सप्तपदी एक सुरमयी प्रवास..भाग ६ (मराठी कथा: Marathi katha)

ही एक कौटुंबिक कथा..एका विधिषाची.. तिच्या सप्तपदी प्रवासाची..

सप्तपदी.. एक सुरमयी प्रवास मराठी कथा: Marathi Katha भाग ६

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की,  अर्णव आणि विधिषा बागेत भेटले तेंव्हा विधिषाच्या बाबांनी त्या दोघांना एकत्र पाहिलं आणि ते खूप संतापले. विधिषाला खेचत घरी आणलं. अर्णवच्या आईबाबांशी अर्वाच भाषेत भांडण केलं. अर्णव विरुद्ध पोलीस तक्रार केली. विधिषा अर्णवच्या विरुद्ध न बोलण्याने तीच्या बाबांच्या तक्रार करण्याला काहीच अर्थ उरला नव्हता. अर्णवला सोडून देण्यात आलं. पोलिसांनी ‘दोघेही सज्ञान आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न करण्यास कोणीही अडवू शकत नाही’  असं स्पष्ट सांगितलं. विधिषाचे बाबा तिला घरी घेऊन आले आणि तिला बेदम मार दिला आता पुढे..

भाग ६

अर्णव आपल्या आईवडिलांना घेऊन घरी आला. अमेय मित्रांसोबत बाहेरच थांबला होता. अर्णवची आई दोघांची जेवणाची ताटं घेऊन आली. पण कोणाच्याही घशाखाली अन्न जात नव्हते. वाढलेल्या ताटाला हात जोडून नमस्कार करत दोघेही भरल्या ताटावरून उठले. आई बाबा झोपण्यासाठी बाहेरच्या खोलीत आले. झोप लागत नव्हती. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतका अपमान केला होता. अर्णव गॅलरीत फेऱ्या मारत होता. विधिषा बंद खोलीत रडत बसली होती.  अर्णव खूप बैचेन झाला. विधिषाच्या बाबतीत काहीतरी अघटित होणार जणू त्याला संकेत मिळत होते. तो डोळ्यात तेल घालून विधिषाच्या घरावर लक्ष ठेवून होता. बराच वेळ उभं राहून त्याचे पाय दुखू लागले म्हणून तो खाली भिंतीला टेकून बसला. आणि तिथेच त्याचा डोळा लागला. अर्णवने आपल्या जवळच्या सर्व मित्रांना जागे राहायला सांगितलं होतं. त्याचे मित्र दोन चाळीच्या मधल्या पार्किंगच्या जागेत मुद्दाम कॅरम, पत्ते खेळत बसले कारण त्यांना विधिषाच्या बाबांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवायचं होतं. जणू वैराचीच रात्र होती. 

पहाटेचे चार-साडे चार वाजून गेले होते. मुलांना झोप येऊ लागली. जांभई  देत पिंट्या मोठ्याने म्हणाला, 

“चला यार, जाऊ आता. खूप झाला खेळ.. मला झोप येतेय. घरी जाऊ”

“हो चला रे! बाय निघतो मी” 

अजय मोठ्याने म्हणाला आणि त्याने भावेशला डोळा मारला. सर्वांनी एकमेकांना खुणावले. आणि सगळेजण एक एक करत पांगू लागले. चाळीच्या एका कोपऱ्यात आडोश्याला जाऊन लपून बसले.

सगळीकडे सामसूम झाली होती. दोन्ही चाळीतली माणसं गाढ साखरझोपेत होती. इतक्यात विधिषाच्या घरचा दरवाजा उघडला. विधिषाच्या बाबांनी कानोसा घेऊन कोणी नसल्याची खात्री घेतली. ते आणि वरद गुपचूप घराबाहेर पडले. सोबत विधिषाही होती. ती रडत होती. वरदच्या हातात मोठी बॅग होती. कदाचित त्यात कपडे असावेत. रिक्षा, बस जे काही वाहन मिळेल त्याने लगेच हे शहर सोडून जायचंच या निर्धाराने ते येणाऱ्या वाहनांची वाट पाहत बसथांब्यावर थांबले.

पहाटेची वेळ असल्याने वाहनांची जास्त वर्दळ नव्हती. महाराष्ट शासनाच्या दुधाच्या गाड्या फक्त येत होत्या. दुध सेंटरवर दूध पोहचवून जात होत्या. हळूहळू  सेंटरवर दूध घ्यायला लोक येऊ लागले.  रात्रीचा अंधःकार दूर होऊन दिवस उजाडू लागला होता. लवकरच सूर्यनारायणाचं दर्शन होणार होतं. सगळीकडे झुंजूमुंजू व्हायला सुरुवात झाली. पाखरांचा किलबिलाट कानी पडू लागला. 

“अरे हे विधिषाला घेऊन गावी म्हणजे रत्नागिरीला तर जात नसतील ना?” 

ती मोठी बॅग पाहून भावेशच्या मनात शंका आली. आणि त्याने मोठ्याने शिळ ठोकली. त्याची ती शीळ ऐकून अर्णव जागा झाला. गॅलरीत उठून उभा राहिला. भावेशने त्याला खुणावलं. तो तिसऱ्या मजल्यावरून धावतच खाली आला. आणि तो बसथांब्याच्या दिशेने धावू लागला. त्याच्या मागोमाग भावेश, पिंट्या,अजय, पार्थ धावू लागले. अर्णव विधिषाच्या बाबांना विनवण्या करत होता. विधिषाला घेऊन जाऊ नका म्हणून आर्जवे करू लागला. पण विधिषा बाबा काहीच ऐकायला तयार नव्हते. बाहेर चाललेला गोंधळ ऐकून अर्णवच्या आईला जाग आली. आणि तीही धावतच खाली आली. अर्णवने विधिषाचा हात पकडला आणि जाऊ नको म्हणून समजावू लागला. वरद आणि त्याचे बाबा अर्णवला अडवत होते. रागाने त्यांनी पुन्हा अर्णवच्या कानाखाली मारली. वरदही त्याला मारू लागला. सगळे मित्र धावून आले. दोघांच्या मध्ये पडून त्यांनी अर्णवला त्यांच्या तावडीतून सोडवलं. 

इतक्यात समोरून बस येताना दिसली. बसथांब्यावर  बस थांबताच वरद बॅग घेऊन पुढे चढला. बाबा विधिषाला बस मध्ये ढकलून चढवू लागले. विधिषा बस मध्ये चढणार इतक्यात कोणीतरी तिचा हात पकडला. तिने मागे वळून पाहिलं. तिचा हात पकडून बसमधून मागे खेचणारी स्त्री अर्णवची आई होती.

“विधी मागे हो, चल घरी.. या क्षणापासून तू माझी सून आहेस. कुठे जाणार नाहीस तू. तुमच्या दोघांच्या सुखात कोण आड येतंय ते बघतेच मी” 

आपल्या आईचा रौद्रावतार पाहून अर्णव अवाक झाला. आपली गरीब सोशिक आई एकदम रणरागिणी झालेली पाहून त्याला खूपच आश्चर्य वाटलं. आईचा तो चण्डिका अवतार पाहून तिचे बाबा आणि भाऊ वरद दोघेही वरमले. बसमधून खाली उतरले. अर्णवच्या आईने अर्णवला घरी जाण्यासाठी खुणावलं आणि  विधिषाच्या हाताला धरून आपल्या घरी घेऊन निघाली. विधिषाही मागे मुकाट्याने चालू लागली. आपली मुलगी आपलं न ऐकता त्यांचा हात धरून निमूटपणे चाललेली पाहून त्यांचा रागाने जळफळाट होत होता. मुठी आवळल्या जाऊ लागल्या. त्यांनी विधिषाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण अर्णवच्या आईने एक जळजळीत कटाक्ष टाकताच दोघेही मागे फिरले. 

अर्णवची आई विधिषा घेऊन घरी आली. आणि त्या दिवसापासून ती विधिषाची सासू नाही तर दुसरी आई झाली. त्या क्षणाला अर्णवच्या आईने पकडलेला तिचा हात आजतागायत कधीच सोडला नाही. अर्णवने अक्षराला फोन करून घडलेला सारा वृतांत सांगितला. अक्षराला आधीपासूनच विधिषा आवडत होती. तिला खूप आनंद झाला होता. अंगावरच्या एका कपड्यानिशी विधिषा अर्णवच्या घरी आली होती. अक्षराला हे कळताच तिचे दोन तीन ड्रेसेस, साड्या घेऊन ती आईकडे आली. तिने आनंदाने विधिषाला घट्ट मिठी मारली. 

“आता वेळ दवडायला नको,पुन्हा काही विघ्न येण्याआधी आपण लगेच या दोघांचं लग्न उरकून टाकू”

आईने फर्मान सोडलं आणि ती पुढच्या तयारीला लागली.  आईबाबांनी विधिषा आणि अर्णवचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. आईने लगेच अर्णवच्या मोठ्या काकांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. आणि दोघांचा निर्णयही त्यांना सांगितला. दुपारी काका घरी आले. आणि त्यांनी सगळं नियोजन आखलं. आईने आपल्या ठेवणीतले पैसे काढले विधिषासाठी साखरपुडा, हळदी आणि लग्नाचा शालू अश्या मोजक्या साड्या घेतल्या. खूप उंची साड्या घेण्याची ऐपत नव्हती. तिच्या परीने  तिला जेवढं करता येईल तितकं ती आपल्या सुनेसाठी करत होती. तिची हौस भागवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होती.  अचानक लग्न ठरलं त्यामुळे पूर्वतयारी करणं शक्य झालं नाही. जवळ फारसे पैसेही नव्हते. विधिषासाठी लगेच नवीन मंगळसूत्र बनवणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं. बाबांच्या तुटपुंज्या पगारात रोजचं भागणं कठीण होतं तर बचत कुठून असणार? मग अर्णवच्या आईने एक आयडिया केली. सोनाराकडे जाऊन स्वतःचं लग्नातलं मंगळसूत्र मोडून त्यात दोन मंगळसूत्रं बनवली. एक विधिषासाठी आणि एक छोटं स्वतःसाठी.

“माझ्या सासूने माझ्यासाठी स्वतःचं मंगळसूत्र मोडून मला मंगळसूत्र केलं. ग्रेट आहात तुम्ही आई!सुनेसाठी आपलं मंगळसूत्र मोडणारी कदाचित पहिलीच सासू असावी”

विधिषा स्वतःशीच बडबडली. तिच्या मनात आपल्या सासुचा रास्त अभिमान दाटून आला. आनंदाश्रू सांडू लागले. लग्नसमारंभासाठी शाळेतला छोटा हॉल बुक केला. लग्नाची तयारी सुरू झाली. 

एक मार्चचा दिवस उजाडला. चाळीतल्या बायका अर्णवच्या आईला लग्नकार्यात मदत करण्यासाठी लगेच धावून आल्या. शेजारच्या मोरे काकू मुलीची पाठवणी माहेरून करायची असते म्हणून त्या मुद्दाम विधिषाला आपल्या घरी घेऊन आल्या. साखरपुड्यासाठी विधिषाला तयार केलं. अक्षरा, अर्पिताच्या मैत्रीणीं तिला सजवायला, नटवायला आल्या. अर्णव आणि विधिषाचा साखरपुडा झाला.  मग हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. चाळीतले सर्वजण या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते. तिसऱ्या मजल्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली. मोरे काकूंच्याच घरात विधिषाने गौरीपुजन केलं. मग चाळीतली सर्व मंडळी आणि मोजकेच आप्तेष्ट, नातेवाईक लग्नसोहळ्यासाठी सभागृहात जमली. 

लग्नसोहळा सुरू झाला. लग्नाच्या विधी सुरू झाल्या. गुरुजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. नवऱ्या मुलीचं कन्यादान करण्याच्या विधीसाठी त्यांनी मुलीच्या आईवडिलांना यायला सांगितलं. विधिषाच्या डोळ्यांत आसवं दाटू लागली. कोण करणार आता तिचं कन्यादान? सर्वांना प्रश्न पडला. इतक्यात शेजारचे जोशीकाका उठून उभे राहिले आणि हसून म्हणाले,

“मी आणि माझी पत्नी अनुजा आम्ही दोघे विधिषाचं कन्यादान करणार आहोत”

सर्वांना आनंद झाला. जोशी काकांनी कन्यादान केलं. दोघेही बोहल्यावर चढले. मंगलाष्टके म्हणण्यात आली. अंतरपाट दूर झाला. अर्णव आणि विधिषा यांनी एकमेकांना पुष्पहार घातले. अर्णवने विधिषाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. भांगेत कुंकू रेखलं. थोड्याच वेळात सप्तपदीचा कार्यक्रम पार पडला. ‘आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहू’ अशी वचनं देण्या-घेण्यात आली. सप्तपदीच्या प्रत्येक फेऱ्यासोबत सात जन्माचं ऋणानुबंध जुळले होते. सप्तपदीच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली होती. अर्णव विधिषाने सर्वांना वाकून नमस्कार करून लहान मोठ्यांचे, नातेवाईकांचे शुभ आशिर्वाद घेतले. पंचपक्वांनाच्या पंगती उठल्या. लग्नसोहळा अतिशय आनंदाने पार पडला. आणि अखेरीस ‘विधिषा जाधव’ आता ’विधिषा नाईक’  झाली. नाईकांची सून झाली. 

विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडला. वरात काढण्यात आली. आपल्या मित्राच्या लग्नात भावेश, पिंट्या, अजय खूप नाचले. आपल्या मित्राची प्रेमकहाणी सफल झाली. सर्वच जण खूप आनंदात होते. लग्न करून आल्यानंतर अर्णव आणि विधिषा दोघेही विधिषाच्या आईबाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या दारात गेले. दारावरची बेल दाबली. विधिषाच्या बाबांनीच दार उघडलं. समोर नवविवाहित जोडप्याला, आपल्या मुलीला पाहून त्यांचा राग शिगेला पोहचला. आणि त्यांनी दोघांनाही अक्षरशः तिथून हाकलून दिले. वडिलांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमूळे विधिषा खूप दुखावली गेली. तिच्या डोळ्यांतला पूर ओसंडून वाहू लागला. अर्णव तिला समजावत होता. 

“सगळं ठीक होईल. वेळ जाऊ दे. ते नक्की आपल्याला माफ करतील. थोडा धीर धर”

अर्णव तिला धीर देत होता. नवीन जोडपं घरी येताच दारातच अक्षराने त्यांना अडवलं.

“विधी, एक छान उखाणा घे बघू.. तरच तुला घरात घेईन.”

अक्षरा मिश्कीलपणे विधीला म्हणाली. नाही होय म्हणत विधीने उखाणा घ्यायला सुरुवात केली.

 “सासूबाईंनी धरला हात

अन सून झाले नाईकांची

अर्णवच्या साथीने करते   

सुरुवात सप्तपदीच्या प्रवासाची”

विधिषाने उखाणा घेताच टाळ्यांचा गजर झाला. अर्णवनेही उखाणा घेऊन सर्वांची मनं जिंकली. नाईकांच्या घराचं माप ओलांडून विधिषाने गृहप्रवेश केला. सोनपावलांनी विधीच्या रूपाने लक्ष्मी घरात आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. अर्णव विधी यांचं लग्नाचं स्वप्नं पूर्ण झालं. सर्वजण आनंदात होते. पण विधिषा आपल्या आईवडिलांच्या आठवणींनी हळवी झाली. एकीकडे ज्याच्यावर प्रेम केलं ती व्यक्ती आयुष्यभराचा जोडीदार बनली होती आणि दुसरीकडे लहानाचं मोठं करून  वाढवणाऱ्या आईबाबांना ती दुरावली होती. ते शल्य तिला टोचत होतं. डोळ्यातलं आभाळ रीतं होऊ लागलं. अर्णवच्या आईला तिच्या मनाची घालमेल उमजली. त्या तिच्या जवळ आल्या. अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने त्यांच्याकडे पाहिलं.

 ‘मी आहे न बेटा’ इतकंच त्यांची गोड प्रेमळ नजर बोलून गेली.  किती आश्वासक स्पर्श होता तो! विधीला जणू शंभर हत्तीचं बळ मिळालं. 

“आता हेच माझं घर.. हिच माझी माणसं. हेच माझं जग”

तिने डोळे पुसले आणि आईकडे हसून पाहिलं. 

अर्णवच्या लग्नाने जणू घरात चैतन्य आलं होतं. लग्नानंतरच्या विधी सुरू होत्या. घर पै पाहुण्यांनी गच्च भरून गेलं होतं. अक्षरा, अर्पिता सर्व पाहुण्यांना काय हवं नको ते पहात होत्या. बच्चेकंपनी दंगा मस्ती करत होती.  अर्णव आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. सर्वजण त्याची चेष्टा मस्करी करत होते. इतक्यात त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर पाहून त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. त्याने कॉल घेतला. आणि दुसऱ्या क्षणाला तो जागीच थबकला. हातातला मोबाईल खाली गळून पडला. आणि अर्णव डोक्याला हात लावून मटकन खाली खाली बसला..

काय झालं होतं? कोणाचा फोन होता? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©निशा थोरे..

🎭 Series Post

View all