सप्तपदी एक सुरमयी प्रवास..भाग ४ (मराठी कथा: Marathi katha)

ही एक कौटुंबिक कथा.. एका विधिषाची तिच्या सप्तपदी प्रवासाची

सप्तपदी.. एक सुरमयी प्रवास मराठी कथा: Marathi Katha भाग ४ 

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की,  अर्णवच्या वडिलांनी खूप साध्या पद्धतीने दोन्ही मुलींची लग्न एकाच मांडवात उरकून टाकली.  अर्णवला विधिषा आवडत होती पण तिला हे सांगण्याची हिंमत होत नव्हती. म्हणून मग भावेशच्या सल्ल्याने त्याने विधिषाला पत्र लिहून मैथिलीला तिच्याकडे पोहचवायला सांगितलं. आता पुढे..

भाग ४ 

मैथिली घरी पोहचली. दुपारचं जेवण आटोपलं आणि  तीने घराबाहेर पडताना आईला आवाज दिला.

“आई, मी विधिषाकडे अभ्यासाला जाते ग.. संध्याकाळ पर्यंत घरी परत येईन”

असं म्हणत मैथिलीने तिची वह्या पुस्तकांची बॅग उचलली  पायात सॅंडल अडकवून भरभर पायऱ्या उतरू लागली. पाच दहा मिनिटात ती विधिषाच्या घरी पोहचली. विधिषाची आई वामकुक्षी घेत होती. विधिषाने दरवाजा उघडला. तिला आतल्या खोलीत घेऊन गेली. दोघी अभ्यासाला बसल्या. अभ्यासाला सुरवात करणार इतक्यात मैथिली हळू आवाजात तिला म्हणाली,

“विधी, आज अर्णव आणि भावेश माझ्या कॉलेजवर आले होते.आणि अर्णवने तुझ्यासाठी हे दिलंय”

मैथिलीच्या हातात गुलाबी रंगाचं पाकीट, गुलाबाचं फुल आणि डेअरी मिल्क चॉकलेट पाहून विधिषा आश्चर्यचकित झाली. खरंतर अर्णवने दिलेल्या वस्तू पाहून तिला खूप आनंद झाला होता. इतका मितभाषी,लाजाळू अर्णव असं काही तरी करेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. विधिषाने मैथिलीच्या हातातील चॉकलेट आणि गुलाबाचं फुल घेतलं. अलगद लाजेची लाली चेहऱ्यावर पसरली. मैथिलीने तिच्या हातात गुलाबी पाकीट दिलं. थरथरत्या हातांनी विधिषाने अर्णवने दिलेलं पाकीट उघडलं.  त्यात जाळीदार पिंपळपानावर हृदयाच्या आकाराची नक्षी रेखाटलेलं एक  सुंदर ग्रीटिंग कार्ड पाकिटाबाहेर डोकावत होतं. विधिषाला ते ग्रीटिंग कार्ड खूप आवडलं. तिने कार्ड बाजूला ठेवलं आणि पाकिटातली चिट्ठी वाचू लागली.

प्रिय विधिषा, 

बऱ्याच दिवसांपासून ठरवत होतो तुझ्याशी बोलायचं. मनातलं गुज तुला सांगायचं. पण माझा धीर होत नव्हता. पण आज सगळं अवसान एकवटून मी हे पत्र लिहिण्याची हिंमत केलीय. एक अनामिक हुरहूर दाटून आलीय ती मी तुला शब्दांत सांगू शकत नाही. तुझ्या समोर येऊन बोलणं शक्य नसतं झालं म्हणुन या पत्रातून माझ्या भावना व्यक्त करतोय. 

विधी, आपण लहानपणापासून एकत्र वाढलो., लहानाचे मोठे झालो. आपल्यात फारसं बोलणं नसलं तरी तेंव्हापासूनच आपण एकमेकांना ओळखतो आहोत. त्यामुळे माझ्याविषयी मीच तुला काय सांगू! तुला सगळंच माहीत आहे.

विधी, फार लांबण न लावता तुला काही सांगायचं आहे. तू मला खूप आवडतेस. तुझं लाघवी हसणं, मधाळ बोलणं, तुझं सरळ साधी राहणीमान..अगदी सगळं मला खूप आवडतं. सतत तुझाच विचार डोक्यात असतो. तुझी काळजी वाटते. सतत तुला पहावंसं वाटतं. तू सतत आसपास असावी असं वाटत असतं. जरा दृष्टीआड झालीस  की माझा जीव कासावीस होतो. हेच प्रेम असावं का? माहीत नाही.. आणि यालाच जर प्रेम म्हणत असतील तर मग हो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगदी जीवापाड. कायम राहील अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत.

विधी, तू मला आवडतेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून  तुलाही मी आवडायलाच हवं, तुझाही होकार असायलाच हवा अशी सक्ती नाही ग तुझ्यावर. तू तुझा निर्णय घेण्यास मोकळी आहेस. मी तुला कधीच दोष देणार नाही. पण तरीही मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत.. 

वाट पाहतोय,

तुझा अन फक्त तुझाच,

अर्णव..

विधिषा पुन्हा पुन्हा ते पत्र वाचत होती. तिची नाजूक बोटं ‘तुझा फक्त तुझाच अर्णव’ या शब्दांवरून पुन्हा पुन्हा फिरत होती.  जणू त्या शब्दांतुन अर्णव तिला, तिच्या मनाला स्पर्श करत होता. खरंतर तिच्यासाठी हा सुखद धक्का होता.  अर्णवही तिला आवडू लागला होता. त्याचं असणं, त्याचं दिसणं, त्याचा स्वभाव सारं सारं तिला आवडत होतं. आपल्या प्रेमाची कबुली द्यायला अर्णवने तब्बल तीन ते चार वर्षे लावली होती. त्याचं प्रेम कळूनही तिला काहीच ठाऊक नाही याच अविर्भावात ती वावरत होती. पण या पत्राने मात्र विधिषा खूपच आनंदी झाली होती. तिचा ओसंडून जाणारा आनंद मैथिलीच्या नजरेतून सुटला नाही. मिश्कीलपणे ती विधिषाला म्हणाली. 

“ओहो, क्या बात है! मॅडम आज भारीच खुश झाल्यात! काय मग भेटणार ना अर्णवला आज संध्याकाळी? विश्वास कॅफेमध्ये? आम्हाला तर पार्टी हवी बाबा? तोपर्यंत हे चॉकलेट चालेल”

असं म्हणत तिने पटकन विधिषाच्या हातातील चॉकलेट हिसकावून घेतलं. विधिषा तिला ते परत देण्यासाठी आर्जवे करू लागली. मैथिली ऐकत नाही हे पाहून विधिषा गाल फुगवून बसली. अर्णवने तिच्यासाठी दिलेलं चॉकलेट परत करताच विधिषाच्या गालावरची कळी खुलली. तिने मैथिलीला आनंदाने कडकडून मिठी मारली. डोळ्यांत संध्याकाळची अर्णवच्या भेटीची स्वप्नं तरळू लागली. 


 

जसजशी संध्याकाळ जवळ येत होती तसतशी अर्णवची आतुरता वाढत चालली होती. थोडं दडपणही आलं होतं. अर्णव तिला भेटायला जाण्यासाठी तयार होत होता. त्याने काळ्या रंगाची जीन्सवर क्रीम रंगाचा शर्ट चढवला. हलकासा सुगंधी परफ्यूम  मारला. कीती रुबाबदार दिसत होता तो! त्याने विधिषासाठी गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेतला. रिक्षात बसल्यावर त्याने  रिक्षावाल्याला रिक्षा 'भारत कॅफे' च्या दिशेने घेऊन जायला सांगितली.  गिरगावच्या समुद्रकिनारपट्टीला लागूनच 'विश्वास कॅफे' नावाचं छोटंसं रेस्टॉरंट दिमाखात उभं होतं. अनेक प्रेमी युगलांच्या स्वप्नांचं जणू ते साक्षीदारच.!  रिक्षा ‘विश्वास कॅफे’ समोर येऊन थांबली.  अर्णवने रिक्षातून खाली उतरला. रिक्षावाल्याला त्याचं रिक्षा भाडं चुकतं केलं. आणि तो  रेस्टॉरंटच्या दिशेने आता येऊ लागला. आत आल्यावर अर्णव कोपऱ्यातला रिकामा टेबल पाहून तेथे जाऊन बसला.  विधिषा येण्याची वाट पाहू लागला. एक ओढ होती भेटीची. उसळणारा समुद्रही जणू तिच्या येण्याची वाट पहात होता. सूर्य मावळतीच्या प्रवासाला निघालेला. सोनेरी किरणांची आरास अथांग सागरावर पसरलेली. किती रम्य संध्याकाळ होती ती! 

1

इतक्यात त्याला विधिषा समोरून आत येताना दिसली.  विधिषा पांढऱ्या रंगांच्या घोळदार ड्रेसमध्ये खूपच मोहक वाटत होती. ती जसजशी त्याच्या जवळ येत होती तसतशी अर्णवच्या हृदयाची धडधड वाढू लागली. इतक्या थंड वातावरणातही अर्णवला घाम फुटला. कसं बोलू? काय सांगावं?  त्याला काहीच समजेना..

विधिषा त्याच्या जवळ आली तसा अर्णव उठून उभा राहिला. त्याच्या हातातला गुलाबाच्या फुलांचा गुच्छ स्वीकारत मान झुकवून ती अर्णवला थॅंक्यु म्हणून खुर्चीत बसली.  निरव शांतता.! काय बोलावं दोघांनाही समजेना. दूरवर सुरू असलेल्या रेडिओवरील मराठी गाण्याचे बोल तिच्या कानावर पडत होते..

“जिथे सागरा धरणी मिळते

तिथे तुझी मी वाट पाहते..”

गाणं ऐकताना विधिषाला ते गाणं आताच्या वातावरणाशी  मिळतं जुळत वाटलं. जणू काही तिचाच मनातल्या भावना गाण्यातून व्यक्त होत होत्या. इतक्यात मेनुकार्ड आणि पिण्यासाठी पाणी घेऊन वेटर त्यांच्या टेबलजवळ आला. पाणी आणि मेनुकार्ड टेबलावर ठेवून तो ऑर्डरची वाट पाहू लागला. अर्णवने मेनुकार्ड विधिषा समोर सरकवलं आणि म्हणाला,

“काय घेणार तू? काय खाणार तू? 

“काहीही चालेल.. तुला आवडेल ते ऑर्डर कर.”

असं म्हणून ती गोड हसली. 

“हाय! पुन्हा तीचं ते घायाळ करणारं मधाळ हसू..!”

स्वतःला त्या गोड धक्क्यातून सावरत अर्णवने वेटरला सँडविच आणि कॉफीची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात वेटर कॉफी आणि सँडविच घेऊन आला. कॉफी टेबलवर ठेवून तो तिथून निघून गेला. थोडा वेळ गेल्यावर त्या दोघातला अवघडलेपणा कमी झाला. तीं दोघे कॉफीचे घोट घेत घेत मनमोकळेपणाने गप्पा मारू लागले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. हवामानाच्या चर्चा झाल्या. मग विधिषाने त्याला विचारलं,

“बोल अर्णव, काय म्हणत होतास? का बोलवलंस मला इथे?”

अर्णवने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि मग स्वतःला सावरत तो म्हणाला,

“विधी, मला जे बोलायचं आहे ते आधीच मी तुला सांगितलं आहे. तरी पुन्हा एकदा सांगतो. तू मला खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. विधी, हे प्रेम क्षणिक नाहीये ग. मला तू आयुष्यभरासाठी हवी आहेस. विधी, माझी जीवनसंगिनी होशील? कायम साथ देशील?”

एका दमात सर्व बोलून झाल्यावर थोडंस थांबून तिचा हात आपल्या हातात घेत अर्णव पुढे म्हणाला,

“आय लव्ह यू विधी.. माझी होशील?” 

अर्णवच्या पहिल्या अलवार स्पर्शाने विधिषा मोहरली. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. डोळ्यांतून अलगद आनंदाश्रू ओघळले. तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. विधिषा थोडी लाजत त्याच्याजवळ जात हळूच त्याच्या कानात कुजबुजली,

“आय लव्ह यू टू अर्णव”

तिच्या तोंडून हें शब्द बाहेर पडताच अर्णवचा आनंद गगनात मावेना. जणू आकाश ठेंगणं झालं होतं. त्याचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना. तिच्या होकाराने तोच इतका खुश झाला कीं जोरात त्याने शीळ घातली. तिचा हात अजून घट्ट पकडून ठेवत बाहेर समुद्राकडे पाहत अर्णव म्हणाला,

“विधी, या अस्ताला जाणाऱ्या भास्कराला साक्षी ठेवून मी तुला वचन देतो. तू जो विश्वास माझ्यावर टाकलाय न त्याला कधीच धक्का लागणार नाही. तूझा पकडलेल्या हात मी कधीच सोडून जाणार नाही. प्रत्येक सुखदुःखात मी कायम तुझ्या सोबत राहीन”

अर्णवच्या हातावर आपला दुसरा हात ठेवत विधिषा म्हणाली,

“अर्णव., मीही कधीच सोडून जाणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत असेन  मीही तुला वचन देते.”

तिच्या या होकाराने अर्णवच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कॉफीचं बिल चुकतं करून दोघेही रेस्टॉरंटच्या बाहेर पडले. 

पावसाची हलकीच रिमझिम सुरू झाली होती.  जणू ती पावसाची रिमझिम त्या दोघांना प्रेमाच्या बरसातीत नाहून काढत होती. नभात ऊन-पावसाचा प्रेमाचा खेळ सुरू झाला. नभातला रवीही त्यांच्याकडे पाहून हळूच हसत होता. केशरी रंगाची उधळण करत होता. उदंड हस्ते आशीर्वाद देत होता जणू..! अर्णवने तिला जवळ घेतलं आणि अलगद तिच्या भाळावर आपले ओठ हलकेच  टेकवले. तशी ती मोहरली.. लाजली.. त्याला येऊन बिलगली. एकमेकांना सोडून घरी जाण्याची इच्छा नव्हती पण निरोप तर घ्यावा लागणारच होता. उद्या परत भेटण्याचं आश्वासन देऊन ती दोघे आपापल्या घरी गेली. मनात खूप साऱ्या गोड आठवणी साठवून.. परत उद्या भेटण्याचं वचन देऊन..

दोघांच्याही आयुष्यात एक सुंदर वळण आलं होतं. रोजचा दिवस एक नवीन आनंद घेऊन येत होता.जीवनात रंग भरत होता. स्वप्नांना जणू पंख लागले होते. अर्णवसाठी तर विधिषाच सुरुवात आणि तिच्यातच शेवट.. असं काहीसं झालं होतं. अर्णव आणि विधिषा एकमेकांच्या प्रेमात अगदी नखशिखांत चिंब भिजून गेले होते. स्वप्नमयी जगात रंगून गेले होते. दोघेच एकमेकांसाठी एकमेकांचे विश्व झाले होते. विधिषासाठी कितीतरी कविता अर्णवने रचल्या.  त्याच समुद्र किनारी तिला बोलून दाखवल्या. त्याच्या प्रेमात तीही रंगून गेली होती. आनंदी होती. दिवस आनंदात सरत होते. भेटी होत होत्या. कधी कॉलेजच्या बाहेर,कधी लायब्ररीत,  तर कधी समुद्र किनारी. कधी बाईकवरून रपेट, तर कधी उगीचं रानावनातून भटकंती. कधी सिद्धिविनायकच्या मंदिरात जाणं व्हायचं., किती स्वप्नं डोळ्यांत साठवलेली. किती चर्चा झाल्या, कितीतरी विषय बोलले गेले होते. भविष्यात काय करायचं? करियर काय निवडायचं? सगळं ठरवून झालं होतं. आधी करियर मग त्यानंतर बाकीचं. या मतावर ते दोघेही ठाम होते. त्याच दिशेने पाऊल टाकत होते. 

त्यांच्या त्या गोड स्वप्नांचा तो समुद्रकिनारा साक्षीदार होता. तोच नेहमीचा बसण्याचा बाक त्या प्रेमात घेतलेल्या वचनांची ग्वाही देत होता. तोच भास्कर आपल्या सोनेरी किरणांनी त्यांच्या स्वप्नांत रंग भरत होता. विधिषा अर्णवच्या कुशीत विसावताना जणू किनाऱ्यालाही लाट बिलगल्याचा भास होत असावा. अलगद एखादी लाट त्यांच्या पावलांना स्पर्शून जायची. त्या संथ निळ्या पाण्यात त्यांच्या पाऊलखुणा विरून जायच्या. दोघांनी मिळून असे कितीतरी स्वप्नांचे मनोरे या समुद्रकिनारी रचले होते. 

सगळं सुरळीत सुरू होतं.पण अचानक त्यांच्या प्रेमाला जणू कोणाचीतरी दृष्ट लागली. आणि एक झंझावाती वादळ त्यांच्या जवळ येऊन ठेपलं. 

नेमकं काय घडलं? पुढे काय होतं? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः

©निशा थोरे..

🎭 Series Post

View all