अवीचा इमेल आला.

"तनु,मी लग्न केलं. मी माझ्यासोबत काम करणाऱ्या एमिलीच्या प्रेमात पडलो.  तुला कसं कळवावं तेच कळत नव्हतं पण आम्ही एकमेकांत गुंतत गेलो आणि नाऊ व्ही कान्ट लीव्ह विदाउट इच अदर सो आम्ही लग्नबंधनात अडकलो. तुला सांगतो तनु,आपल्या मैत्रीत तसुभरही फरक पडणार नाही. मी एमिलीला सांगितलंय तुझ्याबद्दल. तिचंही एक्स-लव्ह होतं. तिथे हे कॉमन असतं. तुही चांगला मुलगा बघ न् लग्न करुन मोकळी हो."

'लग्न करुन मोकळी हो..इतकं सोप्पं असतं नातं तोडणं..किती स्वप्नं रंगवलेली मी,तुझ्यासोबतच्या आयुष्याची..सगळ्या स्वप्नांना पायदळी तुडवलंस..कोणी हक्क दिला तुला माझ्याशी असं वागण्याचा..का केलंस अवी तू असं..का केलंस,' तनू हमसून हमसून रडत होती. पाठीमागे तिचे पप्पा येऊन उभे आहेत हेही तिला कळलं नाही.

पप्पा जाम संतापले होते. "समजतो कोण हा अवी स्वतःला. लोकांच्या मुली म्हणजे खेळणी वाटली काय त्याला! थांब त्याला जाबच विचारतो मी."

मम्मा म्हणाली,"काय उपयोग आहे त्याला जाब विचारुन. प्रेम म्हणजे अगदी कॉमन वाटतं त्याला. माझ्या पोरीच्या लायकीचाच नव्हता तो." मम्मा बराच वेळ तनुच्या केसांतून बोटं फिरवत राहिली. तनू कितीतरी दिवसांनी मम्मीपप्पांमधे निजली..लहानपणी निजायची तशी. सकाळी तिला बरंच फ्रेश वाटलं. तिने अनुरागला फोन केला. अनुराग व तनु एका कॉफी हाऊसमधे भेटले. तनूने अनुरागला अवीच्या लग्नाबाबत सांगितलं.

"मग काय निर्णय घेतला आहेस तू तनु?"

"मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे."

"का अवी नाही मिळाला म्हणून? तडजोड करत आहेस तनु तू."

"मग काय आयुष्यभर त्याची आठवण काढत कुढत राहू ज्याने माझ्या प्रेमाची कदर केली नाही!"

"मी तुला लग्नानंतर अवीवरुन छळणार नाही कशावरुन?"

"नाही छळणार तू, मला खात्री आहेतुझी, पण तरी माझी तुझ्यावर जबरदस्ती नाही. तुच ठरव आता काय करायचं ते."

काही महिन्यात तनुचं अनुरागशी लग्न झालं. अनुरागने तिच्या भूतकाळाबद्दल कधीही वाच्यता केली नाही. तनुही त्याच्याशी प्रामाणिक राहिली. तिने अवीला तिच्या आयुष्यातून ब्लॉक केलं. तनु एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून लागली तर अनुराग एक सिव्हील इंजिनिअर होता. त्याचे आईवडीलही मनमोकळया स्वभावाचे होते. 

अनुने लग्नानंतर चार वर्षांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. तनय नाव ठेवलं बाळाचं.  दोन्हीकडच्या आजीआजोबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सगळं कसं सुरळीत चाललं होतं. तनय छान बाळसं धरत होता. आजीआजोबांकडून लाड करुन घेत होता. 

आणि एकदा तनुचा भूतकाळ तिच्यासमोर येऊन उभा राहिला, एका पिंगट केसांच्या गोरटेल्या मुलीच्या रुपात. तिच्या शाळेत नवीन प्रवेश घेतलेला ह्या मुलीने. मुख्याध्यापकांनी तनुशी त्या मुलीची ओळख करुन दिली, जास्मिन अविनाश राजे.  नाव ऐकताच तनुला  गरगरल्यासारखं झालं. टेबलावरच्या ग्लासातलं पाणी प्यायली ती. ती जरा सावध होताच
मुख्याध्यापिकांनी तिला सांगितलं की जास्मिनच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे व तिचे वडील तिला भारतात घेऊन आले आहेत कायमच्या वास्तव्यासाठी.

तनुने जास्मिनकडे पाहिलं. काहीशी बावरलेली. एखाद्या वाट चुकलेल्या कोकरासारखी तिची भेदरलेली नजर. अगदीच पित्रुमुखी..रंग तेवढा आईचा. तनुने वर्गातल्या मुलांशी जास्मिनची ओळख करुन दिली व तिच्याशी मैत्री करायला सांगितली. जास्मिनलाही टिचरच्या आपुलकीच्या बोलण्याने धीर आला. 

तनुने अनुरागलाही जास्मिनबद्दल सांगितलं. तो म्हणाला,"काय हक्क असतो ना आईवडिलांना मुलांची वाट लावायचा. कोणत्या मानसिक अवस्थेतून जात असेल ती पोर!"

जास्मिनची अभ्यासातली प्रगती उत्तम होती. काही दिवसांतच ती इतर मुलांत मिसळून गेली. विचारलेल्या प्रश्नांची हात वर करुन उत्तरं द्यायची. पालकसभेच्या वेळी जास्मिन तिच्या वडिलांना घेऊन आली होती. किती खूष होती ती तिच्या टिचरची व तिच्या वडिलांची भेट होणार म्हणून. अविनाशच्या चेहऱ्याचा रंग पार उडाला होता. त्याने तनुला 'तनु'म्हंटलं. तनुने त्याला हातानेच थांबवलं व म्हणाली,"नो,से टिचर ओनली. मि. अविनाश राजे,युवर गर्ल इज व्हेरी सिन्सिअर अँड स्टुडिअस. शी हेज गॉट सेकण्ड रँक." तनुने प्रगतीपुस्तक त्याच्या पुढ्यात सरकवलं व सही करुन ठेवायला सांगितलं. चेहऱ्यावर निर्विकार भाव ठेवत ती पुढच्या पालकांकडे वळली. अविनाशला वाटलं असावं तनुने जुनी ओळख दाखवावी वगैरे पण त्याची काहीच गरज नव्हती. तनुने त्याला तिच्या आयुष्यातून कधीच रद्द्बातल केलं होतं. तनुच्या पुढ्यात होता तो केवळ जास्मिनचा पिता. 

असेच दोनेक महिने गेले. वार्षिक परीक्षेचा निकाल लागला. यावेळी मात्र जास्मिनची रँक थोडी घसरली होती तरी ती पहिल्या पाचात होती. तिच्या अभ्यासात मागे पडण्याचं कारण होता तिचा पिता मि. अविनाश राजे,ज्याने दुसरं लग्न करायचं ठरवलं होतं पण त्याच्या फियान्सीला जास्मिनची अडचण होत होती म्हणून अविनाश जास्मिनचं स्कुल लिव्हींग सर्टीफिकेट घेऊन तिला महाबळेश्वरजवळच्या बोर्डिंग स्कुलमध्ये ठेवणार होता.जास्मिनचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. तनुने त्या दोघांना थांबायला सांगितलं व तिचं काम आटोपल्यावर त्यांना जाऊन भेटली. 

"तुमचा निर्णय अंतिम आहे,मि.अविनाश राजे."

"ओ एस, मला लवकरात लवकर हिचा शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. पुढच्या वर्षी मी हिला बोर्डिंग स्कुलमधे टाकणार आहे."

तनुला जास्मिनच्या डोळ्यात याचना दिसली. तिला नाही जायचं होतं ही शाळा,हे मित्रमैत्रिणी सोडून. तनु मुख्याध्यापिकांशी बोलली व त्याला पुढच्या आठवड्यात या म्हणून सांगितलं.

तनु घरी आली पण तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. रात्री अनुरागला जास्मिनबद्दल बोलली. अविनाश तिला बोर्डिंग स्कुलमधे ठेवणार असल्याचं सांगितलं. अनुरागला तनुच्या मनाची तगमग कळत होती. तो तनुला थोपटत राहिला.

 वास्तविक पहाता जास्मिन ही तनुची कुणीही लागत नव्हती तरी का कोण जाणे तिचा जीव त्या चिमुरडीत गुंतला होता..का अविनाशची निशाणी म्हणून?..तिच्या मनाच्या तळाशी अजुनही तिचं पहिलं प्रेम शिल्लक होतं का?..अविनाशने जसं पाटीवर लिहिलेलं पुसून टाकतात तसं त्यांचं प्रेम पुसून टाकलं तसं तनुच्या बाबतीत का होत नव्हतं? 

सकाळी अनुराग तनुला म्हणाला,"तनु आपण जास्मिनला दत्तक घेऊ. अविनाश राजेची मुलगी म्हणून नाही तर आपल्या तनयची बहीण म्हणून तिला वाढवू,तिला हक्काचं घर देऊ. 

तनु म्हणाली,"आईबाबा ऐकतील?"

तो म्हणाला,"मी समजावेन त्यांना." 

तनु म्हणाली,"इतका कसा रे तू चांगला! तुझं मन किती निर्मळ आहे अनुराग!"

आणि खरंच जास्मिनला तनु व अनुरागने दत्तक घेतलं. जास्मिन आणि तनय.. अगदी सख्ख्या भावंडांसारखी राहू लागली. मजा,मस्ती,भांडणांनी घर अधिक बोलकं झालं. अविनाशचा अधेमधे जास्मिनच्या चौकशीसाठी म्हणून फोन यायचा तोही काही वर्षांत बंद झाला.

 आजीआजोबा थोडे नाराज होते पण जास्मिनने त्यांनाही लळा लावला. जास्मिनशिवाय त्यांचही पान हलेनासं झालं.  आजोबांचा चष्मा शोधून देणं,आजीला वाती वळून देणं,दोघांना वेळेवर औषथं देणं..अशा कामांनी तिने त्यांच्या ह्रदयात प्रवेश मिळवला. तनय तर त्याचा कोणताही प्रॉब्लेम असो,आधी ताईला सांगायचा आणि त्याच्या जसू ताईकडे त्याच्या सगळ्या प्रॉब्लेम्सची सोल्युशन असायची. कधीकधी तनुला  जास्मिन म्हणजे तनयची दुसरी मम्माच वाटायची. आधी तिची मराठी तोडकीमोडकी होती ती तनुच्या परिवारात राहून चांगलीच सुधारली.

कधी चोवीस वर्ष निघून गेली कळलंही नाही. आज जास्मिनचं लग्न. अनुराग व तनुने कन्यादान केलं तीचं. मुलगी या नात्याने जास्मिनने खूप सुख दिलं त्यांना. आता स्त्रीरोगतज्ज्ञ झालेय ती. नवराही तिच्याच क्षेत्रातला. दोघं मिळून इस्पितळ उभारणार आहेत. अनुरागचा आर्थिक पाठिंबा आहेच त्यांना. तनयही त्याच वाटेवर चालतोय. पुढे जाऊन तोही जसूताईच्या हॉस्पिटलला जॉइंट होईल. 

अविनाशच्या वागण्यामुळे तनुला पुरुष जातीचा तिटकारा आला होता तर अनुरागच्या चांगुलपणातून तिला पावलोपावली देवत्वाचं दर्शन झालं. 

अनुराग, लेक सासरी गेली म्हणून रडत बसला होता. जास्मिनने गाडी मागे घ्यायला लावली व परत येऊन बापाला बिलगली. त्याला गप्प करुनच सासरी गेली.

-----सौ.गीता गजानन गरुड.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now