स्पर्शबंध ३

स्पर्शाची माया


सौ. वैशाली मंठाळकर
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
विषय: सामाजिक
उपविषय: स्पर्शबंध
टीम सोलापूर..


"दोन मिनिट" ती स्वतःच्या भावनांना आवर घालत म्हणाली.

"ओके ऑफिसमध्ये आहे.तुझे झाले की ये."आर्यन सुस्कारा सोडत म्हणाला .त्याच्या डोक्यात वेगळे विचार घुमू लागले. कालपासून तिचे वागणे जरा वेगळेच होते.


दहा-पंधरा मिनिटात बाळ झोपी गेले .श्रेयाने अलगद बाळाला उचलून पाळण्यात ठेवले. बाळाने तिच्या गळ्यात असलेला स्कार्प छोट्या मुठीत पकडून धरला होता . श्रेयाने गळ्यातून हळूच काढला आणि तिच्या अंगावर टाकला. आणि मावशींना इन्स्ट्रक्शन सांगितल्या व बाहेर आली.

दोघे ऑफिसमध्ये आले. ऑफिसच्या कामात श्रेया व्यस्त झाली .

संध्याकाळी श्रेया घरी आली. श्रेयान तिची वाट बघत बसला होता.

"मम्मा! किती लेट?" तो तिच्या पायाला विळखा घालत फुगून म्हणाला.

"अरे पिल्लू काम होते तर थोडासा लेट झाला."ती खाली झुकून त्याच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाली.

"फ्रेश होऊन आले.आज तुझ्या आवडीचा पिझ्झा करू." श्रेया त्याला बाजूला करत फ्रेश होऊन आली. किचनमध्ये जाऊन पिझ्झाची तयारी केली. श्रेयान तिच्या मागे पुढे करतच होता.


"आई,कुठेय? " श्रेया सरूकडे बघत म्हणाली.

"आई, आश्रममध्ये गेली आहे." सरू भांडी घासत म्हणाली.

"आश्रम !" श्रेयाचा चेहरा गंभीर झाला. लगेच मोबाईल काढला आणि पटकन आईचा नंबर डायल केला. दोन तीन वेळा कॉल केल्यावर नंदाताईंनी कॉल रिसिव्ह केला.

"आई कुठे आहात?" श्रेया.

"मी हॉस्पिटलमध्ये आहे. छोट्या परीला ॲडमिट केले आहे. यायला वेळ लागेल." नंदाताईनी बोलून फोन कट केला.

ॲडमिट ! ऐकून श्रेया सुन्न झाली. पोटात भीतीने गोळा आला होता.

"श्रेया, आर्यनला कॉफी हवी आहे......"आजी बाहेरून ओरडत म्हणाली.

"मम्मा ! आजी बोलावत आहे." श्रेयान तिचा हात हलवत सांगु लागला.

श्रेयाची तंद्री तुटली ."ह....हा ....आले."तिने घाईतच ओव्हनमधुन पिझ्झा काढून प्लेटमध्ये ठेवला.

"यम्मी !..." श्रेयान ओठांवरून जीभ फिरवत प्लेट घेऊन बाहेर पळत आला.

"आर्यन ! मी आईला कॉल केला होता.बेबीला ॲडमिट केलें."ती रडतच त्याच्याजवळ आली.

आर्यन आणि आजी ब्लँक होऊन बघू लागले.

"आय नो! पण तू का रडत आहेस?" आर्यन तिला जवळ घेत म्हणाला.

"तू...तुला माहित होते." श्रेया चिडून मागे सरकत म्हणाली.

"हो, दुपारी आईचा कॉल आला होता." तो तिचे हाव भाव टिपत म्हणाला.

"तू ... तू...का नाही सांगितले...चल आपण बघून येऊ..." ती डोळे पुसत म्हणाली.

"अग,वेड लागले आहे का? सगळे जाऊन आश्रमामध्ये बसा. घर, तुझा मुलगा म्हातारीच्या डोक्यावर सोडून जावा." आजी मोठ्याने ओरडत म्हणाली.

"आजी थोड शांत बसते का?" आर्यन इरिटेत होत म्हणाला.

"आर्यन तुला यायचं नसेल तर मी जाऊन बघून येते." श्रेया पुढे चालत म्हणाली.

"स्टॉप श्रेया !! कालपासून तू वेगळीच वागत आहे. आश्रमामध्ये खूप मुले आहेत आणि आपण त्यांना नीट सांभाळत आहोत. तू जास्तच मनाला लावून घेत आहेस." तो ओरडून म्हणाला.

ती दचकून रडतच रूममध्ये गेली. श्रेयान खाता खाता वर बघू लागला.

"व्हॉट हॅप्पन डॅड ?"श्रेयान बारीक चेहरा करत म्हणाला.

"नथिंग !"तो बोलत पुन्हा सोफ्यावर डोके धरून बसला.

काही वेळाने नंदाताई घरी आल्या. फ्रेश होऊन आजी शेजारी बसल्या.

"आई जेवण झाले?" नंदाताई आजीकडे बघून म्हणाल्या.

"हो...." आजी टिव्ही बघत बोलल्या .

"पिलू कुठे ?दिसत नाही." नंदाताई.

"आर्यन बरोबर बाहेर आहे.आणि श्रेया रूममध्ये आहे.त्या मुलीला वेड लागले आहे का ? ते बघ जरा." आजी चिडून म्हणाली.
"का...काय झाले ?" नंदाताई चिंतेने म्हणाल्या.

"तिला पण हॉस्पिटलमध्ये यायचे होते.म्हणून आर्यनचे डोके खात होती." आजी.

नंदाताई विचारात पडल्या. आर्यन आणि श्रेयान बाहेरून आले.

"कधी आलीस ? डॉक्टर काय बोलले?" आर्यन काळजीने म्हणाला.

"नवजात बाळ आहे.थोडी कावीळ जास्त वाटत होती. म्हणून पाच दिवस ठेवतील." नंदाताई.

"हम...." आर्यन.

श्रेया आईंचा आवाज ऐकून खाली आली."आई, बेबी कसे आहे?" ती अधीर मनाने म्हणाली.

"काळजीचे काहीच कारण नाही. कावीळ झाली आहे.पाच दिवसात कमी होऊन जाईल."नंदाताई.

"हं...."श्रेया खोलवर विचार करत म्हणाली.

"चला जेवण करून घेऊ ." नंदाताई.

"मला भूक नाही.मी मस्त मस्त पिझ्झा खाल्लाय."श्रेयान पोटावर हात फिरवत नखरे करत म्हणाला.सगळेजण त्याचे नखरे बघून हसू लागले.

सगळे जेवण करून इकडचा तिकडचा विषय काढत होते. श्रेयानचीही मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती. श्रेयाच्या मनात विचारांचे काहूर उठले होते.

"श्रेया,तुझ्या मनात काही आहे का? " नंदाताई तिचे डोळे बघून बोलल्या.

तिने आर्यनकडे बघितले.तो ही तिला प्रश्नार्थक नजरेने पाहत होता.तिने दीर्घ श्वास घेतला.

"आई,आपण बेबीला दत्तक घेऊया का?" श्रेया एका दमात बोलून मोकळी झाली.

सगळे शॉक होऊन तिच्याकडे बघू लागले.कोणाला काय बोलावे ? काहीच कळत नव्हते.आर्यन तर टोटली पूर्ण ब्लँक झाला.ती हळव्या मनाची आहे म्हणून ती इतकी त्या बाळासाठी तळमळत असेल की इतका मोठा शब्द बोलली तो हकाबक्का झाला होता.तो तडक उठून रूममध्ये गेला.

"श्रेया काय बोलत आहेस?" आजी चिडून म्हणाली.

"का..?काय चुकीचे आहे यात? एका बाळाला एक घर मिळेल आणि मीही बाळाची नीट काळजी घेईन. मला कालपासून झोप लागत नाही. सतत बेबीचा चेहरा समोर येत आहे." श्रेयाचे बोलताना डोळे भरून आले.

"अग, ज्यांना मुल नाही.त्यांनी तो विचार केला तर बर वाटेल." आजी चिडून म्हणाली.
क्रमशः
सौ. वैशाली मंठाळकर

🎭 Series Post

View all