Jan 19, 2022
नारीवादी

स्त्री - शक्ती की सहनशक्ती?

Read Later
स्त्री - शक्ती की सहनशक्ती?

स्त्री? 
आजवरच्या आयुष्यात खुप गोष्टींवर लिहायचा प्रयत्न केला, मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसाला ओढूनताणून यमक जुळवत काही कडवी लिहिली, कधी काही चारोळ्या केल्या, आमच्या सोबत प्रतिष्ठानसाठी पोस्ट लिहिल्या, परंतु जे थेट मनाला भिडला ते शब्दात मांडायची कधी हिंमतच नाही झाली...

आज फेसबुक वर एक 3-4 व्हिडिओस पहिले आणि म्हटलं चला घेऊन बघू चॅलेंज...

हा लेख आतापर्यंत आयुष्यात आलेल्या सर्व स्रियांना समर्पित!!

एखाद्याने एखाद्या घरात आयुष्य सुरु करायचं, आपले लाड-कौतुक करून घ्यावे आणि मग अचानकपणे एक परंपरा म्हणून दुसऱ्या घरात प्रवेश करत नव्या माणसांशी जुळवून घ्यायचं. आपल्या मनाला मुरड घालत खंबीरपणे उर्वरित आयुष्याला सुरुवात करायची आणि हो ते पण कितीतरी बिना वेळापत्रकाच्या विना पूर्वसुचना समोर येणाऱ्या परीक्षा देत. या परीक्षांमध्ये थोडं जरी डगमगलात तर तुमच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह ठरलेले, लोकांचे बोल ठरलेले; बाहेरच्यांचे डोळ्यात पाणी आणणारे तर आपल्यांचे काळजात खोलवर जखम करणारे! बरं या परीक्षांचे विषय सुद्धा वेगळे, आपल्या अंदाजापलिकडचे. कधी एकाच तासात किती परीक्षा द्यावा याचे नियम नाहीत. तुमच्या मनाचे किती अवमूल्यन होईल याचे तारतम्य नाही. त्यामुळे तुम्ही किती लवकर जखमांवर आशेची मलमपट्टी करता यावर तुमचा पुढील स्पर्धेसाठीचा स्टॅमिना अवलंबून...

कधीकाळी तुमचं उदाहरण लोकांना आदर्श म्हणून दिलं जायचं, तुम्हांला ते सातवे अस्मान वाल फील यायचं.. आयुष्याचा नवा टप्पा सुरु झाला आणि आता तुम्हांला दुसऱ्यांची उदाहरण दिला जातात. टप्याटप्यावर तुम्हांला तुलेवर बसावं लागतं, जिथे तुमचे वजन जास्त ते नेमकं चुकीचंच ठरवलं जात कारण तुमच्यासाठी मापदंड वेगळेच असतात.. सहनशक्तीची परिसीमा गाठावी लागती ती अशा वेळेसच..


भले तुम्ही नव्या युगाच्या असाल पण मन तर तुम्हाला पण आहे, मन तुमचं पण बंड करून उठतं पण कारुण्य त्या सर्वांवर पाणी फिरवत. चीड तेव्हा येत असेल जेव्हा लोक त्याला दुबळेपणा म्हणत असतील, त्यांना काय माहिती तडजोडीची व्यक्तिगत आयुष्यातली व्यख्या काय!!


आज कदाचित तुमच्यासाठी पूर्वीसारखे बाभळीचे काटे नसतील पण गुलाबाचे तर आहेच. आणि हे सत्य मान्य नसणारी जर कोणी असेल तर तिच्या नशिबाला सलाम..


नव्या आयुष्याची अचानकपणे नागमोडी होणारी वळणे घेत तुमचा प्रवास चालू असतो. काळजातल्या वेदनांची धार आता बोथट वाटू लागते आणि अचानकपणे एक नवा पण हवाहवासा, कित्येक प्रकारच्या भावनांची एकाच क्षणात जाणीव करून देणारा पेपर समोर येतो-मातृत्वाची चाहुल!!


मनाच्या दुखण्याला विसरून एक नवं स्त्रीत्व आकाराला येते, आशेचे नवे किरण दिसू लागतात, स्वप्नांची नवी दुनिया समोर असते.. बातमी सांगताच तुम्हांला डोक्यावर घेतलं जाते, काही दिवस तुम्ही फुलांप्रमाणे जपले जातात, सारं जुनं विसरून तुम्ही नव्याने माणसं वाचू लागता आणि अचानक पान बदलतं आणि माणसं सुद्धा.. देवाच्या डोक्यावर ठेवलेले फुल सुद्धा संध्याकाळी निर्माल्य म्हणून अडगळीला जातं हे वास्तव तुमच्या समोर येत आणि तुम्ही कोसळता.. आमच्या पिढीला ही अतिशयोक्ती असेल पण कधी आपल्या जुन्या पिढीशी नातं जोडून पहा, त्यांचं अंतरंग वाचून पहा मग तुम्हाला जाणवेल की शो मस्ट गो ऑन हे लोक कधीपासून म्हणायला लागलेत..


शरीराचं आणि मनाचं अवघडलेपण घेऊन आयुष्य सुरु ठेवायचं.. तोच दिनक्रम फक्त डॉक्टरांच्या भेटी या अधिकच्या आणि त्या भेटीसुद्धा तुमच्यापेक्षा तुमच्या पोटात वाढणाऱ्या घरांच्या वंशासाठी.. पटत नसेल तर तुमच्या गर्भारपणात , तुला काही अडचण नाहीं ना हा प्रश्न कुण्या एकाने तरी विचारलेला तुम्हाला आठवतोय का पहा..


तुमचं बाळंतपण होतं तुम्ही आई होता, सारं जग आता त्या लहान जिवाभोवती फिरतं राहते. तुमचं टाईम टेबल तेच पुर्वीचच पण आता त्यात संगोपन पण असतं.. घरचे समजदार असतील तर तुम्ही सुखी आणि नसतील तर? रात्री झोपेतून मुल जागे झालं तर त्याला शांत करणे हे तुमचं काम, बाळाचे लसीकरण लक्षात ठेवणे हे तुमचे कर्तव्य, त्याच्या आजारपणात तुम्ही रात्री जागून काढणं हे तुमचं आईपण.. आणि या सर्वांत तुम्ही जर नोकरी करणाऱ्या असाल तर मग अग्निदिव्यच!! प्रसूती नंतरच्या मानसिक तणावाला तोंड देत नोकरीतले तणाव झेलायचे आणि बरे त्याचे परिणाम घरी होऊ नये म्हणून खबरदारी बाळगायची नाहीतर अजून एक तणाव ठरलेला. शेअर मार्केटचे दर जितके वरखाली होत नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने बाळ काय करत असेल, कसं असेल यामुळे तुमचं ब्लडप्रेशर बदलत असते.

मुल जस मोठे होऊ लागतो आपल्या मानसिक ताकदीची कसोटी अधिक गंभीर होते. त्याची  वाहवा सर्वांच्या हक्काची तर त्याची दूषणं ही तुमची.. आपलं कमीपणा तुम्ही ओढवून घेता पण प्रतिउत्तर टाळता.. तुमचं दुखणं तुमच्या साठी कवडीमोल असतं पण मुलाचं साधं रडणं तुमच्यासाठी जास्त वेदनादायी असतं. मुल अजुन मोठं होत जातं, तुमच्या पासून थोडं लांबच राहायला लागतं, कारण बाबाच्या मोबाईल मधली सॉफ्टवेअर कुठून  अपडेट करायचं हे त्याला माहित असतं पण तुमचं नाही.. मुलाचे आयुष्य मोठे होते आणि तुमच्याशी संवाद कमी.. नवीन बदल तुम्हाला माहीत नसतील हे गृहीत पकडलेले असते आणि प्रत्येक गोष्ट ही तुम्हांला सांगितलीच पाहिजे हे गरजेचे नाही असं मनात भरलेले असतं. पुन्हा तुम्हाला निर्माल्यात पडल्याची भावना येते पण मुल सुखी तर आपण सुखी हे पारंपरिक आश्वासन मनाला देत तुम्ही भावनांचा कल्लोळ शांत करता.

तुमच्यातल्या बऱ्याच जणी मैत्रीण बनण्याचा छान प्रयत्न करतात, खूप साऱ्यांना बऱ्यापैकी जमते पण ती खास वाली फ्रेंडशिप होतच नाही मग परत आपल्यातच कमी हे पुन्हा एकदा ओढवून घेतलं जातं.. अधिकाधिक मुले तितका संघर्ष अधिक आणि मग काय त्रागा हा ठरलेला.. तुम्ही विनाकारण आकांडतांडव करता असा ठपका तुम्हांला पडतो पण तुमची घुसमट कोण ओळखतो.. तुम्हांला त्याची काही पडली नसते कारण तुमच्यातला स्व पण कधीच संपलेले असतं, जगत असते ती फक्त आई!!!


मुले जशी जशी लग्नाच्या वयात येतात तसे तुमच्या आयुष्यच उत्तरायण चालू होतं. मुलांच्या आणि तुमच्या विचारातली सो कॉल्ड जनरेशन गॅप आता खुप मोठी असते.. नेमके याच वेळेस मेनोपॉज मुळे होणारी चिडचिड जोरात असते. त्याचीच परिणीती ही तुमच्या बंडात होत असते.. घरच्यांच्या मते तुम्ही विनाकारण बाऊ करत असता आणि नेमकं हेच तुम्हांला पटत नसते. सारे द्वंद्व तुमच्याच मनात सुरु असल्याने बाकीच्यांना ते जाणवणार नसतंच त्यामुळे आपसूकच माघार ठरलेली..

काही काळात तुमचे अहो नोकरीतून निवृत्त होतात पण  तुम्हांला मात्र तुमच्या जबाबदारीतून निवृत्त होता येत नाही कारण तुमचं कार्य हे तसं बघायला गेले तरी त्यांच्या मते दुय्यमच असते.. असो त्याने आता तुम्हाला काही फरक पडणारा नसतो कारण समजूतदारपणाने आता परमोच्च सीमा गाठलेली असते.. सारे अपमान पचवण्यासाठी मन निलाजरे झाले असते. मत मांडल्यावर तुला नाही कळणार राहू देत, असे म्हंटले की बाय डिफॉल्ट माघार पक्की!!


अवकाशाने मुलांची लग्न होतात, बेडरूम मधून तुमचा मुक्काम आता हॉल मध्ये येतो. नव्या नवलाईने सुनेभोवती तुमचं कुटुंब फिरतं. निर्माल्य आता खूपच जीर्ण झालेय याची तुम्हाला हळुवार जाणीव होते. तुमच्यातल्या काही सासूच्या भूमिकेत अगदी समरसून जातात. सुनेऐवजी मुलगा आपलाच राहिला पाहिजे या आटापिट्यातुन तुम्ही विसरून जाता की तुम्ही पण एक स्त्री आहात आणि घरी सून म्हणून आलेली पण स्त्रीच! घरात एक नवी जुगलबंदी सुरू होते, ज्या परीक्षा एकेकाळी तुम्ही द्यायचात त्याच परीक्षा आता तुम्ही घेवू लागतात. तुमच्यामते अधिकच्या पावसाळ्याच्या अनुभवामुळे तुम्हाला प्रवाहाचा जास्त अंदाज आहे असे तुम्हांला वाटू लागते परंतु प्रवाहाची बदललेली दिशा तुम्ही लक्षात घेतलेली नसते.. अड्डेलतट्टू भूमिका घेतली तर व्हायचे तेच होते, प्रवाह बेधुंदपणे नात्यात घुसतो आणि सर्वांना वेगवेगळ्या किनाऱ्यावर नेऊन सोडतो.

आता तुम्ही पुरत्या कात्रीत सापडता आणि आपलंच चुकलं बोलून माघार घेता. पण नव्या पिढीची सहनशक्ती तुमच्या पेक्षा खूप कमी असते तर अभिमान किती तरी पटीने जास्त. तुमच्या माघारीला काही अर्थ नसतो कारण नात्यात आता कटूपणा असतो. तुमच्या आयुष्याचा आधीचा टप्पा तुम्हांला आठवतो पण आता उशीर झालेला असतो. आता तुम्ही त्या घरच्या मुख्य नसता पण नव्या पिढीसाठी तुम्ही बांडगुळ असता..

थोडं जास्तीचे, पदरचे लिहिले असे वाटेल पण आपल्या आजूबाजूला डोळे उघडून बघितले तर हे भयाण वास्तव तुम्हाला कित्येक घरात दिसेल. या वेळेस तुमच्यावर पूर्णपणे अन्याय झालेला नसतो तर काहीअंशी तुम्ही तो स्वतः वर ओढवून घेतलेला असतो. 


पण हेच जेव्हा तुम्ही सुनेला मुलगी मानता तेव्हा चित्र वेगळे असते. तुमच्या शब्दाला मान असतो. थोडे चुकलात तरी बऱ्यापैकी सांभाळून घेतले जाते.. मग तुम्हांला तर काहीश्या कोमेजलेल्या फुलाला पाणी मारून ताजे केल्याची फीलिंग येते आणि निर्माल्यापर्यंतचा प्रवास लांबल्याचा जाणवतो..


तुमच्या वृद्धपकाळात पण तुम्हांला तुमच्या पेक्षा जास्त काळजी दुसऱ्यांचीच असते- तुमच्या यांचे पुढे कसे होईल, मुले त्यांच्या औषधपाण्याचे नीट करतील ना, दोन मुलींच्या पाठून या खेपेस तरी मुलगा होईल की नाही असे अनेक.. 


तुमची म्हातारपणातील बडदास्त ही तुम्ही जमवलेल्या मायेवर असते मग ती माया नात्यांची असो वा पैशाची पण मायेचा मुबलक साठा हा हवाच!!


आयुष्याच्या तिनसांजेला सारा हिशोब मनपटलावर मांडता मांडता तुम्ही आता जीवनाच्या शेवटच्या बालपणात प्रवेश करते होतात.. आता कस असतो तुमच्या शिकवणीचा आणि तुमच्या संस्कारांचा.. ज्यांच्या बोबड्या बोलानां तुम्ही बरोबर समजू शकत होतात त्यांना तुमचे बोबडे बोल ही नसती कटकट असते.. काय बोलते म्हातारी समजत नाही म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते.. नकळतपणे डोळे पाणावले जातात.. हात यावेळेस पण उठतो पण कायमप्रमाणे तो याही वेळेस आशीर्वाद देण्यासाठीच असतो...

-मला आतापर्यंतच्या आयुष्यात खुपजणांकडून खुप काही शिकायला मिळालं. पण सर्वात महत्वाची एक गोष्ट शिकलो ती माझ्या आईकडून.. ती म्हणते- तुझ्या आजूबाजूला जे कोणी असेल त्याला माणुस म्हणूनच बघायला शिक. जर त्या व्यक्तींकडून विशेष अपेक्षा ठेवण्याआधी जर तू त्या व्यक्तीच्या जागी आहेस न तू ते काम करू शकतोस का ते आधी ठरव.. जर तुझं उत्तर हो असेल तर त्या व्यक्तीने ते काम कसं करावं हे तू त्याला समजवून सांग आणि जर तुझं उत्तर नाही असेल तर तू फक्त त्याला विनंती करू शकतोस, जबरदस्ती नाही..

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..