स्टेटस:- भाग 10

Bith families of Arnav and Shivaji showed non acceptance about the proposal

स्टेटस:- भाग 10

दुसऱ्या दिवशी सकाळी शिवांगीच्या वडिलांचा फोन वाजला. दुसऱ्या फोनवर अर्णव चे वडील होते.  त्यांनी सांगितले आज संध्याकाळी आम्हाला तुम्हाला भेटायला यायचे आहे चालेल का आले तर?
'वाट पाहतो नक्की या' असे त्यांनी सांगितले.
दिवसभर शिवांगी अर्णव येणार म्हणून खूष होती.
दादा वहिनी आई-बाबा शिवांगी सगळेजण आजच्या भेटीची उत्सुकता मनात ठेऊन होते.  बोलणी पुढे जाण्याची शक्यता आज सगळ्यांना दिसत होती.

संध्याकाळी सहा वाजता शिवांगीच्या घरासमोर बरोबर दोन गाड्या थांबल्या.
पहिल्या गाडीतून अर्णव चे आई-वडील तर दुसऱ्या गाडीतून तो आणि त्याचा लहान भाऊ असे सगळे जण उतरले.
सगळे एकमेकांना भेटून त्यांचे छान स्वागत झाले.
त्याचे वडील म्हणाले, " आमच्या अर्णवला काहीतरी आज  तुम्हा सगळ्यांना सांगायचे म्हणून  सकाळीच त्याने मला तुम्हाला फोन करण्यासाठी सांगितले आणि आम्ही सगळे जण तुम्हाला भेटायला आलो"
ते ऐकून शिवांगी च्या घरचे सगळे जण उत्सुक झाले.

अर्णव ने बोलायला सुरुवात केली.
" त्या दिवशी येऊन भेटून गेल्यावर मला शिवांगी पसंत पडली"  हे वाक्य ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर आरक्त भाव आले.

" तिच्याशी बोलल्यावर आणि तिला समजल्यावर माझे नक्की झाले की मला तिच्याशी लग्न करायला आवडेल.  मला शिवांगी ला पण विचारायचे आहे की, तिलाही माझ्याशी लग्न करायला आवडेल का?"

यावर सगळ्यांनी शिवांगी कडे पाहिले तसे शिवांगी ने लाजतच "मलाही आवडेल" असे सांगितले.

तिच्या या बोलण्याने सगळीकडे  आनंद, उत्साह आणि प्रसन्नता आली. एकमेकांशी ते सगळे तो आनंद शेअर करायला लागले.
' बधाई हो' 'बधाई हो' 'अभिनंदन अभिनंदन' असे बोलणे सुरू झाले.
ते सुरू असताना अर्णव ने सगळ्यांना थांबवून सांगितले "फक्त माझ्या या लग्नाकरता काही अटी आहेत."

त्याचे  तसे बोलणे ऐकल्यावर ती सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागले.
त्याच्या आई आई वडिलांना सुद्धा तो असं काही म्हणेल हे माहिती नव्हते.
त्यांनी त्याला विचारले कसल्या अटी?
त्यावर शिवांगी चे बाबा म्हणले,
" आपण ऐकून तर घेऊन त्याला काय म्हणायचे आहे ते?"

"मला माहिती आहे, मी जे सांगणार आहे हे कदाचित तुम्हाला पटणार नाही पण त्यामागे एक विचारसरणी आहे"
सगळे शांत होऊन  तो काय बोलतोय ते ऐकत होते.
" माझ्या तीन अटी आहेत"
"काय?"
" पहिली अट. हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने केवळ 20 लोकांच्या सहवासात महाबलीपुरम येथे व्हावे.
दुसरी अट.  याचे कुठलेही रिसेप्शन किंवा मोठे फंक्शन झालेले मला नको आहे.
आणि तिसरी अट. आमच्या लग्नाचा कुठलाही वापर हा बिजनेस साठी व्हायला नको आहे."

हे ऐकल्यावर शिवांगी चा दादा आणि तिचे वडील दोघेही  आपल्या जागेवरून उठले आणि एकदमच म्हणाले,
"हे आम्हाला मान्य नाही आमच्या काही हौशी आहेत."

दादा पुढे म्हणाला, "अहो आम्हाला आमच्या बहिणीचे लग्न एकदम धुमधडाक्यात करायचे आहे.
आमचे अनेक नातेवाईक आहेत. त्यांना आम्ही पहिल्यांदाच सांगितले आहे की हे डेस्टिनेशन वेडिंग होईल. एक तर उदयपूर अथवा मुन्नार येथे."

"हो तर. आमच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही 50 कोटी रुपये बाजूला ठेवलेत ते अशा पद्धतीने लग्न करण्यासाठी नाही.  आमच्या काही इच्छा आहेत,  आमच्या मुलीच्या काही इच्छा असतील. आमचा एक वेगळा स्टेटस आहे तो स्टेटस आम्हाला फॉलो करावाच लागेल.
त्यामुळे असे होणे शक्य नाही."

अर्णव चे बाबा ही त्याच्याकडे पाहून म्हणाले, "असं कसं शक्य आहे अर्णव?  या गोष्टी आपल्या बाबतीत शक्य नाहीत. आपण बिझनेसमन लोक आहोत आणि आपल्या बिजनेस मध्ये एकमेकांशी कॉन्टॅक्ट आणि संपर्क हे सगळ्यात महत्त्वाचे असते.  जर एवढे साधेपणाने लग्न केले तर लोकं आपल्याला नाव ठेवतील आणि आपली कपॅसिटी आहे ना हे लग्न सगळ्यात मोठ्या पद्धतीने करू शकण्याची. आपली ताकद आहे हे मोठ्या पद्धतीत करण्याची. त्यांनी 50 कोटी लावले तर आपण ही 50कोटी लावू.

इंडिया मध्ये नसेल करायचे तर 'फुकेतआयलंड' ला करू. तिथे माझ्या मित्राचे फाईव्ह स्टार लक्झरी रिसॉर्ट आहे. तुझा हा वेडेपणा मनातून काढून टाक आपण खूप छान पद्धतीने हे लग्न करूयात"

"मी काही बोलू का?" शिवांगीने विचारले.
"बोल बेटा" तिचा दादा म्हणाला.

" मी अर्णव च्या मताशी पूर्णपणे सहमत आहे."
"काय हे कसं शक्य आहे?"

"का नाही शक्य दादा, पूर्ण शक्य आहे.  प्रत्येक वेळेला लग्न असल्यावर आपण एवढ्या मोठ्या पद्धतीने केलेच पाहिजे का?  तुझे लग्न एवढ्या गाजावाजात झाले आता माझं लग्न  साधेपणाने झालं तर काय हरकत आहे आणि आम्ही दोघेही साध्या लग्नासाठी तयार आहोत तर हा स्टेटस सांभाळण्याचा अट्टाहास का?

आपण लग्नाच्या चार दिवसासाठी हा सगळा थाटमाट करणार, पाण्यासारखा पैसा खर्च करणार, त्यापेक्षा आपण जर साध्या पध्दतीने केले तर काही बिघडणार नाही."

"शिवांगी तुझ्या लक्षात येत नाही आहे या चार दिवसाच्या लग्नाने असंख्य कॉन्टॅक्टस आणि बिझनेस मिळेल आपल्याला"

" म्हणजे तुम्हाला आमचं लग्न हा व्यवहार वाटतो का?"

" असं नाही आहे पण संबंध टिकून ठेवणे हे आपलं पण काम आहे ना"

" ते आम्ही पण पुढे करुच की. त्यासाठी लग्नच मोठया पध्दतीने केले पाहिजे असे आहे का?"

" हो असेच आहे आणि असेच केलं पाहिजे.  माझा या साधेपणाने लग्न करणाऱ्या गोष्टीवर पूर्णपणे आक्षेप आहे"

त्यांच्या या बोलण्याला खूप वेगळं वळण लागतंय हे पाहून अर्णवच्या आईने सांगितले की आपण थोडासा वेळ घेऊ आणि ठरवूया काय करता येईल ते.

ती बोलणी तशीच ठेऊन जनरल खाणे पिणे होऊन तंग वातावरणात अर्णव आणि त्याची फॅमिली बाहेर पडली.

आता एका गाडीत अर्णव आणि त्याचे बाबा तर दुसऱ्या गाडीत त्याची आई आणि लहान भाऊ अर्जित असे बसले.

ड्रायव्हर ने गाडी रस्त्याला लावली तसे त्याचे वडील त्याला म्हणाले,
" तु या बद्दल काहीच आयडिया नाही दिली आम्हाला. तिकडे जाऊन तोंडावर पडल्यासारखे झाले बघ.
तू काय बोलणार आहेस हे आधी सांगायचे तर.
आम्हाला वाटले फक्त तू शिवांगी पसंत आहे हे सांगायला चाललाय"

" बाबा मी काहीच वेगळे बोललो नाही"
" असे कसे नाही बोलला?  तू असं काही बोलशील ह्याची काहीच कल्पना आम्हाला असती तर आम्ही घरातच ब्रेनवॉश केले असते तुझे"

"का कशासाठी ब्रेनवॉश?"
"आपल्या स्टेटसला....."

"हा स्टेटस स्टेटस स्टेटस! कंटाळलोय- वैतागलोय मी जाम याला.
चेन्नई ला जा  तर चार्टरड फ्लाईटने जायचे.  तिथे घ्यायला रोल्स रॉयस येणार. फिरायला जाताना बीएमडब्ल्यू आणि रेंज रोव्हर असणार. हे सगळे कशासाठी?
जर कधी रिक्षात बसून बघितलं तर तेवढीच मजा येते बाबा"

" अरे तुला हे सगळे मिळाले ना म्हणून तू असं काहीतरी बोलतोय"
" अजिबात नाही बाबा, मला मिळाले आहे याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो पण जर नसते मिळाले तरी मी रिक्षातून हिंडण्यामध्ये तेवढाच आनंद मानला असता"

" रिक्षात बसल्यावर ती किती धक्के लागतात  हे तरीतुला माहिती आहे का कधी बसून बघ रिक्षात"
" बसलोय बऱ्याच वेळा बसलोय"
"तू रिक्षात बसलाय आणि आम्हाला माहिती पण नाही"
"कुठला गुन्हा केल्यासारखे काय विचारताय  बाबा"

"सिंघानिया ग्रुप चा मालक रिक्षामध्ये बसलाय!"
" त्याने तुमचा स्टेटस कमी झाला का बाबा?"
" अरे कोणी पाहिलं तर लोक नावे ठेवतील"
" तुमचा स्टेटस, तुमची लोकं, तुमची कीर्ती तुमचं सगळं हेच सांभाळायचं का जन्मभर?"

"तू असा विचार केला तर तुझा लहान भाऊ तो पण तुझ्या पाऊलावर पाऊल टाकेलं"
"अजिबात नाही,अर्जित खूप वेगळा आहे आणि तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल"

" म्हणजे तू करणार नाहीये"
" मी पण करेनच फक्त ही लग्नाची इच्छा माझी तेवढी ऐका मी विनंती करतो"

"अरे सिंघानिया यांच्या घरातील लग्न हे कुठल्यातरी छोट्या गावात होणे शक्य आहे का?"
" ठरवले तर सहज शक्य आहे बाबा"
" मला बिलकुल पटत नाही आहे हे. घरी गेल्यावर आईशी पण बोल तू"
" ठीक आहे"

घरी दोन्ही गाड्या लागोपाठ पोचल्या.
अर्णव हॉल मध्येच थांबला.
"बघा आपला मुलगा काय बोलत आहे" ते आईकडे पाहत म्हणाले.
"आई होतीच की तिथे" अर्णव म्हणाला.

आई अर्णव जवळ गेली त्याला बसवले आणि त्याच्या शेजारी बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली,
"अर्णव अरे बाबांची भूमिका चुकीची नाही आहे"

"आई मी त्यांना खूप चुकीचे नाही ठरवतोय. मी फक्त माझी इच्छा मांडतोय"

" हो पण तू विचार कर आपण सामान्य लोक नाहीत आपण जे करतो ते पेपरात छापून येते.आपल्या प्रत्येक गोष्टीवरती लोकांचं लक्ष असते.  तू असे काही वागला तर काहीतरी वेगळे अर्थ निघतील ना"

" काही वेगळे अर्थ निघणार नाहीत आई.  आपण क्लियर असावे लागते मी याबाबतीत क्लिअर आहे की लग्न स्टेटस प्रमाणे न करता आपण आपल्या इच्छेप्रमाणे करावे"

यावर आई काहीच बोलली नाही उद्या शिवांगी च्या घरून काय उत्तर येते याची वाट पाहूया.

रूम मध्ये जाऊन अर्णव ने शिवांगी ला मेसेज पाठवला,
"घरचे वातावरण कसे आहे?"
"तापलेले आणि तुझ्याकडचे?"
" उकळलेले"
"हा हा हा"
"ऑल द बेस्ट"
"सेम टू यु"

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all