सप्तपदी एक सुरमयी प्रवास..भाग २ (मराठी कथा: Marathi katha)

ही एक कौटुंबिक कथा.. एका विधिषाची.. तिच्या सप्तपदीच्या सुरमयी प्रवासाची..

सप्तपदी.. एक सुरमयी प्रवास मराठी कथा: Marathi Katha भाग २

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, विधिषाच्या सासुसासऱ्यांच्या लग्नाचा चाळिसावा वाढदिवस होता. विनायकराव आणि शांताकाकूंच्या मुलांनी खूप छान सोहळा आयोजित केला होता. विधिषाने स्वतः आपल्या सासूबाईंना तयार केलं होतं. सोहळा छान पार पडला होता. काही जणांनी विनायकराव आणि शांताकाकूंच्या बद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि विधिषा आपलं मनोगत सांगू लागली. आता पुढे..

भाग २

स्वतःची कहाणी सांगता सांगता विधिषा भूतकाळात रंगून गेली. पंधरा वर्षांपूर्वीचा कालखंड एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांसमोरून तरळून गेला. जणू काही तो क्षण, ती वेळ जागीच थिजून गेली होती. मन गिरगावच्या चाळीत पिंगा घालू लागलं. गिरगावच्या चाळीतला तो परिसर, त्या समोरासमोर डौलाने उभ्या असलेल्या ‘मोरेश्वर आणि विघ्नहर्ता’ नावाच्या चाळी, त्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर फेर धरू लागल्या. बालपणीच्या आठवणींनी  विधिषाच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. फ्रॉकमध्ये घरभर वावरणारी इवलीशी विधिषा दिसू लागली. बालपणीचा अर्णव जणू तिला साद घालत होता. 

वीस वर्षांपूर्वीचा काळ होता तो.  गिरगाव परिसरात मोरेश्वर चाळीत तळमजल्यावर असलेल्या दोन खोल्यांमध्ये गजानन जाधव आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. मूळचे रत्नागिरीचे. भाकरीचा चंद्र शोधण्याच्या नादात मुंबईत येऊन वसलेले. पाच वर्षांची विधिषा आणि आठ वर्षाचा वरद ही दोन गोंडस मुलं. एक चौकोनी कुटुंब. शेंडेफळ असल्याने बाबांचा विधिषावर खूप जीव होता. पण ते अतिशय शिस्तप्रिय होते. खाण्यापिण्याचे चिक्कार लाड व्हायचे पण शिस्तीच्या बाबतीत हलगर्जीपणा त्यांना मुळीच खपत नसे. विधिषाची आई अतिशय लाघवी. कोकणातला गोडवा, माधुर्य तिच्या बोलण्यात जाणवायचं. विधिषाची आई सदैव हसतमुखाने सर्वांची विचारपूस करायची. आत्मीयतेने सर्व शेजारीपाजाऱ्यांशी बोलायची. तिच्या आईच्या हातात जणू अन्नपूर्णाच वसत होती. 

विधिषाचे बाबा मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्यावर नोकरीला होते. त्यामुळे घरात बऱ्यापैकी सुबत्ता होती. सुखसोयींनी भरलेलं छोटसं घरकुल. विधिषाचे बाबा मात्र कडक शिस्तीचे. आईसकट वरद आणि विधिषाही त्यांना घाबरायचे. वडिलांच्या धाकात वाढलेले ते चिमुरडे जीव. अबोल, एकलकोंडे झाले होते. चाळीतल्या मुलांत मिसळणं नाही की त्यांच्याशी मैत्री नाही. हसणं बागडणं जे काही ते घराच्या चार भिंतीच्या आत. मुलांनी दंगा मस्ती करणं त्यांना आवडायचं नाही असं नव्हतं  पण उनाडक्या आवडायच्या नाहीत. मुलांच्या आवडीनिवडी कायम जपल्या जायच्या. पण चाळीतल्या मुलांसोबत राहायचं नाही. खेळायचं नाही. अशी दोघांनाही तंबी दिली होती. कोणास ठाऊक! त्यांच्या मनात चाळीतल्या मुलांविषयी काय गैरसमज होता! चाळीतल्या इतर मुलांच्या संगतीने आपली मुलं बिघडतील अशी भीती कायम त्यांच्या मनात असायची.  

वरद विधिषापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता. ‘वंशाचा दिवा’ म्हणून थोडा लाडकोडात वाढलेला. त्यामुळे वडिलांच्या बरोबरीने तोही विधिषाला धाकात ठेवायचा. वरद विधिषासोबत चाळीतली इतर मुलंही विधिषाच्या बाबांना घाबरून असायची.  बाबा घरी असले की चाळीतली लहान मुलं खेळायलाही घराबाहेर पडायची नाही.  दोन चाळीत विधिषाच्या बाबांचा दरारा होता. चाळीतल्या इतर कुटुंबापेक्षा त्यांच्याकडे अधिक सुबत्ता, सधन कुटुंब असल्यामुळे इतरांना कमी लेखण्याची त्यांच्यातली वाईट वृत्ती, थोडा अहंकार बळावला होता.  मुलं मोठी होत होती. शिकत होती.  

पुढे वरदने इंजिनिअरिंग करून पुढे एम.बी.ए ला  प्रवेश घेतला. त्याला अजून पुढे शिकायचं होतं. आणि विधिषाने वाणिज्य शाखेतून पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. वडिलांनी दोन्ही मुलांना शिक्षणाच्या बाबतीत कधीच  आडकाठी आणली नव्हती. मुलांना उत्तमोत्तम देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. आणि त्यासाठी कितीही कष्ट सोसण्याची तयारी असायची.

विधिषाच्या कुटुंबाच्या अगदी विरुद्ध टोकाला अर्णवचं कुटुंब होतं. मोरेश्वर चाळीच्या अगदी समोरच ‘विघ्नहर्ता’ नावाची चाळ उभी होती. त्या चाळीत तिसऱ्या मजल्यावर दोन खोल्यांमध्ये  ‘रामेश्वर नाईक’ नावाचे सद्गृहस्थ आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. महाराष्ट्रातील सोलापूर सारख्या दुष्काळग्रस्त भागातून मुंबईत आलेले, जेमतेम शाळा शिकलेले. गावी उपासमारीने मरण्यापेक्षा मिळेल ती मोलमजुरी करून  पोटापाण्याचा प्रश्न सोडवता येईल आणि गावी राहणाऱ्या आईवडिलांनाही चार पैसे पाठवता येतील या विचारांनी रामेश्वर नाईक मुंबईत आले होते. रामेश्वरांची  पत्नी शांती आणि अक्षरा, अर्णव, अमेय आणि अर्पिता ही चार मुलं  तसेच अर्णवचे नव्यानेच लग्न झालेले धाकटे काका काकू असं हे एकत्र कुटुंब. दहा बाय दहाच्या त्या छोट्या दोन खोल्यांमध्ये जवळजवळ आठ नऊ माणसं राहत होती. त्या दोन खोलीत  त्यांनी आपला संसार थाटला होता. 

अर्णवच्या बाबांचे शिक्षण कमी असल्याने नोकरीही कष्टाचीच. एका खाजगी कंपनीत ‘मशीन ऑपरेटर’ म्हणून काम करत होते. दिवसभर आगीच्या भट्टीसमोर उभं राहून जीवाची काहिली व्हायची. त्यात तुटपुंजा पगार. अर्णवची आई गृहिणी. तुटपुंज्या पगारातही व्यवस्थित घरखर्चाचं व्यवस्थित नियोजन करून संसाराचा गाडा ओढत होती. त्या माऊलीने कधीही कोणाजवळ तक्रार केली नाही. घरात कायम पाहुण्यांचा राबता असायचा. कायम घर माणसांनी भरलेलं असायचं.पण कधीच त्यांनी कंटाळा केला नाही की त्रागा केला नाही.

अर्णवच्या बाबांना अतिशय कष्टाची कामे करावी लागत होती. शारीरिक श्रम विसरण्यासाठी ते कधी कधी रात्री मद्यपान करत असत. आणि मग हीच कधीतरीच पिण्याची सवय रोजची झाली. अर्णवचे बाबा रोज पिऊन येऊ लागले. त्यांना दारूचं जणू व्यसनच जडलं होतं. रोज रात्री दारू पिऊन धिंगाणा सुरू व्हायचा. अर्णवच्या आईवडिलांची कायम या कारणावरून भांडणं व्हायची.  तुटपुंज्या पगारात घरखर्च, चार मुलांची शिक्षणं पाहुणेरावळे आणि त्यात भरीसभर म्हणून त्याच्या बाबांना नव्याने जडलेलं मद्यपानाचं व्यसन. अर्णवच्या आईचा जीव मेटाकुटीला यायचा. अक्षरा या चौघां भावंडांत मोठी मुलगी. आणि मग अर्णव. अमेय आणि अर्पिता खूप लहान असल्याने मोठी भावंडं म्हणून अक्षरा आणि अर्णव यांच्यावर आपल्या लहान भावंडांची जबाबदारी पडली. परिस्थितीमूळे अक्षरा आणि अर्णव वेळेआधीच खूप समंजस झाली होती. चारही मुलं अभ्यासात हुशार होती. आपला अभ्यास सांभाळून ती दोघे आईला घरकामात मदत करायचे. अक्षरा अर्धवेळ नोकरी करून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होती.  अर्णव त्या परिसरात असलेल्या चाळीत वर्तमानपत्र, दुधाच्या पिशव्या टाकायचा. त्यातून त्याला थोडेफार पैसे मिळायचे. तो ते आईकडे द्यायचा. दोन्ही मुलं आईला त्यांच्यापरीने आर्थिक मदत करण्याचा छोटासा प्रयत्न करायची. 

अशा प्रतिकूल परिस्थितीत ही चार भावंडं मोठी होत होती. अक्षरा वाणिज्य शाखेतून पदवीधर झाली. अर्णव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. अक्षरा आता पूर्णवेळ  नोकरी करू लागली. आईला घरखर्चाचा थोडा फार भार उचलत होती.  अक्षरा लग्नाला आली. अक्षरा नाकीडोळी नीटस असली तरी दिसायला सर्वसाधारण, रंगाने काळी सावळी होती. लग्न जमत नव्हतं. आणि कोण पाहणार होतं तिच्यासाठी अनुरूप स्थळ? वडील व्यसनी असल्यानंतर कोण लक्ष देणार त्यांच्याकडे? देवावर विश्वास ठेवून जगणं सुरू होतं. 

‘दारुड्याची मुलगी कोणाचा तरी हात धरूनच जाणार.’ सतत लोकांचे, नातेवाईकांचे  कधी माघारी तर कधी तिच्या तोंडावर टोमणे ऐकून घ्यावे लागत होते. लोकांचे उपहासात्मक बोलण्याने तिला फार वाईट वाटायचं. दारूच्या नशेत तिचे बाबाही तिलाच दोष द्यायचे, 

“करंटी, बाशिंग जड आहे हीचं” 

असे बोल लावून तिला अपमानित करायचे. कधी छोट्या छोट्या कारणावरून तिला बोलायचे, तिच्यावर हातसुद्धा उचलायचे. पण अक्षरा खूप धीराची. तिने कधीच लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आपल्या आईवडिलांच्या नावाला काळिमा लागेल असं कधीच ती वागली नाही. पण तरीही भगवंत तिचीच जास्त परीक्षा घेत होता. अक्षरा बावीस वर्षाची झाली. वय वाढत चाललं होतं. एक दिवस अक्षराचे सांगलीचे काका ऑफिसच्या कामासाठी मुंबईत आले होते.  आणि मग मुंबईत आल्यावर ते त्यांचे घरी मुक्कामाला थांबले होते.अक्षराच्या आईने रात्रीच्या जेवणात छान बेत केला होता. जेवणं आटोपली. भांडीकुंडी, साफसफाई उरकली. झोपण्यासाठी अंथरूणं पडली. आणि सर्वजण बाहेरच्या खोलीत गप्पा मारत बसले होते इतक्यात आईने अक्षराच्या लग्नाचा विषय काढला. ती काकांना म्हणाली,

“भावोजी, जरा अक्षराच्या लग्नाचं बघा की, बावीस वर्षाची झाली ती आता. ” 

आईचं बोलणं मध्येच तोडत अक्षराचे बाबा तुसडेपणाने म्हणाले,

“नाही तर काय! एवढी मोठी घोडी झाली तरी लग्न जमेना. तोंडाचा आधीच प्रकाश पडला होता त्यात बया भरमसाठ शिकलीय. तिला तिच्या तोडीस तोड मुलगा हवाय म्हणे. स्थळं सांगून आली तरी लोकं बक्कळ हुंडा मागताहेत. काही ना काही तरी अडचण येतेय. बघा जरा तिच्या मावशीला सांगून कुठं काय सोयरीक जुळतेय का?”  

वडिलांचं हे असं खोचक बोलणं ऐकून अक्षराच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. तिच्या डोळ्यांत आलेलं पाणी काकांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही. त्यांनी खुणेनेच तिला शांत राहायला सांगितलं. आणि काका म्हणाले,

“आपली अक्षरा खूप गुणी मुलगी आहे. नक्की चांगला मुलगा सांगून येईल. मी स्वतः लक्ष घालतो आता. अक्षराला काही दिवसांसाठी माझ्या घरी घेऊन जातो. तिथे तिच्या मावशीला मदतही होईल आणि मुलं सांगून आली की तिला दाखवताही येईल.”

सर्वांनाच त्यांचं बोलणं पटलं. आणि अक्षरा आपल्या काकांसोबत सांगलीला निघून आली.

पुढे काय होतं? अक्षराचं लग्न जमेल का? दोन विरुद्ध टोक असलेल्या कुटुंबाचं पुढे काय होतं? विधिषा आणि अर्णव यांचं पुढे काय होतं?  पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©® निशा थोरे..

🎭 Series Post

View all