संकेत भाग तीन

कथा मालिका

संकेत

भाग तीन


आदित्यने वेळ वाया न घालवता घर पाहायला सुरुवात केली. ते घर म्हणजे एक प्रशस्त बांगला होता. घर न्याहाळत तो मिसेस पत्की घराबद्दल जे काही सांगत आहेत, ते ही तित्तक्याच एकाग्रतेने ऐकत होता, मध्येच प्रश्न विचारत होता. मिसेस पत्की यांच्या माहिती नुसार त्या आधी मुंबई येथे रहात होत्या. त्यांच्या मिस्टरांची नोकरी तिथेच होती. चाळीस वर्षे त्या तिथेच राहिल्या, नोकरी दरम्यान त्यांचे मिस्टर बारामती येथे आले असताना त्यांनी हा बंगला पहिला आणि बघता क्षणीच त्यांना तो खूप आवडल्यामुळे त्यांनी तो खरेदी केला. रिटायर झाल्यावर इथे येऊन राहण्याचा त्यांचा विचार होता पण त्या आधीच हार्ट अटॅक मध्ये ते गेले. त्याच वेळी त्यांच्या मुलीची बदली बारामतीमध्ये झाली आणि पतीची इच्छा तसेच मुलीची नोकरी यासाठी त्या दोघीही इथे राहायला आल्या.


त्या घरात आदित्यला काहीतरी खटकत होते, पण नक्की काय हे तो अताच सांगू शकत नव्हता. त्याचे पाय नकळत एका रूममध्ये स्थिरावले होते, मिसेस पत्कीना कोणाचा तरी फोन आला म्हणून त्या बाहेर गेल्या होत्या, आदी मात्र बराच वेळ त्या रूममध्ये थांबला होता. बऱ्याच वेळाने तो तिथून जाण्यासाठी वळला तर त्याला मॉलमध्ये धडकलेली मुलगी दिसली, त्याला क्षणभर खरे वाटेना पण ती तीच मुलगी होती. ती रूममध्ये आली तशी वाऱ्याची जोरदार झुळूक आली आणि भिंतीवरील फ्रेम सरकली, ती बरोबर त्या मुलीच्या अंगावर पडणार इतक्यात आदीने त्या मुलीला आत ओढले.ती मुलगी खाली पडली आणि आदी तिच्या अंगावर पडला. दोघांच्यात तसे फारसे अंतर नव्हते. एकमेकांना एकमेकांचे श्वास जाणवत होते. आदी तिच्या डोळ्यात क्षणभर पहातच राहिला. ती कशीबशी बाजूला होत म्हणाली कोण तुम्ही ?? आणि इथे माझ्या घरात काय करता ?? 


हे तुमचं घर आहे ?? आदित्यच्या लगेच लक्षात आले की ही मिसेस पत्कीची मुलगी आहे. त्याने स्वतःची ओळख करून देत म्हटले , मी आदित्य कुलकर्णी. मिसेस पत्कीनी मला इथे बोलावले होते. ओह म्हणजे तुम्ही वास्तूशास्त्र आणि ज्योतिषतज्ञ आदित्य कुलकर्णी आहात तर. हो तोच मी. पण तुम्हाला माझ्या बद्दल बरीच माहिती दिसते . अजिबात नाही, आई म्हणाली होती तुम्ही आज येणार आहात म्हणून अंदाज व्यक्त केला मी फक्त.


पण मिस्टर आदित्य माझा या सगळ्यांवर अजिबात विश्वास नाही. आणि मला माहित आहे तुमच्यासारखे लोक, एखादा कस्टमर गळ्यात अडकवून ठेवण्यासाठी काहीही सांगत असतात. त्यामुळे तुम्ही माझ्या आईला काहीही सांगू नका. एक्साक्यूज मी, मिस..... जे असाल ते पण पहिली गोष्ट की माझ्याकडे प्रचंड कस्टमर आहेत, कोणालाही अडकविण्यासाठी मी काहीही करत नाही, लोक माझ्याकडे स्वतःहून येतात. तुमच्या आई म्हणजेच मिसेस पत्की ही स्वतःहून माझ्याकडे आल्या होत्या आणि मी उगाच काही सांगत नाही, जे वाटतं आणि जाणवतं तेच बोलतो. तसंही तुम्हाला जर हे नको असेल तर तुम्ही ते तुमच्या आईला सांगा. बघा काही उपयोग होतो का. आणि काय म्हणालात तुम्ही ?? तुमच्या सारखे लोक म्हणजे ?? म्हणजे....तेवढ्यात तिथे मिसेस पत्की आल्या आणि म्हणाल्या सॉरी आदित्य मला फोन घ्यावा लागला म्हणून मी गेले. बायदवे ही माझी मुलगी निशा. झाली आहे आमची मिसेस पत्की, आदित्यने निशाकडे कटाक्ष टाकत म्हटले. मी तुम्हाला दोन दिवसात काय ते सांगेन. असे म्हणून आदित्य तिथून निघून गेला निशा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.


आज इतका उशीर का झाला आदी ?? त्याच्या आईने घरात येताच त्याला विचारले. आज आदी खूप थकल्यासारखा वाटत होता त्यांना. आज दिवसभरात काय काय घडले ते सगळे आदीने जेवत जेवत आईला सांगितले. त्यात त्याची आणि निशाची झालेली भेट अगदी जशीच्या तशी तो सांगून गेला. त्याची आई त्याच्याकडे बघुन हसत होती. तो ही क्षणभर गोंधळला आणि म्हणाला, आई तुला वाटते तसे काहीच नाही. तू उगाच भलता सलता विचार करतेस. तिला असे ज्योतिषतज्ञ लोक नाही आवडत. अरे ठीक आहे, पण म्हणून तिला तू आवडणार नाही असे नाही. आणि त्यासाठी मी हसलेच नाही, तुम्ही पहिल्याच वेळी ज्या प्रकारे भेटलात आणि भांडलात ते मी इमॅजिन करून हसले बाकी काही नाही. ते काहिजरी असल आई, तरीही मला तिथे काहीतरी चुकीचे जाणवले आहे, निशा संकटात येणार असे जाणवते आई. पण ही मुलगी माझ काही ऐकणार नाही हे स्पष्ट आहे. होईल सगळं ठिक तू काळजी करू नकोस , माझा तुझ्यावर आणि तुझ्या कामावर खूप विश्वास आहे. तू सगळं नीटच करशील आणि निशाला यातून बाहेर पण काढशील. जा जाऊन झोप आता खूप उशीर झाला आहे.


आदित्यने मिसेस पत्कीचे घर पाहून दोन दिवस झाले होते. त्याने केलेल्या अभ्यासावरुन त्याला तिथे भयानक दोष जाणवत होता. हा दोष मिसेस पत्की आणि खास करून त्यांची मुलगी निशाला जास्त संकटात टाकणारा होता आणि म्हणूनच आज मिसेस पत्कीना भेटायला तो पुन्हा त्यांच्या घरी जाणार होता, पण त्या आधीच मिसेस पत्की त्याच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. आदित्यला त्यांच्याकडे पाहून त्या कमालीच्या अस्वस्थ जाणवल्या. त्याने पाणी देऊन त्यांना जरा मोठा श्वास घ्यायला लावून रिलॅक्स केले पण त्या फारशा नॉर्मल झाल्या नाहीत. आदी म्हणाला मी तुमच्याकडे येणार होतो आज मिसेस पत्की.पण तुम्ही इतक्या अस्वस्थ का आहात ?? सगळे ठीक आहे ना ?? नाही आदित्य काहीच ठीक नाही, मिसेस पत्की म्हणाल्या. निशा, निशा कुठे आहे मिसेस पत्की ?? आदित्यने खूप घाईने हा प्रश्न मिसेस पत्कीना विचारला. मिसेस पत्किना त्याची निशाबद्दल जाणून घेण्याची धडपड पाहून जरा गडबडल्या पण लगेच स्वतःला सावरून म्हणाल्या, ती ऑफिसमध्ये गेली आहे. हे ऐकून त्याने मोठा श्वास सोडला आणि काय झाले ते विचारले.


परवा तू घरी येऊन गेलास ना, त्यानंतर ती रूम साफ करायला मी तिथे गेले होते, तर तिथे मला एक फोटो दिसला. कपाटात एका कोपऱ्यात तो पडला होता. कोणाचा होता काय माहित, म्हणून बघण्यासाठी तो मी उचलला तर अचानक तो फोटो म्हणजे त्यातील मुलगी जीवंत असल्याचा मला भास झाला. म्हणजे तो फोटो माझ्याकडे पाहून हसत आहे, असे मला जाणवले. मी हे निशाला सांगितले तर तिने मला चक्क वेड्यात काढले आणि डॉक्टरांना विचारून झोपेची गोळी देऊन झोपवले. काल पुन्हा त्या खोलीतून मला हसण्याचे, रडण्याचे भास व्हायला लागले हे निशाला सांगितले तेंव्हा मात्र निशा माझ्यावर चिडली आणि आज मीच त्या रूममध्ये तुला झोपून दाखवते असे म्हणून ऑफिसमध्ये गेली. मला खूप भीती वाटत आहे आदित्य.


क्रमशः

🎭 Series Post

View all