सप्तपदी एक सुरमयी प्रवास..भाग ८ (मराठी कथा: Marathi katha)

ही एक कौटुंबिक कथा..एका विधिषाची तिच्या सप्तपदी प्रवासाची..

सप्तपदी.. एक सुरमयी प्रवास मराठी कथा: Marathi Katha भाग ८

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की,  अर्णवला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. आणि अत्यंत वाईट बातमी समजली होती. अक्षराच्या नवऱ्याचं अपघाती निधन झालं होतं.  अर्णव आपल्या आईवडिलांना अक्षराला घेऊन अँब्युलन्स करून त्यांनी अक्षराच्या नवऱ्याचा मृतदेह त्यांच्या गावी नेला. तिथे त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सर्व कार्य आटोपून ते सगळेजण आपल्या घरी निघून आले.चाळीतल्या बायका अक्षराच्या वैधव्याचा दोष विधीला देत होत्या. तिच्या पायगुणामूळे ही दुर्घटना झाली असं म्हणत होत्या. अर्णवच्या आईने आणि अक्षराने त्यांना चांगलंच सुनावलं. आपल्या सासुने सर्वांसमोर तिला जो मान दिला त्याबद्दल ती कायम त्यांची ऋणी राहिली.आता पुढे..

भाग ८

अर्णवच्या आईने विधीला आपल्या मुलीचं स्थान, दर्जा दिला. त्यामुळे विधी आपल्या सासूबाईंवर खुश होती. आईवडिलांच्या घरी श्रीमंतीत लोळणारी. लाडाकोडात वाढलेली विधी गरिबीचे धडे घेत होती. तुटपुंज्या पगारात आर्थिक नियोजन करण्याचं प्रशिक्षण आपल्या आईसमान सासूबाईंकडून घेत होती. दोन खोल्यांच्या घरात तिचा संसार सुरू झाला. स्वयंपाक खोलीत एका बाजूला एक  छोटा बेड आणि मध्ये एक पडदा टाकून घेतला. एका बाजूला स्वयंपाकघर आणि दुसऱ्या बाजूला बेडरूम. दहा बाय दहा रूम मध्ये छान नियोजन केलं होतं. सासू सासरे, दीर, नणंद, सार्थक, कधी अर्पिता आपल्या नवऱ्या सोबत मुक्कामी. एवढ्या लोकांत राहण्याची विधीला सवय नव्हती. पण तरीही ती  स्वतःच्या सवयींना मुरड घालून आपल्या  सासरी आनंदात वावरत होती.  

इकडे विधीचे बाबा खूप दुःखात होते. वरदही नाराज दिसत होता. चार दिवस ते घराबाहेर पडलेच नाही. आई दोघांना जेवायला बसायला सांगत होती पण कोणाच भूक नव्हती. आईकडे पहात बाबा म्हणाले,

“मालती, आपलं काय चुकलं ग? संस्कार देण्यात कुठे कमी पडलो? वाईट वळण लागू नये म्हणून मी धाकात वागवलं. चाळीतल्या मुलांशी खेळू दिलं नाही. त्यांच्यात मिसळू दिलं नाही. पण काय झालं? पोरीनं घराण्याची इभ्रत वेशीला टांगली. किती प्रेम दिलं मी तिला! जे जे मागितलं सगळं आणून देत होतो. त्यांच्यासाठीच दिवसरात्र कष्ट करत होतो. पण तिने काय केलं? माझ्या तोंडाला काळ फासलं. ताठ मानेनं जगत होतो. आजवर कोणाची हिंमत झाली नव्हती माझ्याकडे बोट दाखवायची.पण आता बघ सगळे हसताहेत माझ्यावर. समाजात छि थू झाली. साऱ्या नातेवाईकांत शरमेनं मान खाली गेली माझी. नाक कापलं माझं. ” 

विधीच्या बाबांनी दोन्ही तळहातांनी आपला चेहरा झाकून घेतला. आणि ते अगदी लहान मुलांसारखे ओक्शीबोक्शी रडू लागले.  विधीचे बाबा खूपच भावनिक झाले होते. विधीची आई  त्यांना शांत करत म्हणाली,

“जाऊ द्या, सोडा तो विषय..! जे झालं ते झालं. तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका. तब्बेत बिघडेल तुमची” 

आई समजावत होती. पण तिचे बाबा खूपच व्यथित झाले होते. उद्विग्न होऊन ते म्हणाले,

“नाही मालती, ज्या मुलीला आपल्या जन्मदात्यांची चिंता नाही. त्यांच्या मान मर्यादेची काळजी नाही ती माझी मुलगी असूच शकत नाही. माझी मुलगी तेंव्हाच माझ्यासाठी मेली ज्या वेळीस ती माझा हात सोडून त्या भिकरड्या पोरासोबत निघून गेली. त्या दरिद्री लोकांसोबत राहून तशीच दरिद्री होणार. आता माझा तिच्याशी काहीही संबंध नाही.मला मुलगी नव्हतीच असंच समजेन मी. मला आता एकच मुलगा आहे. तो म्हणजे माझा ’वरद‘ बाकी कोणी नाही या जगात.”

बाबा वरदकडे पाहून म्हणाले. आई आसवं टिपत होती. बाबांची समजूत काढत होती इतक्यात वरद म्हणाला,

“बाबा, मला इथे नाही  रहायचं. सगळे मित्र हसतील मला. याची बहीण दुसऱ्या सोबत पळून गेली असं म्हणून मला चिडवतील. आपण हे घर, हा परिसर  सोडून दूर  निघून जाऊ. जिथे आपल्याला कोणीच ओळखत  नाही अश्या ठिकाणी जाऊ.”

वरदचं म्हणणं बाबांना पटलं. लोकनिंदेपासून स्वतःला वाचवायचं असेल तर हा परिसर सोडलाच पाहिजे या विषयावर दोघांचं एकमत झालं. आणि त्यांनी परिसर सोडण्याचा निर्णय घेतला. विधीच्या आईच्या जीवाची घालमेल होऊ लागली. 

“इथे मुलगी निदान डोळ्यांसमोर तरी होती जर हा परिसर सोडून गेलो तर कशी भेट होईल पुन्हा?कायमची नजरेआड होईल ती.”

आई विचारात पडली. बाबांनी लगेच घराचे खरेदीविक्री करणाऱ्या तुषारला फोन करून घर विकणेबाबत कल्पना दिली आणि लवकरात लवकर व्यवहार पूर्ण करायला सांगितलं. तुषारने व्यवहार घाईत पूर्ण केला. खूप कमी दरात घर विकून टाकलं. सामानाची बांधाबांध होताना विधीने तिच्या गॅलरीतून पाहिलं.  विधीला अंदाज आला की आईबाबा तिच्यापासून घर सोडून निघून चाललेत. ते कुठे चाललेत? काहीच कल्पना नव्हती. विधी धावतच खाली आली. विधी अशी अनवाणी धावत कुठे गेली? म्हणून अर्णवची आई घाबरून बाहेर आली. विधी तिच्या आईवडिलांच्या दारात उभी होती. काहीतरी विपरीत घडायला नको म्हणून अर्णवची आई तिच्या मागोमाग गेली. पण थोडी लांब उभी राहिली. काही विपरीत घडलं तर तिच्या सोबत असावं म्हणून ती आली होती. 

विधी दारातूनच आईला पाहू लागली. तिला दारात आलेलं पाहून वरद चिडला आणि तिला हाकलून देऊ लागला. इतक्यात आई बाहेर आली. विधीच्या आईच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. तिच्या हातात विधीचं परीक्षेचं हॉल तिकीट होतं. पंधरा दिवसावर वार्षिक परीक्षा येऊन ठेपली होती. शेवटी आईलाच काळजी ना! नाळ जी जोडलेली असते. पण वरदच्या पाषाणरुपी हृदयाला पाझर फुटला नाही. त्याने विधीचं हॉल तिकिट  देऊ दिलं नाही. उलट अपमान करून तिला हाकलून दिलं. 

“दादा, मला आईला फक्त एकदाच बोलायचं आहे. एकदा भेटू दे. एकदा डोळे भरून पाहू दे. नको मला काही. काय मी इतकं मोठं पाप केलंय? की मला एवढी मोठी शिक्षा देतोयस! भेटू दे मला. माझेपण आईबाबा आहेत. तुझ्या एकट्याचेच नाहीत.”

विधी त्याला भेटण्यासाठी आर्जवे करत होती. 

“हो ते माझे एकट्याचेच आईबाबा आहेत. ज्या दिवशी तू हे घर सोडून गेलीस त्याच दिवशी आमच्यासाठी तू मेलीस. मला कोणीच बहीण नाही. चल चालती हो.. तुझं तोंड दाखवू नकोस पुन्हा..!” 

वरद रागाने दातओठ खात बोलत होता. विधी निमूटपणे मान खाली घालून उभी होती. अर्णवची आई तिच्या जवळ आली आणि तिला समजावत परत आपल्या घरी घेऊन गेली. विधीसाठी माहेरची सर्व दारे कायमची बंद झाली होती. सर्व बंध तिच्या भावाने सहजपणे तोडून टाकली होती. पण खरंच इतक्या सहजपणे रक्ताची नाती तुटतात? तिचा तिलाच प्रश्न पडला. विधीचे आई बाबा भाऊ तो परिसर सोडून दूर कल्याणला रहायला गेले. 

परीक्षा जवळ आली होती. अर्णवने तिच्या कॉलेजमध्ये जाऊन रीतसर अर्ज करून डुप्लिकेट हॉल तिकीट घेऊन आला. दोन दिवसांवर परीक्षा आली होती. परीक्षा तोंडावर असतानाच महिन्याभरात इतका गोंधळ झाला होता. भांडण, लग्न, अक्षराच्या नवऱ्याचा  अपघात.  सारी संकटं  पाठीला पाठ लावून आली होती जणू.. म्हणावा तसा अभ्यास झालेला नव्हता.  पण तरीही हार न मानता, परिणामांची काळजी न करता ती परीक्षा देणार होती. आईकडे असताना घरात मोजकीच माणसं. अभ्यासाला वेगळी  खोली. आई पाण्याचा ग्लासही हातात आणून द्यायची. पण आता ती एक सासुरवाशीण होती. अर्णवच्या घरात कायम पै पाहुण्यांचा राबता. कोलाहल, गोंधळ. घरातलं सगळं नाही पण थोडं फार तरी काम करायला लागेलच ना. त्याचाही तिला कधी त्रास वाटला नाही पण बाबांचा मद्यपान करून आल्यावर गोंधळ असायचा तो वेगळाच त्रास होता. सर्व संभाळून विधी अभ्यास करायला    बसायची. 

परीक्षेचा दिवस उजाडला. विधीने देवाला नमस्कार केला. आईबाबांचा आशीर्वाद घेतला. अर्णवच्या आईने तिला वाटीत दही साखर खायला दिलं. अक्षराने तिला शुभेच्छा दिल्या. आणि विधी परिक्षेसाठी निघाली. इतक्यात अर्णवची आई म्हणाली,

“थांब विधी, मी येतेय तुझ्यासोबत. तुझ्या परीक्षाकेंद्रापर्यंत.”

“नको आई, जाईन मी.. उगीच कशाला तुम्हाला त्रास..” 

“मला कसला आलाय त्रास? रिक्षाने जाऊ आणि रिक्षाने परत येऊ. तुझी आई असती आता तर आलीच असती ना!” 

अर्णवची आई स्मित हास्य करत म्हणाली. आणि पायात चप्पल अडकवून विधी सोबत निघाली.विधीचा गळा दाटून आला. आई प्रत्येक वेळीस आपल्या चांगल्या  प्रेमळ वागणुकीने तिचं मन जिंकत होत्या. आईची माया विधीला सासूच्या रूपाने मिळत होती. रोज आई तिच्या सोबत परीक्षेला जायची आणि तिला सोबत घेऊन यायची. जणू विधी त्यांची जबाबदारी होती. 

विधीची परीक्षा संपली. आता तिला निकालाचे वेध लागले होते. 

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमश:

©निशा थोरे..

🎭 Series Post

View all