स्पर्श.. भाग ११

ही कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..

स्पर्श..

भाग- ११

देशमुख आणि राजवाडे दोन्ही कुटुंबात लग्नाची लगबग दिसू लागली. दोन्ही परिवारातलं हे पहिलंच आणि शेवटचं लग्न होतं. त्यामुळे लग्न थाटामाटात होणार होतं. राजवाडे साहेबांनी जवळच्या नातेवाईकांना, सगेसोयऱ्यांना, ऑफिसमधल्या त्यांच्या सहकाऱ्यांना आमंत्रणं दिली. सर्वांसाठी आहेर, रिटर्न गिफ्ट घेण्यात आली. आमंत्रण पत्रिकेवर नाव लिहत असताना अचानक देवकीला मीराची आठवण झाली. ती म्हणाली,

“मीराला लग्नपत्रिका पाठवून दिली पाहिजे. किंवा कोणाला तरी पाठवून तिला दोन दिवस आधीच तिला घरी बोलवून घेऊया.”

देवकीचं बोलणं ऐकून राजवाडे साहेबांच्या कपाळावर आट्या पडल्या. पण चेहऱ्यावरील हावभाव किंचितही न बदलता ते म्हणाले.,

“तू बाकीच्या पाहुण्यांचं बघ. मी मीराला आमंत्रण पत्रिका पोस्टाने पाठवून देतो. तू अजिबात का काळजी करू नकोस.”

देवकीला राजवाडे साहेबांनी मीराच्या लग्नात केलेली मदत आठवली. तिच्या लग्नात त्यांनी सर्व खर्चाची जबाबदारी उचलली होती. त्यामुळे देवकीचा त्यांच्यावर विश्वास बसला. आणि तिने पत्रिकेवर मीराचं नाव टाकून राजवाडे साहेबांच्या हातात दिली. जवळच्या सर्व लोकांना आमंत्रणं गेली. शर्विल, सईच्या पसंतीने कपड्यांची, दागदागिन्यांची खरेदी झाली. देशमुखांनी लग्न सोहळ्यासाठी सईच्या आजोळी म्हणजे चिपळूण येथील सर्वात सुंदर, प्रशस्त, समुद्र किनाऱ्याला लागून असलेला ‘माऊली बँक्वेट हॉल’ बुक केला. रत्नागिरी मधल्या सर्वोत्तम केटरर्स सांगून शाही जेवणाची ऑर्डर दिली. लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या मानपानापासून सर्व गोष्टींची खबरदारी घेतली होती. राजवाडे साहेबांनी पाहुण्यांना लग्न मंडपापर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोय केली. चिपळूणमध्ये उंची हॉटेलमध्ये राहण्याची, जेवणाखाण्याची सोय केली होती.

दोन्ही कुटुंबानी अमाप पैसा खर्च करून शर्विल आणि सईचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं. संपूर्ण पंचक्रोशीत इतका सुंदर विवाहसोहळा कोणाचा झाला नव्हता. सर्वजण खूप आनंदात होते. विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर कित्येक महिने त्या लग्न सोहळ्याची चर्चा होत राहिली. अखेर रत्नागिरीच्या देशमुखांची सई शर्विलशी लग्न करून नाशिकच्या राजवाडेंची सून झाली. सईच्या आईवडिलांनी साश्रू नयनांनी मुलीची पाठवणी केली. सई आणि शर्विल आपल्या कुटुंबासमवेत परत आपल्या घरी नाशिकला परतले.

नाशिकला येताच राजवाडे कुटुंबियांनी सईचं जोरदार स्वागत केलं. बंगल्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर उतरून बॅन्ड लावून वरात काढण्यात आली. सर्वजण नाचत होते. मौज मस्ती करत होते. राजवाडेंचा ’राधाई‘ बंगला विद्युत रोषणाई दिमाखात मिरवत होता. दारात सुबक रांगोळी, दारावर आंब्यांच्या पानांचं तोरण सजलं आणि ‘राधाई’ बंगल्याच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून सईने गृहप्रवेश केला. आता सई शर्विलची आयुष्यभराची जोडीदार, अर्धांगिनी झाली. देवकी आणि राजवाडे साहेब आपल्या मुलाच्या सुखात खूप आनंदी होते. राजवाडे साहेबांच्या इच्छेप्रमाणे सर्व घटना घडत होत्या. त्यांना आपल्याच कर्तृत्वावर अभिमान वाटला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली, कुलदेवतेची ओटी भरून झाली. लग्नानंतरचे सर्व विधी सोपस्कार पार पडले. लग्नासाठी आलेले पाहुणेमंडळीनीसुद्धा निरोप घेतला.

संध्याकाळची वेळ होती. सर्वजण वामकुक्षी घेऊन हॉलमध्ये बसले होते. सई सर्वांसाठी चहा घेऊन हॉलमध्ये आली. सईच्या हातातला चहाचा कप घेत देवकी म्हणाली.,

“ये ना सई, तूही आमच्यासोबत चहा घे. बस माझ्या शेजारी..

देवकीने सईला तिच्या शेजारी बसवलं. सर्वजण चहाचा आस्वाद घेत होते. इतक्यात राजवाडे साहेब शर्विलला म्हणाले,

“शर्विल, लग्न झालं. मी आणि तुझ्या आईने तुला काहीच गिफ्ट दिलं नाही ना!”

“बाबा, तुम्ही आमच्या मर्जीने लग्न लावून दिलंत. सईचे आईबाबासुद्धा लग्नाला तयार झाले. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मिळाले. अजून काय हवं? मी खूप आनंदात आहे. मला काही नको.”

शर्विल आईबाबांकडे पाहून म्हणाला.

“अरे व्वा, लहानपणी चॉकलेटसाठी, खेळण्यातल्या नवीन गाडीसाठी हट्ट करणारा माझा चॅम्प मोठा झाला म्हणायचा. चांगली गोष्ट आहे. पण आईवडिलांना आपली मुलं कायम लहानच वाटत असतात बरं!”

राजवाडे साहेब हसून म्हणाले. तशी शर्विलने हसून मान डोलावली. राजवाडे पुन्हा म्हणाले.,

“रितीरिवाजाप्रमाणे आईवडिलांकडून आपल्या नवविवाहीत मुलांसाठी काहीतरी गिफ्ट तर असायलाच हवं. हे घे चॅम्प, आमच्या दोघांकडून तुम्हाला स्पेशल गिफ्ट.”

बाबांच्या हातातली तिकिटे पाहून शर्विलला अतिशय आनंद झाला. त्याने आश्चर्यमिश्रित आनंदाने सईकडे पाहिलं. ती सुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. ऑन्वलप उघडून शर्विलने विमानाची दोन तिकिटं बाहेर काढली.

"स्वित्झर्लंड!!!?”

" हो बेटा, मी तिथे हॉटेलही बुक केलं आहे. डिटेल्स तुला मेलवर पाठवतो. पाहून घे. उद्याच निघायचं आहे तुम्हाला.”

“थँक्यू बाबा..”

असं म्हणत शर्विलने आनंदाने वडीलांना मिठी मारली. राजवाडे साहेबांनी प्रेमाने त्याची पाठ थोपटली. ते सगळं पाहून आणि त्या सुखद धक्क्याने आनंदून गेलेली सई आता लाजली आणि पटकन स्वयंपाकघरात निघून गेली. शर्विलने आधी तिच्याकडे आणि मग आईबाबांकडे पाहिलं. त्यांच्यासमोर आता तोही लाजू लागला तसे आईबाबा हसू लागले.

शर्विल आणि सई स्वित्झर्लंडला जाण्याची तयारी करू लागले. शर्विलचे आईबाबा मुंबई विमानतळावर त्या दोघांना निरोप देण्यासाठी आले. फ्लाईट मध्ये बसवून दोघांनी त्यांचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी शर्विल आणि सई स्वित्झर्लंडला पोहचले. विमानतळाच्या बाहेर हॉटेलचा एक माणूस त्यांना न्यायला आला होता. तिथून कारने ते हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलच्या मॅनेजरने त्यांचं स्वागत केलं. तो सगळा दिमाख पाहून सई तर भलतीच भारावून गेली होती. शर्विलसुद्धा खूप खुश झाला होता. रूमची चावी घेऊन दोघे रूममध्ये आले. रूमबॉयने सामान ठेवून जायला निघताच जेमतेम भानावर येत शर्विलने त्याला टीप दिली. तो जाताच त्याने सईला मिठी मारली. जणू एका स्वप्नवत जगात वावरत होते. दोघे खूप खुश होते आपल्या नशिबावर. प्रवासाने थकल्याने थोडा आराम करून ते फिरण्यासाठी हॉटेलच्या बाहेर पडले. हॉटेलपासून त्यांनी एक कार बुक केली.

”वाव... मार्व्हलस..कसलं सुंदर आहे ना रे स्वित्झर्लंड..”

सई थक्क होऊन उद्गारली. उंचच उंच बर्फाच्या पर्वतरांगा पाहून ती भलतीच खुश झाली.

“अगदी खरंय, या जगात जर कुठे स्वर्ग असेल तो इथेच स्वित्झर्लंडमध्येच बघ! किती सुंदर! अप्रतिम!! माझं स्वप्नं होतं एकदा तरी इथे यायचं. बाबांना ही गोष्ट माहित होती म्हणूनच त्यांनी आपल्याला इथे पाठवलं..”

शर्विल सईला सांगत होता. जवळ जवळ सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहून झाली. नंतर ते सर्वात प्रसिद्ध ‘हॉल ऑफ फेम’ पहायला गेले. खूप भटकंती झाली. सईने खूप सारी शॉपिंग केली. बाहेर खाणं झालं. दोघेही खूप आनंदात होते. सर्व फिरून झाल्यावर ते पुन्हा हॉटेलवर परतले. ते दोघे आपल्या रूममध्ये जात असताना हॉटेलच्या मॅनेजरने त्यांना थांबवलं आणि म्हणाला.,

“सर आज आमच्या हॉटेलला सुरू होऊन पंचवीस वर्ष झालीत त्या निमित्ताने हॉटेलच्या मालकाने छोटीशी पार्टी आयोजित केली आहे. तर तुम्ही संध्याकाळी खाली हॉलमध्ये या.”

“हो नक्कीच आम्ही येऊ.”

शर्विल हसून म्हणाला. दोघांनाही एकापाठोपाठ एक सुखद धक्के मिळत होते.

संध्याकाळ झाली. सई पार्टीसाठी तयार होत होती. पार्टीसाठी बनवलेल्या तिच्या खास ड्रेसेस मधून तिने नेव्ही ब्ल्यू रंगाचा घोळदार वन पिस ड्रेस निवडून अंगावर चढवला. गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस, हातात नाजूकसं हिऱ्यांचं ब्रेसलेट घातलं. कानात लोंबणारी मोठी इयरिंग्स, एका हातात नाजूक घड्याळ घातलं. चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिकची कांडी फिरवली. डोळ्यांवर आयलाईनर लावलं. डोळ्यांत काजळाची रेघ ओढली. लांबसडक काळ्याभोर केसांना गळ्यात मोकळं सोडलं. थोडासा मंद सुगंध असलेला परफ्यूम मारला. मुळातच सुंदर असलेल्या सईचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. म्युझिक सिस्टीमवर छान रोमँटिक हिंदी गाणी लावून ती ऐकत तयारी करत होती. शर्विल बाथरूममधून बाहेर आला. सईला त्या रुपात समोर पाहून तो तिच्याकडे पाहतच राहिला.

“काय दिसतीये यार आज तू.. असं वाटतंय तुला मिठीत घ्यावं.. अगदी घट्ट मिठीत..”

असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. सई मोहरली. त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेत ती म्हणाली,

“काय करतोय शर्विल.. नको ना.. चल आवर लवकर, पार्टीला जायचं आहे ना आपल्याला.. ”

शर्विलने तिच्या गालावर अजून एक चुंबन देत आढेवेढे घेत आपली मिठी सैल केली. आणि तो तयारी करू लागला. त्याने तिच्या आवडीचा आकाशी रंगाचा शर्ट आणि त्यावर पार्टीसाठी काळ्या रंगाचा ब्लेझर अंगावर चढवला. हलकासा परफ्युम मारला. केसांना जेल लावून केस सेट केले. सई त्याच्याकडे एकसारखी टक लावून पाहत होती.

“कसला भारी दिसतोय माझा हिरो..! अगदी कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी दिसत होता अगदी तसाच. इतका हँडसम आहे म्हणूनच कॉलेजमध्ये मुली त्याच्या एका कटाक्षासाठी मरत होत्या. जो सर्वांना आवडायचा त्याला मी आवडले. खरंच खूप नशीबवान आहे मी..”

स्वतःच्याच नशिबाचं तिला कौतुक वाटलं. त्याच्याकडे पाहून तिने गोड स्माईल दिली. एकमेकांच्या हातात हात घेत दोघेही रूमच्या बाहेर पडले. हॉलमध्ये सर्वजण जमले होते. पुढे हिंदी इंग्लिश गाण्याचा ऑर्केस्ट्रा सुरू होता. काहीसं उंचावर असलेल्या त्या हॉटेलच्या काचेच्या खिडक्यांमधून शहराचा रात्रीचा नयनरम्य देखावा नजरेस पडत होता. शर्विल आणि सई रिजर्व केलेल्या टेबलवर जाऊन बसले. आज सई खूपच सुंदर दिसत होती.आजूबाजूला स्त्रियांनाही हेवा वाटावा इतकी ती मोहक दिसत होती. बरीचशी पुरुष मंडळीही सईकडे चोरटा कटाक्ष टाकत होती. शर्विल तर पुरता घायाळ झाला होता. त्या रोमँटिक वातावरणामुळे तीही अतिशय भारावून गेली होती. इतक्यात नाचण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आधी मंद आणि मग फिल्मी म्युझिकवर दोघांनी थिरकायला सुरुवात केली. सईच्या कमरेत हात घालून शर्विलने छान बॉलडान्स केला. इतक्या लोकांमध्ये असूनही ते दोघेच असल्यासारखे ते नाचत होते. काही वेळाने फर्मास डिनर झाल्यावर ते आपल्या रूमकडे निघाले. सई त्याला बिलगून चालत होती. कॉलेजचे गुलाबी दिवस, तो हळवा स्पर्श पुन्हा एकदा ती अनुभवत होती.

खोलीत आल्यावर शर्विल आणि सईने कपडे बदलले. म्युझिक सिस्टीमवर जुनी रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणी हळू आवाजात लावली. डोळे मिटून तो बेडवर पडून होता. सईच्या येण्याची चाहूल लागताच त्याने तिच्याकडे पाहिले. निळ्या रंगाचा वेलव्हेट घोळदार गाऊन घातलेली सई आज अजूनच मोहक दिसत होती. तिचा तो कमनीय बांधा, नशिले डोळे, पाठीवर रुळणारे लांबसडक केस, गुलाबी नाजूक ओठ.. तो तिला न्याहाळत होता. त्याची ती मादक नजर पाहताच सई लाजली आणि फायरप्लेसपाशी जाऊन उभी राहिली. तो भारावल्यासारखा तिच्या मागे गेला. तिच्या कमरेभोवती त्याच्या हातांचा विळखा घट्ट होत गेला. तिला तिच्या खांद्यावर त्याचे श्वास जाणवू लागले. तिचे डोळे आपोआप बंद होऊ लागले. ऊर धपापू लागला. त्याने तिला अलगद मागे फिरवलं. ती लाजून खाली पाहत होती. दोघांच्या श्वासांची गती आता वाढू लागली होती. त्याने हलकेच तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मग डोळ्यांवर, गालांवर आणि शेवटी तिच्या थरथरत्या गुलाबी ओठांचं चुंबन घेतलं. सईचे डोळे आपसूक मिटले. ती थरथरली. सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मग त्याने तिला दोन्ही हातात उचलून घेतलं आणि अलगद बेडवर नेऊन ठेवलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच नशा दिसत होती. त्याची नजर तिच्या सर्वांगावर फिरू लागली. त्याच्या हळुवार स्पर्शाने तिची काया शहारली. ती मोहरली. लाजेने चूर झाली.

“असं नको ना पाहू शरू.. मला लाज वाटते..”

आणि तिने लाजून तिच्या हातांच्या ओंजळीने चेहरा झाकून घेतला. तो अलगद तिच्या हातांची ओंजळ दूर करत तिच्या कानाजवळ येऊन कुजबुजला.

"काय कमाल दिसतेयस अगं तू.. हे नशिले डोळे आणि हे गुलाबी रसाळ ओठ.. वेड लावतेस अगदी..”

ती त्यावर काही बोलणार तोच त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला अन् पुन्हा एकदा तिच्या कोमल ओठांचे हळुवार चुंबन घेऊ लागला. त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले. चुंबनाचा वर्षाव करत त्याने तिच्या खांद्यावर असलेल्या गाऊनचे बंध ओठांनीच उलघडले. तो अलवारपणे तिच्या अंगावरची वस्त्रे दूर करत होता. त्याचे हात तिच्या सर्वांगाला स्पर्श करत होते. तिने आवेगाने शर्विलला जवळ ओढलं. तिचे नाजूक गुलाबी ओठ जणू त्याच्या ओठांच्या स्पर्शासाठी आसुसले होते. तिने त्याच्या ओठांवर तिचे अधीर ओठ टेकवत दीर्घ चुंबन केलं. श्वास श्वासात मिसळला गेला. तिची नाजूक बोटं त्याच्या मानेवर रुळणाऱ्या काळ्याभोर केसांत गुंतली होती. आता त्याच्या पाठीवरून तिचे हात फिरू लागले. त्याच्या पाठीवर तिच्या नखांची नक्षी उमटली. आता फक्त आसुसलेले स्पर्श बोलत होते. तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होता. तीही त्याला तितक्याच आवेगाने प्रतिसाद देऊ लागली. म्युझिक सिस्टीमवर दोघांच्या आवडीचं गाणं वाजत होतं.

"साँसों को साँसों में ढलने दो ज़रा..
धीमी सी धड़कन को बढ़ने दो ज़रा..
लम्हों की गुज़ारिश है ये पास आ जाए..
हम.. हम तुम.. तुम.. हम तुम...”

धुंद रात्र, आसुसलेले क्षण अन एकमेकांचे गंधाळलेले स्पर्श, रोमांचित काया.. आज ते दोघेही एकमेकांना वेगळेच भासत होते. रती मदनाच्या प्रणयक्रिडेचा आनंद, ते सुख दोघेही अनुभवत होते. प्रणयाचा उत्कट आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. बेधुंद रात्रीची ती नशा अजूनही त्यांच्या शरीरात बोलत होती. स्वर्गीय सुखाचं टोक गाठलेल्या त्या दोन जिवांचे श्वास त्या पूर्ण रूममध्ये भरून राहिले होते. म्युझिक सिस्टीम कधीची बंद झाली होती. एकमेकांना ऐकू येत होते फक्त एकमेकांचे श्वास.. दोन पाखरं एकमेकांच्या कुशीत सुखाधीन झाली होती.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all