Feb 24, 2024
नारीवादी

पाळी....... बापरे आळीमिळी गुपचिळी

Read Later
पाळी....... बापरे आळीमिळी गुपचिळी

     पाळी…... बापरे आळीमिळी गुपचिळी

 

 

        आज आई , काकी आणि आजी बाहेर अंगणात सांडगे करत होत्या. तर हॉलमध्ये दादा आणि काका भारताची वन डे मॅच बघत होते. आपल्या खोलीत छोटू विज्ञानाचे पुस्तक वाचत बसला होता. तर ताई तिच्या खोलीत आराम करत होती. पुस्तक वाचता वाचता अचानक छोटू अंगणात आपल्या आईकडे आला आणि म्हणाला - "आई पाळी म्हणजे काय ग? "

 

      तेवढ्यात बाबाही बाहेरून वाणसामान

 घेऊन आले होते, छोटूच्या या प्रश्नाबरोबर आई ,काकी ,आजी आणि बाबा एकदम एकमेकांकडे बघायला लागले. पण उत्तर मात्र कोणीच देत नव्हतं. बाबा सामानाची पिशवी घेऊन घरात गेले.

 

आई- "मला माहिती होतं तू कधी ना कधी हा प्रश्न विचारशील. पण एवढ्या लवकर विचारशील असं वाटलं नव्हतं. कसं सांगू तुला? मला असं वाटतं तू अजून लहान आहेस रे हे सगळं समजून घ्यायला."

 

काकी- "रमा मला असं वाटतं तू त्याला समजून सांगायला काही हरकत नाही, नाही पूर्ण समजलं तरी थोडं थोडं नक्की कळेल त्याला."

  

       छोटूला वाटलं,\"चला निदान घरात काकीला तरी असं वाटतं की, मला आता सगळं समजायला हवं.\"

 

आई - "पहिले मला सांग तुला हा प्रश्न का पडला?"

 

       खरंतर छोटूच्या घरचं वातावरण अगदी मैत्रीपूर्ण. छोटूला पडणारे कुठलेही प्रश्न तो घरातल्या कोणालाही अगदी बेधडक विचारु शकत होता आणि घरातले ही त्याला उत्तर द्यायचं कधी टाळत नव्हते. पण आता हा प्रश्न छोटूला नेमकं त्याच्या आईलाच विचारावासा वाटला कारण त्याच आणि त्याच्या आईचं बॉण्डिंग खूप छान होतं.

 

          तर झालं असं की, मागल्या आठवड्यात छोटूच्या वर्गातल्या एका मुलीला पाळी सुरू झाली होती. त्यामुळे ती अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन घरी गेली होती. छोटूला सुरुवातीला प्रश्न पडला होता की ,सकाळी शाळेत आलेली रिया अचानक सर्व ठीक असताना अर्धा दिवसाची सुट्टी घेऊन घरी का गेली? तिच्या मैत्रिणींनाही त्यांनं आपापसात कुजबुज करताना ऐकलं होतं कि, "रियाची पाळी आली आहे." त्या दिवसापासून पाळी हा शब्द सारखा छोटूच्या डोक्यात फिरत होता. मित्रांसोबत खेळताना, ते पाळी हा शब्द वापरायचे, पण तेव्हा याचा अर्थ आता तुझी टर्न किंवा बारी असा व्हायचा. पण मग मुलींची पाळी ? हे काय सीक्रेट आहे? हे छोटूला जाणून घ्यायची खूपच उत्सुकता लागली होती.

 

      आज विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये पुनरुत्पादन हा धडा वाचतांना छोटूला एकदम पाळी हा शब्द आठवला आणि तो थेट आपल्या आईजवळ गेला.

 

छोटू- "आई सांग ना माझी पाळी केव्हा येणार?"

 

     आता मात्र घरातले सगळे हसायला लागले.

 

आई - "अरे येडबंबू मुलांना नाही येत पाळी. फक्त मुलींना येते." (आईला तिचं हसू आवरता येत नव्हतं.)

 

         छोटू विचार करायला लागला, छ्या बुवा हे \"द सिक्रेट\" आपल्याला आता कधीच समजणार नाही. म्हणून छोटूचा चेहरा पडला.

 

आई - "छोटू, तुला जरी पाळी येणार नसली तरी मी सांगेन बरं का आमचं हे सिक्रेट. ये माझ्याजवळ."

 

              आईच्या इशाऱ्याबरोबर छोटू आईजवळ उतावीळपणे जाऊन बसला.

 

आई- "छोटू ,मला सांग की सगळ्या प्राण्यांना पिल्लं होतात हे तुला माहिती आहे ना! पण फक्त माद्यांना होतात, म्हणजे फिमेल्स ना! बरोबर? जसा तू आणि दादा तुम्ही दोघं माझी पिल्लं आहात." (आईने छोटूचा गालगुच्चा घेतला.)

 

          पण छोटू सगळं ऐकायला उतावीळ झाला होता . त्याला असं वाटत होतं,\"आई एवढे फिरून फिरून का सांगते आहे ? तिने लवकर मुद्द्यावर यायला हवं.\"

 

आई- "सगळ्या सजीवांमध्ये नर आणि मादी असतात. माणसांमध्ये पण असतात. जसे की तू, दादा, बाबा आणि मोठे काका सगळे मेल्स आहात म्हणजे नर आणि मी ,काकी ,आजी आणि ताई .आम्ही आहोत फिमेल्स म्हणजे मादी."

 

छोटू- "अरे खरंच ! मी तर असा विचारच केला नव्हता की, मुलगा आणि मुलगी असं वेगळं असतं आणि ते का असतं?"

 

आई -"सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे की ,मुलांना जन्म देण्याची पावर किंवा क्षमता फक्त माद्यांकडेच असते. का? कारण त्यांना काही स्पेशल अवयव मिळाले आहेत, जे नरांकडे नसतात आणि त्यातलेच मुख्य अवयव आहेत अंडाशय आणि गर्भाशय म्हणजे ओव्हरीज आणि युटेरस."

 

दादा -"हे बघ ! हे असे दिसतात आणि दादांनी येवुन छोटूला दोन चित्र दाखवले."

         ती दोन चित्र बघून छोटूचे तर डोळेच विस्फारले . बापरे ! त्याला हे सगळं खूप चमत्कारीक वाटायला लागलं होतं.

 

छोटू - "आई तुझ्या पोटात हे आहे?" छोटूने उत्सुकतेने आईला विचारलं.

 

आई -"अर्थातच म्हणून तर तुम्ही दोघे झालात ना मला ! आता तुला मेन मुद्दा सांगते की पाळी म्हणजे काय? आणि ती कशी येते. तर माझ्या पोटात जे अंडाशय आहे ना ,त्यातून दर महिन्याला एक अंड गर्भाशयात पाठवलं जातं ज्या अंड्याचं पुढे जाऊन बाळ बनणार असतं."

 

छोटू मनात विचार करायला लागला की , \"अरे बापरे म्हणजे मी आधी एक अंड होतो. त्याला एकावर एक धक्के बसत होते.\"

 

आई- "पण प्रत्येक वेळी या अंड्याचं पिल्लू बनत नाही. नाहीतर विचार कर मला किती मुले झाली असती?" आणि आई खुदकन हसली. "तर जे गर्भाशय असतं, तिथे अंड्याचं बाळात रूपांतर होणार असतं. त्यासाठी तिथे स्पेशल अरेंजमेंट केली जाते. त्या लहान बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी रक्ताचं एक जाडसर आवरण बनतं आतमध्ये. बाळ पोटात असताना पूर्णपणे आईवर अवलंबून असतं. अगदी खाण्या-पिण्यात पासून ते श्वास घेण्यापर्यंत. पण जर बाळ तयार होणार नसेल , तर मग उपयोग काय त्या आवरणाचा? काही ठराविक काळानंतर मग ते आवरण आपोआप गळून पडतात रक्ताच्या रूपात. त्याला म्हणतात मासिक पाळी. दर महिन्याला येते म्हणून मासिक. मुली थोड्या मोठ्या झाल्या म्हणजे साधारणतः 13-14 वर्षाच्या झाल्या की मग येते पहिल्यांदा पाळी आणि मग 45 -50 वर्षापर्यंत पाठ सोडत नाही."

 

  आईच्या चेहर्‍यावरचा वैताग छोटूला स्पष्ट दिसत होता.

 

 आई परत सांगू लागली….

आई -"पाळी आली याचा अर्थ ती मुलगी मोठी झाली. तिच्याकडे बाळ जन्माला घालण्याची शक्ती आली."

 

      छोटूला आता हे सिक्रेट अजिबात भारी वाटत नव्हतं, तर थोडंसं भीतीदायक वाटत होतं .त्याने परत प्रश्न केला.

 

छोटू -"आई मग हे रक्त बाहेर कुठून येतं?"

 

आई - "जिथून बाळ बाहेर येतं तिथून. म्हणजे जिथून आपल्याला सु होते ना , त्या भागाला लागूनच अजून एक मार्ग असतो मुलींमध्ये .त्याला योनी किंवा वजाइना असे म्हणतात. तुला हे सगळं एकदम लक्षात नाही राहणार. गुंतागुंतीचं असतं हे खूप. बाकी माहिती हळूहळू देईन मी तुला. शाळेच्या अभ्यासक्रमात सुद्धा असतं हे सगळं पुढे."

 

छोटू - "पाळीच्या वेळेस दुखतं का ग तुला खूप?"

\"आपल्या आईला दर महिन्याला असं रक्त येतं,\" असा विचार करून छोटूला वाईट वाटलं होतं.

 

आई -"हो दुखत ना ! पोट, मांड्या, कंबर ,कधीकधी डोकं दुखतं, चिडचिड पण होते. पण करणार काय? काहीच इलाज नसतो त्याला. सगळ्याच बायकांना होतो हा त्रास. निसर्गाची रचनाच आहे तशी."

 

   आईचं हे वाक्य ऐकून छोटूला निसर्गाचा अक्षरशः राग आला त्याला वाटलं, \"निसर्गाने स्त्रियांवर अन्याय केला आहे.\"

 

छोटू - "काय करता मग तुम्ही? कसे थांबवता रक्त? यावर काही औषध आहे का?" छोटू चे प्रश्न थांबतच नव्हते.

 

आई - "चार-पाच दिवस येतच राहतं हे रक्त हळूहळू. त्यासाठी मग आम्हाला पॅडस् वापरावे लागतात. म्हणजे जसे लहान मुलांसाठी डायपर्स असतात ना तसं. ते लावून मग आम्ही नेहमीप्रमाणे दिवसभराची कामं करू शकतो. त्रासदायक आणि गैरसोयीचं असतं हे. पण आता इतक्या वर्षांमध्ये सवय होऊन गेलेली आहे. मी आठवीत असताना मला पाळी सुरू झाली होती." आईने तिच्या बद्दल सांगितलं.

 

छोटू -"आम्ही काही करू शकतो का ग तुमच्यासाठी?"

 

आई -"थोडी थोडी मदत जशी तु मला रोज करतोस ना तशी .बस अजून काही नाही."

 

      छोटू विचार करायला लागला आई, आजी, काकी ,ताई ,त्याची लाडकी मावशी आणि वर्गातल्या इतर मुली या सगळ्यांना हा त्रास होत असेल नाही ! पण त्यासोबतच त्या सगळ्यांना एक सॉलिड सुपर पॉवर ही मिळाली आहे , त्या गोष्टीचं त्याला थोडं समाधान वाटलं.

 

आई -"बाळा, ही इतकी अवघड आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की ,अजूनही त्यावर संशोधन सुरू आहे. कितीतरी गोष्टी अजून शास्त्रज्ञांना पण माहित नाही आणि समजलेल्या नाहीत."

 

         छोटूच्या दादाने छोटूला काही व्हिडिओ दाखवले, ॲनिमेशनवाले, समजायला एकदम सोपे. आपलं शरीर म्हणजे एक जादूची पेटी आहे याची छोटूला आधी पुसटशी कल्पनाही नव्हती आणि आपल्या शरीराच्या आत एवढ्या साऱ्या गोष्टी एकाच वेळी घडतात हे बघून तर आश्चर्यच वाटलं.

 

          रात्री झोपताना छोटूच्या डोक्यात अनेक विचार येत होते आणि त्याला झोपच येत नव्हती एवढं सगळं समजल्यानंतर त्याचे प्रश्न अजून वाढतच होते. तेवढ्यात आईचे शब्द कानावर पडले.

 

 आई - "थोडी घाई केली का मी? हे सगळ छोटूला सांगायला?"

 

बाबा - "नाही मला नाही वाटत तसं .आता जग इतकं फास्ट झालाय ना . सगळ्यांच वय अलीकडे यायला लागलय. आणि तसेही तुला काय वाटतं तू नसतं सांगितलं तर त्यानी दुसरीकडून माहिती नसती मिळवली? उलट बरं झालं! एक तर त्याने सरळ तुला येऊन विचारलं. आणि तू ही त्याला आढेवेढे न घेता सगळं लगेच आणि सोप्या भाषेत मोकळेपणाने समजून सांगितलं."

       

आई - "मला त्याला खात्री पटवून द्यायची होती की, तो आपल्याला कधीही ,कुठले प्रश्न विचारू शकतो. न घाबरता, न लाजता म्हणून देऊन टाकली सगळी माहिती. जास्त विचार न करता."

 

बाबा - "चुकीच्या मार्गाने चुकीची माहिती मिळवण्यापेक्षा अपेक्षेपेक्षा लवकर मिळणं कधीपण परवडतं, तुम्हा बायकांना जेव्हा पाळी सुरू होते तेव्हा, तुम्ही तरी कुठे कळत्या वयात असता? तुम्ही करताना मॅनेज बरोबर सगळं. आम्हाला तर फक्त ऐकायचं त्याबद्दल. समजून घ्यायलाच हवं की."

 

आई - "मुलं किती लवकर मोठी होतात ना ! मला आपली लहान बाळाच वाटत होती ती!"

 

 

          ***********************************

 

     आजकाल मुला-मुलींचं दोघांचाही वयात येण्याचं वय अलीकडे आलेलं आहे .त्यामुळे योग्यवेळी, योग्य वयात त्यांना जर पालकांकडून आणि घरच्यांकडून योग्य ती माहिती मिळाली, त्यांच्या शंकांचं निरसन झालं तर मुलं चुकीच्या गोष्टी करणार नाहीत. चुकीच्या मार्गाने माहिती मिळवणार नाही आणि या सगळ्या गोष्टींचा टॅबू पण होणार नाही.

 

 

 

संदर्भ

१. संध्या घाटपांडे पेंडसे यांच्या पाळी ची गोष्ट या ब्लॉगवरून साभार.

 

२. इतर माहिती आणि फोटो साभार गुगल.

 

 

 

 

 

  

 

      

 

    

 

 

 

   

 

 

  

       

       

 

       

   

 

 

        

 

     

 

        

 

 

       

 

 

 

   समाप्त.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//