स्पर्श.. भाग ३९ (अंतिम)

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..

स्पर्श..

भाग- ३९ (अंतिम)

मीराला प्रचंड त्रास होत होता. तिची एकंदरीत अवस्था पाहता तिचं सिझरिंग करणं आवश्यक होतं. एक डॉक्टर म्हणून सईच्या समोर यक्षप्रश्न उभा राहिला. तिला निर्णय घेणं गरजेचं होतं. ती स्वतः एक स्त्रीरोगतज्ज्ञ होती. डॉक्टरांच्या टीमशी बोलून सई ऑपरेशन थेटरमध्ये दाखल झाली. मीराचा, बाळाचा जीव वाचवणं तिच्यासाठी खूपच महत्वाचं होतं. खरंतर एक डॉक्टर इतर कोणत्याही पेशंटच्या वेदनेला सामोरं जाऊ शकतो पण स्वतःच्या जवळची माणसं पेशन्ट म्हणून पाहताना, त्यांच्या वेदना पाहून हळवा होतो. मनातून थोडा धास्तावतो. सईचंही काहीसं तेच झालं होतं पण मोठ्या धीराने सई आत आली. तिने मीराच्या डोक्यावरून हात फिरवला.

“मीरा थोडं सहन कर गं. सगळं ठीक होईल.”

सई मीराला धीर देत होती पण आता बाळ की आई अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सिनियर डॉक्टर शर्मा काळजीने म्हणाल्या.,

“आपल्याला पेशन्टच्या नातेवाईकांना म्हणजेच डॉक्टर शर्विल यांना ही गोष्ट सांगायला हवी. वेळ पडली तर कोणाला वाचवायचं हा निर्णय आपण त्यांच्यावरच सोपवूया.”

असं म्हणून डॉक्टर शर्मा बाहेर आल्या आणि मग त्यांनी ऑपेरेशन विभागातली परिस्थिती सांगितली.

“डॉक्टर शर्विल, परिस्थिती खूप नाजूक आहे. बाळ आणि आईपैकी कोणाला एकालाच वाचवता येईल. तुम्ही या फॉर्मवर सही करून द्या. तुमचा निर्णय काय आहे ते लिहा म्हणजे आम्हाला आमचा निर्णय घेता येईल.”

त्यांच्या सोबत असलेल्या नर्सने फॉर्म पुढे केला. शर्विलच्या डोळ्यात पाणी साठू लागलं. आपली जिवलग मैत्रीण मृत्यूच्या दारात उभी होती. तिला गमावण्याची भीती मनात दाटून आली. त्याचं डोकं सुन्न झालं. एकीकडे नातवंडाच्या सुखाला आसूसलेले आईबाबा, मातृत्वाच्या सुखाला पारखी झालेली त्याची पत्नी सई आणि दुसरीकडे त्याची जिवलग मैत्रीण मीरा.. शर्विलला काय करावं कळेना. थरथरत्या हातांनी शर्विलने फॉर्मवर सही केली. शर्विल, आईबाबा काळजीत पडले. शर्विल खुर्चीत बसून राहिला. डोक्यात आठवणी पिंगा घालू लागल्या. अगदी लहानपणापासून मीराच्या प्रत्येक गोष्टी त्याला आठवत होत्या.

“देवा, माझ्या मीराला वाचव रे.. खूप सोसलंय तिने. संपूर्ण आयुष्य ती शापित आयुष्य जगलीय आतातरी तिला थोडं सुख दे. काही मागत नाही तुला. मला तिला गमवायचं नाहीये. हवंतर मला शिक्षा दे पण मीराचे प्राण वाचव. प्लिज तिची रक्षा कर.”

हात जोडून शर्विल देवाच्या धावा करत होता. डोळ्यातला पाऊस बरसत होता.

“काही झालं तरी मीरा आणि बाळ दोन्ही सुरक्षित असायला पाहिजे आणि सर्वात आधी बाळापेक्षा मला मीराला वाचावायला हवं. मला स्वार्थी होऊन चालणार नाही. मी एक डॉक्टर आहे. जीव वाचवणं माझं काम आहे. कर्तव्य आहे.”

सई मनातल्या मनात बोलत होती. सर्वांचे टेन्शन वाढलं होतं. मीराला ऑपेरेशन थेटरमध्ये नेण्यात आलं. मीराच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. सई, इतर डॉक्टर्स तिला धीर देत होते. पण तिला काहीच समजत नव्हतं. तिने मनात श्रीरंगाचा धावा केला.

“माधवा, मला शरूसाठी निदान इतकं तरी करू दे रे.. माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. ईश्वरा, माझ्या बाळाला सुखरूपपणे या जगात येऊ दे रे.. आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. वाटल्यास देवा माझे प्राण घे पण माझ्या बाळाला या जगात येऊ दे रे.. सईला तिचं बाळ, मातृत्वाचं सुख मिळू दे. देवा प्लिज माझी सुटका कर..”

मीरा भगवंताला आर्जवे करत होती. सई आणि डॉक्टरांची टीम प्रयत्नांची शर्थ लावत होते. रात्रभर मीरा प्रसवपिडेने विव्हळत होती परिस्थिती खूपच बिकट झाली होती. मीराचा जीव धोक्यात होता आणि एक चमत्कार झाला. जणू श्रीरंगच सईच्या रूपाने मदतीला धावून आला. दुसऱ्या क्षणाला मीराची सुटका झाली. मीराने एका गोड मुलाला जन्म दिला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला मुलाला जन्म देताच तिची शुद्ध हरपली. डॉक्टरांच्या पुढच्या प्रक्रिया सुरू झाल्या. त्यानंतर सिनियर डॉक्टर शर्मा आणि सई दोघी ऑपरेशन थेटरमधून आनंदाने बाहेर आल्या.

“डॉक्टर शर्विल, अभिनंदन.. बाबा झालात तुम्ही. मुलगा झालाय“

डॉक्टरांच्या तोंडून ही बातमी ऐकताच शर्विलच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दोन मिनिटं त्याला काय बोलावं सुचत नव्हतं. बाजूला उभ्या असलेल्या सईकडे त्याने पाहिलं तिने आनंदाने होकारार्थी मान डोलावली.

“डॉक्टर, मीरा कशी आहे? ती ठीक आहे ना?”

शर्विलने भितभीत प्रश्न केला. भीतीने हृदयाचे ठोके वाढले होते.

“हो, डॉक्टर शर्विल, बाळ आणि आई अगदी सुखरूप आहेत. मीराला ग्लानी आलीय. थोड्याच वेळात येईल शुद्धीवर. डॉक्टर शर्विल, आपल्याला डॉक्टर सई यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. मीराला वाचवणं खूप कठीण होतं. डॉक्टर सई यांनी खूप प्रयत्न केले आणि ऑपेरेशन यशस्वी केलं. खरंतर तुम्ही त्यांचेच आभार मानायला हवेत. काँग्रट्स डॉक्टर सई..!”

डॉक्टरांनी सईचं अभिनंदन केलं. शर्विल मटकन खुर्चीत बसला. एक सुटकेचा निःश्वास टाकला. पूर्ण रात्र त्याने मीराच्या काळजीत, चिंतेत घालवली होती. तिला गमावण्याच्या भीतीने त्याचा जीव टांगणीला लागला होता. आता कुठे त्याला हायसं वाटलं. सईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने सईकडे पाहिलं. डोळे पाण्याने गच्च भरले होते. त्याने आनंदाने सईला मिठी मारली.

“सई, आपली मीरा ठीक आहे.”

त्याच्या तोंडून इतकेच शब्द बाहेर पडले. शर्विल धाय मोकलून रडत होता. त्याची अवस्था पाहून सर्वजण सद्गदित झाले. सई हलकेच त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाली.,

“शरू, शांत हो, देवाच्या कृपेने सगळं नीट पार पडलं ना. मीरा आणि बाळं दोन्ही ठीक आहेत आता. तू शांत हो.. आपण तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं की पाहायला जाऊया. समजलं का बाळाचे बाबा.. अभिनंदन हो..”

सई मिश्किलपणे म्हणाली तसा शर्विल डोळे पुसत गालातल्या गालात हसत म्हणाला.

“हो.. हो.. समजलं बरं का..! बाळाची आकुडू आई.. हार्टली काँग्रॅच्यूलशन डिअर..”

शर्विलने डॉक्टरांचे पुन्हा एकदा आभार मानले. राजवाडे साहेब आणि देवकीला तर आकाश ठेगणं झालं. सई देवकीच्या गळ्यात पडून म्हणाली.,

“आई बाबा, अभिनंदन.. आजी आजोबा झालात तुम्ही. बढती मिळाली हो तुम्हाला. पार्टी हवी बाबा.”

“नक्कीच बेटा, जंगी पार्टी होणार.. राजवाडे घराण्याला वारस मिळाला. मला नातू झाला. पार्टी देणार म्हणजे काय देणारच.”

असं म्हणत राजवाडे साहेबांनी तिथल्या नर्स, आया यांना आनंदाने मिठाईसाठी पैसे दिले आणि म्हणाले.,

“आज संपूर्ण वॉर्ड मध्ये पेढे वाटा सिस्टर. राजवाडे कुटुंबाचा सर्वात मोठा आनंद आहे हा. आम्हाला नातू झाला आम्ही आजी आजोबा झालो यासारखं दुसरं सुख नाही. आनंद नाही.”

देवकीने मनातल्या मनात श्रीरंगाचे आभार मानले. इतक्यात शर्विल म्हणाला

“सई, तू आईबाबांना घेऊन घरी जा. थोडा आराम करा आणि पुन्हा या.”

“नको शरू, मी थांबते. आईबाबांना जाऊ दे.”

सईने आईबाबांना घरी जायला सांगितलं. देवकी आणि राजवाडे साहेब घरी निघून गेले. थोड्याच वेळात मीराला शुद्धीवर आली आणि तिला लेबरवॉर्ड मधून तिच्या खोलीत शिफ्ट करण्यात आलं. कधी एकदा मीराला पाहतोय असं शर्विलला झालं होतं. डॉक्टरांनी सई शर्विलला मीराला भेटण्याची परवानगी दिली. सिस्टरने मीराच्या सांगण्यावरून तिला उठवून बसवलं. मीराची सलाईन चेक केली आणि ती तिथून निघून गेली. शर्विल धावतच मीराच्या खोलीत आला आणि त्याच्या पाठोपाठ सईसुद्धा आली. खोलीत येताच शर्विलने मीराला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून त्याच्या मेघ बरसत होते. रडवेल्या स्वरात शर्विल बोलत होता.

“मीरा, थँक गॉड तू ठीक आहेस. किती घाबरलो होतो मी. माझी जिवलग मैत्रीण मला सोडून जाईल की काय अशी भीती वाटत होती. मीरा, तुला गमावणं मला खूप त्रासदायक झालं असतं गं. कसा जगू शकलो असतो मी. तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. अपराधीपणाचं शल्य आयुष्यभर मनाला टोचत राहिलं असतं. मीरा, मला माफ कर गं. स्वार्थी झालो होतो. मुलाच्या हव्यासापोटी माझ्या जिवलग मैत्रिणीचा जीव मी धोक्यात घातला. आता मी तुला मला सोडून कुठेच जाऊ देणार नाही. माझी मैत्रीण मला कायम माझ्या जवळ हवी आहे समजलं तुला..”

शर्विल मीराला कवटाळून अगदी लहान मुलांसारखा रडत होता. सईचे डोळेही पाणावले. शर्विल खूपच भावनिक झाला. त्याने नकळतपणे मीराच्या भाळावर प्रेमाने चुंबन केलं. मिठी अजून घट्ट झाली आणि मीराच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.

“अरे, हाच तो मायेचा स्पर्श.. ज्यासाठी मी इतकी आतुर झाले होते. हिच ती मिठी ज्यासाठी मी इतकी वर्षे वाट पाहिली अगदी वेड्यासारखी.. ह्याच प्रेमाच्या स्पर्शाला मी आयुष्यभर आसूसले होते. हेच ते प्रेम जे आज मला इतक्या वर्षांनी शरूच्या डोळ्यात दिसलं. होय.. मीरा हाच तो अलौकिक प्रेमाचा परिस स्पर्श.. हाच तो स्पर्शाचा अलौकिक आनंद..”

मीरा एकदम भारावून गेली. तिने शर्विलला रडून मोकळं होऊ दिलं. त्यानंतर त्याच्या मिठीतून स्वतःची सुटका करून घेत सद्गदित होऊन म्हणाली.,

“शरू.. आज मला तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी निःस्वार्थ प्रेम दिसलं. हेच ते प्रेम शरू ज्याची मी इतकी वर्षे वाट पाहिली होती रे.. हाच तो स्पर्श ज्याच्यासाठी मी इतकी आतुर झाले होते. हाच तो तुझा हळव्या मनाचा स्पर्श.. माझी इच्छा पूर्ण झाली शरू.. तो तुझा स्पर्श मला मिळाला. मला खूप आनंद होतोय शरू..”

मीराचे डोळे ओसंडून वाहू लागले. शर्विल पुन्हा तिला प्रेमाने गोंजारलं. इतक्यात सई पुढे आली मीराला कुशीत घेत म्हणाली.,

“आता रडायचं नाही मीरा, इतका आनंदाचा दिवस आहे. तू आई झालीस. शर्विल बाबा झाला. मीरा, थँक्यू सो मच गं.. मला आईपणाचं सुख तू माझ्या पदरात टाकलंस. आयुष्यभर तुझे उपकार मी विसरू शकत नाही. मी कायम तुझ्या ऋणात गं.”

सईच्या डोळ्यातही पाणी दाटून आलं.

“चला आता.. जास्त गप्पा नाही करायच्या आराम करायचा. बसून राहायचं नाही. अजून तुझा त्रास कमी झालेला नाही. समजलं तुला माझं ऐकायचं तू..”

मीराने हसून होकार दिला. सईने तिला खाली बेडवर झोपवलं. मीरा हसून सई आणि शर्विलकडे पाहत होती. त्याने नजरेनंच बाळाला घेऊ असं मीराला विचारलं. मीराने मान डोलावली. शर्विलने पाळण्यात ठेवलेल्या इवल्याश्या बाळाला हातात घेतलं. त्याचे नाजूक हात, इवलीशी जिवणी, गोरा रंग.. शर्विलने बाळाला हातात घेताच त्याने हलकेच हातपाय हलवले. बाळाच्या हालचाली पाहून शर्विलच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि डोळ्यातून पाणी टपटप पडत होतं. सईने सुद्धा बाळाला हातात घेतलं. त्याच्या त्या नाजूक स्पर्शाने ती आनंदित झाली. हेच स्पर्श सुख अनुभवण्यासाठी तिला कोणकोणत्या दिव्यातून जावं लागलं होतं. आनंदाश्रू वाहत होते. कोणीच बोलत नव्हतं. फक्त आसवांची बोली सुरू होती. सर्वजण निशब्द झाले होते. थोड्याच वेळात देवकी राजवाडेसाहेब खोलीत आले. देवकीने मीराला कुशीत घेतलं आणि मीराच्या कपाळावर मायेने चुंबन केलं. राजवाडे साहेब खूप खुश होते. हात जोडून त्यांनी मीराचे आभार मानले. जास्त काही बोलायची गरज नव्हती. शब्दाविण संवाद सुरू होता. त्यांच्या पाठोपाठ विराजही आला. मीराला सुखरूप पाहून त्याच्या जीवात जीव आला. भरल्या डोळ्यांनी त्याने मीराकडे पाहिलं. मीराने खुणेनेच ठीक असल्याचं सांगितलं. विराजने बाळाला हातात घेतलं आणि त्याच्या तोंडून इतकेच शब्द बाहेर पडले.

“कृष्णा..”

मीराने चमकून त्याच्याकडे पाहिलं. गमावलेल्या मुलीच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती सुद्धा अस्पष्टपणे पुटपुटली..

“हो माझा कृष्णा..”

एक आनंदसोहळा साजरा होत होता. सर्वजण खूप आनंदात होते. विराज आणि मीरा बाळाला कुशीत घेऊन त्याच्या बाललीला पाहत होते.. विराज बाळाला हातात घेऊन जोजवत होता. विराजने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत आज तिला काही वेगळं दिसत होतं. ती नजर तिला फार ओळखीची आणि हवीहवीशी वाटली. तिने गोड लाजून नजर झुकवली.

मौनातले इशारे डोळ्यांत वाच ना रे..
हसतील जाणीवांचे आभास गोड सारे..

पूर्णविराम.

©निशा थोरे (अनुप्रिया)


नमस्कार वाचक मित्रमैत्रिणींनो,

आज स्पर्श या कथेचा अंतिम भाग.. कथा संपवताना खरंच खूप मन भरून आलं. हि कथा माझ्या आयुष्याचाच एक भाग कधी बनली माझं मलाच समजलं नाही पण हि कथा जगण्याचा आनंद मिळाला. एकदा अश्याच एका वात्र व्यक्तीने मला प्रश्न केला.

“आठवण कशाला होते. मनाला की शरीराला..?”

या प्रश्नांने मी अगदी आतून हलले. खरंच स्पर्श इतका महत्वाचा? पण नेमका कोणता स्पर्श आपल्याला हवा असतो? या प्रश्नांनी मला भंडावून सोडलं होतं. मग मला हि स्पर्श नावाची कथा सुचली आणि बघता बघता या कथेचे ३९ भाग झाले.. सारं स्वप्नावत वाटत आहे. मुद्दाम खोचकपणे विचारलेल्या एका प्रश्नामुळं, एका वाक्यामुळं स्पर्श या कथेने जन्म घेतला. हि कथा लिहताना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या स्पर्शाची ओळख करून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. मग तो स्पर्श लहानग्या शर्विलचा पाच वर्षाच्या मीराला होणारा असो वा वयात आल्यानंतर अनोळखी आवडते नावडते स्पर्श असो., शर्विल आणि विराजच्या घट्ट मैत्रीच्या मिठी स्पर्श असो वा रखमाचा, देवकीचा मायेचा स्पर्श असो..मीराच्या नवऱ्याचा वखवखलेला घाणेरडा स्पर्श असो वा शर्विल आणि सईच्या सहजीवनातील रोमँटिक स्पर्श असो., सईने मीराला मारलेली मिठी असो किंवा मग कथेच्या अंतिम टप्यात शर्विलने मीराला मारलेली घट्ट मैत्रीची आश्वासक मिठी असो.. प्रत्येक स्पर्शाची जाणीव करून देण्याचा अल्पसा प्रयास केला आणि त्याचंच फळ म्हणून तुम्ही सर्वांनी कथेला भरभरून दाद दिलीत., प्रेम दिलंत. माझ्या बाळबोध लिखाणाचा स्वीकार केलात. माझ्या वाचक मित्रमैत्रिणींनो याचसाठी मी निशा थोरे (अनुप्रिया) कायम तुमच्या ऋणात.

दीर्घ कथा लिहण्याचा माझा पहिलाच अनुभव. स्पर्श कथा तुम्हां सर्वांना कशी वाटली जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया माझं लिखाण अजून प्रगल्भ करेल यांत शंकाच नाही. पुन्हा नक्की भेटूया अश्याच एका नवीन कथेसह तोपर्यत माझा छोटासा स्वल्पविराम..

सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार..

आपली शब्दसखी
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all