अव्यक्त प्रेमाची कथा भाग ६ (अंतिम)

संदीपची आई आणि अश्विनी दोघीही खुश होत्या. संदीपला छान बायको मिळाली याचं समाधान त्यांच्या चेहऱ?

अव्यक्त प्रेमाची कथा.

पात्र रचना

संदीप                आपल्या कथेचा नायक.

सुशीलाबाई            संदीपची आई.

केशवराव              संदीपचे वडील.

अभय               संदीपचा मोठा भाऊ.

अश्विनी              अभयची बायको.

रामलिंगम             संदीपचे सहकारी.

रमेशकुमार            संदीपचे सहकारी.

प्रसाद                संदीपचे सहकारी.

विश्वनाथन साहेब       कंपनीचे उपाध्यक्ष

शलाका               आपल्या कथेची नायिका

भाग ६ (अंतिम)   

भाग ५ वरून पुढे वाचा  ...... 

“शलाका, मघाशी तू अगदी हलक्या स्वरात म्हणाली की सॉरी सर, मी असं विचारायला नको होतं, हे पुन्हा त्याच स्वरात म्हणशील?” – संदीप.

आता शलाका चिडली, खरं तर तिला संदीप बद्दल खूपच चांगला रीपोर्ट मिळाला होता, पण मिळालेली माहिती आणि आत्ताचं त्याचं वागणं यांचा काही ताळमेळच तिला बसवता येईना. “तुम्ही काय बोलत आहात सर, मला तर, काहीच कळत नाहीये.” शलाका म्हणाली. तिने अत्यंत संयमाने राग आवरला आहे हे तिच्या स्वरातून स्पष्ट होत होतं. संदीपला कळलं की ती चिडली आहे म्हणून. तो घाई घाईने म्हणाला “हे बघ शलाका, गैरसमज करून घेऊ नकोस, I am just trying to recollect. मी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे. अजून काही नाही.”

“काय आठवण्याचा प्रयत्न करता आहात सर?” आता तिचा स्वर सामान्य होता. संदीपला सुटल्या सारखं झालं. तो म्हणाला “सांगतो सर्व सांगतो पण आधी तू म्हण.”

“सॉरी सर, मी असं विचारायला नको होतं” शलाका हलक्या स्वरात म्हणाली.

संदीपने चुटकी वाजवली. “यस, आठवलं. पण निश्चित तोच प्रसंग आहे याची खात्री करण्या साठी, अजून एक मी सांगतो ते वाक्य म्हण.”- संदीप म्हणाला. आता शलाकाला पण त्यात इंट्रेस्ट आला होता, तिची पण जाणून घेण्याची उत्सुकता वाढली होती.

“कोणचं वाक्य?” – शलाका.

“आप ठीक तो हैं ना?” हे ते वाक्य.” – संदीप.

आता शलाकाला समजेना की संदीपच्या मनात काय आहे ते. ती म्हणाली, “सर मी म्हणते तुम्ही सांगितलं तसं, पण प्लीज मला सांगा की हा काय प्रकार आहे ते, मला हे हिंदीतलं वाक्य .. आणि ती थांबली, तिच्या डोळ्यापुढे दिल्लीतला प्रसंग चमकून गेला. त्या माणसांनी तिच्या या प्रश्नावर काय म्हंटलं होतं ते सुद्धा तिला स्वच्छ आठवत होतं. ती आता एकदम हळवी झाली. आता संदीप काय उत्तर देतो हेच बघायचं होतं.

“आप ठीक तो हैं ना?” शलाका हळव्या, काळजीच्या स्वरात बोलली.

“आठवलं, अगदी सूर्य प्रकाशा सारखं स्वच्छ आठवलं.” संदीप म्हणाला. “शलाका पृथ्वी गोल आहे. माणसं अचानक, ध्यानी मनी नसतांना भेटतात.”

“सर मला प्रश्न विचारायला लावला, पण त्याचं उत्तर पण दिलं तर बरं होईल.” शलाका बोलली. तिचा सुर तसाच हळवा होता.

“ऐक, उत्तर पण ऐक.” संदीप म्हणाला. “मैं ठीक हूँ, और आपभी बात मत कीजिए, आवाज बाहर जाएगी, तो लोग अंदर घुसनेमे देर नहीं करेंगे.”

हे ऐकल्यावर शलाकाचा बांध फुटला. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या, जखमा पुन्हा भळभळून वाहायला लागल्या. ती हमसून हमसून रडायला लागली. संदीप उठला तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर हलकेच थोपटलं, “शांत हो शलाका, आपण ऑफिस मधे आहोत, बाहेर आवाज गेला तर लोकं आत येतील. त्यांना समजावणं अवघड होऊन बसेल. शलाकांच्या पण ते लक्षात आलं. ती भानावर आली, पर्स मधून रूमाल काढून तिने चेहरा पुसला. दोन मिनिटं शांततेत गेली.

“सर नुसत्या आवाजावरून तुम्ही ओळखलं? की ती मीच आहे म्हणून?” – शलाका.

“आयुष्यातला हा प्रसंग इच्छा नसतांना मनावर शिलालेखा सारखा कोरल्या गेला आहे. मी त्या वेळेस तुझं रक्षण करू शकलो नाही, हे ओझं मनावर घेऊनच जगतो आहे मी.” संदीप म्हणाला. हे बोलताना त्याचा स्वर आता घोगरा  झाला होता. चेहरा कोमेजला होता.

कोणी तरी दरवाज्यावर टक टक केलं

“या आत. या” संदीप म्हणाला.

शिपाई चहा घेऊन आला होता, म्हणाला “ सर सगळे कॉनफरन्स हॉल मधे जमले आहेत. तुम्हाला अजून किती वेळ आहे असं घाटगे सर विचारात होते.”

“चहा घेऊन आलोच.” – संदीप.

“आपण आज रात्री जेवायला जायचं का? मला खूप काही बोलायचं आहे. ऐकायचं आहे.” – संदीप.

शलाका विचारात पडली, ते पाहून, संदीप म्हणाला “नसेल जमत, तर राहू द्या, मी आग्रह करणार नाही.”

“सर, सगळे वाट पाहताहेत, आत्ता आपण हॉल मधे जाणं जास्त जरुरीचं आहे. मग म्हणाली की मला तुमचा फोन नंबर द्या, नाही तर असं करा न, आपलं विजिटिंग कार्ड संदीपला देऊन म्हणाली, मला साडे नऊ नंतर फोन करा. त्या वेळेस मी मोकळी असते.” असं म्हणून ती उठलीच. नाइलाजाने संदीप पण उठला.

रात्री संदीपने फोन केला. “मी संदीप बोलतो आहे. मोकळ्या आहात न?”

“हो आत्ताच जेवणं झालीत. बोला न सर, काय बोलायचं होतं?” – शलाका.

“खूप काही बोलायचं आहे, पण शब्दच जुळत नाहीयेत. कसं बोलावं तेच कळत नाहीये” – संदीप. संदीपच्या मनाची काय अवस्था झाली असेल, यांची कल्पना शलाकाला आली. तिची पण अवस्था काही वेगळी नव्हती. इतक्या वर्षांनंतर दोघं अचानक भेटले होते, तसे एकमेकांना अनोळखीच होते, एकाच रात्रीची ओळख होती, पण त्या रात्री   इतकं काही घडून गेलं होतं की ती एका रात्रीची ओळख सुद्धा जवळची वाटत होती. कशी सुरवात करावी, हेच कळत नव्हतं. पण बोलायचं तर होतं.

“सर, उद्या शनिवार आहे, सुट्टी आहे. आपण लंचला जाऊ शकतो” – शलाका

“सकाळी मला जमणार नाहीये, आमच्या मिटिंगा आहेत, रात्री चालेल?” – संदीप.

“रात्री उशीर होईल सर, मग आई बाबा काळजी करतील.” – शलाका.

“मी घ्यायला येतो आणि परत सोडून पण देईन. मग तर हरकत नाही?” -संदीप.

“चालेल. आठ वाजता?” – शलाका.

“डन.” – संदीप.

“संदीप, उद्या सुट्टी आहे ना, काय करायचं आहे, तुझ्या आवडीचा बेत सांग.” वहिनी विचारात होती.

“वहिनी, उद्या दुपारी तीन वाजे पर्यन्त मिटिंगा चालणार आहेत, आणि रात्री मला बाहेर जेवायला जायचं आहे.” संदीप म्हणाला.

अभयनी म्हणजे त्यांच्या मोठ्या भावाने विचारले, “काय रे, कधीच बाहेर जेवायला न जाणारा मुलगा आज कसा काय बाहेर?”

“चार महिन्या पूर्वी एक मुलगी आमच्या फॅक्टरीत जॉइन झाली. काल सर्वांशी माझ्या मिटिंगा होत्या, तशीच तिच्या बरोबर पण होती. तिचा आवाज ऐकल्यावर मी तिला ओळखलं आणि तिने पण मला माझ्या आवाजावरून ओळखलं. उद्या तिच्याच  बरोबर जेवायला जाणार आहे.” – संदीप.

“म्हणजे? आवाजावरून ओळखलं म्हणजे, तू तिला पाहीलं नव्हत? काय प्रकार आहे हा?” आता आईने आश्चर्याने विचारले.

मग संदीपनी प्रथमच सर्वांना दिल्लीची कथा सांगितली. ऐकून सर्वांनाच धक्का बसला. शलाका बद्दल हळहळ वाटत होती. सर्वांचेच चेहरे विदीर्ण झाले होते.

“मग” – बाबा.

याच प्रसंगाचं ओझं दोघांच्याही मनावर होतं. ती म्हणाली की “सत्य कळल्यावर कोणी तयार होणार नाही, आणि सत्य न सांगता, अंधारात ठेवून लग्न करायचं नाही.” म्हणून त्या वाटेला जायचंच नाही असं ठरवलं होतं तिने.” -संदीप

“मला ती मुलगी एकदमच आवडून गेली, मला तिच्याशी लग्न करायचं आहे.” -संदीप  

“आणि त्याबद्दल आम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायच आहे तुला?” – अश्विनी.

“हो” – संदीप.

आता वातावरण जरा गंभीर झालं होतं. थोडा वेळ सर्वच विचार करत होते, मग बाबाच बोलले, “तिच्यावर जी आपत्ति ओढवली, त्यात तिचा बिचारीचा काहीच दोष नाहीये, पण आपला समाज फार विचित्र आहे, उद्या जर एखाद्याने ही गोष्ट षट्कर्णी केली, तर त्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाण्याची तयारी आहे का तुझी? त्या वेळी, बायकोच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याची हिम्मत आहे का? अपराधीपणाची खंत किंवा  उपकाराच्या भावनेने हा निर्णय घेतला असेल, तर अजून वेळ गेलेली नाहीये, खूप विचार कर आणि मगच निर्णय घे.”

“हो बाबा, मी सर्व विचार केला आहे. खरं सांगायचं तर ओळख पटली, आणि मी तिच्या प्रेमातच  पडलो.” – संदीप.

“ठीक आहे, माझी संमती आहे.” – बाबा.

आई, अश्विनी, म्हणजे अभयची बायको आणि अभयनी पण होकार भरला. मग बाबा म्हणाले की, “लग्न झाल्यावर चुकूनही हा विषय घरात नको निघायला. कुठल्याही परिस्थितीत याचा उच्चार होता कामा नये. हे सर्वांनीच लक्षात ठेवणं फार फार जरूरी आहे.” संदीप लग्न करणार म्हंटल्यांवर सर्वांनाच खूप उत्साह आला.

दुसऱ्या दिवशी रात्री, संदीप ८ वाजता शलाकाला घ्यायला गेल्यावर तिने आई, वडीलांची ओळख करून दिली. थोडा वेळ बोलल्यावर, दोघं निघाले.

“कुठे जाणार आहोत आपण, एखाद्या निवांत हॉटेल मधे जाऊया, जिथे आपल्या कंपनीतले कोणी नसतील.” – शलाका.

दोघंही बोलत होते. बऱ्याच गोष्टी परस्परांना कळल्या. जेवण झाल्यावर सुद्धा बाहेर येऊन कार पाशी बोलत उभे होते. बोलता बोलता शलाका म्हणाली की “म्हणून सर मी लग्न नाही केल. पण सर, तुम्हाला तर असा काही प्रॉब्लेम नव्हता, तुम्ही का नाही केलं?”

“त्या घटनेचं माझ्या मनावर फार ओझं होतं. अगणित रात्री झोपेविना गेल्या, पुरुष असूनही मी तुला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवू शकलो नाही, तुझं नाव गाव तर काहीच माहीत नव्हतं, तू भेटण्याची पण शक्यता मुळीच नव्हती अश्या परिस्थितीत मी लग्नच करायचं नाही, असा निर्णय घेतला. नेमकं काय घडलं हे कोणालाच माहीत नाही, त्यामुळे घरच्यांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला पण घेतला, पण मी कोणालाच काही सांगितलं नाही. असं आहे सगळं.” – संदीप.

“पण आता मी सांगते आहे, तुम्ही तुमच्या परीनी खूप केलं, स्वत:चा जीव पण धोक्यात घातला, मला दिसत होतं की तुमच्या डोक्यातून एखाद्या नदी प्रमाणे रक्त वाहत होत, मी तर समजत होते की तुम्ही या जगातच नाही आहात, पण देवाची कृपाच म्हणायची आणि तुम्ही वाचलात. म्हणून, आता तो विचार मनातून काढून टाका.” – शलाका.

“ठीक आहे करतो प्रयत्न.” – संदीप.

संदीप मग शलाकाला सोडण्यासाठी तिच्या घरी गेला. दिवे चालू होते, म्हणजे आई, बाबा जागे होते. तिची वाटच पाहत होते. “कॉफी घेणार?” शलाकानी विचारलं.

संदीप तिच्याकडेच बघत होता, ती अवघडून गेली. “चला सर, फारसा उशीर नाही झालेला.” शलाका  म्हणाली.

कॉफी पिता पिता संदीप अचानक शलाकाच्या बाबांना म्हणाला, “बाबा, शलाका ज्या कंपनीत आहे, त्या कंपनीत मी जनरल मॅनेजर आहे, हे तुम्हाला माहीतच आहे, आम्ही नाशिकचेच. आमचं येथे घर आहे. मला शलाकाशी लग्न करायची इच्छा आहे.” एका दमात संदीप बोलला.

शलाकाचे आई, बाबा, संदीपने अचानक केलेल्या वक्तव्यामुळे हतबुद्ध झाले. त्यांनी शलाका कडे बघितलं. ती पण गोंधळली होती, संदीप असं काही बोलेल याची तिने कल्पनाच केली नव्हती.

“तुमचं बरोबर आहे, पण आमची शलाका लग्नाला मुळीच तयार नाहीये.” – बाबा.

“ते मला माहीत आहे. पण तरी सुद्धा तुम्ही आणि शलाकाने माझ्या बोलण्याचा विचार करावा असं मला वाटतं.” आणि एवढं बोलून तो जाण्या साठी उठला.

त्याला सोडण्या साठी शलाका पण बाहेर आली. “शलाका तू विचार करावास अशी माझी विनंती आहे.” – संदीप.

शलाका त्यांच्या कडे बघतच राहिली. तिला कळेच ना की काय बोलावं ते.

“काय शलाका, मी काय म्हणतो आहे?” - संदीप.

“सर, असं एकदम कसं विचारलं तुम्ही बाबांना?” -शलाका.

“का? काय झालं? मी काही चुकीच बोललो का?” – संदीप.

अहो, पण आधी, मला तरी विचारायचं? तुम्हाला माहीत आहे, मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे ते.” – शलाका.

“नाही शलाका तुझा निर्णय लग्न न करण्याचा नव्हता.” – संदीप.

“कमाल आहे, निर्णय माझा, आणि तुम्ही म्हणताय की नाही म्हणून? मग काय निर्णय होता? मला कळू तरी द्या.” – शलाका.

“सत्य कळल्यावर कोणी तयार होणार नाही, आणि सत्य न सांगता, अंधारात ठेवून लग्न करायचं नाही. हा तुझा निर्णय होता.” – संदीप.

“म्हणजे तेच झालं ना.” – शलाका.

“नाही तेच नाही. एक म्हणजे मला सत्य माहीत आहे, तू सांगण्याची जरूर नाही, आणि माझी तयारी असण्याचा प्रश्नच नाही. माझी ती मनापासून इच्छा आहे. मला स्वत:लाच कल्पना नव्हती, पण तू भेटल्यावर मला एकदम ज्ञान प्राप्त झालं, की मी तुझ्याच साठी इतकी वर्ष मी थांबलो आहे.” – संदीप. “आणि अजून एक, तुझी माझ्या बोलण्याला संमती नसती तर तू माझ्याशी इथे बोलत उभीच राहिली नसतीस. तेंव्हा किंतु, परंतु विसरून जा आणि हो म्हण.” – संदीप.

“तुम्ही कोणालाच माझ्या बद्दल सांगीतलेलं नाही, आणि त्यांना अंधारात ठेवून मला पुढे जायचं नाही. हे बघा, माझ्या बाबतीत जे काही घडलं, ते पचनी पडणं फार अवघड आहे, त्यामुळे, घरच्या मंडळींचा नकार असू शकतो.” शलाका जरा ताठरपणेच बोलली.

मला नाही वाटत असं काही होईल म्हणून तू चिंता करू नकोस.” – संदीप.

“मला कसं कळेल, काय प्रतिक्रिया आहे ते? सर्वांचा विरोध पत्करून, वेगळं राहण्यात मला इंट्रेस्ट नाहीये, जर तुमच्या घरच्या लोकांना मान्य नसेल, तर आपण इथेच थांबूया.” – शलाका.

“खरं सांगू? मी येतांनाच सगळं बोलून आलो आहे. आमच्या घरचे संस्कार वेगळे आहेत. सगळे तुला भेटायला खूप उत्सुक आहेत. खूप पॉजिटिवली घेतलं आहे सर्वांनी.”– संदीप.

हे ऐकल्यावर शलाकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कृतक कोपाने ती म्हणाली, “संदीप तुमची कमाल आहे. एखाद्या मुलीला असं प्रपोज करतात? अख्ख्या जगा मधे इतक्या रुक्ष पणे मागणी घालणारे, संदीप तुम्ही एकटेच असाल. अरे, थोडे तरी रोमॅंटिक असायला हवे होते तुम्ही, शब्दांमधे प्रेमळ भावनांचा फुलोरा हवा होता, अंगावर रोमांच उठायला हवे होते, तसं काहीच झालं नाही, एखाद्या ट्रक ड्रायव्हरला मालाच्या बाबतीत सूचना द्याव्यात, त्यासं प्रपोज केलं तुम्ही! आयुष्यात एकदाच येणार्‍या, एका सुंदर क्षणाचा तुम्ही पाचोळा करून टाकलात. अश्या रूक्ष माणसाला मी जन्माचा जोडीदार म्हणून स्वीकारू? कसं शक्य आहे. नो वे” – शलाका.

“मला उत्तर मिळालं, उद्याच मी आई, बाबांना घेऊन तुमच्याकडे येतो.” – संदीप.

“ओ, हॅलो, मी अजून हो म्हंटलं नाहीये, उगाच तुमचे आई बाबा निराश होतील.” शलाका

“हरकत नाही, उद्या सकाळी ११ वाजता, चालेल ना?” – संदीप.

“आता तुमचं एवढा अग्रहच असेल तर चालेल. पण बघा हं रिस्क आहे.” शलाका.

“उद्या सकाळी ११ वाजता. चालेल ना?” – संदीप.

“चालेल, मी वाट बघते.” – शलाका.

संदीप म्हणाला “निघतो मी, एकदा हसून गुड नाइट म्हण ना मग मी निघतो.”

शलाकानी मग खरंच एक मधाळ हास्य केलं, एक डोळा मिचकावला आणि गुड नाइट म्हणाली. संदीप अस्मानात तरंगायलाच लागला, त्याला पावती मिळाली होती.

संदीप गेल्यावर शलाका घरात आली. आई बाबा आपसात बोलत होते. कोणी तरी शलाकाला मागणी घातली होती, त्याचाच त्यांना आनंद झालेला दिसत होता.

“शलाका अग आधी काही बोलणं झालं होतं का तुमचं?” बाबांनी विचारलं.

“नाही हो बाबा, काल प्रथमच ते फॅक्टरी व्हिजिटला आले होते, माझी आणि त्यांची कालच ओळख झाली. काल पर्यन्त आम्ही एकमेकांना पाहीलं पण नव्हतं.” – शलाका

अरे, मग आज एकाच दिवसांत सगळं ठरलं? तुम्ही लोकं कामच करायला जाता न ऑफिस मधे? – बाबा.

मग शलाकाने  त्यांना ४-५ महिन्यांपूर्वी घडलेला मॉल मधला प्रसंग सांगीतला. “त्या दिवशी ते म्हणाले, की माझा आवाज ऐकल्या सारखा वाटतो आहे पण कुठे ते आठवत नाहीये. मला पण तसंच वाटत होतं पण मी फारसा विचार केला नाही. मग मी नोकरी बदलली, आणि आज त्यांची व्हिजिट होती. आम्ही दुपारी ४ वाजता भेटलो, माझा आवाज ऐकल्यावर त्यांना आणि त्यांचा आवाज ऐकल्यावर मला पण सर्व सूर्य प्रकाशा सारखं स्वच्छ आठवलं.” शलाका सांगत होती.

“अग काय आठवलं ते सांग न” – बाबा

“दिल्ली. बाबा, दिल्ली. हेच माझ्या बरोबर होते त्या रात्री. यांनीच माझं रक्षण करण्या साठी आपल्या जिवाची पण पर्वा केली नाही.” -शलाका.

****

संदीप घरी पोचला, तेंव्हा सगळे वाटच बघत होते. मग संदीपनी सगळं सांगितलं आणि म्हणाला की “उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या घरी जायचं आहे.” सगळ्यांनी मान डोलावली. अश्विनी म्हणाली की “अरे फोटो तर दाखव, बघू तरी दे माझी जाऊ कशी आहे ते” पण संदीप जवळच  फोटो नव्हता, तर दाखवणार काय?

फोनची रिंग वाजली. कोण असेल एवढ्या रात्री, असं म्हणतच संदीपने फोन उचलला.

शलाकाच बोलत होती. संदीपने फोनवर घराचा पत्ता सांगीतला, आणि फोन ठेवला.

“शलाकाचा फोन होता, तेच लोकं येणार आहेत.” – संदीप.

मग सर्वच गोष्टी यथासांग पार पडल्या. शलाकाच्या आई वडीलांना जावई एकदम पसंत होता. शलाका सारख्या सुस्वरूप आणि हसतमुख मुलीवर असा दुर्धर प्रसंग यावा याची संदीपच्या आई, बाबा आणि भाऊ आणि वाहिनी सर्वांनाच हळहळ वाटली, पण संदीपची आई आणि अश्विनी दोघीही खुश होत्या. संदीपला छान बायको मिळाली याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच होतं. लग्नानंतर शलाकाने नोकरी करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. मुंबईला त्यांचं हॅपी मॅरीड लाइफ सुरू झालं होतं.

****समाप्त****

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा.

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187