सप्तपदी एक सुरमयी प्रवास..भाग ५ (मराठी कथा: Marathi katha)

ही एक कौटुंबिक कथा.. एका विधिषाची..तिच्या सुरमयी सप्तपदी प्रवासाची.

सप्तपदी.. एक सुरमयी प्रवास मराठी कथा: Marathi Katha भाग ५

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की,  अर्णवचं पत्र वाचून विधिषाला आनंद झाला. तिलाही अर्णव आवडत होता. ठरल्याप्रमाणे अर्णव आणि विधिषा यांची भेट झाली आणि दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केला. आता पुढे..



 

भाग ५


 

सगळं छान सुरळीत सुरू होतं. दिवसांमागून दिवस पुढे सरत होते. विधिषा आणि अर्णव यांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या. आतापर्यंत त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणींना विधिषा आणि अर्णवच्या प्रेमाबद्दल माहीत झालं होतं. कायम एकमेकांच्या सोबत असल्याने परिसरातील इतर ओळखीच्या लोकांनाही ही बातमी समजली होती. मग काय! चर्चेला उधाण आलं होतं. पण खरं आश्चर्य म्हणजे 

दोघांच्याही घरी अजूनही ही बातमी पोहचली नव्हती. 

ऋतुचक्राने कुस पालटली. गुलाबी थंडीचा मौसम सरून उन्हाळा सुरू झाला. विधिषाची परीक्षा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली. आज संध्याकाळी वाचनालयाबाहेर लागून असलेल्या बागेत अर्णवने  तिला भेटायला बोलावलं होतं. थोडा अभ्यास संपवून विधिषा अर्णवला भेटायला बागेत आली. अर्णव तिच्याआधीच येऊन बागेतल्या बाकावर बसला होता.  विधिषा त्याच्याजवळ येऊन बसली. दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. थोड्यावेळाने ते दोघे घरी जाण्यास निघाले. अर्णव तिला म्हणाला,

“विधी, तुझी वार्षिक परीक्षा जवळ आलीय. आणि माझीही. आता आपण पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. आजपासून परीक्षा संपेपर्यंत भेटणं बंद..आजच्या नंतर फक्त अभ्यास एके अभ्यास. वेळ वाया घालवायचा नाही. चांगल्या गुणांनी पास झालो की चांगली नोकरी मिळेल. आणि मग आपल्या घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगून टाकू. आणि सर्वांच्या संमतीने लग्न करू”

अर्णवचं बोलणं ऐकून विधिषा हरकून गेली.  पटकन तिने अर्णवचा हात हातात घेतला,

“खरंच अर्णव! आपलं लग्न होणार!”

विधिषाला खूप आनंद झाला होता. ती अर्णवला प्रेमाने बिलगली. 

“विधी….., काय चाललंय हे?”

पाठीमागून कोणीतरी जोरात ओरडलं. विधिषाने मागे वळून पाहिलं. तिचे बाबा रागाने फणफणत होते.बाबांना समोर बघून विधिषा भीतीने चळचळा कापू लागली. 

“बाबा तुम्ही!”

विधिषाच्या तोंडून भीतीने उद्गारली. तिने विधिषाचे बाबा भरभर तिच्याजवळ आले. अर्णवच्या हातातला हात झिडकारून देत विधिषाच्या श्रीमुखात जोरात लगावून दिली. तिच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. ती रडू लागली. 

“अहो बाबा, ऐकून तर घ्या. विधीची काहीच चूक नाही.” 

अर्णव त्यांना विनवत होता. विधिषाच्या वडिलांचा राग अनावर झाला. 

“खबरदार नालायका! एक शब्द जरी बोललास तर जीव घेईन मी तुझा.”

असं म्हणत त्यांनी अर्णवची कॉलर पकडली आणि सणसणीत कानाखाली मारली. अर्णव मान खाली घालून उभा राहिला. विधिषाच्या हाताला धरून तिचे बाबा तिला ओढत घरी घेऊन जात होते. अर्णव जागीच थबकला. त्याला काहीच समजत नव्हतं. अर्णव धावतच भावेशच्या घरी आला. त्याला त्या घाबरलेल्या अवस्थेत पाहून भावेशला कल्पना आलीच की  नक्कीच काहीतरी बिनसलंय. त्याने अंगात शर्ट चढवला आणि पटकन अर्णव सोबत घराबाहेर आला.

“काय झालं रे? असा अचानक आलास?” 

भावेशने अर्णवने प्रश्न केला. 

“भावेश, आज मी आणि विधिषा बागेत भेटलो होतो. थोडा वेळ गप्पा मारून निघालोच होतो. इतक्यात विधिषाचे बाबा तिथे आले. त्यांनी मला आणि विधिषाला बोलताना पाहिलं. त्यांनी विधिषाच्या कानाखाली मारून तिला खेचत घरी घेऊन गेले. आता काय होईल रे?” 

आणि अर्णवने बागेत घडलेला सगळा वृतांत भावेशला सांगितला. भावेश धीर देत त्याला म्हणाला,

“तू घाबरू नको, आता तू घरी जा. आणि आधी घरातल्या माणसांना विधिषाबद्दल सांग. सगळं ठीक होईल. मी आपल्या मित्रांना गोळा करून घेऊन येतोच तिथे तू जा घरी.”

अर्णवने मान डोलावली. आणि  भावेशचा निरोप घेऊन तो घराच्या दिशेने निघाला. घराजवळ आला.  पहातो तर काय! चाळीतली माणसं दारात येऊन उभी होती. विधिषाचे बाबा दारात उभे राहून अर्णवच्या आई वडिलांशी भांडत होते. तोबा गर्दी झाली होती. त्यांच्या भांडणाच्या आवाजानं आतापर्यंत परिसरातील सर्व चाळीना अर्णवच्या प्रेमप्रकरणाबद्दल समजलं होतं. इतक्या मोठमोठ्याने ते साऱ्या जगाला ओरडून अर्णव किती नालायक  हे सांगत होते. खूप कडाक्याचं भांडण सुरू होतं. अर्णव आणि अमेय दोघे भावंडं आपल्या आईवडिलांना शांत राहायला सांगत होते. विधिषाच्या बाबांनी अर्णवच्या संपूर्ण घराण्याचा उद्धार करून झाला. आणि एकदम ते अर्णवच्या आईला अरे तुरे करून बोलू लागले. अर्वाच शिव्या देऊ लागले. अर्णव त्यांना शांत करत होता. माफी मागत होता. पण ते ऐकायला तयार नव्हते.  इतक्यात विधिषाचा भाऊ वरद बाहेर येऊन भांडू लागला. आणि त्याने रागात अर्णवच्या पोटात लाथ घातली. अर्णव कळवळला. खाली कोसळला.  मग मात्र अमेयचा राग अनावर झाला आणि त्याने वरदवर हात उचलला. अर्णवचे मित्र, अमेयचे मित्र मध्ये पडले. भांडण थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. पण कोणीच काही ऐकत नव्हतं. 

“एकेकाला दाखवतो माझा इंगा. बघच तू आता. नाही तुला माझ्या मुलीची छेडछाड केली म्हणून तुरुंगात खडी फोडायला लावली तर नावाचा गजानन जाधव नाही. तुझं सगळं करीयर बरबाद करतो.  नाही तुझ्या आईवडिलांना माझ्या पायाशी नाक घासायला लावलं तर नाव बदलेन”

विधिषाचे बाबा अर्णवच्या आईवडिलांना धमकावत होते. त्यांच्या गरीब परिस्थितीची टर उडवत होते. विधिषाला सोबत घेऊन ते जवळच्या गिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी ‘अर्णवने त्यांची मुलगी विधिषाची छेड काढली आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला’ अशी खोटी तक्रार केली. रीतसर तक्रार नोंदवल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली. अर्णवच्या घरी जाऊन अर्णवला अटक करण्यात आली. अर्णवचे आईबाबा गरीब होते. ते घाबरले. कोणाला सांगणार? अर्णवची आई तर रडू लागली. सगळेजण पोलीस स्टेशन बाहेर जमा झाले. अर्णवचे सर्व मित्र आईबाबांना धीर देत होते. दोन्ही घरातली माणसं समोरासमोर उभी होती. विधिषा मान खाली घालून रडत होती. आपल्यामुळे आईबाबांना त्रास झाला म्हणून अर्णवही व्यथित झाला. 

इन्स्पेक्टर साळुंखे यांनी गजानन जाधव यांची तक्रार वाचली. एक नजर सर्वांवर टाकत त्यांनी प्रश्न केला.

“अर्णव कोण आहे?” 

“मी आहे साहेब”

अर्णव पुढे येऊन म्हणाला. साळुंखेनी त्याच्याकडे पाहिलं. आणि गालातल्या गालात हसले आणि विधिषाच्या बाबांकडे पाहत म्हणाले.

“याने तुमच्या मुलीची छेड काढली आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला?” 

“होय साहेब, हाच तो नालायक. बऱ्याच दिवसांपासून हा माझ्या मुलीच्या मागे लागला आहे. आणि आता तर हे असं  नालायक कृत्य करण्याचा प्रयत्न केलाय.याला सोडू नका साहेब. चांगली अद्दल घडवा. कडक शिक्षा करा. इतका कडक गुन्हा नोंदवा की आयुष्यातून उठला पाहिजे हा. परत कोणत्या मुलीला छेडण्याची याचीच काय कोणाचीही  हिंमत होणार नाही.”

विधिषाचे बाबा त्वेषाने बोलत होते. जणू काही अर्णवचं भवितव्य उध्वस्त करण्याचा त्यांनी विडाच उचलला होता. 

साळुंखे साहेबांनी एकदा अर्णव आणि विधिषाकडे पाहिलं. दोघांचे निरागस चेहरे एकमेकांच्या मनात असलेल्या प्रेमाची ग्वाही देत होते. त्यांनी अर्णव आणि विधिषाची कसून चौकशी केली. त्यांना अनेक प्रश्न विचारले. अखेरीस ते म्हणाले,

“जाधव साहेब, आमची पोलिसांची नजर गुन्हेगारांना अचूक ओळखते. आणि माझा अनुभव सांगतोय की या मुलाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तुमचा गैरसमज झाला असेल.”

त्यांनी अर्णवकडून त्याची बाजू ऐकून घेतली. अर्णवने ‘ते दोघे एकमेकांना पसंत करतात. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि ते एकमेकांशी लग्न करणार आहेत’हे स्पष्टपणे सांगून टाकलं. 

इन्स्पेक्टर साळुंखेनी विधिषाकडे पाहिलं आणि तिला प्रश्न केला.

“काय ग मुली, तुझे  बाबा म्हणतात ते खरं आहे की हा मुलगा म्हणतो ते?” 

त्या प्रश्नांसरशी विधिषाने तिच्या बाबांकडे पाहिलं. ते रागाने तिच्याकडे पाहत होते. घरून वदवून आणलं होतं तेच विधिषाला पोलिसांसमोर बोलायला सांगितलं होतं. तसं नाही केलं तर तिचा जीवे मारण्याची धमकी स्वतःच्या जन्मदात्याने दिली होती. अर्णवला कायम स्वरूपी तुरूंगात डांबून ठेवायचं आणि त्याचं भविष्य, करीयर उध्वस्त करण्याचा उत्तम कट त्यांनी रचला होता. अर्णवच्या कुटुंबाला देशोधडीला लावण्यासाठी ही नामी युक्ती आखली होती. 

विधिषाने एक कटाक्ष अर्णवच्या दिशेने टाकला. ती काय बोलेल?याकडे तो कानात प्राण आणून ऐकत होता. खूप आशेने तो तिच्याकडे पाहत होता. आता जर तिने तिचे शब्द फिरवले तर तो आयुष्यातुनच उठणार होता. आतापर्यंत सोसलेल्या कष्टांवर पाणी फिरणार होतं. आपली गरीब सोशिक आईच्या यातना त्याच्या डोळ्यातून वाहत होत्या. या एका घटनेने त्याच्या आईच्या स्वप्नांची राखरांगोळी होणार होती. सारं काही विधिषाच्या वक्तव्यावर अवलंबून होतं.

“सर, माझं अर्णववर प्रेम आहे. त्याने माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. माझी छेड काढलेली नाही. आम्हाला लग्न करायचं आहे.” 

विधिषा शांतपणे बोलत होती. तिचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच बाबा तिच्या अंगावर धावून आले.

“नालायक कार्टे, आईवडिलांची इभ्रत वेशीला टांगायला निघालीस. कळतं का तुला? तू काय बोलतेस?”

विधिषाचे बाबा तिच्या अंगावर हात उचलणार इतक्यात इन्स्पेक्टर साळुंखेनी त्यांना अडवलं. 

“मि. जाधव हे पोलीस स्टेशन आहे. तुमचं घर नाही. इथे हा प्रकार चालणार नाही”

साळुंखेनी आवाज चढवून तंबी दिल्यावर विधिषाचे बाबा वरमले.  इन्स्पेक्टर साळुंखेनी अर्णव आणि विधिषाला त्यांचं वय विचारलं. आणि विधिषाच्या वडिलांकडे पाहत म्हणाले,

“मि.जाधव दोन्ही मुलं सज्ञान आहेत. दोघांनीही वयाची अठरा वर्ष पूर्ण केलीत., कायद्याच्या दृष्टीने कोणीच त्यांना अडवू शकत नाही. दुसरी गोष्ट मुलीच्या जबाबामूळे अर्णवने कोणताही गुन्हा केला नाही हे सिद्ध झालंय. तेंव्हा तुम्ही समोपचाराने हे प्रकरण मिटवा.  मुलांच्या निर्णयाला संमती द्या. आणि दोघांचं लग्न लावून द्या”

“हे कदापिही शक्य नाही. तू घरी चल ग. तुला बघतोच”

असं म्हणत त्यांनी विधीचा हात पकडला. आणि खेचत पोलीस स्टेशनच्या बाहेर आणलं. रिक्षा करून घरी आले. घरी येताच धाडकन दार लावून घेतलं. 

“बाबा, नका ना मारू. लागतंय न बाबा.! आई ग वाचवा मला..”

बाहेर फक्त विधिषाचा आक्रोश ऐकू येत होता. ती मोठमोठ्याने ओरडत होती. रडत होती. मारू नका म्हणून बाबांना विनवत होती. विधिषाच्या आईचा आवाज बाहेर येत होता

“नका ओ मारू तिला, लहान नाही आता ती. एवढ्या मोठ्या मुलीवर हात उचलू नका. सोडा तिला”

विधिषाची आई आर्जवे करत होती. पण तिच्या बाबांचा संताप अनावर झाला होता. तिचा आक्रोश जणू त्यांच्या कानावर पडतच नव्हता. रात्रभर विधिषा रडत होती. मार खात होती. 

पुढे काय होईल? वडिलांच्या संतापापुढे विधिषा हार मानेलं का? अर्णव काय निर्णय घेईल पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे..

🎭 Series Post

View all