मी छोटा बनी बोलतोय....

A Letter To A Santa Claus
मी छोटा बनी बोलतोय......

प्रिय सांताक्लॉज,

मी छोटा बनी बोलतोय......

आम्हाला प्रत्येक ख्रिसमसला तुझं प्रत्यक्ष रूप डोळे भरून पाहायला मिळतं. तुझा तो मऊ मऊ लाल अंगरखा, त्याला पांढरी फर ची झालर..... ती पांढरी फर तर एवढी लोभस वाटते.... की तू प्रेमाचा मायेचा आमच्यावर वर्षाव करीत आहेस असं खरोखर वाटतं.

पण सांताक्लॉज! एक सांग ना! तू रात्रीच कुणालाही न सांगता कसा बरं येतोस?
क्रिसमसच्या आदल्या रात्री माझी आई मला सांगत होती की बाळ, आज लवकर झोप बर का! सांताक्लॉज तुला गिफ्ट द्यायला येणार आहे! सकाळी सकाळी तुला दिसेलच ते आपल्या दारात!
मला तर खूपच आनंद झाला. आणि स्वप्नात सुद्धा रात्री तूच दिसला मला.
तुझ्या त्या मऊ मऊ अंगरख्याला मी हात लावला. फर कॅप ती गोंडा लावलेली तू माझ्या डोक्यावर ठेवलीस! तुझ्याजवळ खूप मोठी पिशवी बक्षीसांनी भरलेली मी पाहिली. त्या पोतडीत तर खूप खेळणी होती. मी तुला विचारलं की एवढी सर्व खेळणी तू मलाच देणार ना! तर तू खूप जोरात हसला. आणि म्हणाला कसा! अरे बाळा! ही खेळणी मी प्रत्येक लहान मुलांना बक्षीस म्हणून वाटत असतो.
तू जसा आतुरतेने माझी वाट पाहतो, तशी इतर मुले सुद्धा माझी वाट पाहतात. त्यांना नको का द्यायला.....

सांताक्लॉज, एक कर ना! आमच्या घराच्या खूप दूर मी शाळेतून येताना खूप झोपड्या पाहतो. तिथे उघड्यावरच छोट्याशा पालात लहान लहान मुलं खेळत असतात. त्यांच्या अंगावरचे फाटके कपडे पाहून मला खूप कसंतरी होतं रे! ती मुलं अशीच जुन्या खेळण्यांसोबत खेळत असताना मी नेहमी बघतो.
त्यांनाही तुझ्या पोतडीतली खेळणी, नवीन कपडे गिफ्ट म्हणून देशील का? त्यांना हे सर्व बघितल्यावर किती आनंद होईल म्हणून सांगू..…....
खरंच! मला नको तुझं बक्षीस! पण त्या बिचाऱ्या लहान मुलांना देशील का रे तुझ्या पोतडीतील वस्तूंचं बक्षीस!
तसं सांताक्लॉज ,तू मला मायेने जवळ घेतलं.

मी झोपेतून थेट सकाळीच ज जागा झालो. उठल्याबरोबर दाराकडे धाव घेतली.
बघतो तर काय! खरंच माझ्यासाठी तू गिफ्टच्या स्वरूपात एक मोठा खेळणं ठेवलेलं होतं.
सांताक्लॉज, आम्हाला नाताळच्या सुट्ट्या असतात ना, आम्ही या सुट्ट्यांमध्ये धमाल करतो. आमच्या शाळेत सुद्धा ख्रिसमस साजरा करतात. तुझं रूप घेऊन आलेल्या सांताक्लॉजला आम्ही भेटतो. त्याच्यासोबत खूप मजा मस्ती करतो. तो सुद्धा आम्हाला बक्षीस म्हणून आमच्या आवडीचे चॉकलेट्स, व इतर छान छान वस्तु भेट म्हणून देतो..,

तू जातोस तेव्हा आम्हाला वाईट वाटते पण तू पुढच्या वर्षी पुन्हा येणार, आमच्या सोबत मस्ती करणार, म्हणून आम्ही तुझी खूप वाट पाहतो.....

तर येणार ना पुढच्या वर्षी क्रिसमसला आम्हाला बक्षीस वाटायला......

मेरी ख्रिसमस.....


छाया राऊत ( बर्वे)