अव्यक्त प्रेमाची कथा.
पात्र रचना
संदीप आपल्या कथेचा नायक.
सुशीलाबाई संदीपची आई.
केशवराव संदीपचे वडील.
अभय संदीपचा मोठा भाऊ.
अश्विनी अभयची बायको.
रामलिंगम संदीपचे सहकारी.
रमेशकुमार संदीपचे सहकारी.
प्रसाद संदीपचे सहकारी.
विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष
भाग ३
भाग २ वरून पुढे वाचा ......
सर्व कारखान्यांमधे ट्रेनिंग झाल्यावर प्रत्येकाला एक एक फॅक्टरी सांभाळायला दिली होती. तिथे त्या त्या परदेशी अधिकाऱ्यांच्या मार्ग दर्शनाखाली स्वतंत्र पणे फॅक्टरी सांभाळायची होती. संदीपला फरीदाबाद च्या फॅक्टरीमधे काम करायचं होतं.
संदीपने सहाच महिन्यात सर्वच आघाड्यांवर पकड घेतली होती. आणि अशातच त्याच्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस उगवला. त्या दिवशी, म्हणजे ३ नोव्हेंबर १९८४ या दिवशी ऑफिस मधली कामं आटोपून दुपारी उशिरा, संदीप काही कामा साठी दिल्ली ऑफिसला आला होता, ऑफिस पाशी आल्यावर त्याला एकदम जाणवलं की दिल्लीची परिस्थिती काही वेगळीच आहे. सर्व दुकानं बंद होती, आणि रस्त्यावर टोळक्या टोळक्याने लोक आरडा ओरडा करत फिरत होते. दोनच दिवसांपूर्वी, पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती दोन दिवस दुखवटा होता पण सर्व काही तसं सुरळीत चालू होतं, पण आता परिस्थितीने एकदम वेगळंच वळण घेतलेलं दिसत होतं. ऑफिस तर बंदच होतं. आता काय करायचं, या विचारात तो होता. खाली आला पण सर्व दुकानं बंद होती, फोन करून विचारायचं तर आजू बाजूचे सर्व PCO बंद होते. सगळीकडे एक प्रकारची भयाण शांतता होती. वापस जायचं तर रिक्शा पण कुठे दिसत नव्हत्या, ज्या रिक्षेने तो आला होता, तिला सोडून दिलं होतं. थोडं पुढे गेल्यावर रिक्शा मिळेल असा विचार करून तो चालू पडला. दोन चौक पार केल्यावर त्याला दिसलं की बरीच दुकानं फोडलेली आहेत, रस्त्यावर खूप कचरा पडलेला आहे. जाळपोळीच्या घटना झाल्या असाव्यात अश्या खुणा जागो जागी दिसायला लागल्या होत्या. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. जीव मुठीत धरून तो चालत होता. इतक्यात बाजूच्या छोट्या गल्लीतून बराच मोठा जमाव धावत आला. त्यांच्या हातात मशाली होत्या, तलवारी होत्या, पेट्रोल ने भरलेले जेरी कॅन होते, बऱ्याच लोकांजवळ दगड होते आणि ते दिसेल त्या दुकानावर फेकून मारत होते. आणि प्रचंड आरडा ओरडा करत तो जमाव दुकानांचे शटर तोडायला लागला.
आता संदीपने पण जीव मुठीत धरून पाळायला सुरवात केली. बाजूच्या गल्लीतून काही सरदार येत होते, पण जमावाला पाहून ते पळत सुटले आणि जमाव त्यांच्या मागे. काटो, मारो अश्या आरोळ्या देत जमाव धावला. सगळी कडे पळापळ सुरू झाली होती. दुकानाच्या मागे असलेल्या घरांमध्ये लोकं घुसले. संपूर्ण परिसरात नुसत्या किंचाळ्या ऐकू येत होत्या. परिस्थिती बिकट होती. कोण कोणाच्या जीवावर उठलाय हेच कळत नव्हतं. संदीपला पळताना पाहून काही लोकं त्याच्या मागे धावले. संदीपला कुठल्या रस्त्याने धावतो आहे याचं भानच नव्हतं. जीव वाचवण्या साठी नुसता वाट फुटेल तिकडे पळत सुटला होता. संदीप जिवाच्या आकांताने पळत होता, जमाव काही त्याची पाठ सोडायला तयार नव्हता. तास दोन तासांच्या पळा पळी नंतर तो थकला, धाप लागली, अंधार पडला होता, वीज गायब होती, सर्व दूर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. त्या अंधारात जमावाचा आरडा ओरडा हृदयात धडकी भरवत होता, आता जमावानी मशालीच्या उजेडात संदीपला शोधायला सुरवात केली होती. संदीपच्या पायातली शक्ति आता संपली होती. धावता धावता संदीप एक फुटलेल्या दुकानात शिरला, लपण्यासाठी जागा शोधत होता, काऊंटरच्या मागे एक बाक होता, त्याच्या खाली जाऊन संदीप लपला. त्याच्या मागोमागच जमाव तिथे आला, उरल सुरलं काऊंटर आणि मागची काचेची कपाटं जमावाने फोडून टाकली, संदीप बेंच च्या खाली एका कोपर्यात अंगाचं मुटकुळं करून श्वास रोखून बसला होता, मशाली आता विझत आल्या होत्या. कुठेच वीज नसल्याने पूर्ण काळोख झाला होता, शेवटी लोकांनी संदीपचा नाद सोडला, आणि ते नारे देत निघून गेले.
गुंडांच्या टोळ्या तिथून पसार झाल्यावर, सुद्धा बराच वेळ संदीप तसाच अवघडलेल्या अवस्थेत बसून राहिला. दुकानातून जरी लोकं गेले असले, तरी बाहेर बराच गोंधळ अजूनही चालू होता. कुठल्याही क्षणी ते पुन्हा दुकानात येतील अशी भीती संदीपला वाटत होती, म्हणून तो हालचाल न करता तसंच बसून होता. थोड्या वेळाने जमावाचा अजून एक लोंढा आला, त्यांच्या हातात नव्याने पेटवलेल्या मशाली होत्या. संदीपला दिसत होतं आणि संदीपचा जीव भीतीने थोडा थोडा होत होता. त्या गर्दीने बाहेर जे काही सामान होतं ते एका बाजूला ढिगारा करून पेटवून दिला, आणि मग विजय झाल्याच्या आवेशात ते पुढच्या गल्लीत निघून गेले. थोड्या थोड्या वेळाने दुसरे, दुसरे जमाव येतच होते. बऱ्याच वेळानंतर थोडं वातावरण शांत झालं. मग काही वेळ वाट पाहून संदीप बाहेर निघाला. पूर्ण शरीर अवघडून गेलं होतं, इथे दुकानात पोचायच्या अगोदर तो नुसता या गल्लीतून त्या गल्लीत पळत होता, त्यामुळे तो नेमका कुठे आहे यांचा अंदाजच त्याला येत नव्हता. बाहेर पडण्या आधी तो कानोसा घेत होता, तेवढ्यात त्याला पुन्हा दंगेखोरांचा आवाज ऐकू आला. एक टोळी त्याच रस्त्यावरून येत होती.
दूर रस्त्यावर दंगेखोरांनी जी होळी पेटवली होती, ती आता विझत आली होती, पण तिच्या अंधुक उजेडात, त्याला दिसलं की काऊंटर च्या मागे जी काचेची कपाटं होती, त्यामध्ये एका ठिकाणी एक फट होती, जवळून पाहिल्यावर लक्षात आलं की तो सरकता दरवाजा होता. कदाचित त्याच्या आत मधे मागच्या बाजूला छोटी स्टोर रूम असेल, आणि तिथे सकाळ पर्यन्त लपता येईल असा विचार करून त्यांनी दरवाजा ढकलला आणि आत जाण्या साठी पाऊल टाकलं, इतक्यात त्याला पाठी मागून कोणी तरी जोरात धक्का दिला. संदीप त्या धक्क्या मुळे आतल्या फारच छोट्या खोलीत असलेल्या रॅक वर आदळला आणि खाली पडला. प्रकाश फारच अंधुक होता, तरी त्याला त्या प्रकाशात दिसलं की एक मुलगी आत मधे आली आणि तिने तो सरकता दरवाजा लावून टाकला आहे. ती फार घाबरली होती आणि अजूनही धापा टाकत होती. संदीपच्या लक्षात आलं, की ती सुद्धा जीव वाचवण्यासाठी धडपडते आहे म्हणून. ती थोडी शांत झाल्यावर बघू, असा विचार करून तो गप्पच बसला.
*****
शलाका त्या दिवशी खूपच आनंदात होती, तिचा M.Sc. चा आज रिजल्ट लागला होता आणि ती फर्स्ट क्लास मधे पास झाली होती. केंव्हा एकदा ही आनंदाची बातमी घरी सांगते, असं तिला झालं होतं. अपेक्षे प्रमाणेच घरी सर्वांनाच आनंद झाला होता. तो दिवस शलाकाचा होता, तिच्या आवडीचे पदार्थ बनले, वडीलांनी आणि भावानी तिला गिफ्ट दिलं. तिच्या वाहिनीनी तिच्या आवडीचा मुगाचा हलवा केला होता. रात्री शलाकानी पुढे काय करायचं यावर बराच खल झाला. सर्वांचा आता तिच्या साठी मुलगा पाहायला सुरवात करावी असाच सुर होता. शलाकाची पण काही हरकत नव्हती. लग्न तर करायचंच होतं. नोकरी करायचीच असा काही तिचा हट्ट नव्हता. मग तिचं एक छान फोटो सेशन झालं. शलाका खूप सुंदर नसली, तरी चार चौघीत उठून दिसणारं व्यक्तिमत्व तिला लाभलं होतं. हसतांना तर ती फारच आकर्षक दिसायची. लगेच वधू वर सूचक मंडळात तिचं नाव पण नोंदवून झालं.
आता रोजच्या रोज विवाह मंडळाच्या साइट वर बघणं चालू झालं. चर्चा सुरू झाल्या. पाहता पाहता दोन तीन महीने निघून गेले. शलाकाची एक पंजाबी मैत्रीण होती, तिचं लग्न ठरलं. लग्न दिल्लीला होतं आणि त्या मैत्रिणीचे आई, वडील शलाकाच्या घरी येऊन निमंत्रण देऊन गेले. वराती बरोबर शलाकाला घेऊन जाऊ म्हणत होते, लग्न लागल्यावर त्यांच्याच बरोबर शलाका पण येईल अशी आग्रहाची विनंती करून गेले.
शलाकाच्या दिल्लीला एकटी जाण्यावरून बरीच चर्चा सत्र, घरात झडली. पण शेवटी शलाकाला परवानगी मिळाली. लग्नासाठी खरेदी करून झाली आणि मैत्रिणीच्या कुटुंबा बरोबर एक दिवस शलाका दिल्लीला रवाना झाली. मंडळी दिल्लीला पोचली त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंत प्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. दोन दिवस संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. दुकानं बंद होती. तिसर्या दिवशी बाजार उघडला, आणि शलाका आणि तिच्या मैत्रिणी शॉपिंग करायला बाहेर पडल्या.
ते लोकं मार्केट मधे असतांनाच एकदम माहौल बदलला. आगडोंब उसळला. एका मागोमाग टोळ्या बाजारात येऊन हैदोस घालायला लागल्या. मारो पीटो, काटो चे नारे लागायला सुरवात झाली. ह्या मुली ज्या दुकानात होती, त्या दुकानात लोकं घुसले आणि हातातल्या लोखंडी कांबी आणि सळाकींनी दुकानांची नासधूस आणि तोडफोड करायला सुरवात केली. विरोध करणाऱ्या दुकानाच्या मालकाला कोणी तरी भोसकलं, तो बिचारा रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. दुकानात जेवढे लोकं होते, त्या सर्वांची एकच पळापळ सुरू झाली. या मुली पण त्यांच्याच बरोबर बाहेर पडल्या. आता संध्याकाळ झाली होती अचानक त्या परिसरातली वीज गेली. सगळी कडे अंधार पसरला. या मुली घाबरून पळत होत्या, आजू बाजूला नुसता धिंगाणा चालू होता, पळता पळता एकमेकींचे धरलेले हात सुटले, आणि भान न राहून सर्वच वाट फुटेल तिकडे पळत सुटले, कसही करून जीव वाचवणं महत्वाचं होतं. शलाकाला दिल्लीची काहीच माहिती नव्हती, ती प्रथमच दिल्लीला आली होती. तिला अंदाजाच येत नव्हता की ती कुठे आहे आणि कुठे चालली आहे ते. दंगा पेटला होता आणि गुंडांच्या हातात सापडू नये म्हणून शलाका सैरा वैरा पळत सुटली होती. पळता पळता, त्या अंधुक उजेडात तिला दिसलं की, एका दुकानात एक माणूस दार उघडून आतल्या खोलीत जातो आहे, शलाकाने क्षणाचाही विचार न करता तिकडे मोर्चा वळवला आणि त्या माणसाला ढकलून आत शिरली आणि दार खेचून लावून घेतलं. आत मधे पूर्ण काळोख होता. ज्याला ढकललं, तो माणूस आत कशावर तरी धडकला आणि खाली पडल्याचं तिला जाणवलं. या सर्व पळापळीत शलाकाला धाप लागली होती आणि तिचा श्वास जोरात चालू होता.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा.