Login

स्टेटस:- भाग 11

Discussions between Shivangi 's father and brother has reached to a point of stress.

स्टेटस :- भाग 11

जशी अर्णव आणि त्याची फॅमिली शिवांगी च्या घरातून बाहेर पडले तसे तावातावाने तिचा दादा आणि बाबा तिच्याकडे बघायला आले. त्यांच्या नजरेने शिवांगी ला घरात प्रचंड तंग वातावरण जाणवायला लागले. 

शिवांगी चा दादा प्रचंड विचारात आणि रागात होता, वहिनी त्याला कसेबसे शांत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती.
तिचे बाबा एकीकडे लग्नाला होकार आला  म्हणून  आनंदात होते, त्याची अनेक वर्षांची स्वप्ने  या लग्नामुळे पूर्ण होणार या विचारात होते पण अर्णव च्या बोलण्याने ते सगळं धुळीत मिळेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

"अर्णव समजतो काय स्वतःला? आपण काही कमी नाही आहोत त्यांच्यापेक्षा की फक्त त्यांची मते आपल्यावर लादली जावीत. 
मला हे अजिबात मान्य नाही आहे, आपले स्टेटस, आपले नाव, आपला रुतबा काय धुळीला मिळवायचा आहे असे भिकाऱ्या सारखे  वागून? 
आपल्या तोलामोलाने आणि जंगी असेच सगळे व्हायला हवे." तिचा दादा हुकमी  बोलत होता.

हे सगळे असेच होणार, ह्यांची मते,ह्यांचे राग सगळे तिला अपेक्षित होते.  हे असे होईल अर्णव ने सुद्धा सांगितलेले आणि  तिलाही काही विशेष काळजी नव्हती म्हणून ती निर्विकार पण नजरेत ठाम उभी होती. 
फक्त शांत राहायचे हे तिला अर्णव ने निक्षून सांगितले होते.
नुरी तिच्या बाजूला उभे राहून फक्त निरीक्षण करीत होती.

"हे बघा मला तर अजिबात पटले नाही त्या अर्णव चे बोलणे, आपली एकुलती एक मुलगी आहे तिच्याबद्दल ची सगळ्या हौशी मला पूर्ण करायच्या आहेत. 
काहीही झाले तरी हे असे भिकेचे डोहाळे मला पसंत नाही" तिचे बाबा म्हणाले.

"लोक किती नावं ठेवतील आपल्याला! आपलं स्टेटस, आपली इज्जत क्षणात संपून जाईल. 
किती वर्षे लागतात अशी गुडविल जमवायला आणि आपल्या अश्या काही वागण्याने तर एक मिनिट लागणार नाही होत्याचे नव्हते व्हायला.
मला खूप लोकांना बोलवायचे आहे, अशा जबरदस्त बिझनेस एक्सपांशन ची संधी मी सोडूच शकत नाही. 'बजाज आणि सिंघनिया' एकत्र आले तर जग जिंकता येईल. जर हे असे केले तर कोणी आपल्याला विचारणार नाही. आपलं नाव खराब होईल, स्टॉक मार्केट मधून भाव घसरलतील आपल्या शेअर्स चे, इन्व्हेस्टर्स येणार नाहीत, शेयर होल्डर्स त्यांचे हिस्से काढून घेऊ शकतात. जगात हसे होईल आपले" तिचा दादा न थांबता बोलत होता.

ती मनाशी प्रचंड ठाम होती आणि अर्णव वरचा विश्वास सुद्धा पाठीशी होता त्यामुळे तिला काहीच फरक पडत नव्हता. आपले लग्न खरंच आपल्यासाठी आहे की दादा च्या बिझनेस प्लॅन साठी याचेच तिला नवल वाटत होते.

"तू का गप्प आहेस शिवांगी? तू असे कसे म्हणू शकतेस आम्हाला की तुला सुद्धा साध्या पद्धतीने लग्न हवे आहे?" चिडत तिचा दादा म्हणाला.

"दादा लग्न माझे आणि अर्णव चे करायचे आहे की सिंघनिया आणि बजाज नावांचे?"

"What do you mean? काय म्हणायचे आहे तुला स्पष्ट बोल" 

" सोपा प्रश्न आहे त्यात न कळण्यासारखे काय आहे दादा?"

" तुला ज्या स्टेटस मध्ये आम्ही वाढवले,तुझे लाड केले तुला सगळ्या फॅसिलिटी दिल्या त्या तुला माहीत नाहीत का?"

"माहिती आहे आणि त्याबद्दल मी ऋणी आहे तुमची. पण दादा, बाकी काही स्टेटस ला सोडून नाही करता येत तर माझंही स्वतःचे लग्न तर मी हव्या त्या पद्धतीने करू शकते ना"

"पण का तुला असे वागायचे आहे?"

"खरे सांगायचे तर मला या मोठेपणाचा उबग आला आहे." ती म्हणाली. 
सगळे सुन्न होऊन बघत होते तर दादा चा रागाचा पारा चढत होता, चेहरा नुसता लालबुंद झाला होता त्याचा.

 तो म्हणाला " तुला जे मिळाले ते लोकांना स्वप्नातही मिळत नाही.  तू स्वतःला नशीबवान समज की तू बजाज फॅमिली मध्ये जन्माला आली आहेस."

" तुझ्यासारखा प्रेम करणारा दादा, लाड करणारी वहिनी आणि फुलाप्रमाणे जपणारे आई बाबा मिळाले यासाठी मी खरंच नशीबवान आहे. पण मटेरिऍलिस्टिक  गोष्टीमध्येच सुख असते काय?"

आता मात्र तिचे बाबा पण भडकले.
 "तू लहान आहेस शिवांगी. तुला बिझनेस मधले कळत नाही.  इतरांसारखं रिक्षा,बस मध्ये फिरावे लागले असते म्हणजे कळले असते. ते काही नाही, अर्णव म्हणाला ते मला कदापि मान्य नाही. मी असे होऊच देणार नाही."

प्रचंड दडपण, तापलेले वातावरण तिला जाणवत होते,शांत राहणे योग्य आणि त्यांना वेळ देणे जरूरी इतकेच तिचे मन तिला सांगत होते.

मनातून प्रत्येक क्षणाला ती अर्णवची आठवण काढत होती.
 किती योग्य विचार करून अर्णव ने तिला समजावून सांगितले होते की काय आणि कसे वागायचे.
त्याच्या सारखी परिपक्वता तिला शोधून मिळत नव्हती.   प्रेमात पडली होती ती त्याच्या सगळ्या गुणांवर.

 "मी आताच्या आता अर्णव ला फोन करून सांगतो की आम्हाला हे मान्य नाही" दादा म्हणाला.

"एक मिनिटं थांब. नक्की काय मान्य नाही तुला?" आई पहिल्यांदा बोलली.

"म्हणजे?"
"लग्न की पद्धत?"
"ऑफकोर्स पद्धत!"

"मग बोलण्याची पण पद्धत असावी" आईने नीट सुचवले.

बाबा हॉल मध्ये फेऱ्या घालत होते तर दादा सोफ्यावर बसून राग व्यक्त करत होता. 
थोडक्यात सगळ्यांचा प्रचंड विरोध दिसत होता.

" बाबा! मी हे कदापि खपवून घेणार नाही आधीच सांगतो. माझे खूप प्लॅन्स आहेत बिझनेसचे. 
मला कुठल्याही परिस्थितीत  स्टेटस च्या विरुद्ध वागलेले चालणार नाही. आपल्याच पद्धतीने हे झाले पाहिजे. डेस्टिनेशन वेडिंग तेही उदयपूर मध्ये. मी 'ओबेरॉय उदयविलास' संपूर्ण बुक करतो.
पूर्ण देशाच्या न्यूज पेपरमध्ये मला बातमी आलेली हवी आहे.
आपले काही क्लाइन्ट्स अमेरिका, जर्मनी फ्रांस आणि ऑस्ट्रेलिया वरून येणार आहेत. त्यांना त्या निमित्ताने आपण आपला शाही विवाह सोहळा दाखवू. ते इम्प्रेस झाले की आपली पुढची काळजी गेली.

 मी आधीच सगळी तयारी केली आहे फक्त मुहूर्ताची देर आहे ." दादा म्हणाला.

शिवांगी शी कोणी काही बोलत नव्हते, तिच्या सहमतीचा त्यां सगळ्यांना राग आला होता. ती हे पूर्णपणे जाणून होती, पण यावेळी तिनेही माघार घेतली नव्हती की कोणाची मिन्नते पण केली नव्हती.

2 तास झाले तरी चर्चा संपत नव्हती, कोणाची मते बदलत नव्हती की कोणी तिला काही विचारात नव्हते.
 शिवांगीला तर मनातून वाईट वाटत होते की यांना माझ्या आनंदापेक्षा यांचे बिझनेस चे आणि लोक काय म्हणतील  यांचेच पडले आहे. 
एरवी दादा इतके लाड करतो आणि आज मात्र तोही असेच बोलतो,मी काय बाहुले आहे का यांच्या स्वप्नपूर्तीसाठी? नक्कीच नाही!

 जितके ते आक्रमक होत होते तेवढी ती खंबीर होत होती! 

"उद्या आपण त्यांच्याशी बोलू यात की आम्हाला हे अजिबात मान्य नाही.  अश्या गोष्टी फोनवर बिघडतील तर त्यांना घरी जाऊन आपण सांगूयात. " एका कसलेल्या बिझनेसमन प्रमाणे बाबा म्हणाले.

नुरी आणि शिवांगी दोघींनी नोकराला सांगून  सगळ्यांसाठी कॉफी मागवली पण दादा रागाने उठून निघून गेला, तर बाबा मीटिंग च्या बहाण्याने बाहेर गेले. 
आई तिच्या रूम मध्ये तर, वहिनी किटी आहे सांगून क्लब ला गेली.

सगळे कसे  तिला अपेक्षित होते तसेच घडत होते. अर्णव ने या सगळ्या घटना तिला आधीच दाखवल्या होत्या जश्या जादूच्या गोलात एखादा जादूगार दाखवतो अगदी त्याप्रमाणेच. 

निवांतपणे तिने आणि नुरीने कॉफी प्यायली आणि त्या दोघी तिच्या रूम ला गेल्या
 तर अर्णव चा मेसेज तिच्या मोबाइलला आलेला होताच.

"कसे आहे वातावरण?"
"तापलेले आणि तुझ्याकडे?"
"उकळलेले"
"हा हा हा"
" ऑल दि बेस्ट"
"सेम टू यु"


"प्रचंड तापमान वाढले आहे आज"नुरी हसत तिला म्हणाली.

"अगदी हेच होणार म्हणून अर्णव म्हणलेला. या सगळ्या व्यवहारी बोलण्यात मला अर्णव खूप जास्त मोठा, उदात्त आणि मॅच्युअर्ड वाटतो नुरी"

"अगं, तसाच आहे तो. आयुष्य कसे जगावे आणि काय करावे याच्या कन्सेप्टस खूप क्लियर आहेत त्याच्या. 
तुला सांगू, माझे मन सांगते की तुम्हा दोघांना जसे हवे ना अगदी तसेच होणार आहे हे नक्की."

"होईल तेव्हा ग, तोपर्यंत तू बघत आहेस ना घरात कसे ज्वालामुखी फुटत आहेत ते"

"फुटू देत ग. आपल्याकडे अर्णव नावाची त्सुनामी आहे ना त्या ज्वालामुखीना शांत करायला"

"हा हा हा..." दोघी टाळ्या देत हसत म्हणाल्या.

तेवढ्यात रूम मधला फोन  वाजला तसा शिवांगी ने घेतला तर खालून आईचा फोन होता.
"का ग आई? खाली येऊ का?"
"नाही नको राहू देत. तुझे बाबा आत्ताच बोलले आहेत अर्णव च्या वडिलांशी. उद्या सकाळी 9 वाजता आपल्याला अर्णव च्या घरी जायचंय. तू तयार राहा"
"ओके आई" ती खुश होत म्हणाली.

फोन ठेवल्यावर नुरी ने भुवई उंचावत 'काय' असे विचारले. 
"उद्या अर्णव च्या घरी जायचे..."
"वाह मॅडम..जोरदार"
"मज्जाच मज्जा"
"ए त्याला फोन लाव ना"
"अगं त्याच्या कडे पण वातावरण तापलेले आहे. उगाच नको"
"लाव तर. नाही उचलला तर आपण समजून जाऊ"

शिवांगी ने अर्णव ला फोन लावला. फोन मिस झाला. 
"बघ मी तुला म्हणत होते ना...." शिवांगी एवढे बोलत असतानाच त्याचा व्हिडिओ कॉल आला.
तिने उचलल्यावर अर्णव ने छान स्माईल दिली आणि तिला विचारले,
"तू ठीक आहेस शिवांगी?"
"एकदम मस्त. आणि तू?"
"छान आहे. उद्या येत आहेस ना सकाळी?"
"हो. म्हणजे काय. तुला भेटायचा चान्स मी थोडीच घालवणार आहे?" ती हसत म्हणाली.
तो ही हसला आणि म्हणाला, " उद्या मी जे म्हणेन तिथे तर तसेच्या तसे तू पण तेच बोल"
"येस बॉस"
"मी उद्या सांगणार आहे की मला हे लग्न नाही करायचे आहे"
"काय? असे का बोलतोय तू अर्णव?"
"जे मी म्हणेन तेच म्हणायचे शिवांगी"
"पण लग्न नाही करायचे म्हणजे...?"
"रिलॅक्स. ती स्ट्रॅटेजी आहे."
"म्हणजे लग्न करायचे ना आपण?" तिने घाबरून विचारले.
"कोई शक?"
"नाही"
"मग....!"
"असंच..."
"बाय द वे, असंच काही नसते बरं का!
"असते..."
"नसते...."
"असते...."
"लग्न करायचे आहे ना?" त्याने विचारले
"ओके बाबा, नसते" ती तोंड वाकडे करत म्हणाली.

तिच्या त्या रिअकॅशन ला तो खदखदून हसला.
ती त्याला नाकावर बोट ठेऊन वेडावून दाखवायला लागली तसा तो अजून हसायला लागला.

तिने खोटे खोटे कट्टी केले तसे त्याने हसत बट्टी ची साईन केली.
पहिल्यांदा तिने नाही अशी मान डोलावली.
त्याने परत बट्टी असे दाखवले.
तरी ती नाही नाही अशी मान डोलावायला लागली.
तसे त्याने तिला हग करत आहे अशी साईन केली. 
ते पाहून हळूच हसून तिने पण बट्टी केली.
त्याने बाय करून फोन ठेवला तशी नुरी धावत येऊन तिला म्हणाली, " तुमचे हे प्रेम पाहून मलाही लग्न करायची ईच्छा होत आहे"

तिच्या या बोलण्यावर शिवांगीच्या मोठ्याने हसण्याचा आवाज पूर्ण रुम मध्ये घुमला.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all