Feb 24, 2024
प्रेम

स्टेटस भाग 2

Read Later
स्टेटस भाग 2

स्टेटस :- भाग 2

ड्रायव्हर ने 2 वेळा विचारले की मॅडम कुठे जायचे तरी तिचे लक्ष नव्हते. गाडी हलली नाही तेव्हा तिने पाहिले तर ड्रायव्हर अपेक्षेने तिच्याकडे बघत होता. 
ती म्हणाली "मला आता कंपनीमध्ये सोडा पण दुपारनंतर तुम्ही जा, मी गाडी घेऊन जाईल."
तो काहीच बोलला नाही, त्याने गाडी कंपनीच्या दिशेने वळवली. हिचे विचारचक्र सुरु झालें! आज कित्येक वर्षांनी ती अशी 7 पर्यंत झोपली होती, "का असे व्हावे?
का आपल्याला झोप लागत नव्हती? का अर्णव चे विचार आताही मनात येत आहे? तो काय करत असेल?"
काही कळत नव्हते. मोबाईल हातात घेतला आणि व्हॉटस ऍप ला पाहिले तर तो ऑनलाइन नव्हता. "काय करू का नको त्याला कॉल?" मनाशी विचार करत शेवटी कॉल केला.
 
पाचव्या रिंगला फोन उचलला गेला आणि उत्साहात समोरून "हॅलो गुड मॉर्निंग"असा आवाज आला.
तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले
 " कुठे आहेस अर्णव तू?"
"मी ऑफिस ला असणार ना यावेळी!"
"अरे हो पण तुझा आज काय प्लॅन आहे?"
"का ग?"
"काही नाही सहज विचारले!"
तिचे उत्तर ऐकून त्याला हसू आले जणू प्रश्नातील मेख कळली, म्हणाला " दुपारी 2 नंतर कामाचा लोड जरा कमी असेल. तुझं काय?"
ती उत्साह लपवत म्हणाली " मी फ्री आहे आज! जाऊयात का कुठे छान ड्राईव्ह ला? लंच करू आणि थोडी शॉपिंग! चालेल का?"
"हो चालेल."
"मला ऍड्रेस मेसेज कर, आज मी पिक करेल तुला."
आज खरं तर  महत्वाची मीटिंग होती त्याची. कडक शिस्तीचा तो आज पहिल्यांदा कामाला बाजूला सारून काही ठरवत होता म्हणाला " येस मॅडम पाठवतो हां. आता ठेऊ का? कॉन्फरन्स मधून बाहेर आलो आहे."
"सो सॉरी! तू ऍड्रेस पाठवून ठेव, बाय."

आज त्याला भेटायचं म्हणून उत्साह संचारला होता तिच्यात. कधी दुपार होणार हा विचार मनात आला तशी ती थोडी दचकली 'मी का असे वागतेय?'
तोवर कार कंपनीच्या आवारात आली होती. 
तिने ड्रायव्हर कडून कार ची किल्ली घेतली आणि त्याला पाठवून देत होती तर तो जाईना. 
"ताई नका ना पाठवू मला ! दादा साहेब रागवेल मला."
"नाही कळणार त्यांना, जा तू आणि हो तू पण बोलू नकोस."
नाईलाजाने तो गेला.

 " माझी आजची मीटिंग कॅन्सल कर" कॉन्फरन्स मध्ये असताना अर्णव सेक्रेटरी ला म्हणाला तसं तिला नवल वाटले करण तिने जॉईन केल्यापासून आज हे पहिल्यांदा घडत होते.
त्याने तिला अड्रेस मेसेज करून ठेवला.  
आज त्याचे लक्ष सारखे घड्याळाकडे जात होते.
 
कॉन्फरन्स नंतर त्याने काही महत्वाची कामे 1 वाजेपर्यंत उरकली.
 त्यालाही तिला भेटायची ओढ लागली होती.  
त्याच्या  केबिन मधील असलेल्या स्पेशल प्रायव्हेट रूम  मध्ये जाऊन तो फ्रेश झाला.
 कपडे बदलले. 
व्हॅन हुसेन चा स्काय ब्लु कलरचा शर्ट, ऍलन सॉलिची ओव्हरी कलरची पॅन्ट, सोबत लुई फिलिपीचे शूज.
कपड्यांवर डेव्हिड ऑफ कुल वॉटर चा छान परफ्युम स्प्रे करून तो मस्त आवरून बसला.
रूम मध्ये आलेल्या त्याच्या सेक्रेटरीला हे सगळं नवीन होते पण ती काही न बोलता फक्त हसून निघून गे

पोचायला 1 तास लागेल या बेताने ती कंपनी मधून कार घेऊन निघाली, तिचा अंदाज बरोबर ठरला. आता पोचणार त्याच्या 10 मिनिटे अधो तिने कॉल केला तर तो वाटच बघत होता.
तो लिफ्टने लगेच खाली आला. 
तिने कार स्टॉप करताच तो आत डोकावला, तिला पाहून शॉक झाला. साध्या पिच फॉर्मल शर्ट आणि ब्लॅक ट्राउझररधे सुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती.
डोळ्याला मोनालीसा गॉगल आणि पायात फॉर्मल ब्लॅक शूज. गाडीमध्ये एक छान फ्रेगरन्स दरवळत होता.

तिने हाय म्हटले तसं तो भानावर आला आणि तिच्या बाजूला बसला.
त्याने सुदधा घातलेला अटायर पाहून तिला तो डॅशिंग वाटला.
 ते थोडे पुढे गेले तोच रस्त्यात गर्दी दिसली तशी तिने कार थांबवली. काहीतरी गोंधळ  जाणवून तो लगेच कार मधून उतरला.

पाहिले तर एक मुलाचा अपघात झाला होता, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि लोक फक्त बघत होते. तो लगेच पुढे गेला, त्याने अंबुलन्स ला कॉल केला,जवळच्या पोलीस स्टेशन ला कॉल करून कळवले. 'अर्णव सिंघानिया' नाव मोठे असल्याने सगळे मॅनेज झाले.
ती त्याचे शांतपणे निरीक्षण करत होती आणि तो आपल्याच नादात सगळी हालचाल करत होता. 
त्याचा घेतलेला पुढाकार, त्यातून दिसत असलेली माणुसकी! ती इम्प्रेस होऊन बघत होती.
या सगळ्या नादात त्याच्या शर्टावर रक्त सांडलेले पण त्याच्या ते खिजगणतीतही नव्हते.

सगळे नीट अरेंज झाले हे पाहून तो गाडीत परतला आणि तिला म्हणाला " आपण कुठे जातो आहोत?"
" मला गोंधळापासून लांब जायचे आहे, तुला माहीत आहे का असे काही?"
" हो नक्की! चल मी नेतो तुला! मी ड्राईव्ह करू का?"
"येस बॉस!" म्हणत ती कारमधून उतरून बाजूच्या सीट वर बसली आणि त्याने स्टेयरिंग हाती घेतले.

छान किशोर कुमारची गाणी तिने लावली, मग एखाद्या गाण्यावर चर्चा करत छान गप्पा मारत ते जात होते. दोघेही उत्साहाने आनंदाने एकमेकांची साथ एन्जॉय करत असताना कुठे जातोय हे सुद्धा तिने विचारले नाही.
कार कधी मुंबई बाहेर आली हे तिचे तिला कळले नाही. 

भायदंर ची खाडी पार केल्यावर डावीकडे टर्न घेतला. पुढे जाऊन मुंबई अहमदाबाद हायवे एके ठिकाणी वळत होता त्याच्या आधीच्या ह्या टर्न ला त्याने गाडी आत घेतली आणि 5 मिनिटे त्या रस्त्यावरून पुढे जाऊन कार पार्क केली.
सीट बेल्ट काढत असताना तो म्हणाला " मॅडम आपण पोहचलो आहोत" तसं तिने बाहेर पाहिले तर आजूबाजूला खूप छान हिरवेगार डोंगर दिसत होते. समोर एक रेस्टॉरंट ते सुद्धा जणू निसर्गाच्या कुशीत वसलेले एक ठिकाण इतकेच तिला जाणवत होते. 
त्याच्या पाठोपाठ ती उतरली, तो म्हणाला " ये माझ्या सोबत" ती निघाली.
थोडं चालून गेले तर तिथे खळाळत असलेला ओढा, बाजूला छानसे दगड, गर्द हिरवीगार झाडी बघून ती हरखून गेली. 
भान विसरून तिने  पायातील सँडल फेकल्या.  शर्ट च्या बाह्या वर केल्या पॅन्ट वर खेचली आणि  त्याच्या हाताला धरून धावत पाण्याकडे निघाली.
त्याला हे अनपेक्षित होते. थोडा गोंधळलेल्या अवस्थेत तो  तिच्यासोबत पुढे गेला. पण  तिचा तो बालिशपणा बघून त्यांच्यातील लहान मुलगा सुद्धा जागा झाला आणि तो तिला सामील झाला.
ते दोघे भरपूर पाण्यात खेळले, दमून पाण्यात पाय सोडून ती त्याच्या समोर बसली. 
तोही तिचे हे वागणे एन्जॉय करत होता, त्याला कळून चुकले की हिला का ते अवडंबर आवडत नाही कारण ती निसर्गवेडी होती.
" मॅडम"
"काय रे सारख सारखं मॅडम! मला नाव नाही आहे का?" वैतागत ती बोलली.
" शिवांगी अग तुला चिडवत होतो मी. बरं मला तर भूक लागली आहे तुझे काय?"
"मला पण रे!"
"तुझे झाले असेल खेळून तर जायचे का जेवायला?"
"हो" हसतच ती म्हणाली.
दोघेही पॅन्ट वर खेचलेली, शर्ट च्या बाह्या फोल्ड,अर्धवट सुकलेल्या तर अर्ध्या ओल्या आशा अवस्थेत ते निघाले तिच्या एक हातात सॅंडल तर तो ती पडू नाही म्हणून सांभाळत असे ते रेस्टॉरंटमध्ये आले.

ते रेस्टॉरंट पण फार वेगळे भासले तिला. तिथे कोणताही बडेजाव नव्हता पण केन फर्निचर, त्याचेच इंटिरिअर, मध्येच पाण्याचा देखावा झाडे सगळे कसे लोभस होते.
वेटर मेनू घ्यायला आला आणि त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याला वाटले की ह्याने आपल्याला ओळखले पण तो सारखा त्याच्या शर्टकडे पाहत होता.
त्याचे लक्ष गेले तेव्हा त्याला कळले की जे रक्त सांडले आहे त्याकडे वेटर बघत आहे. 
त्याने त्याला सांगितले की काळजी करू नकोस, रक्त माझे नाही आणि मी कोणाला मारले पण नाही...
ती त्यावर खळाळून हसली.
काय ऑर्डर देऊ असे त्याने तिला विचारले पण ती काही बोलली नाही मग त्याने स्वतः जेवण ऑर्डर केलं, मेनू एकदम उत्तम!

पनीर, मिक्स व्हेज, पराठा, सॅलड, दाल आणि राईस. नंतर खास आईस्क्रीम.
अधाशासारखी जी जेवणावर तुटून पडली, तो हसत होता आणि जेवत होता.
"आवडले का ठिकाण आणि जेवण?" 
"अर्णव विश्वास ठेव इतके स्वादिष्ट जेवण,असा निसर्ग मी पहिल्यांदा अनुभवते आहे. भूक काय असते आज मला पहिल्यांदा कळले. थँक्स! अगदी मनापासून."
"ओहो!"
" का रे अर्णव काय झाले?"
"अग तू थँक्स म्हणाली मग संपले ना सगळे!"
"म्हणजे"
"मला थँक्स म्हणून तू यापुढे असे एन्जॉय करायला जायचे की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे केलेस!"
आता तिला कळले की हा खोड्या काढतो आहे, " दे मला परत!"
"काय?" तो दचकून म्हणाला.
"माझे थँक्स रे!" आणि खळाळून हसायला लागली.
ती इतकी गोड दिसत होती की भान हरपून तो फक्त बघत होता.
" चला म्हणजे शिवांगी मॅडम ला आवडले तर."
"येस बॉस! तुला पान आवडते का रे?"
त्याने काहीच न बोलता वेटर ला सांगून दोन मघई मसाला पाने मागवली ते पाहून ती आणखी खुश झाली, मस्त एन्जॉय करत ती खात होती.

संध्याकाळ व्हायला आली होती. थोडा वेळ गप्पा मारत ते फिरत होते. ते फिरणे दोघांनाही पण आवडले होते त्यामुळे अवघडलेपणा सोडून एन्जॉय करत होते.

त्याला विचारायचे तर नव्हते पण तरी त्याने विचारले.
"शिवांगी निघायचे का? आपल्याला पोचायला 8.30 तरी होणारच आहेत."

"हो चल निघू यात."(मनात तर होते की नाही जायचे पण काय करणार.जावे लागणार)
शिताफीने तो ड्राईव्ह करत होता. 
आता एकमेकांना सोडावे लागणार या विचाराने गाडीत थोडा वेळ शांतता होती मग ती बोलली,
 "अर्णव I am so happy today!"
"Welcome" म्हणत तो गोड हसला.
तिला अजिबात जायचे नव्हते... त्याला तर तिच्या गाडीतून उतरायची ईच्छाच नव्हती. 
दोघेही अधूनमधून एकमेकांकडे पाहत होते आणि नजरानजर झाल्यावर हळूच हसत होते. 

 त्याची कार नसल्याने तिने त्याला घरीच ड्रॉप केले.
निघताना त्याला काय बोलावे सुचलेच नाही..
"बोल काहीतरी अर्णव, मी चालले आहे आता?"
 "काय बोलू, येतेस घरी?"
"हा हा हा"
"खरंच विचारत आहे मी"
"खरंच हसत आहे मी"
"ओके...परत कधी"
"हं... चल बाय!"
"बाय"
तिने गाडी वळवली आणि तिच्या घराकडे गेली.
घराच्या गेट मध्ये पोचली तर तिची आणि तिच्या दादाची कार एकाच वेळी गेट जवळ होती. पाठोपाठ दोन्ही कार आत शिरल्या, दादा मागच्या सीट वरून ड्रायव्हर ने दार उघडल्यावर बाहेर आला तर ही स्वतः ड्राइविंग सीट वरून बाहेर आली. तिला तसं पाहून तो एकदम म्हणाला " तू ड्राईव्ह केलस? ड्रायव्हर कुठे आहे?"
"अरे मीच सांगितले त्याला जायला! मी जरा बाहेर होते दुपारपासून."
"हे बघ शिवांगी तुला आवडो अथवा नाही पण हे आपल्या स्टेटस ला शोभत नाही! ड्रायव्हर हा हवाच!" थोड्या हुकमी भाषेत तो बोलला.
तिला हे सगळं  कधीच पटत  नव्हते पण वाद नको म्हणून ती काही न बोलता तिथून निघाली आणि सरळ तिच्या रूम ला गेली.

क्रमशः

©®अमित मेढेकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Amitt Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!

//