कथेमागची कथा, भाग तीन (अंतिम )

एक लेखिका, तिची कथा आणि कथेतील पात्र व त्यांच्याभोवती फिरणाऱ्या तिच्या माणसांची कथा
कथेमागची कथा......


कधी एकदा सकाळ होईल आणि श्वेताला चांगला जाब विचारू ह्या विचारात सुमित्राबाई कूस बदलत रहातात, त्यांना अजिबात झोप येत नाही. पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागतो.

"आठ वाजले, आई अजुन कशा उठल्या नाहीत, बघ रे शिरीष, हे दूध दे त्यांना " म्हणत श्वेताने शिरीषला आईच्या खोलीत पाठवलं.

" आई, बरं नाहीये का गं? का उठली नाहीस अजुन? उठ, तोंड धु, दूध घे आणि परत झोप. काही गोळी देऊ का? " शिरीषने विचारलं.

सुमित्राबाई उठल्या, त्यांनी शिरीषला कथा वाचायला दिली आणि त्या तोंड धुवायला गेल्या. त्या परत येईपर्यंत शिरीषची कथा वाचून झाली होती आणि येणाऱ्या वादळाची चाहूल लागली होती. सुमित्राबाईंनी दार लावले आणि शिरीषची धडधड अजुन वाढली.

"शिरीष, मी अशी आहे? का लिहिलं श्वेताने असं? " त्यांनी चिडून विचारलं.

" अगं आई, ती लेखिका आहे. प्रत्येक वेळी स्वतःचा अनुभव असतोच असं नाही " शिरीषने सावरून घ्यायचा प्रयत्न केला.

" पण लोकांना काय वाटेल, मी तशी आहे असेच वाटेल ना? आणि ही कथा तर नक्कीच माझ्यावर वाटते " सुमित्राबाई " हिच अपेक्षा केली होती का मी? किती खस्ता खाल्ल्या तुझ्यासाठी? "

शिरीषही चिडला " हो आई, म्हणून तर मी कधीच तुला उलट बोलत नाही आणि श्वेतालाही बोलू देत नाही. पण आमचाही संसार आहे गं, ती दुसऱ्या घरातून येऊन इथे विरघळण्याचा प्रयत्न करते आणि तू फक्त तिच्यावर रोख जमवते, हिच भाजी त्याच कढईत पासून तर आम्ही बेडरूममध्ये कसे झोपलोय इथवर तुझं लक्ष असतं मग तिने काय करावं? तुला स्वतःला जाणवलं ना कि ही कथा तुझ्यावरच लिहिली आहे? ह्यातच आलं कि सगळं!"

सुमित्राबाई ऐकत होत्या.
" माझं घर नाहीये का मग हे? " सुमित्राबाईंचा चढलेला आवाज ऐकून श्वेताही खोलीत आली.

" हो, आहे ना, तुझंच आहे. तुझं काम तू कर, तिचं तिला करू दे एवढं साधं गणित आहे. तू कधी पनीरची भाजी केली नाहीस तर तिला रागाऊन नको ना सांगू तू हे घालायला हवं होतं म्हणून, प्रेमाने सांग ! तू काही करत असलीस कि ती लुडबुड करणार नाही मग. ती म्हणून मी अन मी म्हणून ती ह्यात मी भरडला जातो. " शिरीष हताश होऊन म्हणाला.

"आई, खरं सांगू, खरंच ठरवून सहा महिन्यातून एकदा आपण आठ दिवस एकमेकांपासून दूर राहू. तिलाही तुझी किंमत कळेल अन तुलाही तिची. मयंकला सांभाळणे, वरची आवरा आवर ही तुझी मदत तिला लक्षातच येत नाही. आता ती लिहिते हे तिने तुला सांगितलं नाही आणि कळल्यावर तू ही कधी आवडीने वाचलं नाही, का? तर कौतुक न करता फक्त उणी दुणी काढत रहाता तुम्ही. प्रत्येकाला गरज असते गं मोकळा श्वास घेण्याची! ह्या कथेतले शब्द असतील श्वेताचे पण संकल्पना, भावना माझ्याही आहेत. आई आणि बायको, दोन्ही माझ्या जवळच्या पण मी ही वैतागतो ह्या शीत युद्धाला! चूक अशी कोणाचीच नाही, तुझी काळजी आणि तिला तिचं आभाळ हवंय. सगळ्यांनाच स्पेस हवी असते. तू ती तिला दे. तिचं अजिबात चुकत नाही असं नाही, तिलाही मी समजवतो पण खरंच दोघी मिळून मला मोकळा श्वास घेऊ द्या. तुम्ही दोघी मला ऐकवता आणि माझा कोंडमारा होतो गं....." शिरीष खिडकीपाशी जाऊन दूरवर बघत उभा राहिला.

थोड्यावेळाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत सुमित्राबाई म्हणाल्या, " आणि मला घेऊन जायला तुला बहीणपण नाही ना.... पटतंय मला तुझं, ठरलं तर मग, आपण सगळ्यांनी सहा महिन्यातून एकदा आठ दिवस एकमेकांपासून दूर रहायचं. कसं ते ठरवू पण इथून पुढे आम्ही तुला त्रास देणार नाही. हो ना श्वेता? " सुमित्राबाईंनी श्वेताचा हात हातात घेतला.

श्वेताचे डोळे भरून आले. ती सॉरी म्हणणार एवढ्यात, सुमित्राबाई तिला म्हणाल्या, " श्वेता, \"नेशील तू त्यांना?\" कथा मस्तच आहे. माझेही डोळे उघडले, असे दुसऱ्या सासवांचेही उघडू दे रे देवा.... मला ते कुठलं मायरा app आहे ते डाउनलोड करून देशील का गं? तुला फॉलो करेन म्हणते.... "

" हो आई, नक्की! " म्हणत श्वेता सासूबाईंच्या कुशीत शिरली.

मायरा app कि जय!

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

🎭 Series Post

View all