दोष कुणाचा??संचित की ....

दोष कुणाचा??


स्वच्छंदी या शब्दाचा अर्थ समजावा अशी होती माझी लीना...प्रश्न पडला असेल ना...कोण ही लीना ?
मी आणि ती सातवीला भेटलो शाळेत. बिनधास्त ,आनंदी,नेहमी हसतमुख ,सर्वांशी गोड बोलणं आणि हातात नेहमी असणारा स्कार्फ....सर्वांना आपलंसं करणं हे तर तिला जन्मजातच होत.
शाळा आणि कॉलेज कसे बरोबर गेले समजलच नाही..नंतर संसारात अडकून गेलो.भेटीगाठी खूपच कमी झाल्या.
अचानक मोबाईल इंटरनेट देवासारखे धावून आले..आणि आम्ही पुन्हा भेटलो.
खूप वर्षांनी आम्ही आमच्या बद्दल बोलायला लागलो, नको त्या जोक्स वर हसायला लागलो,फिरायचे प्लॅन व्हायला लागले.भेटलो तर गप्पा रंगायला लागल्या .खूपच भारी वाटायला लागले .व्हिडिओ कॉल नी तर दूर असून जवळचे झालो आयुष्य जगण्यात पुन्हा नवचेतना आली.आम्ही पुन्हा बहरलो...

अचानक कोविड आला.. सर्वांचं बदललं तस आमचं ही आयुष्य बदललं...अचानक फोन आला दीपा अग मी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला जातीये.माझा कोविड रिपोर्ट आला आहे.मी बोलले इकडे निघून ये तर मला बोलली नको काळजी करू तुझे जिजू मला काही होवू देणार नाही..मनातून मी खूपच अस्वस्थ झाले ... आमचे कॉल व्हिडिओ कॉल चालूच होते...तिच्या प्रकृतीत बिल्कुल फरक नव्हता तिच्याशी बोलताना जाणवत होत..
परिस्थिती पाहून तिच्या नवऱ्याला संगितल की दुसरीकडे दवाखान्यात दाखल करून उपचार करा ..मी स्वतः मेडिकल प्रोफेशन मध्ये आहे त्यामुळे तिची परिस्थिती समजत होती मला.ती जिथे कोविड सेंटर ला दाखल होती तिथे तिला हवे ते उपचार नव्हते चालू. जीव तोडून सांगितलं की तिला हवे ते उपचार नाहीत चालू इकडे घेवून या.पण बिलकुल एकल नाही त्यांनी...
नी एक दिवस मी कॉल लावून थकले पण कॉलच रिसिव्ह नाही झाला..काळजात धस्स झालं.
नी नको ते झालं 1महिना अगोदर भेटलेली माझी मैत्रीण मला अचानक सोडून गेली..शेवटच्या क्षणापर्यंत विचारत होती कधी वाटेल मला बर सांग ना ग्....?नाही सांगू शकले की अग तुझे उपचार नाहीत बरोबर .. सांगून थकले जिजूना इकडे आणा ..दुसरीकडे शिफ्ट करा.पण त्या हट्टी माणसाने नाही एकल माझं.
तिच्या जाण्याने पुन्हा आयुष्यात मोठी पोकळी झाली.अजूनही विचार डोक्यात आला की वाटत यात चूक नक्की कुणाची ??तिचा किती विश्वास होता नवऱ्यावर..जिजूनी एकल असतं तर पोरगी एकटी नसती पडली..ते एकटे नसते पडले...आई वडिलांना जिवंत पणी हे दुःख पाहावं नसतं लागल.
आजही तिच्या मुलीला कुशीत घेतलं की वाटत तीच जवळ आहे माझ्या.पण डोक्यातून प्रश्न जात नाही की....... दोष कुणाचा??