कथेमागची कथा, भाग दोन

एका लेखिकेची कथा आणि कथेतील पात्र व त्याभोवती फिरणाऱ्या तिच्या माणसांची कथा


कथेमागची कथा....2

" आलीस का हरिपाठाहून? उशीरच झाला जरा आज " शिरीषने आईला विचारलं.

" तू कसा आलास लवकर? आणि मला का नाही कळवलं लवकर येणारेस म्हणून? मी नसते गेले मंदिरात " सुमित्राताई म्हणाल्या.

" म्हणूनच नाही सांगितलं " असं पुटपुटत शिरीष म्हणाला, " असच आलो, काय म्हणतेस, खाली राउंड मारलेस का? फिरत जा गं आई डॉक्टरने सांगितलंय ना?"

" का, मी नकोय का घरात? तुम्हाला आई म्हणजे अडचण वाटते का रे? त्या पाध्ये बाईंनी आज एक अशीच गोष्ट वाचून दाखवली, पण त्यातली सासू खाष्ट असते, मी तशी नाहीये. छान होती कथा पण मयंक मध्ये मध्ये करत होता ना. मी म्हंटलं, पाठवा मला whatsapp वर. वाचत नाही मी कधी पण ही इंटरेस्टिंग वाटली. हे काय श्वेता, तू अजुन दिवा नाही लावलास? दळण, भाजी आणली का? थालीपीठं आणि टमाट्याची कोशिंबीर कर. मयंकला सर्दी आहे त्याला भाजी पोळीच कर, थालीपीठ तेलकट होईल आणि हो रात्री तीन ला आले होते मी बेडरूम मध्ये तर पांघरूण नव्हतं त्याच्या अंगावर, लक्ष का नाही देत तू? "सुमित्राताई म्हणाल्या.


रात्री त्यांनी कथा वाचायला सुरुवात केली.

नेशील तू त्यांना ?

" हॅलो , वहिनी , वाढदिवसाच्या शुभेच्छा ! हॅप्पी बर्थडे.... मग आज काय स्पेशल प्लॅन ? " पलीकडून प्रियाने वहिनीला म्हणजेच रजनीला विचारलं .

" छे गं , नेहेमीचंच आपलं . मला रसमलाई आवडते पण बाकी कुणाला आवडत नाही मग काय गाडी परत गुलाबजामवर ..." रजनी म्हणाली.

" काय गं , आजतरी जायचं ना दोघांनी बाहेर , काही ठरवायचं छान . ते ही खरंय म्हणा की तुम्ही ठरवलं तरी आई नानांनी ते पूर्ण करू द्यायला पाहिजे " प्रिया

"......"

" वहिनी , कुणाला असो नसो , मला खरंच तुझी जाणीव आहे . अगं आई फटकळ आणि नाना हट्टी , त्यांचं नशीब म्हणून तू त्या घरात गेलीस. दुसरी कुणी असती तर टिकली नसती . स्वभावाला औषध नसतं म्हणतात तेच खरं ! " प्रियाला वहिनीबद्दल प्रेम तर होतंच पण आदरही होता .

" थॅंक्यु प्रिया. पण सांगू का , आताशा नाही सहन होत गं . चाळीशी कधीच उलटून गेली, हार्मोनल बदल होऊ लागलेत, मुलं मोठी होताय, आता नको वाटतं हे सगळं सांभाळणं. आईंची सततची लुडबुड, काम कमी आणि सूचना जास्त! जे केलंय ते न बघता जे राहिलंय तिकडे बरोबर नजर जाते. नानांचं पण मी म्हणतो तसेच झाले पाहिजे हा अट्टहास. नाही गं सहन होत आता. मी कधीच कुरकुर करत नाही, तुला तर माहिती आहे पण असह्य होतंय आता " रजनीने हुंदका दिला.

" हो गं, मी समजू शकते. बरं मी येते रविवारी, बोलते दोघांशी. काय गिफ्ट आणू तुला सांग? " प्रियाने विषय बदलवत विचारलं.

" एक सांगू? येतेच आहेस तर नेशील काही दिवस दोघांना तुझ्याकडे? मी जबाबदारी झटकते असं नाही पण मला काही दिवस मोकळा श्वास घ्यायचाय गं. मला माझा संसार करायचाय. मी त्यांच्याच संसारात बाहेरून आलेलं एक पात्र आहे असं मला वाटतंय. देशील हे गिफ्ट मला? " रजनीने विचारलं.

©️®️ श्वेता शिरीष पाटील


श्वेताचं नावं खाली लेखिका म्हणून वाचल्यावर इतका वेळ किती छान मांडली आहे सुनेची बाजू असं वाटणाऱ्या सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

मी अशी आहे का? का हिने असं लिहिलं असेल? ह्यांच्यासाठी इतकं करा तरी ह्यांना माझी अडचणच वाटते का म्हणजे? बघतेच सकाळी तिला. सुमित्राबाईंचा पारा चांगलाच चढला होता.

काय करतील सुमित्राबाई श्वेताचं? वाचूया पुढील भागात, कथेमागची कथा.....

🎭 Series Post

View all