तिच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट

Story of a divorcee woman

तिच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट
सिद्धी भुरके ©®

"अरे नवऱ्याने सोडलेली ही बाई... आणि त्यात तुझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठी...तुला जगात हीच मिळाली होती का प्रेम करायला??" विमलताईंचा पारा चढला होता.. आपल्या मुलाचं म्हणजेच सारंगचं एका घटस्फोटीत आणि वयाने मोठ्या असलेल्या रुपालीवर प्रेम आहे हे समजताच त्या गावाहून मिळेल ती गाडी पकडून पुण्याला आल्या होत्या. रुपालीच्या घरात त्या तिघांची बोलणी सुरु होती.

"अगं आई हे काय बोलतीयेस??"सारंग विमलताईंना म्हटला.

"एक मिनिट सारंग.. मला बोलू दे.."तितक्यात रुपाली म्हणाली.

"काकू..पहिली गोष्ट म्हणजे मला नवऱ्याने सोडले नाही तर त्याला मी सोडले.. आणि हो मी आहे वयाने मोठी.. पण आजकाल अशी कितीतरी लग्न बघायला मिळतात.."रुपाली शांतपणे म्हणाली.

"हे बघ.. कशी बोलतीये ही माझ्याशी... हिला काही लाज नाहीये.. पण तू तरी लोकांचा विचार कर सारंग..." विमलताई म्हणाल्या.

"आई अगं आम्हा दोघांना हे नातं जगासमोर आणणे अवघड जाणार आहे.. कारण मी ज्या कंपनीत कामाला आहे त्या कंपनीची रुपाली बॉस आहे.. आणि मी तिच्या हाताखाली काम करतो.. रुपालीचा पैसा बघून मी तिला प्रेमात अडकवलं असं लोकं मला बोलणार आहेत आणि कमी वयाच्या, आपल्या एम्प्लॉयी सोबत प्रेम करते म्हणून रुपालीलासुद्धा तितकीच दूषणे देणार आहेत लोकं... पण आम्ही दोघांनी मनाची तयारी केली आहे..."सारंग विमलताईंना म्हणाला.

"अगं.. का माझ्या लेकाच्या आयुष्याशी खेळतीयेस? या वयात का तुला लग्न करायचं आहे.. मग का नाही शोधलास तुझ्या वयाचा एखादा चाळीशीतील माणूस?"
विमलताई रुपालीला उद्देशून म्हणाल्या.

"काकू आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.. आणि माझा घटस्फोट झाला आहे म्हणून मी पुन्हा लग्नाचा विचार करू नये का??"रुपाली म्हणाली.

"कशाला करायचं आहे पुन्हा लग्न.. गप गुमानं उरलेलं आयुष्य घालवं कि... आमची सुमी बघ.. सहा महिन्याचा संसार केला आणि तिचा नवरा देवाघरी गेला.. आता परिस्थितीचा स्वीकार करून विधवा म्हणून जगतीये ना?? काय रे सारंग? तुझी बहीण कधी बोलली कि तिला प्रेम करायचा अधिकार आहे.. लग्न करायचा अधिकार आहे... संस्कार आहेत माझे तिच्यावर... तिचं लग्न लावलं तर सासरकडची मंडळी काय बोलतील??"विमलताई सांगत होत्या.

"आई मी तुला हजार वेळा सांगितलं कि सुमीचं लग्न लावू.. तिला पुन्हा स्वप्न रंगवू दे.. पण तू पोरीचा नाही तर जगाचा विचार करतीयेस..."सारंग बोलला.

"संस्कार... हेच संस्कार मला माझ्या आईवडिलांनीही  दिले होते..नवऱ्याची मर्जी सांभाळायची.. त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधायचा.. वगैरे वगैरे.. आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण झाले आणि वडिलांनी माझे लग्न लावून दिले.. चांगल्या हुद्द्यावर काम करणारा एक इंजिनिअर मुलगा.. आई वडिलांना त्याचं स्थळ खूप आवडले... लग्नानंतर त्याने मला नोकरी करण्याची संमती दिली नाही.. आता हे घर,संसार माझे आयुष्य आहे असं मला वाटले.. खूप शिस्तीचा होता तो.. अगदी कडक शिस्तीचा.. त्याला घर नेहमी स्वच्छ लागे.. जरा धुळ कचरा सहन होत नसे.. जेवण पण अगदी परफेक्ट लागायचं.. जरा मीठ कमी जास्त चालत नसे.. मी पण वेडी दिवसभर घराची साफसफाई करणे आणि त्याच्यासाठी चांगला स्वयंपाक बनवणे हेच करत बसायचे. एक दिवशी त्याला डायनींग टेबलवर डाग दिसला तर त्याने मला साडीने पुसायला लावला.. एकदा भाजी तिखट झाली तर त्याने मला मारहाण केली.. सुरुवातीला वाटायचे तापट स्वभाव आहे.. काळानुरूप बदलेल.. पण नाही... मारहाण वाढतच गेली.. आणि बायको ही फक्त घरकाम करणारी आणि तिची इच्छा नसतानाही शरीरसुख उपभोगायला देणारी साधन बनले.. आईवडिलांना सांगितलं, पण हेच संस्कार मध्ये आले... बदलेल तो असा सल्ला दिला.. शेवटी माझ्या बहिणीने मला साथ दिली आणि मी घटस्फोटाची मागणी केली.. सहजासहजी त्याने घटस्फोट दिला नाही.. पण मी सुद्धा मागे हटले नाही.. त्याच्यापासून वेगळी झाल्यावर नोकरी केली.. या क्षेत्रातला अनुभव आल्यावर स्वतःची आर्किटेक्टचरल फर्म काढली.. आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचले.. इतक्या वर्षात लग्न करायची इच्छा झालीच नव्हती.. कदाचित त्याने माझ्या शरीरावर आणि मनावर केलेले घाव भरून निघायला वेळ लागला.. गेल्या वर्षी सारंग ऑफिसमध्ये येऊ लागला.. त्याचा तो अल्लडपणा, वेंधळेपणा मला आवडू लागला...उद्याची काळजी करून आजचा क्षण खराब  करायला त्याला आवडत नाही.. त्याचं हेच अटीट्युड मला आवडलं... "रुपाली बोलली.

"हो आई.. रुपालीचा समंजसपणा, एखादा प्रॉब्लेम शांतपणे हॅन्डल करण्याची तिची क्षमता मला भावली आणि आम्ही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडलो.."सारंगने विमलताईंना सांगितले.

"काकू आणि तुम्ही एकदा तरी सुमीला विचारलं कि तिला काय पाहिजे ते.. तिला खरचं आयुष्यभर विधवा म्हणून जगायचं आहे का?? तिची काही स्वप्न, आकांक्षा आहेत का?? सुमी काय आणि मी काय... नवरा नसला कि स्त्री कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलूनच जातो.. तुम्ही मगाशी म्हटला तसं नवऱ्याने सोडलेली बाई ही माझी ओळख आहे.. पण का??? मी त्याला घटस्फोट दिला आहे... त्याच्या जाचाला कंटाळून.. तो चुकीचा वागला याची मला शिक्षा का?? माझा घटस्फोट झाला म्हणून मी पुन्हा संसाराची स्वप्न बघू नये का? आणि लग्न केलं तर एखाद्या घटस्फोटीत माणसाशीच करावं का?? आणि वयाचा मुद्दा सांगायचा झाला तर प्रेमाला वय नसतं..."रुपाली विमलताईंना म्हणाली.

"ते काही पण असू दे.. आम्ही गावाकडची साधी  माणसं.. सारंगचं शहरात येऊन डोकं फिरलंय.. हे लग्न मला मान्य नाही..."असं म्हणून विमलताई सारंगला घेऊन तिथून निघाल्या.

      परतीच्या प्रवासात सारंग आणि रुपालीपेक्षा त्यांना सुमीचा विचार जास्त सतावत होता. घरी पोहोचल्यावर त्यांनी सुमीला विचारलं,"सुमी थोड्या वेळासाठी विसरून जा तू विधवा आहे.. तुला हे आयुष्य कसं जगायचं आहे मला सांग. "

"आई अगं...असं का विचारतीयेस...?"सुमी म्हणाली.

"सांग मला..."विमलताई बोलल्या.

"आई खरं सांगू... मला पण शहरात जाऊन नोकरी करायची आहे... स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.. आणि.. आणि..."सुमी बोलता बोलता थांबली.

"आणि काय सुमी???? बोल.."ताई ओरडल्या.

"आणि.. मला पुन्हा संसार थाटायचा आहे.. मला पुन्हा लग्न करायचं आहे... कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं.. मी कोणाला तरी जिवलग मानावं असं वाटतं गं आई.. मला ही जगाची सहानुभूती नको... मला कोणीतरी समजून घ्यावं असं वाटतं..."सुमी बोलली. तसं ताईंनी तिला उराशी कवटाळलं आणि माय लेकी रडू लागल्या.

      त्या रात्री विमलताईंना डोळा लागला नाही.. सतत सुमीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आणि रुपालीचं बोलणं आठवत होतं... त्या सकाळी लवकरच उठल्या... सारंगला सोबत घेऊन पुन्हा रुपालीकडे निघाल्या. प्रवासात त्या सारंग सोबत काही बोलल्या नाहीत. सकाळी सकाळी रुपालीच्या घरी ताई आणि सारंग गेले..
"पोरी माफ कर मला.. काल तुला नाही नाही ते बोलले.. तुझ्या आणि सारंगच्या नात्याविषयी बोलताना तू सुमीबद्दल माझे डोळे उघडले.. खरचं तू काय आणि सुमी काय... आयुष्य रंगीत करण्याचा, पुन्हा संसाराची स्वप्न बघण्याचा तुम्हा दोघीना अधिकार आहे... म्हणूनच मला तुझं आणि सारंगचं नातं मान्य आहे.. तुम्हा दोघांच्या लग्नाला मी तयार आहे.. आणि हो सुमीला सुद्धा तिच्या पायावर उभं करणार आहे मी.. विधवा म्हणून तिला नाही जगवणार...."विमलताई रुपालीला बोलल्या... तसं रुपालीने झटकन त्यांना मिठी मारली आणि दोघींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले...आणि काही दिवसांनी सारंग आणि रुपालीचा लग्न सोहळा पार पडला.

वाचकहो कथा कशी वाटली ते नक्की सांगा. तुमचं याविषयी काय मत आहे ते नक्की सांगा. कथा आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.

सिद्धी भुरके ©®