स्पर्श.. भाग १०

ही कथा एका मीरची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..
स्पर्श..

भाग- १०

शर्विल आईबाबांसोबत पहाटे ५.३० वाजता घरी नाशिकला पोहचला. रात्रीच्या इतक्या लांबच्या प्रवासाने सारेच दमले होते. शर्विल तर दोन दिवसांपासून प्रवासातच होता त्यामुळे तो जास्तच थकला होता. घरी येताच फ्रेश होऊन कॉफी घेऊन लगेच राजवाडे साहेब, शर्विल आणि देवकी झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेले. बोलण्याचंही त्राण कोणात उरलं नव्हतं. पूर्ण दिवसभर सर्वांनी विश्रांती घेतली. त्यानंतर रात्रीच्या जेवणात देवकीने साधीच मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी बनवली होती. जेवण उरकून शर्विल आणि राजवाडे साहेब आरामासाठी पुन्हा आपल्या खोलीत जाऊ लागले.

“आई, तुझं आवरलं की सांग. तुझ्या हातून केसांना तेल लावून घ्यायचं आहे. लावशील का?”

शर्विल त्याच्या खोलीत जाता जाता आईला म्हणाला. त्या दिवशी मीराबद्दल आईला विचारायचं राहिलं होतं. कधी एकदा आईशी मीराविषयी बोलतोय असं त्याला झालं होतं. म्हणून केसांना तेल लावण्याचं निमित्त होतं.

“हो लावते, आलेच लगेच इतकं आवरून.”

देवकी किचन आवरता आवरता म्हणाली. एका वाटीत खोबरेल तेल गरम केलं आणि ती शर्विलच्या खोलीत आली. शर्विल डोक्याला तेल लावून घेण्यासाठी तिच्या पुढ्यात येऊन बसला. देवकी शर्विलच्या केसांना तेल लावून मालिश करत होती.

“आई, सांग आता.. काय झालं मीराचं? कधी लग्न झालं? का इतक्या घाईत केलं? आणि मला तिच्या लग्नाबद्दल काहीच आणि कोणीच कसं सांगितलं नाही? आता कुठेय ती?

शर्विलने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. त्याला थांबवत दीर्घ श्वास घेत देवकी सांगू लागली. देवकीला साधारण एका वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आठवू लागल्या.

“मीरा दहावीला चांगल्या मार्कांनी पास झाली होती. तिने पुढे शिकावं, मोठं व्हावं अशी माझी खूप इच्छा होती. म्हणून मग मी तिला विचारलं होतं की, तुला पुढे शिकायचं असेल तर सांग. इथे जवळच्या कॉलेजमध्ये तुझं ऍडमिशन करूया. कॉलेजच्या खर्चाची तु काळजी करु नकोस मी पाहते सगळं. तेंव्हा ना शर्विल, तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. डोळ्यातलं पाणी लपवत ती म्हणाली होती.,

“काकू, मला खूप शिकायचं होतं. शिकून खूप मोठं व्हायचं होतं. चांगल्या मोठ्या ऑफिसात नोकरी करायची होती. महिन्याभराचा पगार आणून आईच्या हातात द्यायचा होता. आयुष्यभर ती कष्ट करत राहिली निदान आता तरी तिला सुख द्यावं असं वाटत होतं. आईला सुखात ठेवण्याचं स्वप्न होतं माझं पण माझी स्वप्नं स्वप्नच राहिली. आता आई नेहमी आजारी असते. बाहेरची कामे आणि घरातली कामे उरकून मला तिच्यासाठी वेळ द्यावा लागतो. तिचं पथ्यपाणी, औषधाच्या वेळा पहाव्या लागतात. यातून वेळ काढणं खरंच कठीण आहे. आणि समजा वेळ काढलाच तर बाबा माहितच आहेत तुम्हाला. करू देतील का अभ्यास? इथं पर्यंतच कशी शिकले तुम्हालाच माहित आहे काकू. त्यापेक्षा आईला मदत करते. तिला माझी गरज आहे काकू. बाबांनी पूर्ण आयुष्यभरात फक्त तिला त्रासच दिला. निदान मी तरी काही दिवस तिच्या सोबत राहून आनंद देईन. तसा प्रयत्न करेन.”

देवकी क्षणभर थांबली आणि बोलू लागली.

“मीराने असं म्हटल्यावर मी तरी काय बोलणार? मला तिचंही म्हणणं पटत होतं. रखमाला मीराची, तिच्या जवळ असण्याची खूप गरज होती. तिचं शिक्षण थांबलं पण ती घरकामाला येत होती. पण कायम चिंतीत असायची. हसरा चेहरा नव्हताच कधी. कधी रडून डोळे सुजलेले तर कधी आपल्या वडिलांचा मार खाऊन चेहरा काळा निळा झालेला, अंगावर मारलेल्याचा खुणा असायच्या. मला खूप वाईट वाटायचं. राग यायचा तिच्या सोशीक स्वभावाचा. पण ती सारं निमूटपणे सोसत राहायची. कोणाला काही बोलायची नाही. मी तिला विचारलं,

“का सोसतेस हे सगळं? सोडून का येत नाहीस? इथे माझ्यासोबत रहा. नोकरांची खोली आहेच ना. वाटल्यास रखमाला घेऊन ये.”

खिन्नपणे किंचित हसून म्हणाली.,

“आईसाठी सोसतेय सगळं. तिला सोडून कुठे जाऊ? आजवर तिने माझ्यासाठी खूप खस्ता खाल्या आहेत. माझ्यासाठी बाबांची बोलणी तर कधी मार सुद्धा खाल्ला आहे. मग तिला सोडून कशी येऊ? काकू, आई जुन्या वळणाची. मरेपर्यंत नवऱ्याच्या घरचा उंबरठा ओलांडणार नाही. त्या घरातून माझी अंतिमयात्राच निघेल असं म्हणाली होती. मग मला सांगा ती इथे कशी राहायला येईल? काकू,नका जास्त विचार करू. माझ्या नशिबाचे भोग आहेत. मलाच सहन करावे लागतील ना.. आणि मी घेईन काळजी आईची. शक्य होईल तितकं करेन तिच्या सुखासाठी.”

तिच्या बोलण्याने तिच्याविषयी कणव वाटायची आणि तिचं कौतुकही. इतक्या लहान वयात तिच्यात इतका समंजसपणा कुठून आला असेल? देव जाणे! एक दिवस रखमाने मीराकडे निरोप पाठवला. तिला भेटायला येण्याचा. काही सांगायचं होतं तिला. मी रखमाला भेटायला तिच्या घरी गेले. रखमा बिछान्यात होती. सतत खोकत होती. मीरा तिला मधाचं चाटण देत होती. मी आले तशी मीराने तिला उठून बसवलं. रखमा खूपच अशक्त झाली होती. बोलताना तिला धाप लागत होती. रखमा म्हणाली.,

“देवकीवहिनी, माफ करा तुम्हाला माझ्यामुळे इथे यावं लागलं. पण माझं ऐकून घेणारं तुमच्याशिवाय कोण आहे? आज मी तुम्हांला इथे का बोलावलं माहित आहे? मला तुम्हांला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. बातमी इतकी गोड आहे की ती ऐकून तुम्हालाही खूप आनंद होईल. आपल्या मीराचं लग्न ठरवलंय आम्ही. म्हणजे त्याचं काय झालं., मीराच्या काकाने म्हणजे माझा मावस दिराने, बबनने मीरासाठी एक चांगलं स्थळ आणलं. नागपूरला राहतात ते. विजय नाव आहे मुलाचं. माझा दिर म्हणाला की, मुलगा खूप चांगला आहे. निर्व्यसनी, सुस्वभावी. मुलाच्या लहानपणीच त्याचे वडील देवाघरी गेले. सगळी घरची जबाबदारी त्याच्यावर आली. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून नोकरी धरली. मुलगा एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. गावी शेतीवाडी, स्वतःचा मोठा वाडा आहे म्हणे म्हणजे मी नाही पाहिलं पण बबन आणि मीराच्या बाबांनी पाहिलंय जाऊन. बबनने स्वतः मला सगळं सांगितलंय. मीराच्या वडिलांवर नसला तरी माझ्या दिरावर माझा पूर्ण विश्वास आहे. मीरा त्याच्या मुली सारखीच आहे ना.. महिन्याला तीस चाळीस हजार रुपये कमावतो म्हणे. दोन दिवसांपुर्वी बबन आणि तो मुलगा त्याच्या आईसोबत आला होता. त्यांनी पाहताक्षणीच मीराला पसंत केलं. आणि पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख पण काढली. मुलगा कमवता आहे. मीरा सुखात राहील. माझ्यासारखं असं दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी नाही करावी लागणार तिला. माणसं खूप चांगली आहेत देवकी वहिनी, कसलाच हव्यास नाही. त्यांना आपल्याकडून काहीच नकोय. फक्त मुलगी आणि नारळ द्या म्हणाले. आपली परिस्थिती तुम्हाला माहितच आहे. तुम्हांला काय वेगळं सांगू! मग आम्ही फार आढेवेढे न घेता त्यांना होकार कळवला. देवकी वहिनी, तुम्ही आजवर मीराची खूप काळजी घेतली. पोटच्या मुलीसारखं तिला सांभाळलंत. कशी पांग फेडू ओ तुमचे? समजत नाही. एकच शेवटचं उपकार कराल का ओ? माझ्या मीराच्या लग्नाच्या तयारीत तुम्ही लक्ष घालाल का? एवढं मीराचं लग्न तुमच्या हातून पार पडावं इतकीच इच्छा आहे.”

बोलता बोलता रखमा थांबली. ती खोकू लागली तर मीराने लगेच तिला पाणी आणून दिलं. खरंतर मला मीराचं लग्न ठरल्याचा खूपच आनंद झाला. मी दोघींचं अभिनंदन केलं आणि रखमाला विचारलं

“अग, पण मीराला पसंत आहे का मुलगा? तिला आवडला ना?”

तेंव्हा रखमा म्हणाली,

“वहिनी आमच्यात मुलींची मर्जी नाही विचारत. आईवडील सांगतील त्या गोष्टींना तयार होतात मुली. आणि मला सांगा कोणाचे आई वडील आपल्या मुलांचं वाईट होऊ देत असं चिंतणार आहे. आईवडील थोडी मुलांचं वाईट करणार आहेत?”

मी संमती दाखवत फारसं काही न बोलता घरी आले. आणि तुझ्या बाबांना ही गोष्ट सांगितली. आणि मला खूप नवल वाटलं की, नेहमी मीराचा राग राग करणाऱ्या तुझ्या बाबांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. त्यांनी लगेच लग्नाची पूर्ण जबाबदारी घेतली. मीराच्या वडिलांना आणि काकांना घरी बोलवून घेतलं त्यांच्याशी स्वतः बोलले. लग्नाच्या खरेदीसाठी थोडे पैसे दिले. हॉल बुक करण्यापासून ते कॅटरींगच्या खर्चापर्यंत सगळा खर्च तुझ्या बाबांनी केला. सगळ्यांना ऍडव्हान्स पेमेंट केलं. लग्नाची तारीख जवळ येत होती. तसा कामांनाही वेग आला.

आणि एक दिवस अचानक रखमाची प्रकृती बिघडली आहे हा निरोप घेऊन मीरा रडत घरी आली. आम्ही तिघेही तिच्या घरी पोहचलो. रखमा शेवटची घटका मोजत होती. तिने मला आणि मीराला जवळ बोलावलं. मीराचा हात माझ्या हातात देत ती म्हणाली,

“देवकीवहिनी, आता माझं काही खरं नाही. त्याचं बोलावणं आलंय बहुतेक. जावं लागेल ना..! माझ्या मीराला मी तुमच्या हातात सोपवून जातेय. तिचं लग्न मी ठरवलेल्या मुलाशी करून द्या. मला तिचं लग्न माझ्या डोळ्यांनी पाहायचं होतं पण कदाचित ते माझ्या नशिबात नाही. तुम्ही द्याल ना तिचं लग्न लावून? मला वचन द्या सगळं तुम्ही तुमच्या हातांनी ठरलेल्या दिवशीच करून द्याल.”

इतकं बोलल्यावर तिला धाप लागली. तिचा श्वास फुलू लागला. मी मीराचा हात हातात घेऊन रखमाला मीराचं लग्न लावून देण्याचं वचन दिलं. आणि काही क्षणातच रखमाने प्राण सोडला. मीराने मोठ्याने हंबरडा फोडला. अगदी गगनभेदी.. हृदय पिळवटून टाकणारा..

हे सांगता सांगता देवकीने डोळ्याला पदर लावला. शर्विललाही खूप भरून आलं. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. देवकी पुढे सांगू लागली.

“शर्विल, रखमाच्या जाण्याने मीरा पार कोलमडून गेली होती. तुझ्या बाबांनी तिला आपल्या घरी राहायला आणलं. मला काळजी घ्यायला सांगितलं. लग्न तोंडावर आलेलं असताना असा अचानक नियतीने तिच्यावर क्रूर डाव केला होता. पण मी रखमाला वचन दिलं होतं. मीराचं लग्न ठरलेल्या दिवशी त्या मुलाशी लावून देणं ही माझी जबाबदारी होती. तुझ्या बाबांनी स्वतः लक्ष घालून तिचं लग्न पार पाडलं. लग्नाचा सर्व खर्च उचलला. त्यांनी स्वतः तिला तीन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस लग्नात भेट म्हणून दिला होता. त्यांच्यात अचानक झालेला कायापालट मला आश्चर्यात टाकत होता पण हा बदल मला सुखावणाराही होता. तुझ्या बाबांच्या या चांगल्या कृत्यामुळे मला त्यांचा खूप आभिमान वाटला. लग्नात मुलाकडची कोणीच पाहुणे मंडळी आली नव्हती. फक्त नवरा मुलगा आणि त्याची आई दोनच माणस आली होती. मीराच्या घरचे पण दोन चार नातेवाईक आणि शेजारची लोकं होती. फार गाजावाजा न करता मीराचं लग्न साध्या पद्धतीने पण निर्विघ्नपणे पार पडलं आणि आम्ही सर्वांनी मिळून मीराची पाठवणी केली. त्या नंतर मीराचे बाबाही नाशिक सोडून निघून गेले. कुठे गेले कोणालाच माहीत नाही आणि ते जाणून घेण्याची तसदीही कोणी घेतली नाही.”

बोलता बोलता देवकीच्या कंठात उमाळा दाटून आला. सर्व कहाणी ऐकून इतका वेळ शांत असलेला शर्विल देवकीला म्हणाला,

“आई, इतकं सगळं झालं मीराच्या आयुष्यात पण तुम्ही मला एका शब्दानेही कळवलं नाही. का असं केलंत?”

“अरे बाळा, तुझे बाबा म्हणाले तुला आधीच अभ्यासाचं टेन्शन असतं. अजून मी तुला हे नवीन टेन्शन दिलं तर तुझं अभ्यासातलं लक्ष विचलीत होईल. उगीच तुझ्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून मग तुझ्या बाबांनी मला तुला सांगण्यापासून थांबवलं. मग मीही नाही सांगितलं तुला.”

देवकीने शर्विलला उत्तर दिलं.

“चला एक गोष्ट छान झाली. मीराचं लग्न झालं. ती तिच्या संसारात खुश आहे.”

शर्विलच्या चेहऱ्यावर मीराचं लग्न झालं, ती सुखात आहे या भावनेने एक प्रकारचं समाधान झळकत होतं.

“पण का कुणास ठाऊक! शर्विल, ती जाताना इतकी आनंदी दिसत नव्हती. चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी दिसत होती. असं वाटलं की या लग्नामुळे ती फारशी खुश नाहीये. कदाचित रखमाच्या, तिच्या आईच्या जाण्याने ती दुःखी असेल. म्हणून मला तसं वाटलं असेल.”

देवकीने शर्विलला उत्तर दिलं. मीरा तिच्या सासरी सुखात आहे या विचारांनी शर्विल आनंदीत झाला. त्याची एक काळजी मिटली होती. सईच्या प्रेमात तो मीराला, आपल्या जिवलग मैत्रिणीला पार विसरून गेला याचं शल्य त्याच्या मनाला टोचत होतं. आईचं बोलणं ऐकल्यानंतर त्याच्या मनातली सल थोड्या प्रमाणात का होईना कमी झाली.


पुढे काय होतं? खरंच मीरा सुखात असेल का? मीरा आणि शर्विलची भेट होईल का? की अजून काही नियतीने वाढून ठेवलं असेल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)

🎭 Series Post

View all