Feb 28, 2024
सामाजिक

नितीमुल्य जपुया..सुरुवात स्वतःपासून करूया

Read Later
नितीमुल्य जपुया..सुरुवात स्वतःपासून करूया

धैर्य, माधव आणि यशदाचा एकुलता एक मुलगा...लग्नानंतर दहा वर्षांनी अनेक देवांना नवस करून, महागडे डॉक्टर, उपचार सगळं करून त्यांच्या संसारवेलीवर उमललेलं फुल.. एक वेळ तर अशी आली होती की सगळ्यांनी अपेक्षा सोडली होती कारणही तसंच होतं.. डॉक्टरच्या रिपोर्ट्स नुसार शक्य नव्हतं माधव आणि यशदाच्या नशिबात आईवडील होणं पण म्हणतात ना कर्ताकरविता असतो त्याने सगळ्यांसाठी काही न काही नियोजन करून ठेवलेलं आहे फक्त विश्वास हवा...☺️☺️

माधव एकवेळ हिम्मत हरला होता पण यशदा कमालीची सकारात्मक आणि संयमी.. ती खचली नाही की डगमगली नाही.. एव्हाना इतके टोमणे आणि बोल ऐकून एखादी स्त्री हरून गेली असती पण यशदाने तिच्या संयमाचा बांध ढळू दिला नाही आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अखेर धैर्यचा जन्म झाला... मग काय नवसाचा असल्याने अतिलाड आलेच..  दोन्ही आजी आजोबा, काका काकू, मावशी, मामा सगळ्यांचा तो जीव की प्राण आणि एकटा असल्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षाही फार..

माधव पोलीस सेवेत असल्याने साहजिकच त्याला वाटत होते मोठं होऊन धैर्यनेही पोलीस होऊन देशसेवा करावी. आजीआजोबांना अजून काही वेगळीच स्वप्न  साकारायची होती..धैर्यने एखाद्या खेळात देशाचे नेतृत्व करावे असे त्यांना वाटत होते. यशदा स्वतः शिक्षिका होती पण तिला वाटत होते त्याने डॉक्टर व्हावे.जबरदस्ती नव्हती काहीच पण बोलून बोलून प्रत्येक जण आपली इच्छा त्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असे.

हळूहळू जसा धैर्य मोठा होत होता तसा त्याला ह्या अपेक्षांचा त्रास होऊ लागला कारण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होते..धैर्यला शेफ म्हणून काम करायचे होते.बघता बघता दहावी झाली धैर्य चांगल्या गुणांनी पास झाला आता खरा पेच होता. त्याने मनाविरुद्धच विज्ञान शाखेत प्रवेश घेतला तसा यशदाला आनंद झाला.

बारावी होत होत त्याने क्रिकेट खेळणं सोडलं होते तसे आजीबाबा हिरमुसले. त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते शेवटी धैर्यने त्याची इच्छा घरात बोलून दाखवली तर घरात आकांडतांडव झाले."स्वयंपाक ही काय करिअर करण्याची गोष्ट आहे का? मुलीची काम असतात ही सगळी.. त्यात किती कमाई होणार आहे, तुझ्यासाठी काय नाही केलं आम्ही,लोक काय म्हणतील वगैरे वगैरे.."

माधवने कधी नव्हे ते धैर्यवर खूप चिडचिड केली. आजीबाबा काही बोलले नाही पण त्यांची नाराजी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.यशदाही उदास दिसत होती पण धैर्यला असं बघूही शकत नव्हती शेवटी आईच ती. तिने धैर्यशी बोलायचे ठरवले. धैर्य सांगू लागला,"मान्य आहे आई तुम्हाला वेगळ्या अपेक्षा आहेत माझ्याकडून पण मला जे जमत नाही ते मी केलं तर आयुष्यभर दुःखी राहीन, ज्या कामात मला अजिबात रस नाही तिथे करिअर का करू मी? आणि काय वाईट आहे एका पुरुषाने स्वयंपाकी म्हणून काम केले तर ? हे क्षेत्र पुरुषाचे हे स्त्रीचे असं कुठंही लिहलेलं नाहीये आणि मुळात स्वयंपाक ही बायकांची मक्तेदारी आहे ही मानसिकताच चुकीची आहे.. मी रोज बघतो तू नोकरी करूनही दिवसभर किचनमध्ये राबते,कुणीही तुला मदत करत नाही, मी काही करायला लागलो की तुही करू देत नाहीस आणि घरात सगळे म्हणतात ती बायकांची काम आहेत..किती दिवस आपण हेच बुरसटलेले विचार पुढे घेऊन जाणार आहोत? आज सगळ्या आंतरराष्ट्रीय हॉटेल मध्ये शेफ जास्तीत जास्त पुरुषच आहेत मग आपल्याच घरात किचनमधे जायला इतका कमीपणा का वाटावा आई?? आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करतो मग सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी ना?आणि मुळात समानता हा प्रत्येकाचा हक्क नाहीये का?"

धैर्य बोलत होता आणि यशदा कौतुकाने त्याच्याकडे बघत होती. तिचे डोळे भरून आले होते तिला धैर्यचे म्हणणे पटले होते. तिने धैर्यला मिठी मारली आणि म्हणाली ,"खरं आहे बाळा,मी शिक्षिका असून आज तुझ्याकडून खूप काही शिकले..एक शिक्षिका म्हणून रोज शाळेत नितीमूल्यांची शिकवण देत असते पण घरात वागताना सगळ्यात महत्वाचे मूल्य स्त्री पुरुष समानता विसरून जाते..खूप चुकलं माझं..मला माफ कर बाळा.. तुझ्या इच्छेप्रमाणे सगळं होईल.मी बोलेन घरात सगळ्यांशी.."

धैर्यने आईचे डोळे पुसले आणि दोघेही आनंदी झाले. म्हंटल्याप्रमाणे यशदाने धैर्याला साथ दिली.माधवला समजावले,आईबाबांना समजवायला जरावेळ लागला पण शेवटी सगळे आनंदाने धैर्यसोबत उभे राहिले आणि आज तो एक प्रख्यात आंतरराष्ट्रीय नामांकित हॉटेलमधे चीफ शेफ म्हणून कार्यरत आहे.

खरं आहे ना मित्रमैत्रिणींनो, आपण नेहमी स्त्री पुरुष समानता ही स्त्रीच्या नजरेतूनच बघतो पण कित्येकवेळा पुरुषांवरही परिस्थितीमुळे किंवा इतर काही कारणास्तव अन्याय होत असतो. समानता हा पुरुषांचाही अधिकार आहेच की!चला तर मग सुंदर बदल घडवूया, नितीमुल्य जपुया आणि सुरुवात स्वतःपासून करूया.

लेख आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. माझे इतरही ब्लॉग वाचण्यासाठी मला नक्की फॉलो करा.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//