स्टेटस:- भाग 5

Chennai Stay brought many good things for Arnav and Shivangi. Lets find out what they are doing

स्टेटस:- भाग 5

मरिना बीच वर त्यावेळेस पण बरीच चाहूल होती. समोरच्या रस्त्याच्या  मागे दिसणारे चेपॉक स्टेडियमवर चे लाईट्स ऑन होते.
समोर असणारा शांत समुद्र पण मनात खळाळणाऱ्या असंख्य लाटा असेच काहीसे तिचे झाले होते.
आज या समुद्रावर तिच्या सोबत अर्णव होता, तो अनुभव तिच्यासाठी हवाहवासा आणि नवीन होता.
प्रत्येक क्षण हा तिला त्याच्या सोबतीने घालवायचा होता,मनात एक हुरहूर होती आणि समोर त्याचे ते शांत, सभ्य पण मनमिळाऊ वागणे खूपच भावत होते.
आज त्याने स्वतःची स्टेटस ची वस्त्रे बाजूला टाकून सामान्य माणसा प्रमाणे जगणे काय असते हे दाखवले होते.
शहराच्या श्रीमंती पेक्षा गावाच्या मातीशी नाळ जोडायचा प्रयत्न मेळा होता.
नुरी त्यांच्या सोबत होती पण आणि नव्हती पण!
ती मुद्दामून त्यांना स्पेस देत होती. थोडी बाजूला असून पण तरीही सोबत आहे असे वागत होती.
तिच्यासाठी शिवांगी चे हे वागणे फार नवीन होते पण मनाला कुठेतरी ते आवडत होते.

त्याने तिथेच वाळूत बसायची जागा केली. तिघेही जण
तिथे बसले.
आजूबाजूला बरीच लोक होती त्यात काही मुले तर काही मोठी.
ते लोक रेतीचा किल्ला बनवत होते. त्यांचे वागणे ती शांतपणे बघत होती आणि अचानक म्हणाली,
"अर्णव हे असे लहानपण कधी जगायलाच नाही मिळाले बघ! आई, बाबा, हाताला धरून चालत आहेत, खेळवत आहेत हे कधी अनुभवलेच नाही! वाट्याला आले ते स्टेटस पायी मेड सोबत असणे, इन्फेकशन होईल म्हणून सगळ्यांपासून लांब राहणे! छोट्या छोट्या गोष्टीतला जो आनंद असतो ना तो कधी मिळालाच नाही..आणि कधी मिळवायचा प्रयत्न केला तर ते आपले स्टेटस नाही हे उत्तर!"
आपल्या मनाशीच ती बोलत होती आणि खंत चेहऱ्यावर जाणवत होती तीचे निरीक्षण करणारा अर्णव म्हणाला,
"माझे ही काही वेगळं नाही,पण येस मला हे माझ्या मुलांना नक्कीच द्यायचे आहे. जो आनंद मी उपभोगला नाही, जे आयुष्य मी अनुभवले नाही ते त्यांना नक्की देणार. मला त्यांना लगेच मोठे नाही करायचे आहे, त्यांचे बालपण त्यांना उपभोगता आले पाहिजे"
त्याचे हे वाक्य ऐकून दोघीही चकित होऊन त्याच्याकडे बघत होत्या, काही क्षणाने त्याला जाणवले की आपण काय बोलून गेलो.

एकदम शांत झालेल्या वातावरणाला फ्री करण्यासाठी त्याने नुरी आणि शिवांगी च्या हाताला धरून रेतीत हात घातले आणि  म्हणाला, "आणि अरे कोणी सांगितले आपण मोठे झालो? चला आपण पण ट्राय करू!"
तसे उत्साहाने त्या तिघांनी वाळूच्या किल्ल्याला बनवायला सुरूवात केली.
मधेच त्याने केलेले वाळूचे स्ट्रक्चर नुरी ने मुद्दाम तोडले, मग शिवांगीने तोडले, मग त्याने त्या दोघींचे तोडले.
नंतर एकमेकांवर वाळू फेक झाली मग ती वाचवता वाचवता सगळे पाण्यात गेले...येणाऱ्या लाटा भरपूर वेळ अंगावर घेत , दुसऱ्यांवर पाणी उडवत, लाटांशी कबड्डी खेळत, भरपूर मस्ती करत करत दमून भागून, थकून ते तिघेही रेतीवर पहुडले आणि वर पसरलेल्या चांदण्याकडे बघत राहिले.

ते पाहत असताना शिवांगी म्हणाली "अर्णव मला माहिती नव्हते तुझ्या मागे इथे आलेली मी, माझ्या आयुष्याचा एक अमेझिंग अनुभव मला मिळवून देईल."
"माझ्या मागे आलेली?" थोडं चपापुन आश्चर्याने तो शिवांगीकडे बघत म्हणाला.
तसं तिने  स्वतःची जीभ चावली आणि लगेच म्हणाली, "तूच आणले ना आम्हाला इथे, म्हणजे तुझ्या मागे आलो ना"
"हो ना, नाहीतर आम्हाला कुठे चेन्नई माहिती होते" नुरी तिची बाजू सावरत म्हणाली.

तेवढ्यात त्यांच्या मागे एक सायकल ची घंटी वाजली.
एक आजोबा सायकल वर कॉफी विकत होते.
टेक कॉफी प्लिज, नो इन्कम फ्रॉम एव्हीनिंग. व्हेरी नाईस कॉफी, माय वाईफ मेड, प्लिज टेक"
त्याचे बोलणे ऐकून अर्णव उठला आणि त्यांना म्हणाला, "हाऊ मेनी कपस लेफ्ट इन जार?"
"20 ओर मोर"
"सगळे पैसे मी देतो आम्हाला 3 कप द्या आणि बाकीची सगळ्यांना वाटून टाका" असे म्हणून त्याने 2000 ची नोट त्या आजोबांना दिली.
आजोबांच्या चेहऱ्यावरील कृतार्थ भाव पाहून शिवांगी च्या डोळ्यात पाणी तरळलं.
तिने मूक पणे अर्णव ला धन्यवाद दिले.

रात्रीच्या वेळेस त्या थर्माकोल च्या कपातून कॉफी पित असताना मरिना बीच तिला फार आवडला.
खरंतर ती चेन्नईच्या प्रेमात पडली होती.
जशी कॉफी संपली तशी तो जोरात म्हणाली,
" मला पुन्हा भूक लागली आहे रे!" तसे नुरी आणि अर्णव दोघेही मोठ्याने हसले.

पुन्हा जवळच असलेल्या चायनीज स्टॉल वर ते सगळे गेले.
उभे राहून वन बाय थ्री असे हक्का नूडल्स एन्जॉय करत त्यांनी खाल्ले आणि मग अर्णव ने जवळची रिक्षा थांबवली.
हॉटेल कडे जात असताना गार वारे त्यांना थंडी ची जाणीव करून देत होते.
" उद्या चे काय प्लॅन तुझे?"
"सकाळी मीटिंग आहे 10 ला. त्या मीटिंग प्रमाणे पुढचे प्लॅन होईल, का ग?"
"ठीक आहे,मी उद्या त्या स्वामी ना भेटेल आणि तुझी मीटिंग झाली की मला कॉल कर मला तुझ्या बरोबर बिझनेस एक्सपांशन बद्दल बोलायचे आहे"
"येस मॅडम!"

हॉटेलमध्ये पोचल्यावर गुडनाईट करून ते आपापल्या स्वीट रूमस मध्ये गेले .
पुढे काहीतरी त्याच्या मनात आले आणि तो विचार त्याला खुलवून गेला.
रात्री 2 वाजता तिच्या रूम चा इंटरकॉम वाजला तिने झोपेत उचलला "अर्णव बोलतोय!"
"हां बोल" झोपेत ती म्हणाली पण क्षणात लगेच विचारले" तू झोपला नाही?"
"सध्या मी गाढ झोपेत आहे आणि स्वप्नात तुझ्याशी बोलतो आहे" खोडकरपणे तो म्हणाला आणि हसला.
"व्हेरी फनी!"
"बाहेर ये रुम च्या".
"या वेळी?"
"नाही ग! उद्या दुपारी" थोडा वैतागत तो म्हणाला.
"सॉरी सॉरी, आलेच" असे म्हणून तिने इंटरकॉम ठेवला.
ती लगेच बाहेर आली तर हा आधीच उभा होता.
" चल, माझ्या मागून हळूच ये.माझ्या सिक्युरिटी ला कळता कामा नये" तो म्हणाला
तसे ती त्याच्या मागोमाग हळूहळू निघाली.
दोघेही लिफ्ट ने खाली स्विमिंग पूल पाशी आले.
ती म्हणाली " झोप नाही आली का तुला?"
त्याचे लक्ष होते तिच्या चेहऱ्याकडे. झोपेतून उठलेली ती थोडे विस्कटलेले केस जे वाऱ्याने उडून तिच्या गालावर तर काही मानेवर रुळत होते.
पिंक कलरचा तिचा सॅटीन चा नाईट गाऊन जो वाऱ्याने उडत कधीतरी तिच्या शरीराला चिकटत होता आणि गोड दिसणारा तिचा तो निरागस चेहरा जो फक्त तिचा आनंद दर्शवत होता.
तिने पुन्हा विचारले तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला " तू मगाशी काय म्हणत होतीस की माझ्या मागे आली?"
तशी ती बावचळली काय बोलावे कळेना आणि फक्त त्याच्याकडे पाहिले आणि त्याच लक्ष आहे हे कळल्यावर नजर खाली वळली तिचे गाल आरक्त दिसत होते.

"शिवांगी" त्याने फक्त हाक मारली.
"हं" इतकेच ती बोलली.
त्याने तिला हाताला धरून बाजूच्या चेयर वर बसवले, बाजूला छान पाणी होते, तिथेच काही शोभेची लावलेली झाडे, सोबत हिरवळ आणि आजूबाजूला पडलेला तो चंद्र प्रकाश हे सगळे तिला स्वप्नवत वाटत होते.
ती स्वप्नात असल्याप्रमाणे वावरत होती तो पुन्हा म्हणाला " शिवांगी तू ठीक आहेस ना?"
हो" ती म्हणाली.

ती चेअर वर बसली होती आणि तो तिच्या शेजारी बसला होता, म्हणाला
"शिवांगी तुझ्याशी काही बोलायचे आहे!"
"बोल ना" ती म्हणाली तर खरं पण तीचे हृदय जोरजोरात धडधडायला लागले होते.

"तूझा साधेपणा, उत्तम विचार आणि छान वागणूक मला भावली.
आज मी तुला न विचारता के काय करायला लावले, याचा तुला राग नाही ना आला?"
ती काहीच बोलली नाही फक्त तिचे आसुसलेले डोळे त्याच्याकडे बघत होते आणि बरेच काही सांगत होते.
"तुझ्या घरच्यांनी तुला एवढे जपले आहे आणि फुलासारखे वाढवले आहे, मी मात्र तुला आज अगदी बेफामपणे आयुष्य जगायला लावले, माझे काही चुकले का? तूला काय वाटते?"
"अर्णव, आज जे तू माझ्यासाठी जे केलेस त्याने मी किती आनंदी आहे ह्याचे मी कसे वर्णन करू?"

काही क्षण अबोल पण अर्थपूर्ण शांततेत गेले.
अर्णव ने काही बोलावे म्हणून ती कानात जीव आणून वाट पाहत होती.
"झोपतेस वर स्वीट मध्ये जाऊन?"
"नको"
"मग काय इथेच झोपणार?"
"झोपायला कशाला हवे? गप्पा मारुयात आपण मस्त"
त्याने हसून रिसेप्शन ला इंटरकॉम केला आणि कॉफी शॉप मधून तिथेच कॉफी मागवली.

"तुला कॉफी आवडते का रे खूप?"
"खूप.आणि तुला?"
"मला सुद्धा खूप"
"तुला रात्री गप्पा मारायला आवडतात का ग?"
"खूप. तुला?"
"मला सुद्धा खूप"  यावर ते दोघेही हसले.

"नेचर, गाणी, कॉफी, गप्पा, बऱ्याच कॉमन आवडी आहेत ना आपल्या"
"हो मग! त्यात आता चेन्नई ची पण भर पडली बरं का!"
"काय सांगतेस! मला चेन्नई मनापासून आवडते म्हणून मी कायम इथे येतो"
"तुला माहिती आहे अर्णव, एखाद्या शहरात जर आपल्या मनाला स्पर्शणाऱ्या काही गोष्टी झाल्या ना तर ते शहर आपल्याला खूप आवडते"
"खरंय! पण चेन्नईत तुझ्या मनाला काय स्पेशल फील झाले?"
ती नुसती हसली.
"सांग ना!"
तिने नाही अशी मान डोलावली.
"बरं, कानात सांग. मी कुणाला नाही सांगणार" तो म्हणाला.
तशी ती अजून हसली...
काही क्षण हसण्याचे झाल्यावर ती म्हणाली, "सांगू?"
"येस प्लिज"
"चेन्नई मधली ऑटो रिक्षा" ती मोठ्याने हसत म्हणाली.
यावर अर्णव ने कपाळावर हात मारुन घेतला.
त्याच्या या रिऍक्शन मुळे शिवांगी अजून जोरजोरात हसायला लागली.
समोर आलेल्या वेटरने एकदा त्या दोघांकडे बघितले आणि कॉफीचे कप तिथे ठेऊन निघून गेला.
तो निघून गेल्यावर त्याला बघत अर्णव ने  हसायला सुरुवात केली.
दोघेही मोठ्याने हसत असताना आकाशातल्या चंद्राचे प्रतिबिंब त्यांच्या कॉफीच्या कपात हळूच डोकावून हसत होते.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all