जेव्हां सोनाक्षीताई घोषा पद्धतीने नांदायला सासरी आल्या तेव्हा बसस्थानकापासून वाड्यापर्यंत वाजंत्री नवरा-नवरी यांच्यासमोर वेगवेगळ्या गाण्यांवर सूर लावत होते. अख्ख गाव नवरा नवरी यांच्या स्वागताची तयारी करण्यात गुंतलेले होते. सोनाक्षीताईना अतिशय आनंद होत होता कारण त्यांच्या माहेरी किंवा त्यांनी लहानपणापासून अशा पद्धतीचे नवरीचे स्वागत पाहिलेच नव्हते..
वाड्याचा दरवाजा एक,दोन नव्हे तर तब्बल पाच माणसांनी ओढून बसवावा लागायचा किती मोठा असेल ना वाडा! वाड्याच्या पायऱ्या शंभरच्या जवळपास वाडा चढताना आपण गड चढतोय की काय असा अभूतपूर्व अनुभव प्रत्येकालाच यायचा... पण स्त्रियांना मात्र वरच्या पायरीपासून खालच्या पायरीपर्यंतचे दर्शन फक्त माहेरी जाताना व्हायचे आणि वाड्यातील सून कोणालाच दिसत नसे, शेलवट पांघरल्यामुळे ...
पण वड्याची खासियत होती वाड्याच्या वर(माळवद) जाऊन अख्ख्या गावाचे दर्शन व्हायचे मग तिथे स्त्रियानाही जाण्याची परवानगी होती जेव्हा सोनाक्षीताई त्यांच्या मोठ्या चुलत जाऊबाईसोबत माळवदावर गेल्या,त्या स्वतःला एवढ्या भाग्यवान समजू लागल्या, खरंच! असेल का अस गजबजलेलं कोणाच तरी घर.. ज्या घरावर उभारून पूर्ण गावाचे दर्शन होत असेल..
वाड्याच्या खाली एका भिंतीवर हौदासारखा आकार असलेल्या चौकोनी खड्डा होता. त्या खड्ड्याचे वैशिष्ट्य असे की जी माणसे वाड्यामध्ये पाणी भरायचे, त्यांनी त्या हौदातून पाणी ओतले की वाड्याच्या अगदी वरती स्वयंपाक घरातल्या टाकीत ते पाणी पाडायचे ज्यांनी कोणी बनवली असेल त्यालाही सलाम म्हणावा लागेल...
वाड्यात एक चौकोनी आकाराची खिडकी होती. त्या खिडकीतून येणारे वारे म्हणजे आपला आत्ताचा एसी सुद्धा त्याच्यापुढे फिका पडेल... वाड्यात पाच भाऊ एकत्र असल्यामुळे वाड्यातील माणसांची व मुलांची संख्या अफाट होती. त्यामुळे आपला वाडा म्हणजे एक गजबजलेला गाव आहे असे सोनाक्षीताईना वाटायचे. वाड्याच्या खाली मोठा गोठा होता. गोठ्यामध्ये गाई,म्हशी यांची संख्या सुद्धा खूप जास्त होती, त्यामुळे दूध, दही ताक, लोणी,तूप यांना कोणत्याच प्रकारची कमी नव्हती.
सोनाक्षीताईनी स्वप्नांच्या पलीकडले सर्व सोयींनी युक्त असलेल वाड्याच रूप पाहून आपल्या पतीला मोठ्या अभिमानाने सांगितलं, "मी खूप पुण्य केले असेल, म्हणूनच मला असं सासर आणि आपल्या दोघांच पहिलं घर गजबजलेला गढीचा वाडा... देवाने खूश होऊन दिला असेल हो ना!"
सौ. प्राजक्ता पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा