यशची गोष्ट (सुटका) भाग तीन अंतीम

A Story Of A Boy Escape From Kidnapers




आपल्या भारत देशात लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना वारंवार घडत असतात पण आई-वडील आणि आजूबाजूचे लोक जर सतर्क राहिले तर लहान मुलांचे अपहरण करणार्या लोकाना पोलिस नक्कीच पकडतील.

ही गोष्ट आहे यश नावाच्या एका हुशार आणि प्रसंगावधान राखून गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका करणाऱ्या एका धाडसी मुलाची.


*************************************************



मागल्या भागात आपण पाहिलं की झाल्यामुळे राधा आणि यश घरी परतत असताना, एक व्यक्ती यशच्या अपहरणाचा प्रयत्न करते, पण राधाच्या समय सूचकतेमुळे तो प्रयत्न सफल होत नाही आता पुढे…


घरी आल्यावर झालेली घटना राधा आणि यशने आपापल्या आईंना सांगितली. रमाला म्हणजेच यशच्या आईला राधाच खूपच कौतुक वाटलं. संध्याकाळी बागेत भेटल्यावर रमाने राधाच मीनाकडे कौतुक केलं.

रमा -"मीना तुझी राधा खरच खूप हुशार आहे. सकाळी झालेल्या घटनेच्या वेळी जर तिने समय सूचकता दाखवली नसती तर आज माझा यश माझ्याजवळ नसता."


मीना -"आपल्या आजूबाजूला लहान मुलांच्या अपहरणच्या इतक्या घटना घडत असतात की त्यामुळे मी आणि राधाच्या बाबांनी राधा लहान असतानाच तिला हे पासवर्ड आणि कोडवर्डच गुपित सांगितलं होतं."

रमा -"बरं झालं बाई तुझ्या राधाला  ते पासवर्ड आणि कोडवर्डच कोड त्या व्यक्तीला ऐनवेळी घालता आलं आणि माझ्या यशनेही तीला साथ दिली."

संध्याकाळी दोघीही मीना आणि रमा आपापल्या घरी परतल्या. काही दिवस, दोन-चार महिने शांततेत गेल्यानंतर अचानक एक दिवस यशला त्यादिवशी शाळेत जाण्याकरिता तयार व्हायला जरा वेळच लागला होता त्यामुळे, शाळेची व्हॅन पुढे निघून गेली होती. रमाने व्हॅनकाकांना फोन करून यशला घेऊन जाण्याची विनंती केली.

रमा -"हॅलो व्हॅनकाका मी यश ची आई बोलते आहे. मी त्याला घेऊन खाली येते तुम्ही त्याला शाळेत घेऊन जा."

व्हॅन ड्रायव्हर -"ताई तुम्ही एक काम करा ना मी पुढच्या चौकातून दुसरी मुलं घेत आहे तुम्ही त्याला चौकापर्यंत घेऊन या."

यशचे बाबा यशला मग चौकापर्यंत घेऊन गेले. बाबा आणि यश शाळेच्या व्हॅनची वाट पाहत होते. तेवढ्यात बाबाचा फोन वाजला. यशच्या आजीची म्हणजेच रमाच्या सासुची तब्येत अचानकच बिघडली होती. त्यामुळे यशच्या बाबाला रमाने पटकन घरी बोलावलं होतं. बाबाने व्हॅन ड्रायव्हरला परत फोन केला.

बाबा -"किती वेळ आहे तुम्हाला?"

ड्रायव्हर काका -"बस पोहोचत आहे."

बाबा -"बर ठीक आहे मी घरी निघतो मला एक इमर्जन्सी आली आहे."

ड्रायव्हर काका -"ठीक आहे साहेब. मी यशला घेऊन जाईल."

पण मधल्या काळात झालं असं की व्हॅन काका पोहोचायच्या आधीच दुसरी एक व्हॅन तिथे आली. व्हॅन मध्ये बसल्यानंतर आत मध्ये बसलेल्या व्यक्तीने यशच्या तोंडावर रुमाल बांधला आणि व्हॅन सुसाट वेगाने पुढे निघाली. यशची व्हॅन तिथे पोहोचेपर्यंत यश तिथे नव्हताच. घरी आल्यावर रमाच्या सासूबाईंची तब्येत बिघडली होती त्यामुळे रमा आणि यशचे बाबा त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका आलेला होता. या सगळ्या धावपळीत दुपारी चार वाजता रमाने मीनाला फोन केला.


रमा -"राधा सोबत यश आला का घरी मीना?मी आता दवाखान्यात आहे प्लीज यश कडे लक्ष दे."

मीना -"अग माझी राधा आली आहे परत, पण यश तिच्यासोबत नाही आणि राधा म्हणत होती की, आज यश शाळेतही नाही आला."

मीनाचे हे वाक्य ऐकून रमाच्या पायाखालची जमीन सरकली. ती मटकन खाली बसली तिला असं टेन्शनमध्ये पाहून यशच्या बाबांनी काय झालं ते विचारल.


रमा -"अहो आज आपला यश शाळेतच गेला नाही.तुम्ही त्याला व्हॅन मधे नीट बसवलं की नाही?"

बाबा -" अग तुझा फोन आला ड्रायव्हरही पोहोचण्यातच होता म्हणून यशला चौकात उभा करून मी माघारी परतलो."

रमा-"मग दिवसभर कुठे आहे यश?"

आता यशच्या बाबांनाही काळजी वाटायला लागली होती. इकडे यशला घेऊन ते गुंड एका जुनाट फॅक्टरीमध्ये आले होते. तिथे त्यांनी यशला बांधून ठेवले होते. त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावली होती. दिवसभर ते गुंड तिथे पत्ते, जुवा खेळायचे. यशला सकाळी चहा बिस्कीट किंवा ब्रेड द्यायचे. दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण. फक्त प्रातर्विधी करण्यासाठी त्याला मोकळं सोडलं जायचं. यशने स्वतःच सोडवणूक करून घेण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा केला, हाताला हिसके दिले पण त्याचे हात-पाय दोरीने करकचून आवळलेले असल्याने तो काहीच करू शकत नव्हता. दुपारच्या वेळी त्या जुन्या फॅक्टरीत एक घाणेरड कुत्रं यायचं, मग यश स्वतः जवळचे बिस्किट, ब्रेड आणि उरलेलं अन्न त्याला द्यायला लागला.आठ दिवसातच त्या कुत्र्याची आणि यशची चांगली मैत्री झाली
जेव्हा यश लघवी करायला किंवा शौच्च्यासाठी बाहेर जायचा त्यावेळी तो कारखान्यात पडलेल्या जुनाट पेपर आणि मॅक्झिन मधील अक्षरे  खिळ्यांच्या मदतीने कुरतडून, जेवणात मिळालेल्या भाताच्या मदतीने एका पांढऱ्या कागदावर चिपकवायचा. असं करत करत त्याने दहा दिवसात एक संदेश बनवला.

" मला इथे डांबून ठेवण्यात आलं आहे. कृपया माझी सुटका करा - यश देशमुख."

त्याने तो संदेश व्यवस्थित भाताने चिपकवून एका सुतळीच्या साह्याने त्या कुत्र्याच्या गळ्यात बांधला. ते भटकं कुत्रं असल्यामुळे त्याच्या गळ्यातला तो संदेश काही पोलिसांना दिसला आणि त्या कुत्र्याचा माग घेत ते यश पर्यंत पोहोचले. यशच्या या प्रसंगावधानाने यशची सुटका तर झालीच पण त्याचं अपहरण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.त्या गुंडांना शिक्षा झाली.


**********************************************

वाचक हो आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्यामुळे केवळ अभ्यास आणि खेळ एवढेच शिक्षण मुलांना देऊ नका तर, आयुष्यात एखादा कठीण प्रसंग आला तर आपली मुलं त्यांचा धीराने सामना कशी करू शकतील त्याचे प्रशिक्षणही त्यांना द्या. धन्यवाद.


सदर कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.


कथा कशी वाटली ते कळवायला विसरू नका. तुमच्या अभिप्राय यांच्या प्रतीक्षेत.


*****************************************



🎭 Series Post

View all