स्टेटस:- भाग 12

Discussions and arguments between Arnav and Shivangi's family continued

स्टेटस: -भाग 12

परत तोच हॉल, तेच लोक पण यावेळेस वातावरण जरा वेगळे होते. खालच्या मोठ्या हॉल मध्ये गोलाकार सोफ्यावर जवळजवळ बारा माणसे बसली होती.
अर्णव कडचे 6 आणि शिवांगी कडचे 6 लोक एकमेकांच्या समोर बसले होते.

अर्णव आणि शिवांगी हे दोघेही दोन्ही साईड च्या सोफ्यावर बसले होते आणि ते फक्त शांतपणे ऐकत होते.
खूप वेळ एकच डिस्कशन चालले होते, की लग्न किती मोठे आणि थाटात केले पाहिजे.
शिवांगीचा दादा आणि वडील हे दोघेही जण त्या बाबतीत ऍग्रेसीव होते.
त्यांचा हा विचार चालला होता की दोन्ही मुले लहान आहेत कुठल्याही परिस्थिती मध्ये यांचे न ऐकता आपण आपल्या पद्धतीने छानपैकी सगळ्या गोष्टी करूयात.
या सगळ्यात अर्णव मात्र एकदम शांत होता.
आज शिवांगी बरोबर नुरी नव्हती आणि अर्णव बरोबर त्याचा भाऊ सुद्धा नव्हता. त्यामुळे शिवांगी आणि अर्णव हे पूर्णपणे  एकटे होते.

"अर्णव हे काही चालणार नाही, ज्या आमच्या हौशी मौजी आहेत त्या पूर्ण करायच्याच आहेत आणि त्या करिता तुझ्या बाबांचा आणि आईचा पाठिंबा आहे.
तुम्ही पण सांगा आता." तिचा दादा अर्णव च्या वडिलांकडे पहात म्हणाला.

"मला असे वाटते की सगळ्याच गोष्टी बोलून झाल्या आहेत आणि आता यात वेगळे ठरवण्यासारखे असे काही नाही. तुम्ही मुहूर्ताचे बघा आणि मग आपण बाकीचे बोलणे करून घेऊयात."

अर्णव एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला " जर तुम्हाला मी जे सांगतो ते पटत नसेल तर मला लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही."

हे ऐकून सगळे एकदम ताडकीने उभे
राहिले.
" काय? काय बोलतो आहेस तू? काय चालले आहे तुझे? तुला कळत आहे का तुझ्या बोलण्याचा अर्थ?"त्याचे बाबा म्हणाले .
शिवांगी फक्त शांतपणे अर्णव कडे बघत होती आणि त्याने नजरेनेच तिला शांत राहा असे खुणावले.

"तुम्ही जे ऐकले ते बरोबर आहे, तुम्हाला जर माझे ऐकायचे नसेल आणि माझी पद्धत पटत नसेल तर मला हे लग्न करायचे नाही" अगदी ठामपणे तो म्हणाला.

"हा हट्टीपणा झाला! " वैतागून तिचा भाऊ म्हणाला.

"अर्णव हे असे का बोलतो आहेस? तुला ती पसंत आहे ना? तू तिला लग्नासाठी हो म्हणाला होतास ना? आमची मोठ्यांची बोलणी सुरू झाली आणि आता काय हे की तुला लग्न नाही करायचे!" त्याची आई त्याला विचारत होती.

अर्णव आई कडे पाहत म्हणाला" आई मी परत एकदा सांगतो जर तुम्हाला मी सांगतो ते पटत नसेल तर मला हे लग्न करायचे नाही."

त्याच्या ह्या उत्तराने शिवांगीकडील लोक एकदम शांत बसले.
एका क्षणात तिच्या दादा आणि बाबांच्या डोळ्यासमोरील चित्र बदलले, जर हे लग्न झाले नाही तर किती नुकसान होईल? बिझनेस एक्सपांशनचा प्लॅन नष्ट होईल, शेयर मार्केट मधला टक्का वाढवण्याची स्वप्ने जी पहिली ती स्वप्नच राहतील. दोन्ही फॅमिली एकत्र नाही आल्या तर कसे होईल? तिचे बाबा आणि आई शांत झाले.
दादा कपाळाला हात लावून बसला तर वहिनी जळजळीत नजरेने अर्णव कडे बघत होती.

"मी जे सांगितले ते माझे पक्के आहे, त्यात कुठलाही बदल आला चालणार नाही. पुन्हा एकदा सांगतो मला माझे लग्न माझ्या पद्धतीने होणार असेल तरच आणि तरच करायचे आहे, नाहीतर मी हे लग्न करणार नाही" अर्णव शांतपणे पण अगदी निक्षून बोलला.

"हे सगळं आता बोलतोय तू? सगळी बोलणी झाल्यावर" तिचा भाऊ म्हणाला.

"कसली बोलणी, तुमच्या एक्सपांशन ची की बिझनेस ची? तुम्हाला मी नाही तर तुमचा बिझनेस तुमचे स्टेटस महत्वाचे आहे. " तो म्हणाला.

"अरे हे सगळे तुझ्यासाठीच तर करतोय! आता नाही तुला 10 वर्षांनी कळेल की हे तुझ्या चांगल्यासाठीच आहे" त्याला कनविन्स करायचा प्रयत्न करत त्याचे बाबा म्हणाले.

"शिवांगी तू सांग ना अर्णव ला" सगळेच तिला म्हणाले आणि तिच्याकडे अपेक्षेने बघत होते.

"मी काय सांगणार? तो अगदी बरोबर बोलतो आहे. त्याचे जे म्हणणे आहे तेच माझेही मत आहे.जर त्याला लग्न करायचे नसेल तर मलाही करायचे नाही". ती म्हणाली.

हे ऐकल्यावर दोन्ही घरातील सगळी लोक एकदम शॉक होऊन शांत बसली, काही क्षण एकदम अफाट शांततेत गेले. कोणाच्याही तोंडून काही शब्दच फुटत नव्हते.

तेवढ्यात नोकर मंडळी कॉफी आणि स्नॅक्स घेऊन आलेले तसे अर्णव चे वडील घ्या म्हणाले पण कोणीही  प्लेट्सला हात देखील लावला नाही.

"घ्या सगळ्यांनी घ्या. अन्नावर राग कशाला?" ते म्हणाले तसे त्यांच्या शब्दाचा रिस्पेक्ट म्हणून सगळ्यांनी कॉफी तेवढी घेतली.

अर्णव मात्र एकदम स्थिर आणि शांत होता. त्याचा निश्चय त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता, त्यामुळेच तर सगळे भयंकर पेचात अडकले होते त्यातून कसे बाहेर पडावे  कोणालाच कळत नव्हते.
ती शांतता भंग करायला त्याचे वडील म्हणाले" तुझ्या डोक्यात तरी काय आहे अर्णव?"

"माझ्या डोक्यात जे आहे ते मी तुम्हाला स्पष्ट पणे सांगितले आहे, मला कोणीही या बाबत काही वेगळा बदल असे सांगण्याचा प्रयत्न करू नका. मला बरोबर कळते आहे की मी काय करतो आहे ते." तो म्हणाला.

"तुला कळते आहे का तुझ्या या निर्णयामुळे किती नुकसान होणार आहे आपल्या कॉन्टॅक्टस रिलेटेड?"

"त्याची जवाबदारी माझी! आपण लोकांना न बोलावल्याने जे काही बिझनेस चे नुकसान होईल ते मी भरून काढेन. पुढच्या 3 वर्षात आपला बिझनेस हा आत्तापासून दुपटीवर नेण्याची जवाबदारी माझी."

"अरे पण ही असे काही प्रसंग असतात ज्याने काहीतरी मिळवता येते, काही गोष्टी करता येत असतात, लोकांना मोठेपणा देऊन त्यांच्याकडून अनेक कामे करून घेता येत असते. आपले दिसणे, आपला व्याप दाखवणे खूप गरजेचे असते."

"मी तुम्हाला पाहिल्यापासुन सांगतो आहे की मला हे प्रस्थ, हा स्टेटस, हा बडेजाव या सगळ्या गोष्टी दाखवण्यात काही इंटरेस्ट नाही. निदान माझ्या लग्नात तरी नाही.
अर्जित च्या लग्नात हे सगळे करा. त्यात मी पण तुम्हाला हवी ती मदत करेन  स्टेटस जपण्यासाठी फक्त त्याची ती ईच्छा असली पाहिजे आणि बघा मी काय काय करेन ते.

हे असे घडेल अशी तुम्ही माझ्या लग्नात मात्र अपेक्षा ठेऊ नका. माझे माझ्या आयुष्याबद्दल काही स्वप्ने आहेत, काही अपेक्षा आहेत, म्हणून अत्यंत सध्या पद्धतीने मला लग्न करायचे आहे. त्यात शिवांगीचा सुद्धा पूर्ण पाठिंबा आहे."

" तू परत एकदा विचार करावा अर्णव" तिचा दादा आता खूप शांतपणे म्हणाला.

"दादा खूप विचारपूर्वक हे बोलतो आहे. मी कधीच विचार न करता बोलत नाही".

"आणि आम्ही हे जे 50- 50 कोटी बाजूला ठेवले ते?"
"ते तुम्ही फक्त आमच्यासाठी ठेवले आहेत की आणखी काही कारणासाठी?"
"नाही ते तुमचेच आहेत"
"मग तुम्ही ते लग्नाचे गिफ्ट म्हणून आम्हाला द्या आम्ही बघतो त्याचे  काय करायचे ते"

"म्हणजे"
"चार दिवसाकरता 100 कोटी खर्च करण्यापेक्ष त्याचे योग्य नियोजन काय करायचे ते आम्ही दोघे बघतो. जर मुलांसाठी 100 कोटी ठेवले राहवत तर त्या मुलांनाही कळू देत की त्याचे काय करायचे."

अर्णव आणि शिवांगी च्या वडिलांनी एकमेकांकडे बघितले.
शिवांगी चे वडील म्हणाले " तुझ्या मनात काय चालूं आहे नक्की?"

"माझे आणि शिवांगी चे लग्न महाबलीपुराम येथे फक्त आपल्या घरच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या साक्षीने व्हावे. या लग्नात कुठलाही बडेजाव नसावा! लग्न संपूर्ण विधीयुक्त, प्रेमाने आनंदाने व्हावे आणि त्या पवित्र ठिकाणी त्या अथांग समुद्राच्या साक्षीने व्हावे. अग्नी  भोवती मी फेरे घ्यावे.  वरून आकाशने भरभरून आशीर्वाद द्यावा. तसाच तिथल्या मंदिरातील देवाने  आम्हा दोघांकडे  परिपूर्ण पाहावे आणी तथास्तु म्हणावे.
त्या भल्या मोठ्या पृथ्वी ने तिच्या भव्यदिव्य संकल्पनेत आम्हाला सहज सामावून घ्यावे, एवढेच माझ्या मनात चालू आहे"

"महाबलीपुराम हेच ठिकाण का?"

"मी काही जागा शोधल्या,त्यातील मला हवेतसे सगळे योग्य आणि पवित्र फक्त त्या ठिकाणी असल्याचे जाणवले. जिथे मी पूर्णपणे लिन झालो, तिथल्या तत्वाशी  कनेक्ट झालो आणि  मला अपूर्व मनशांती मिळाली."

"अरे पण महाबलीपुराम ला काहीच मोठं...."

"काहीच करायचं नाही दादा, मोठं नाही की बडेजाव नाही. आपण तिथे एक मंडप बांधू, त्यात होम असेल बाजूला गुरुजी असतील आणि आम्ही तुमच्या सगळ्यांच्या उपस्थित फेरे घेऊ आणि तुमचे आशीर्वाद घेऊ. लग्नाला अजून काय लागते? अशी असंख्य लग्ने  होतात ज्यामध्ये कोणीच नसते, इथे आपण तर हौशीने घरातील सगळे असू."

"आणि आपण सगळे महाबलीपुरामला तरी विमानाने जाऊ का तुला त्यातही काही वेगळेपणा अपेक्षित आहे किंवा अजून काही वेगळी पद्धत?" नापसंती ने का ना असो पण त्याचे बाबा म्हणाले.

तो हसत म्हणाला, "नाही बाबा!  जो काही आपला ट्रॅव्हल मोड असेल तो चालेल. मग आपले चार्टर्ड प्लेन आहे ते पण चालेल. तुम्ही म्हणाल तसे!

बाबा मी सिंघनिया हे स्टेटस तसेच सांभाळत आहे फक्त माझ्या लग्नाची पद्धत ही माझी आहे आणि असावी हे नक्की. शिवांगी तू तयार आहेस ना?"

ती उठून त्याच्याजवळ जात म्हणाली " मी पूर्णपणे तयार आहे. "

मग त्याने सगळ्यांकडे पाहिले आणि म्हणाला " काय आहे तुमचे म्हणणे यावर?"

"आम्ही काय म्हणणार यावर आता? तू हे लग्नच कारायचे नाही म्हणल्याल्यावर सगळ्याच गोष्टी संपूर्ण बदलून जातात ना.
आमच्या मनासारखे नाही होत तर निदान तुमच्या तरी मनासारखे होते आहे,  ठीक आहे आम्ही मान्य करतो. आम्हाला वाटले ते सगळे तुला सांगितले पण तू त्याला तयार नाहीस मग ठीक आहे तू म्हणतो त्यासाठी आम्ही तयार आहोत. चालेल ना सिंघानिया साहेब? " तिच्या बाबांनी अर्णव च्या बाबांकडे पाहत विचारले.

आधी शांत असलेले त्याचे बाबा " ठीक आहे " इतकेच बोलले.

सगळे तयार आहे म्हणल्यावर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहुन सुटकेचा निःश्वास सोडला.
अर्णव आणि शिवांगी ने हळूच एकमेकांकडे पाहुन डोळा मारला आणि स्माईल दिले.

ज्या पद्धतीने त्यांना जसे हवे त्या आणि त्याच पद्धतीने सगळं घडणार होते याची खात्री होती त्यामुळे त्याने पूर्ण विश्वासाने शिवांगीला त्याचा प्लॅन सांगितला होता.

त्याची ही फुलप्रूफ स्ट्रॅटेजी फुल्ल सक्सेस झाली होती. शेवटी लग्न ठरले या आनंदात अर्णव च्या आईने नोकरांकडून मिठाई मागवली.
संपूर्ण घरामध्ये मिठाईचे बॉक्स वाटायला सुरुवात झाली आणि अर्णव आणि शिवांगी च्या बाबांनी एकमेकांना मिठाई भरवली.

तिचा दादा तिच्या जवळ आला आणि हसत म्हणाला" शिवांगी आता लग्न ठरले आहे तू पण अर्णवला मिठाई भरवू शकतेस"

"हो का दादा, मी भरवू शकते का?  मला वाटले तो मला भरवणार आहे."

"का तुमच्याकडे लेडीज फर्स्ट अशी पध्द्त नाही का?" अर्णव तिला चिडवत म्हणाला.

"अरे मला वाटले तुला आवडेल भरवायला".
"नाही मला भरवून घेण्यात इंटरेस्ट आहे"
"असे का?  मग लग्नाच्या जेवणात मी भरवेन आता तू भरव" ती म्हणाली.

"असे कसे? एका गोडाची सुरवात ही दुसऱ्या गोडापासून झाली पाहिजे" तो म्हणाला.

"कोण गोड आहे" तिने भुवई उंचावत विचारले.

"तू" मिश्कीलपणे तो म्हणाला.

"मला वाटलं ही काजूची मिठाई"

" नाही तू"

हे बोलताना त्याच्या डोळ्यातून वाहणारे प्रेमाचे असंख्य भाव तिला दिसत होते तर त्याच्या बोलण्याने आरक्त गाल झालेली ती लाजत त्याला बर्फी भरवत होती.

क्रमशः:-

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all