गोष्ट एका आयुष्याची भाग 2 - बालपण

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..
2. बालपण

"नाव काय ठेवायचं आपल्या बाळाचं", जान्हवीने अविनाशने विचारलं.


"आगम्या", कसं वाटतं? अविनाशने विचारलं.


"अरे किती ते कठीण. सोपं सांग की जरा", शालिनीताईंनी सुचवलं.


"अगं आई बाळाचा जन्मच मुळी देवाच्या कृपेने झालाय. आगम्य म्हणजे न कळणारे, त्याची कृपा म्हणून आगम्या." अविनाशने समजावलं.


"बरं बाबा, लेक तुमची. तुम्हाला जे आवडेल ते नाव ठेवा. " शालिनीताईंनी जरा नाराजीच्या सुरातच म्हटलं आणि त्या तिथून उठून गेल्या.


"अगं आई. " अविनाशने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मागे वळून पाहिलंही नाही.


"अविनाश, आईंना नसेल आवडलं तर आपण दुसरं नाव ठेवू. उगाच नावामुळे त्यांच्या मनात बाळाविषयीं तिरस्कार नको निर्माण व्हायला. " जान्हवी अविनाशला काळजीच्या स्वरात म्हणाली.


"माझं ठरलंय, आगम्याचं नाव ठेवायचं. " अविनाश ठाम होता.


न जाणो का, जान्हवीच्या मनात शंकेची पाल चुकचूकली.


आपल्या बाळावर सगळ्यांनी प्रेम करावं, इतकीच अपेक्षा होती त्या माऊलीची.


बारशाचा दिवस उजाडला. तेव्हाही जान्हवी अविनाशला समजावत होती, "अविनाश आपण जे नाव ठेवतो त्या नावातला काही ना काही अंश त्या बाळाच्या वागण्यात दिसतो."


अविनाशला आनंदापुढे जान्हवीचे काळजीचे स्वर ऐकू येईनासे झाले होते.


सगळं साग्रसंगीत सुरु होतं. अविनाशने बारशात कसलीच कसर ठेवली नव्हती.


सगळं घर सजलं होतं पण जान्हवीचं मन मात्र काळजीने कोमेजलं होतं.

अखेर तो क्षण आला. आणि मोठ्या थाटात अविनाशने आपल्या लाडक्या लेकीचं नाव जाहीर केलं तसा टाळ्यांचा कडकडाट झाला.

सगळेजण बारशाच्या आनंदात होते फक्त शालिनीताई आणि जान्हवी सोडून.


"आई जेवून तरी घ्या", जान्हवीने शालिनीताईंना सांगितलं.


"मला नकोय. तूच जेव." शालिनीताई रागातच बोलल्या.


"जान्हवी, आई, इथे काय करताय तुम्ही? चला बाहेर फोटोशूट करायचंय. " अविनाशने त्या दोघींना बोलावून नेलं.


शालिनीताईंनी आधी नकार दिला पण अविनाशच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही.


🎭 Series Post

View all