स्पर्श..भाग १२

ही कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..
स्पर्श..

भाग- १२

पंधरा दिवसांच्या दीर्घ सुट्टी नंतर शर्विल आणि सई धुंद क्षणांच्या आठवणी सोबत घेऊन पुन्हा आपल्या घरी परतले. सई आता नवीन घरी आपल्या सासरी छान रुळली. घरातल्या सर्व लहान सहान कामांची जबाबदारी तिने स्वीकारली. देवकीही आपल्या सुनेवर जाम खुश होती. घरात सतत पाहुण्यांचा राबता असतानाही राजवाडे कुटुंबाच्या घरच्या चालीरिती, पै पाहुण्याची ऊठबस सारं सईने छान सांभाळलं होतं. देवकीने तिला स्वयंपाक करायला, नवनवीन पदार्थ बनवायला शिकवलं. आता सई उत्तम स्वयंपाक बनवायला शिकली होती. एकदा असंच स्वयंपाक बनवत असताना देवकी सईला म्हणाली,

“सई, मला जेव्हा शर्विल झाला होता ना.. तेंव्हा न मी खूप रडले होते. का माहिती? मला मुलगी हवी होती. सोनपरी.. पण शर्विल झाला. आणि मुलीची इच्छा राहून गेली. पण आता तुझ्या रूपाने मला माझी मुलगी मिळाली. मी तुझी सासू नाही तर आईच आहे. तू मला शर्विल सारखंच आई म्हणायचं. अजुन एक गोष्ट सांगते तुला, कितीही शिकलीस तरी बाईला नव्हे तर पुरुषांनाही गरजेपूरतं तरी जेवण बनवता यायलाच हवं. उपाशी राहण्याची वेळ येत नाही. समजलं का बेटा?”

देवकीच्या बोलण्याने सईला तिच्या आईची आठवण झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तीने देवकीला घट्ट मिठी मारली.

”आई, तुम्ही माझ्या आईची उणीव भरून काढलीत. आजपासून मी तुम्हांला आईच म्हणेन. खरंतर तुम्ही माझ्या सर्वात जवळच्या बेस्टी आहात.”

सई रडत रडत म्हणाली. देवकी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. तिला गोंजारत होती. सासू सुनेचं नातं आता माय लेकीचं झालं होतं.

दिवस छान सरत होते. नुकतच लग्न झालेलं असल्याने शेजारचे, नातेवाईक सई आणि शर्विल ला पाहुणचाऱ्यासाठी बोलवत. लग्नाचं पहिलं वर्ष. सगळे सण अगदी थाटामाटात पार पडले. रीती प्रमाणे सर्व सणांना देशमुखांनी सुद्धा आपल्या लेकीचा, जावयाचा छान मानपान केला. सर्व काही दृष्ट लागण्याजोगं होतं. सई आणि शर्विलचा संसार छान फुलू लागला. दिवस मजेत जात होते.

एक दिवस दुपारची जेवणं झाल्यानंतर शर्विल, राजवाडे साहेब हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. देवकी आणि सई जेवणानंतर भांडीकुंडी करत होती. किचन आवरत होती. किचनमधली सर्व कामे उरकून देवकी आणि सईसुद्धा त्या दोघांच्या गप्पात सामील झाल्या. गप्पांची मैफिल छान रंगली होती. मधेच हास्याचे फवारे उडत होते. इतक्यात सई म्हणाली.,

“आई-बाबा, आता आम्हाला आमच्या कामावर लक्ष दिलं पाहिजे ना.. खूप मज्जा केली. फिरून झालं, पाहुणचार झाला. आता आमच्या पेशंटसकडे पण पाहायला हवं ना.. बाबा, आता मला रत्नागिरीला जावं लागेल. तिथल्या लोकांची सेवा करायची आहे. सुरुवात अगदी ग्राउंड झीरोपासून करायची आहे त्यामुळे खूप कामे असणार आहेत. एकदा का तिथे पूर्ण सेटअप करून झाला तर मी येईन परत घरी.”

“सई बेटा, खरंतर तू आम्हाला सोडून जाऊ नये, असंच वाटतंय पण तुमचं करियर पण महत्वाचं आहे. त्यामुळे त्याबाबतीत काही आम्ही मधे पडणार नाहीत. बरं, कधी निघणार तू?”

आपल्या सासर्‍यांच्या तोंडून आलेल्या पाठिंब्याच्या या शब्दांनी सईला धीर आला. ती हसत म्हणाली

“दोन दिवसांनी निघेन म्हणते.”

तिने शर्विलकडे पाहिलं. तो हसत होता पण खरंतर त्याची उदासी लपवू पाहत होता. त्या दोघांचं याबाबतीत आधीच बोलणं झालं होतं तरी आता मात्र त्याचं मन नाराज झालं होतं. पण त्याने तिला वचन दिलं होतं. त्यामुळे तिच्या निर्णयाला होकार दर्शवत तो म्हणाला,

“हो.. आता मीही इथे प्रॅक्टिस सुरू करतोय. काही दिवस मुंबईला जाईन आणि मग बघू पुढे काय ते? तू तयारीला लाग. तुला रत्नागिरीला सोडून मी तसाच मुंबईला जाईन. थोडे दिवस तुझ्यासोबत राहेन म्हणजे तुलाही थोडी मदत होईल..”

त्याची नजर सईकडे होती. त्या दोघांचं नजरेतलं संभाषण त्याच्या आईबाबांनी ओळखलं आणि दोघं एकदम म्हणाले,

“हं...”

ते ऐकताच दोघे पटकन भानावर आले. शर्विल लाजून अडखळत म्हणाला,

"नाही.. म्हणजे तिला तिथे सगळा सेटअप बसवायला मदत होईल ना माझी..”

त्याला असं गोंधळलेलं पाहून आईबाबा जोरात हसायला लागले. तशी सई लाजून आत पळाली. मागोमाग काहीतरी कारण सांगून शर्विलनेही तिथून काढता पाय घेतला.

दोन दिवसांनी सई रत्नागिरीला जायला निघाली. सईने काहीशा जड मनानेच दोघांच्या बॅग्स पॅक केल्या. शर्विलने बॅग्स गाडीच्या डिकीत ठेवल्या. सईने देव्हाऱ्यातल्या गणेशाच्या मूर्तीला नमस्कार केला. देवकीने तिचं औक्षण केलं. हळदीकुंकू लावलं. देवकी सईला म्हणाली.,

“सई, खूप लळा लागला आहे गं तुझा. तुझी सवय झालीय बघ. आता कशी राहणार मी? बेटा काळजी घे गं स्वतःची.. पोहचल्यावर फोन कर आणि लवकर परत ये. आम्ही तुझी वाट पाहतोय..”

असं म्हणत देवकीने डोळ्यात आलेलं पाणी पुसलं. सईलाही भरून आलं. देवकीने तिच्यावर केलेली आईसारखी माया जणू तिचं पाऊल अडवत होती. सईने तिला घट्ट मिठी मारली आणि दोघींना अश्रू अनावर झाले. कशीबशी मिठी सोडवत सई म्हणाली,

“आई, मी लवकर परत येईन. तुम्ही आणि बाबा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. वेळेवर औषध घ्या... आणि बाबा, आता मी नाहीये तुम्हाला ओरडायला म्हणून गोड पदार्थ जास्त खायचे नाहीत. मी रोज कॉल करून चेक करणार आहे हे लक्षात असू द्या..”

असं म्हणून तिने डोळे पुसत शर्विलच्या बाबांकडे हसून पाहिलं. राजवाडे साहेबांनी तिच्याकडे स्मित हास्य करत मान डोलावली. शर्विल आणि सई आईबाबांच्या पाया पडून साश्रू नयनांनी दोघांचा निरोप घेऊन निघाले.

संध्याकाळी उशिरा शर्विल आणि सई रत्नागिरीला आपल्या गावी पोहचले. देशमुखांनी आपल्या लेकीचं, जावयाचं मनःपुर्वक स्वागत केलं. लेकीच्या घरी येण्याने देशमुख कुटुंबीय खूपच आनंदात होते. काही दिवसांतच सईने तिच्या गावातल्या सरकारी दवाखान्यात जायला सुरुवात केली. शर्विलच्या आणि तिच्या वडिलांच्या मदतीने क्लिनिकचा पूर्ण सेटअप बसवला. सरकारी दवाखान्यात स्त्रियांच्या, लहान मुलांच्या समस्या, त्यावरील उपाय योजना, स्त्रियात अपेक्षित असलेली जागरूकता याचे पोस्टर लावण्यात आले. तिथे येणाऱ्या रुग्णांना स्वच्छतेविषयी जागरूकतेचे धडे देण्यात येत होते. सई प्रत्येक घरात जाऊन स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहण्याचं प्रशिक्षण देत होती. अर्थात शर्विलची मदत होतच होती.

काही दिवस शर्विल रत्नागिरीत राहिला. सईला क्लिनिकच्या कामात सगळी मदत करत होता. फार कमी अवधीत सईचं क्लिनिक छान सुरु झालं . तिचं रुटीन छान सुरू झालं. शर्विल आणि सई गावांत चांगला हातगुण असलेले डॉक्टर म्हणून नावारुपाला आले होते. सई मनोभावे लोकांची, रुग्णांची सेवा करत होती. त्यांच्यावर औषधोपचार करत होती. आता तिच्या या कार्यात ३-४ असिस्टंट डॉक्टरही सामील झाले होते. रोज क्लिनिक मध्ये येऊन ते सईला मदत करत होते. ती आता तिथे छान रुळली होती. अधून मधून आपल्या सासू सासऱ्यांना फोन करून ख्याली खुशाली विचारायला ती विसरत नव्हती. गावातल्या लोकांनाही तिच्या बोलण्यावर उपचार पद्धतीवर विश्वास बसू लागला. या सगळ्यांत बघता बघता ७-८ महिने सरले. अधून मधून शर्विल मुंबईला जाऊन तिथल्या राहिलेल्या औपचारिकता पूर्ण करून घेत होता. तिथे विराज त्याला मदत करत होता. विराजदेखील त्याची तिथली प्रॅक्टिस संपवून कोल्हापूरला शिफ्ट होत होता. आता शर्विललाही स्वतःच्या प्रॅक्टिसकडे लक्ष द्यावं लागणार होतं. सईला एकटीला रत्नागिरीला सोडून जाणं शर्विलच्या जीवावर आलं होतं पण त्याचा नाईलाज झाला होता. शर्विल जाण्यासाठी निघाला तेव्हा सईच्या डोळ्यांत पाणी आलं.

“शरू, काळजी घे शोना.. वेळेवर जेवत जा. आई आहेतच म्हणा तिथे पण तरी कामाच्या धावपळीत जेवणाच्या बाबतीत मला हलगर्जीपणा नकोय. मी रोज कॉल करेनच कन्फर्म करायला. शरू...”

बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. शर्विलने तिला जवळ घेतलं. माथ्यावर तिच्या ओठ टेकवत तो म्हणाला,

“बच्चा, असं रडून कसं चालेल.. मग माझा पाय कसा निघेल सांग बरं? जाऊ नको का मी? असं नाही करायचं. मी माझी काळजी नक्की घेईन. तू तुझ्या कामावर लक्ष दे आणि असंही आता जेमतेम वर्ष-दीड वर्षाचा तर प्रश्न आहे. असा निघून जाईल वेळ.. मग आपण पुन्हा एकत्र.. आणि अशीही तू आता घरी येशीलच की.. बघता बघता वर्ष पूर्ण होणार आहे आपल्या नात्याला.. सई, आय लव्ह यू जानू..!”

त्याची मिठी अजूनच घट्ट झाली. सई त्याला प्रेमाने बिलगत म्हणाली,

“आय लव्ह यू टू शरू.. आय लव्ह यू सो मच..”

ती त्याच्या आश्वासक स्पर्शाने मोहरली. मिठीत काही क्षण का होईना पण ती बाकी सगळं भान विसरून गेली होती. डोळ्यांत पाणी असताना एक अधीर दीर्घ चुंबन घेत दोघांनी एकमेकांना गोड निरोप दिला. सर्वांचा निरोप घेऊन शर्विल निघाला. जाताना तो कोल्हापूरला विराजला भेटून मग नाशिकला गेला. तिथे त्याच्या क्लिनिकच्या काही औपचारिकता पूर्ण होईतोवर एका मोठ्या इस्पितळात तो रुजू झाला. शर्विलची प्रॅक्टिस पुन्हा सुरू झाली. तिथल्या सिनियर डॉक्टरांकडून अनुभव मिळत होता. खूप काही शिकायला मिळत होतं. रोज सईला कॉल होत होता. रोजच्या घडामोडी कळत होत्या. आई बाबांची खुशाली कळत होती. तीन महिन्यांनी सई तिच्या आईबाबांना घेऊन नाशिकला आली. तिथे शर्विल आणि सईच्या लग्नाचा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा झाला. एक वर्ष किती झटपट सरून गेलं. दोन दिवस राहून सई परतली.

काळाचं चक्र वेगाने फिरत होतं. देवकी आणि राजवाडे साहेब आपल्या सुनेची आतुरतेने वाट पहात होते. देवकी तर सतत काहीतरी कारण काढून लग्नाचे आणि लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो आणि विडिओ बघत असे. तिकडे राजवाडे साहेबांनी शर्विलच्या क्लिनिकच्या कामात जातीने लक्ष देत होते. बघता बघता अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्सने सुसज्ज `देवकी` क्लिनिक सुरू झालं. आता शर्विलची प्रॅक्टिस जोमात सुरू झाली. नाशिकमधल्या सरकारी, खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच्या कन्सल्टींग व्हिजिट्स वाढल्या. अतिशय कमी अवधीत शर्विल नावारूपाला आला. हळूहळू नाशिकमधल्या नामांकित डॉक्टरांमध्ये त्याची गणना होऊ लागली. त्याचं रुटीन सुरू झालं.

एक दिवस संध्याकाळच्या वेळी देवकीने देवापुढे दिवा लावून देवाला नमस्कार केला. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. पण त्या आधी मस्त आलं घालून बनवलेल्या चहाचा आस्वाद घेत म्यूजिक सिस्टीमवर जुनी हिंदी गाणी ऐकत सोफ्यावर बसली होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. देवकीने दरवाजा उघडला. दारात शर्विल उभा होता. देवकी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत हसून म्हणाली.,

“अरे काय रे बाळ, आज इतक्या लवकर! तब्बेत ठीक आहे ना?”

“हो आई, तब्बेत ठीक आहे माझी. आज पेशंट कमी होते. मग आलो निघून.”

असं म्हणत बॅग सोफ्यावर ठेवून शर्विल फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. देवकी त्याच्यासाठी कॉफी करण्यासाठी किचनमध्ये गेली. शर्विल फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसला. देवकीने त्याला कॉफी आणि स्नॅक्स आणून दिलं. शर्विल आणि देविकी कॉफी, स्नॅक्सचा आस्वाद घेत गप्पा मारत बसले होते. इतक्यात दारावरची बेल वाजली.

“तुझे बाबा आले की काय? इतक्या लवकर कसे आले रे? थांब बघते.”

देवकीने दार उघडलं. समोर चाळिशीच्या आसपासची एक स्त्री दारात उभी होती. तिने हात जोडत विचारलं,

"नमस्कार, शर्विल राजवाडे इथेच राहतात ना?”

"हो, आपण..?”

असं विचारताना देवकीचं लक्ष तिच्यासोबत आलेल्या दुसर्‍या स्त्रीकडे गेलं आणि ती आश्चर्यमिश्रित आनंदाने जवळपास ओरडलीच.

“मीरा..!! तू?”

असं म्हणत तिने मीराला मिठी मारली. देवकीचे शब्द कानावर पडताच शर्विलचं लक्ष दाराकडे गेले. समोर मीरा एका मध्यमवयीन स्त्रीसोबत उभी होती.

पुढे काय होते? मीरा सोबत आलेली स्त्री कोण होती? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)

🎭 Series Post

View all