स्पर्श भाग ३८

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..

स्पर्श..

भाग- ३८


मीराच्या काही टेस्ट झाल्या आणि सरोगसीच्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली. विराज, शर्विल आणि सईसुद्धा तिच्या सोबत होते. वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती खरंच प्रशंसनीय होती. मीरासाठी या सर्व गोष्टी खूपच नवीन वेगळ्या होत्या. प्रक्रिया पूर्ण झाली. आणि त्यानंतर तीन चार महिन्यात मीराला ती गरोदर असल्याची गोड बातमी समजली. मीराला खूप आनंद झाला. ती लगेच राधाई बंगल्यावर आली. सई, शर्विल, राजवाडे साहेब, देवकी काकू दुपारची जेवणं आटोपून हॉलमध्ये बसले होते. देवकीला मीराला दारात असं अचानक समोर पाहून थोडंसं नवल आणि आनंद झाला.

“अगं मीरा.. ये.. ये.. अशी अचानक?”

देवकीने जागेवरून उठत प्रश्न केला. मीरा आत आली. देवकीने तिला सोफ्यावर बसायला सांगितलं. इतक्यात सई तिला पिण्यासाठी पाणी घेऊन आली. मीराने पाणी घेतलं. उन्हातून आल्यामुळे तिला तहान लागली होती. तिने स्मित हास्य करत सर्वांकडे पाहिलं आणि लाजत तिने देवकीच्या कानात ही गोड बातमी सांगितली. ती बातमी ऐकून देवकीचा आनंद गगनात मावेनासा झाला. देवकीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सर्वजण तिच्याकडे पाहू लागले.

“अहो, ऐकलंत का? तुम्ही आजोबा होणार आहात. सई, जा बेटा देवापुढे दिवा लावून साखर ठेव. मीरा.. मीरा तू मला आज खूप मोठा आनंद दिला आहेस.”

देवकीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. इतकी गोड बातमी ऐकून सर्वांना खूप आनंद झाला होता. देवकीला तर मीराला कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं. नवीन उत्साह संचारला होता. तिला काळजी घेण्याचं बजावत देवकी म्हणाली.,

“मीरा बेटा, आता स्वतःची काळजी घ्यायची. मस्त खायचं प्यायचं. कसलीच काळजी करायची नाही. जास्त दगदग करायची नाही. चांगली देवाधर्माची पुस्तकं वाचायची. सकाळी स्वच्छ हवेत फिरायला जायचं. सात्विक आहार घ्यायचा. आता जेवणात तूप, दही यांचा समावेश व्हायला हवा. आता मनात कोणतेही वाईट विचार आणायचे नाही आणि आलेच तर देवाचं नामस्मरण करत राहायचं. चांगल्या गोष्टी पाहायच्या, ऐकायच्या. गर्भसंस्कार चांगले व्हायला हवेत ना.”

देवकीचं बोलणं ऐकून मीराला आईपणाची भावना पुन्हा एकदा सुखावत होती. तिला तिच्या आईची खूप आठवण झाली. मीरा देवकीच्या जवळ आली. तिच्या कुशीत शिरत म्हणाली.,

“काकू, किती काळजी करता! तुमच्या या प्रेमळ काळजी करण्याने मला खूप छान वाटतंय. आई असती तर तिनेही अशीच तुमच्यासारखी काळजी घेतली असती.”

मीराच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत देवकी म्हणाली,

“बाळा, रखमा तुला माझ्या हाती सोपवून गेली त्या क्षणापासून मी तुझी आईच होते गं. काही गोष्टी चुकल्या असतील माझ्याकडून पण तुझ्याविषयी कायम मनात माया होती. कायम असेल. ज्या गोष्टी घडून गेल्या त्याबद्दल मनात सल आहेच गं. ते काही आता बदलता येणार नाही नं.. बरं ते सोड. आता मी तुला एकटीला राहू देणार नाही. एकटी असशील तर तुझी काळजी कोण घेईल? अचानक तुला कशाची गरज भासली तर? नाही मला भीती वाटते. मी तुला एकटीला तिकडे राहू देणार नाही. असंही पहिलं बाळंतपण माहेरीच असतं. तुझं पहिलं बाळंतपण मला करता आलं नाही. निदान आता तरी ते सुख मला मिळू दे. तू आपल्या घरी इथेच रहा.”

सई मीराच्या जवळ येत म्हणाली.,

“मीरा तू मला, शर्विलला संपूर्ण कुटुंबाला खूप मोठा आनंद दिला आहे. मला जगण्याची आशा दिलीस. मी आई होऊ शकत नाही. ते सुख ईश्वराने माझ्याकडून हिरावून घेतलं पण तुझ्या रूपाने परतही दिलं. मीरा, आईपण मलाही अनुभवायचंय. गरोदरपणातल्या तुझ्यात होणाऱ्या बदलाचा आनंद अनुभवायचा आहे. तुझ्या उदरात होणारी बाळाची वाढ, त्याची हालचाल मला अनुभवायची आहे आणि मीरा, त्यासाठी तुला इथे माझ्याजवळ राहायला हवं ना.. प्लिज रहा ना इथे.”

सई मीराला विनवणी करत होती तसं शर्विल पुढे येऊन म्हणाला,

“खरंय सई म्हणते ते.. हे बघ मीरा अगं आम्ही बाळ दत्तक घेतलं असतं किंवा तुझ्याऐवजी इतर कुणाला यासाठी निवडलं असतं तर आम्हाला हे सुख अनुभवायला मिळालं असतंच असं नाही. पण आता सुदैवाने तू आहेस तर मला आणि सईलासुद्धा हे आईबाबापण जगता येईल अगदी या क्षणापासून.. आईसुद्धा तिच्या लाडक्या मुलीचं कौतुक करेल. होणाऱ्या आजीआजोबांना नातवाची ही चाहूल अनुभवता येईल.."

“अगदी बरोबर बोलतोय शर्विल. तू कुठेही जायचं नाहीस. तू इथेच रहा आता.”

राजवाडे साहेबांनी शर्विलच्या बोलण्याला दुजोरा दिला. मीराने शर्विलकडे क्षणभर पाहिलं पुन्हा डोळ्यात पाणी दाटून आलं. मनातल्या खपली धरलेल्या जखमा पुन्हा भळभळून वाहू लागल्या. त्या घरातल्या प्रत्येक कानकोपऱ्यात काही आठवणी साठून होत्या. त्या पुन्हा धावून आल्या. मीरा कंठात दाटून आलेला उमाळा आवरत म्हणाली.,

“मला खूप छान वाटतंय की तुम्ही सर्वजण माझी इतकी काळजी करत आहात. मला इथे राहण्यासाठी आर्जवे करत आहात. पण माझं काम? मेहंदीच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. लग्नातल्या नवरीच्या मेकअपच्या दोन तीन ऑर्डर्स आहेत ते पण संपवावं लागेल ना. आणि दुसरी गोष्ट मी खरंच ठीक आहे. माझी काळजी मी घेईन. तुम्ही अजिबात माझी चिंता करू नका आणि तरीही वाटलंच तर दोन तीन महिन्यानंतर तुम्ही सर्वजण माझ्या घरी या किंवा आपण सगळे लोणावळ्याच्या बंगल्यात जाऊया का राहायला?”

मीराने प्रश्न केला. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. मीराचं म्हणणं सर्वांना पटलं. देवकी आनंदाने म्हणाली.,

“हो हेही चालेल. तेवढीच हवापालटही होईल पण हे दोन तीन महिने तू अजिबात दगदग करायची नाही. रोज मला फोन करायचा आणि दर दोन दिवसांनी आम्ही सर्वजण भेटायला येऊ. चालेल ना?”

देवकीने मीराला प्रश्न केला आणि मीराने मान डोलावली. मीराने मान डोलावताच सगळे तिच्याकडे पाहून मोठ्याने हसू लागले. थोडा गप्पा मारून ती तिच्या घरी निघून गेली. जाताना फक्त एकदा तिने वळून शर्विलकडे पाहिलं मग स्वतःलाच निक्षुन बजावून सांगितलं.

“नाही मीरा, आता पुन्हा गुंतणे नाही. बाहेर पडायचं तुला या सर्व गोष्टीतून. जुन्या जखमांना कुरवाळत बसलीस तर त्रास तुलाच होणार.”

मीरा बंगल्यातून बाहेर पडली. आता मीराच्या एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. एका आईचा प्रवास, मातृत्वाचा अनोखा प्रवास. एक नवीन तेज तिच्या चेहऱ्यावर दिसू लागलं होतं. विराज रोज सकाळ संध्याकाळ कॉल करत होता. तिची काळजी घेत होता. विराजच्या रूपाने मीराच्या आयुष्यातला हरवलेला आनंद परत आला होता. मीरा पूर्वीसारखी हसू लागली होती. राजवाडे साहेब आणि देवकी अधून मधून मीराला भेटायला येत. मग देवकी मीराजवळ दोन चार दिवस मुक्कामी रहात असे. मीराला तिच्या आवडीचं खाऊपिऊ घालत असे. तिची काळजी घेत असे. कधी सई शर्विलही तिला भेटायला येत. मीराची औषधं, पथ्यपाणी नीट तपासून पाहत असत. अधून मधून ते तिला रुटीन चेकअप साठी घेऊन जात असत. सर्वांच्या प्रेमात मीरा नाहून निघाली.

बघता बघता तीन महिने उलटून गेले आणि मीरा राजवाडे कुटुंबासोबत लोणावळ्याच्या बंगल्यावर आली. लोणावळ्याच्या आल्हादकारक प्रसन्न वातावरणात मीराला खूप छान वाटत होतं. सई आणि शर्विलने तिची सतत काळजी करणं तिला मनापासून आवडलं होतं. दिवस सरत होते तसं तशी मीराच्या शरीरात बदल होऊ लागले. सई सतत तिच्या सोबतच रहात होती. त्यामुळे काही लागलं तरी सई समोर हजर असायची. मीराचा अनुभव ऐकताना सई खुश दिसायची. मीराला सातवा महिना सुरू झाला. एक दिवस सई आणि मीरा गप्पा मारत पलंगावर आडव्या पडल्या होत्या. अचानक मीरा दचकून “आई गं…” म्हणाली. सई घाबरली.

“काय झालं मीरा? काही दुखलं का? शरूला बोलवू?”

मीराने हसून सईचा हात हातात घेवून तिच्या पोटावर ठेवला. सईला आतल्या बाळाची हालचाल जाणवली. सई दचकून हात मागे घेतला. मीरा हसून म्हणाली.,

“घाबरू नको, तुझ्या बाळाने किक मारायला सुरुवात केली बघ. बदमाश आहे पक्का. आतापासून किक मारतोय. पुढे जाऊन फुटबॉल खेळणार बहुतेक.”

सईला खूप भारी वाटलं. एक वेगळा अनुभव. एक डॉक्टर म्हणून तिला या गोष्टी माहित असल्या तरी प्रत्यक्ष हा अनुभव तिला खूप आनंद देणारा होता.

“शरू.. ए शरू.. इकडे ये पटकन.”

सईने शर्विलला आवाज दिला. सईचा आवाज ऐकून शर्विल धावतच मीराच्या खोलीत आला.

“काय झालं गं? मीरा तू ठीक आहेस ना?”

शर्विलने घाबरून मीराकडे पाहिलं. सईने त्याचा हात पकडून त्याला मीराजवळ आणलं आणि त्याचा हात मीराच्या पोटावर ठेवला. पुन्हा हालचाल जाणवली. बाळाने पुन्हा एकदा किक मारली. शर्विल सईसारखाच दचकला. त्याने आनंदाने सईकडे पाहिलं. मग दोघांनीही तिच्या पोटावर हात ठेवला. पुन्हा एकदा त्या दोघांना बाळाची हालचाल जाणवली. ते दोघे बाळाच्या हालचालींच्या स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत होते. आता रोज हे असंच घडत होतं. मीरासोबत शर्विल आणि सईच्या आई बाबां होण्याचा प्रवास सुरू झाला.

मीराला सातवा महिना सुरू झाला. देवकीच्या मनात तिच्या ओटीभरणाच्या कार्यक्रमाची कल्पना आली. मोठ्या थाटामाटात आजूबाजूच्या मोजक्याच लोकांना बोलवून मीराच्या ओटीभरणाचा कार्यक्रम करण्यात आला. हिरव्या शालूत मीराचं सावळं रूप खुलून दिसत होतं. मीराला फुलांनी सजवण्यात आलं. फुलांच्या झोपाळ्यावर बसवून झुलवण्यात आलं. विराज या आठवणी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवत होता. व्हिडिओ बनवून ठेवत होता.
देवकी मीराचं अगदी मनापासून सारं कोडकौतुक करत होती. तिच्या आवडीनिवडी जपत होती. विराजचं येणंजाणं सुरू होतं. विराज घरी आला कि मीराच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असे. दोघांच्या गप्पा छान रंगत असत. विराज तिला बाहेर फिरायला घेऊन जात असे तर कधी बाहेर पाणीपुरी, भेळपुरी, आईस्क्रीम खाऊ घालत असे. मीराला अगदी लहान मुलांसारखं वागताना पाहून विराजला तिचा तो निरागसपणा जपून ठेवावासा वाटत असे. मीरा विराजसोबत असताना खूप आनंदी वाटत असे. ऋतुचक्र वेगाने फिरत होतं.

बघता बघता मीराला नववा महिना सुरू झाला. आता मीराला जास्त हालचाल करता येत नव्हती जरा काही काम केलं की ती थकून जाऊ लागली. मीराचे दिवस भरत आले होते. सर्वजण आता मीराची जास्तच काळजी करत होते आणि एके दिवशी रात्री मीराच्या पोटात दुखू लागलं. प्रसववेदना होऊ लागल्या. शर्विलने हॉस्पिटलमध्ये कॉल केला. मीराला गाडीत मागच्या सीटवर बसवलं. सई आणि शर्विल तातडीने मीराला हॉस्पिटलला घेऊन आले. मीराला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. त्यांच्या मागोमाग राजवाडे साहेब आणि देवकीही हॉस्पिटलला पोहचले. मीराला लेबर वॉर्ड मध्ये नेण्यात आलं. बाळंतवेणा सुरू झाल्या होत्या. मीराला या अवस्थेत पाहून सई आणि देवकीचा जीव कासावीस होत होता. देवकीने हात जोडले.

“माझ्या लेकीची सुखरूप सुटका कर रे श्रीरंगा..”

मनोमन देवकीने प्रार्थना केली. शर्विल डॉक्टरांशी बोलून मीराच्या प्रकृतीची विचारपूस करत होता. त्याने तेवढ्यातच विराजला फोन करून मीराला हॉस्पिटलला आणल्याचं सांगितलं.

“मी लगेच निघतो इथून. तोपर्यंत तो सर्वांची काळजी घे आणि मुळात तू घाबरू नको. सगळं ठीक होईल. निघतोय मी.”

असं म्हणून विराजने गाडी काढली आणि तो मीराला भेटण्यासाठी लोणावळ्याला निघाला. गाडीने चांगलाच वेग धरला होता. विनाकारणच त्याला रस्त्याचं अंतर वाढल्या सारखं वाटत होतं. कधी एकदा लोणावळ्याला पोहचतोय आणि मीराला सुखरूप पाहतोय असं विराजला झालं होतं.

इकडे मीराला खूप त्रास होत होता. तिच्या प्रसूती वेदना तिला सहन होत नव्हत्या. तिला होणारा त्रास पाहून डॉक्टरांनी तिला ऑपेरेशन विभागात नेलं.

पुढे काय होतं? पाहूया पुढील आणि अंतिम भागात..

क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)

🎭 Series Post

View all