स्पर्श..
भाग- ४
मीराचा रडवेला चेहरा शर्विलच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. आईच्या डोळ्यातलं पाणी आठवून तो व्यथित झाला. राजवाडेसाहेब आणि शर्विल मुंबईत पोहचले. राजवाडेसाहेबांनी नाशिकमधून निघतानाच मुंबईतल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. त्यांची कार त्या आलिशान हॉटेलसमोर येऊन थांबली. ड्राईव्हरने सामानाच्या बॅग्स बाहेर काढून ठेवल्या आणि त्याने गाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केली. हॉटेलच्या स्वागतकक्षात येताच हॉटेलचा मॅनेजर हसून अभिवादन करत म्हणाला,
“गूड इव्हनिंग सर, आपलं स्वागत आहे. मी आपली काय सेवा करू?”
“मि. राजवाडे यांच्या नावाने रूम बुक असेल. पाहून सांगा आणि आमचं सामान आमच्या खोलीत घेऊन जाण्याची व्यवस्था करा.”
राजवाडेंनी मोबाईलमधलं डोकं बाहेर न काढता उत्तर दिलं. मॅनेजरने कॉम्पुटर स्क्रीनवर पाहून, काही कागदपत्रे, आयडी चेक करून त्यांचं बुकिंग निश्चित केलं आणि स्वतः त्यांच्या खोलीची चावी घेऊन तो त्यांना खोलीपर्यंत सोडायला आला. त्याच्या मागोमाग तिथली व्यवस्था पाहणारा मुलगा सामान घेऊन आत आला. रूमच्या एका कोपऱ्यात त्यांचं सामान ठेवलं. त्यानंतर त्यांची रात्रीच्या जेवणाची चौकशी करून ते दोघेही तिथून निघून गेले. थोड्याच वेळात शर्विल आणि राजवाडेसाहेब फ्रेश झाले. गरमागरम कॉफी पोटात गेल्यावर दिवसभराचा त्यांचा सारा क्षिण निघून गेला. रात्री जेवतानाही शर्विल शांतच होता. काहीसा नाराजच. हि गोष्ट राजवाडेसाहेबांच्या लक्षात आली होती पण त्यांनी मुद्दामच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. घरापासून, आईपासून पहिल्यांदा शर्विल दूर होता. रात्र उलटून गेली तरी त्याला झोप येत नव्हती. आईची, मीराची, त्याच्या जिवलग मित्रांची त्याला खूप आठवण येत होती. अनोळखी शहर, अनोळखी लोक. त्याचा कसा निभाव लागणार होता देव जाणे! केंव्हातरी पहाटे त्याला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच ते दोघे कॉलेजमध्ये पोहचले. ‘सेंट जॉर्ज कॉलेज ऑफ सायन्स, मुंबई’ च्या प्रवेशद्वारापाशी त्यांची कार येऊन थांबली. कॉलेजचं भव्य प्रवेशद्वार, कॉलेजच्या उंचच्या उंच चार इमारती, भव्य प्रांगण पाहून शर्विल थक्क झाला. ते दोघे कॉलेजच्या इमारतीत शिरले. बाहेर उभ्या असलेल्या शिपायाला मुख्याध्यपकांच्या केबिनची चौकशी केली. शिपायाने मुख्याध्यापकांच्या केबिनच्या दिशेने बोट दाखवलं आणि तो तिथून त्याच्या कामासाठी निघून गेला. ते दोघे त्या दिशेने जात होते. एका केबिनबाहेर ‘प्रभाकर म्हात्रे, मुख्याध्यापक - विज्ञान शाखा’ या नावाची पाटी दिसली. राजवाडेसाहेबांनी बाहेर खुर्चीत बसलेल्या शिपायाला स्वतःचं नाव लिहून दिलं. शिपायाने आत जाऊन मुख्याध्यापकांना सांगितलं. त्यांनी दोघांनाही आत बोलावलं. समोर ठेवलेल्या खुर्चीत त्यांना बसायला सांगितलं. आपली स्वतःची ओळख करून देत राजवाडे साहेबांनी बोलायला सुरुवात केली.
“नमस्कार म्हात्रे सर, मी राजवाडे, असिस्टन्ट कमिशनर ऑफ इनकम टॅक्स, नाशिक इथे वास्तव्य. हा माझा मुलगा शर्विल. आपल्या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. म्हटलं, नाशिकला घरी परत जाण्याआधी तुम्हाला भेटून जावं. म्हणून आलो.”
असं म्हणत त्यांनी आपलं व्हिजिटींग कार्ड त्यांच्या पुढे सरकवलं. ते कार्ड पाहताच म्हात्रे सरांना कॉलेजच्या ट्रस्टीनीं या आधी राजवाडे साहेबांबद्दल सांगितलेली गोष्ट आठवली आणि ते चटकन आपल्या जागेवरून उठून उभे राहिले. कॉलेजला भरमसाठ देणगी देऊन राजवाडेसाहेब आता कॉलेजच्या ट्रस्टींच्या कमिटीमधले एक सदस्य झाले होते. त्यांनी म्हात्रे सरांना हातानेच खाली बसण्याचा इशारा केला. त्यांनी मुद्दामच शर्विल हा कोणाचा मुलगा आहे हे सर्वांना समजावं आणि त्याला कोणाचाही त्रास होऊ नये म्हणून शर्विलची ओळख करून दिली होती. प्रवेशप्रक्रिया या आधीच पूर्ण झाली होती. जुजबी बोलणं झाल्यानंतर म्हात्रेसर राजवाडेसाहेबांना म्हणाले,
“तुम्ही निश्चिन्त रहा राजवाडेसाहेब, तुमचा मुलगा इथे सुरक्षित राहील. त्याला कोणत्याही गोष्टींचा त्रास होणार नाही. शर्विल आता आपल्या कॉलेजमध्ये असेपर्यंत माझी जबाबदारी आहे. तुम्ही बिलकुल काळजी करू नका.”
“तुम्ही असताना कसली काळजी करायची सर, आता आम्ही निश्चिंत झालो. आता हॉस्टेलमध्ये जाऊन सगळी सोय पाहावी लागेल. खरंतर आम्ही आमच्या शर्विलला राहण्यासाठी स्वतंत्र खोलीची सोय करणार होतो पण चार मित्रांसोबत राहिला तर जगरहाटीची जाणीव होईल. माणसं ओळखायला शिकेल म्हणून आम्ही त्याला हॉस्टेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला. तिकडेही तुमचं लक्ष असू द्या सर. मी शर्विलला त्याचं हॉस्टेल दाखवतो. त्याच्या रूमवर सोडतो आणि निघतो मग नाशिकला. आपण कॉलवर बोलत राहूच ना!”
असं म्हणत राजवाडेसाहेब आपल्या जागेवरून उठले. हस्तांदोलन करत त्यांनी त्यांचा निरोप घेतला. म्हात्रेसरांनी राजवाडेसाहेबांची काही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या सोबत एका शिपायाला पाठवून दिलं. कॉलेजपासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर त्याच कॉलेजचं हॉस्टेल होतं. ते तिथे पोहचले. शिपायाने हॉस्टेलच्या वॉर्डनशी शर्विलची आणि त्यांची ओळख करून दिली. वॉर्डनही नम्रतेने बोलत होते. शर्विलच्या बाबतीत निश्चिंत राहण्यास सांगत होते. राजवाडे साहेबांना आता मागे फिरावं लागणार होतं. इथून पुढचा प्रवास शर्विलचा एकट्याचा होता. आता शर्विलला निरोप देण्याची वेळ आली होती. हॉस्टेलच्या गेटपाशी उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीजवळ दोघेही येऊन थांबले. दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. गळ्यात आलेला अवंढा गिळत ते म्हणाले,
“शर्विल, मला माहित आहे तुला माझा खूप राग आला असेल. माझा निर्णय चुकीचा वाटत असेल. पण तुझ्या भविष्याचा विचार करूनच मी हे पाऊल उचललं आहे. आता तु मोठ्या शहरात आला आहेस. आपल्या करियरच्या दृष्टीने विचार कर. तुला डॉक्टर व्हायचं आहे. आताच पाया मजबूत झाला तरच उपयोग आहे. घरातून बाहेर पडल्याशिवाय जगरहाटीची तुला कल्पना येणार नाही. कुपातील मंडूक बनून नाही राहायचं तुला. मन लावून अभ्यास कर. काही त्रास असेल तर लगेच मला फोन करून कळव. तुझे आईबाबा कायम तुझ्या पाठीशी आहेत हे विसरू नकोस.”
शर्विलला आपल्या वडिलांचं म्हणणं पटलं. त्याने होकारार्थी मान डोलावली. शर्विलचा निरोप घेऊन राजवाडेसाहेब आपल्या गाडीत जाऊन बसले. शर्विलची योग्य ती सोय लावून झाली होती. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. नाही म्हटलं तरी एका बापाचं काळीज होतं कितीही कणखर असलं तरी पहिल्यांदा आपल्या पोटच्या मुलाला दूर ठेवताना यातना तर होणारच ना! पण शर्विलच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला होता. आता गाडी भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने धावू लागली.
शर्विल दूरवर जाणाऱ्या गाडीकडे पार ती नजरेआड होईपर्यंत पाहत राहिला. गाडी नजरेआड झाली आणि तो मोठ्या जड अंतःकरणाने माघारी हॉस्टेलच्या दिशेने वळला. वॉर्डनने शर्विलला त्याची खोली दाखवली. शर्विलने आत प्रवेश केला. खोलीत काही टवाळ मस्तीखोर मुलं बसली होती. त्यांच्यातला एकजण म्हणाला,
“ नवीन ऍडमिशन दिसतंय कॉलेजमध्ये. नया बकरा आया है हलाल होने के लिये.. अरे अपना परिचय नही दोगे? और उसके बाद हमेभी जान लो! बहुत जरुरी है कॉलेजके बाकी दिन सुकूनसे बिताने के लिये!”
आणि ती मुलं मोठ्याने हसू लागली. शर्विलला कळून चुकलं होतं कि ती मुलं त्याचं रॅगिंग करण्याच्या मुडमध्ये आहेत. तो बावरला. कोणाला सांगावं त्याला काही उमजेना. ती मुलं शर्विलला त्रास देऊ लागली. त्यांनी त्याला त्याचा शर्ट काढण्यास सांगितलं. शर्विल विरोध करत होता. शर्विलने नाईलाजाने शर्ट काढला. त्यांचा लीडर गरजला,
“चलो अब पॅन्ट उतारो..”
आता त्याला पॅन्ट काढायला सांगितलं होतं. तो तयार होत नाही हे पाहिल्यावर त्यातली दोन मुलं पुढे आली. त्यांनी शर्विलला जमिनीवर पाडलं आणि त्याची पॅन्ट उतरवू लागले. आता मात्र शर्विलने कडाडून विरोध केला. पण त्या चार पाच टवाळ मुलांसमोर त्याचा प्रतिकार कमकुवत पडत होता. त्याला हतबल झालेलं पाहून त्यांना अजूनच चेव चढत होता. बाकीची मुलं त्याच्यावर हसत होती. इतक्यात आतून एक भारदस्त आवाज सर्वांच्या कानावर पडला.
“सोडा रे त्याला.. उगीच त्रास देऊ नका”
सर्वजण आवाजाच्या दिशेने पाहू लागले. आतून एक उंच, रुबाबदार मुलगा बाहेर आला. त्याला पाहताच शर्विलला धरून ठेवलेली मुले चपापली. त्यांनी पटकन शर्विलला सोडलं. त्यांचा खुर्चीत बसलेला म्होरक्या उठून उभा राहिला. त्या मुलाला पाहताच सर्वजण भयभीत झाले. आणि एक एक करत सगळे खोलीच्या बाहेर पसार झाले. त्याने जमिनीवर पडलेल्या शर्विलला उठण्यासाठी हात पुढे केला. शर्विलनेही हात पुढे केला आणि उठून बसला. त्या मुलाने शर्विलचा खाली पडलेला शर्ट उचलून त्याच्या हाती दिला. शर्विलने अंगावर शर्ट चढवला. विस्कटलेले केस नीट केले. धक्काबुक्कीमुळे त्याच्या
नाकातून रक्त येत होतं. त्या मुलाने त्याच्या कपाटातून फर्स्ट एडचा बॉक्स बाहेर काढला आणि शर्विलच्या जखमांना औषध लावण्यासाठी त्याच्या हातात दिला. शर्विलसमोर पाण्याचा ग्लास धरत तो म्हणाला,
“अरे भावा, इटस ओके.. घाबरू नकोस. नवीन येणाऱ्या प्रत्येक मुलांना असाच त्रास देतात ही मुलं. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जस्ट चिल्ड. कॉटनने जखमा पुसून घे आणि औषध लाव. बाय द वे, मी विराज सरंजामे फ्रॉम कोल्हापूर.. फर्स्ट इयर बी.एस्सी. आणि तुझा रूम पार्टनर. आता मी आहे तुझ्यासोबत. कोणी तुला त्रास देणार नाही.”
शर्विलने विराजच्या हातातला पाण्याचा ग्लास घेत त्याच्याकडे पाहून किंचित हसून “धन्यवाद मित्रा” म्हटलं. अचानकपणे ओढावलेल्या कठीण प्रसंगमुळे शर्विल धास्तावला होता. कायम आई वडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या शर्विलला या साऱ्या गोष्टी नवीन होत्या. एका नवीन जगाशी त्याला तोंड द्यायला शिकायचं होतं.
“कसा निभाव लागेल माझा?”
तो मनाशीच पुटपुटला. पण त्याचवेळी विराजचा हसरा चेहरा समोर दिसला. विराजने मैत्रीसाठी पुढे केलेला हात त्याने हातात घेतला. क्षणभर शर्विल त्याच्या रांगड्या रूपाकडे आश्चर्याने पाहत राहिला. गव्हाळ रंग, उंचपुरा, धिप्पाड अंगाचा, व्यायामाने कमावलेलं पिळदार शरीर, ओठांवर काळ्याभोर मिशीची महिरप, शर्टाची वरची दोन बटनं उघडी ठेवल्याने दिसणारं गळ्यातलं काळ्या रंगाचा ताईत, बोलण्यात गावरान, राकट लहेजा त्याच्या रूपात अजूनच भर टाकत होतं. अपघातानेच म्हणा, शर्विलला एका अनोळखी विश्वात विराजच्या रूपाने एक अनोखा मित्र भेटला होता. विराजने बाकीच्या मित्रांना बोलावून घेतलं आणि शर्विलची ओळख करून दिली. सर्वजण आपल्या वागण्याने खजिल झाले होते. विराजने सर्वांना शर्विलची माफी मागायला सांगितली. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला,
“सॉरी यार, तुला खूप त्रास दिला. आताच वॉर्डनने तुझ्याबद्दल सांगितलं. तु कॉलेजच्या ट्रस्टीचा मुलगा आहेस. आम्हाला खरंच माहित नव्हतं. गंमत करायला गेलो तुझी. होप तु सर्व विसरून आमच्याशी मैत्री करशील.”
हे ऐकताच विराजने चमकून शर्विलकडे पाहिलं. त्याला खूप नवल वाटलं. शर्विलने विराजकडे आणि बाकीच्या सर्व मुलांकडे हसून पाहिलं. आश्चर्यचकित होऊन शर्विल म्हणाला,
“काय सांगतोस! मला खरंच ठाऊक नव्हतं. मलाही हे आताच कळतंय पण दोस्तांनो, प्लिज तुम्ही तो विचार मनात आणू नका. त्या गोष्टीमुळे आपल्या मैत्रीत अंतर नको. मी कोण्या मोठ्या घरातला असलो तरी आता तुमचा मित्र आहे.”
त्याचं बोलणं ऐकून सर्वांनाच आनंद झाला. इतक्या मोठ्या घरचा असूनही शर्विलचे पाय जमिनीवर स्थिर असलेले पाहून विराजला त्याचं खूप कौतुक वाटलं. जिव्हाळा वाटला. भारावलेल्या अंतःकरणाने त्याने पटकन शर्विलला कडकडून मिठी मारली. सर्वांनी हात जोडून झालेल्या गोष्टीबद्दल क्षमा मागितली. शर्विलनेही मनात राग न धरता हसून सर्वांना माफ करून टाकलं आणि मैत्रीचा हात पुढे केला. सर्वांनी आनंदाने त्याच्या हातात हात मिळवला आणि एका नवीन मैत्रीची रुजवात झाली.
दुसऱ्या दिवसापासून कॉलेज सुरू झालं. सुरुवातीला
नवीन वातावरणाशी जुळवून घेताना शर्विलला कठीण जात होतं. त्याला त्याच्या मैत्रिणीची, मीराची खूप आठवण यायची. दिवसभरात घडलेली प्रत्येक गोष्ट सांगायची एकमेकांना सवय होती. पण आता तो मीराला काहीच सांगू शकत नव्हता. मीराच्या आठवणीने शर्विल व्याकुळ व्हायचा तर कधी तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवून त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरायचा. तिला भेटावंसं वाटायचं. पण आपल्या वडिलांना दिलेला शब्द आठवायचा अन मन माघार घ्यायचं. कधी कधी हॉस्टेलवर त्याच्या बाबांचा फोन यायचा. तो आईबद्दल, मीराबद्द्ल विचारायचा. पण मीराचा विषय निघताच ते विषय बदलायचे आणि जुजबी बोलून फोन ठेवून द्यायचे. त्याचं मन खट्टू व्हायचं. हॉस्टेलवर मेसचं जेवण जेवताना त्याला आईची खूप आठवण यायची. आईने बनवलेल्या पदार्थांची चवच न्यारी.. मनाला तृप्त करणारी. सुरुवातीला न जेवताच अर्धपोटी झोपी जायचा. मग विराज त्याला समजावून सांगायचा.
“मित्रा, असा अन्नाचा अपमान करू नये रे. मी मातीतला माणूस. वीतभर पोटाची खळगी भरता यावी, मला चांगलं जगता यावं म्हणूनच माझा बा शेतात राबतो रे. मी माझं प्रिय गाव सोडून इथे शिक्षणासाठी आलोय. या एका भाकरीचं खूप मोल आहे भावा..”
असं म्हणताना विराजच्या डोळ्यात पाणी तरळायचं. शर्विलला विराजचं बोलणं पटू लागायचं आणि मग निमूटपणे जेवून घ्यायचा. मग कलांतराने हळूहळू हे चित्र बदलू लागलं. सुरुवातीला उदास राहणारा शर्विल आता नवीन मित्रांत मिसळून गेला. नवीन वातावरणात रुळू लागला. विराज आणि शर्विल यांची मैत्री दिवसेंदिवस दृढ होऊ लागली. ‘जय-वीरु’ म्हणून मजेने सर्वजण त्यांना चिडवू लागले. संपूर्ण कॉलेजमध्ये त्यांच्या मैत्रीची चर्चा होऊ लागली.
पुढे काय होतं? शर्विल आणि विराजची मैत्री अशीच टिकून राहील का? पाहूया पुढील भागात..
पुढील सर्व भाग ira blogging app वर प्रकाशित होतील, आजच app डाउनलोड करा. ब्लॉग च्या शेवटी लिंक दिली आहे.
क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)
नमस्कार वाचक मित्रमैत्रिणींनो, आता पर्यंत स्पर्श या कथेचा तिन्ही भागांना अप्रतिम उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात. मनःपुर्वक आभार. या कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी इरा ब्लॉगिंग अँपला सब्स्क्रिब करा. आणि कथेला असच भरभरून प्रेम द्या
आपली सखी,
निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा