स्पर्श भाग ३६

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..


स्पर्श..

भाग- ३६

शर्विलचं बोलणं ऐकून मीराच्या डोळयांतून पाणी वाहत होतं. शर्विल तिला थांबण्यासाठी विनंती करत होता. मीरा त्याला म्हणाली.,

“नाही शरू, जाऊ दे मला. मला माहित आहे तुझं माझ्यावर प्रेम नाही. तुझं सईवर खूप प्रेम आहे पण शरू, माझं काय? एकतर्फी का असेना माझं तर तुझ्यावर जीवापाड प्रेम होतच न.. मी त्या साऱ्या गोष्टी कश्या विसरू? मी तुला आणि सईला एकत्र कसं पाहू? माझ्या मनातल्या तिच्या विषयी निर्माण झालेल्या असुयेला कसं मिटवू? तू माझा कृष्ण होतास हा माझा भ्रम तुटलाय. प्लिज आता परत नव्याने त्या विरहाच्या अग्निकुंडात जळणं नको. तुझ्याविषयी मनात द्वेष नको म्हणून मला जाऊ दे शरू.. डॉक्टर विराज म्हणाले तसं कृष्ण आनंदाचा देव आहे तो देव मला नक्कीच भेटेल. शरू, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे आणि तुझा आनंद सईच्या आनंदात.. आता मला तुमच्या दोघांच्या मधे यायचं नाही. प्लिज आता थांबवू नकोस.. माझा निर्णय झालाय.”

मीरा ठामपणे म्हणाली. सई आणि देवकीही भावुक झाल्या. सई डोळयांत पाणी आणून म्हणाली.,

“मीरा, प्लिज नको ना असा निर्णय घेऊ. मला खूप अपराध्यासारखं वाटेल गं. तुमच्या मैत्रीच्या मधे मी आले की काय? हि गोष्ट मला सतावत राहील. आपण छान एकत्र राहूया एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनून. मीरा, तू तुझ्या देवकी काकूंना कसं सोडून जाऊ शकतेस? आई मानतेस ना त्यांना? मग असं का करतेस. प्लिज मीरा..”

सई आर्जवे करत होती.

“सई, तू खरंच खूप चांगली आहेस गं. इतकं होऊनही तू मला इथे थांबवण्याचा प्रयत्न करतेय. माझ्यावर तितकीच माया करतेय. सई, मी मान्य करते, काही तासांपूर्वी मलाही असंच वाटलं होतं की तू माझ्या आणि शरूच्या मैत्रीच्या मधे आलीस. पण तसं नाही गं, तो माझा नव्हताच कधी. तो कायम तुझाच होता. मी चुकीचं समजले होते. सई, तू मुळीच वाईट वाटून घेऊ नकोस किंवा मनात कोणत्याही गोष्टीचं शल्य बाळगू नकोस. माझा तुझ्यावर अजिबात रोष नाही. उलट मी खूप भाग्यवान आहे की तुझ्या सारखी चांगली मैत्रीण माझ्या आयुष्यात आली पण मीच तुला समजू शकले नाही. सई, आता मला अडवू नकोस.. जाऊ दे प्लिज.”

मीरा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. देवकी काही बोलणार इतक्यात राजवाडे साहेब उठून उभे राहिले. राजवाडे साहेब काय बोलतील या विचारांनी देवकीला धडकी भरली. आता जर काही वाईट बोलले तर कडकडून विरोध करायचा देवकीने मनाशी पक्कं ठरवलं होतं. राजवाडे साहेब हात जोडून मीरासमोर आले.

“मीरा, बेटा मला माफ कर. आजच्या तुझ्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे. मी कायम तुझा दुस्वास केला. राग केला. मी शर्विलला मुद्दाम तुझ्यापासून दूर केलं कारण तुमची मैत्री मला कधीच मान्य नव्हती. म्हणून मी असं वागलो. आज मी माझ्याच मुलांच्या, बायकोच्या नजरेतून उतरलो. मला खरंच माफ कर पण घर सोडू जाऊ नकोस. माझ्या कर्माची शिक्षा बाकी लोकांना देऊ नकोस. प्लिज असं करू नकोस.”

राजवाडे साहेब मीराची क्षमा मागत होते. त्यांच्या वागण्याचं देवकीला खूप आश्चर्य वाटलं. राजवाडे साहेबांना त्यांच्या वागण्याचा पच्छाताप होतं होता. मीरा पुढे होऊन त्यांचे जोडलेले हात हातात पकडत म्हणाली.,

“काका प्लिज, तुम्ही असं हात जोडू नका. मोठ्यांनी लहानांची माफी मागू नये. तुम्ही जे वागलात त्या बद्दल मी तुम्हांला अजिबात दोष देत नाही. तुमचं वागणं योग्यच होतं. तुम्ही जे केलंत ते शरूच्या भविष्याचा विचार करूनच केलंत. तेंव्हा तुम्ही तसें वागले नसतात तर आज शरू डॉक्टर झाला असता की नाही सांगता येणं कठीण आहे. सई त्याच्या आयुष्यात आली. तो सुखी झाला. काका, नियती आपल्याला कायम तिच्या तालावर नाचवत असते. आणि आपण तसेच वागत जातो. आपलं प्राक्तन आपल्याला बदलता येत नाही. जे नशिबात होतं ते घडत गेलं. पुढेही घडेल. डॉक्टर विराज म्हणाले तसं आपल्याला ते स्विकारता यायला हवं. तोच प्रयत्न करतेय मी. काका, मी कोणावर राग धरून जात नाहीये पण मी इथे राहिले तर अजूनच गुंता वाढेल. शरूला विसरणं माझ्यासाठी खूप अशक्य आहे. माझ्या मनात असलेलं त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम मला इतक्या सहजासहजी पुसून टाकता येणार नाही. त्या प्रेमामुळे माझ्या मनात सईविषयी तिरस्कार निर्माण होतं राहील आणि पुन्हा मी काहीतरी चुकीचं वागेन. आता अजून मला कोणाच्या आयुष्यात वादंग निर्माण करायचं नाही. माझ्यामुळे आता अजून कोणाला मला त्रास द्यायचा नाही. खूप मुश्किलीने मी निर्णय घेतलाय. आता मला थांबवू नका प्लिज, कारण आता जर थांबले तर सारंच कठीण होऊन जाईल. काका, आता मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. पुढे शिकायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.”

“अगं पण..”

राजवाडे साहेब बोलत असताना विराजने त्यांना थांबवलं.

“काका, मीरा म्हणते ते बरोबर आहे. तिला या सर्व गोष्टींतून बाहेर पडायचं आहे. तिला तिच्या मनाप्रमाणे जगायचं आहे. पुढे शिकायचं आहे. स्वतःच्या पायावर कोणाच्याही आधाराशिवाय उभं राहायचं आहे. ती असा विचार करतेय हि खरंच खूप छान गोष्ट आहे. खूप कौतुकास्पद आहे. आपण तिचा हा निर्णय मान्य करूया.  आपण सर्वजण मिळून तिला तिचं आयुष्य नव्याने जगण्यास मदत करूया. तिला तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगू देऊया. तिचे निर्णय तिला घेऊ देऊया. निर्णय घेताना ती चुकेलही पण निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात येईल. मीरा या घरापासून दूर गेली म्हणजे आपल्यापासून फार दूर गेली असं नाही. आपण तिला सतत भेटत राहणार आहोत. सतत तिच्या संपर्कात राहणार आहोत. दुसरीकडे राहूनही ती कायम आपल्यासोबतच असेल. शर्विल तुझं काय म्हणणं आहे?”

विराजने शर्विलकडे पाहून प्रश्न केला. त्याच्या डोळयांत पाणी होतं. त्याने काहीही न बोलता फक्त मान डोलावून संमती दर्शवली. सर्वांनी विराजच्या म्हणण्याला मुकसंमती दिली. विराज पुढे म्हणाला.

“मीरा, तुझा निर्णय आम्हा सर्वांना मान्य आहे. लवकरच आपण याबद्दल ठरवूया पण त्या आधी तू मला तुझे पेंटिंग्स दाखवणार होतीस. कुठे आहेत त्या सांग? आणि पेंटिंग्सचं साहित्य? मला ते पाहायचं आहे. ”

पेंटींग्सचं नाव काढताच मीराच्या डोळयांत विराजला एक वेगळीच चमक दिसली.

“हो.. हो.. नक्कीच दाखवेन. माझं लग्न ठरलं होतं त्यावेळीस मी माझ्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी इथल्या स्टोररूम जपून ठेवल्या आहेत. दाखवू तुम्हाला?”

मीराचा उत्साह ओसंडून वाहत होता.

“हो.. नक्कीच..चल पाहूया..”

विराज जागेवरून उठत म्हणाला. इतक्यात मीरा काहीतरी लक्षात येऊन त्याला थांबवत म्हणाली.,

“आधी मी स्वयंपाकाचं बघते. मग पाहूया माझी पेंटिंग्स. चालेल ना?”

मीरा स्मित हास्य करत म्हणाली. विराजनेही हसून मान डोलावली. मीरा स्वयंपाकघराकडे जाऊ लागली. सई तिच्या मदतीला जाऊ लागली. तिला अडवत मीरा म्हणाली.,

“सई, तू आज आराम कर. मी पूर्ण स्वयंपाक करते. डॉक्टरांना माझ्या हातचं जेवण जेवायचं आहे ना.. मीच करते. तू आणि काकू सर्वांसोबत गप्पा मारत बसा. तुमच्यासाठी खायला काही घेऊन येऊ का?”

“नको बाळ, तू रात्रीच्या जेवणाची तयारी कर. आता काही नको करुस. वाटल्यास सर्वांसाठी कॉफी करून आण.”

देवकी म्हणाली. मीराने मान हलवली आणि स्वयंपाकघरात जाऊन सर्वांसाठी कॉफी करून आणली. सर्वजण शांत बसून होते. त्यानंतर मीराने स्वयंपाक केला. डायनींग टेबलवर सर्वांसाठी जेवणाची पानं वाढली. विराज मीराच्या हातच्या जेवणाचं भरभरून कौतुक करत होता. सर्वांची जेवणं झाली. त्यानंतर मीराने स्टोररूम मध्ये जाऊन तिने ठेवलेल्या वस्तूंचा बॉक्स बाहेर काढला आणि तो विराजला दाखवण्यासाठी तिच्या खोलीत घेवून आली. मीराने बॉक्स उघडला. इतक्यात दारावर टकटक झाली. दारात विराज उभा होता. तिने त्याला आत बोलवलं. मीरा एकेक वस्तू त्याला दाखवत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. शर्विलने दिलेली प्रत्येक भेटवस्तू तिने जपून ठेवली होती अगदी त्याने दिलेल्या पाहिल्या मोरपीसापासून सगळं होतं. प्रत्येक वस्तूशी निगडित तिची एक खास आठवण होती. तिच्या त्या आठवणी ऐकताना विराज हळवा झाला. मीराच्या पेंटिंग्स त्याला खूप आवडल्या. त्याचं कौतुक करत विराज तिला म्हणाला.,

“मीरा, आता तुला तुझे छंद जोपासायचे आहेत आणि ते करता करता तुला तुझ्या पायावर उभं राहायचं आहे. एखादा छोटा मोठा कोर्स करून तुझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तुलाच मिटवता यायला हवा. आपण लवकरच त्या विषयी ठरवू. मीरा, आता तू कसलीच काळजी करायची नाही. दुःख करायचं नाही. मान्य.. जुन्या आठवणी पुसता येत नाहीत पण आपण त्या पुसण्याचा प्रयत्न करायला हवा न.. यासाठी मी तुला मदत करेन. आता मी निघतोय. लवकरच परत येईन तेंव्हा मला तुझे नवीन पेंटिंग्स पाहायला मिळतील आणि मला हसरी मीरा पाहायला मिळेल. करशील इतकं माझ्यासाठी? देतेस वचन?”

असं म्हणून विराजने त्याचा हात पुढे केला. मीराने भरल्या डोळ्यांनी विराजच्या हातात आपला हात देत वचन दिलं. त्यानंतर विराजने सर्वांचा निरोप घेतला आणि तो कोल्हापूरला निघून गेला. दोन दिवसांनी सई आणि शर्विलने मीरासाठी जवळच्याच परिसरात भाड्याने घर पाहिलं. देवकीने मीराला लागणारी मोजकी भांडीकुंडी गॅस सिलेंडर, मोजकं किराणाचं सामान दिलं. सईने मीराच्या नव्या घरी जाऊन सर्व सामान लावून घेतलं. तिथे तिची काही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली. मीरा घर सोडून जाताना सर्वांनाच वाईट वाटत होतं पण ती एका नवीन पर्वाची नांदी होती. मीराची एखाद्या माहेरवाशिनी सारखी अवस्था झाली. राधाई बंगल्यातून तिचा पाय निघत नव्हता. तिने राजवाडे साहेब आणि देवकीला वाकून नमस्कार केला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत देवकी म्हणाली,

“मीरा, काळजी घे बेटा.. कधी काही वाटलं तर घरी येत जा.. हे तुझंच घर आहे हे कधीच विसरू नकोस..”

भरल्या डोळ्यांनी सर्वांनी तिला निरोप दिला. स्वतः शर्विल, सई तिला सोडवायला आले होते. शर्विलचा निरोप देताना पुन्हा एकदा तिचं मन त्याच्याकडे ओढ घेऊ लागलं. डोळयांत प्रेम दाटून आलं पण मीराने मोठ्या संयमाने उफाळून आलेल्या भावनांना आवर घातला. जाताना सईने तिचा हात हातात घेतला आणि पर्समधून एक छोटा बॉक्स बाहेर काढून तो मीराच्या हाती सोपवत म्हणाली.

“मीरा, हि माझ्याकडून तुझ्यासाठी छोटीशी भेट. नाही म्हणू नकोस आणि काही झालं तरी तुझ्या या मैत्रिणीला कधीही विसरू नकोस.”

सईच्या डोळयांत पाणी होतं. दोघांनी मीराचा निरोप घेतला. आता या नवीन घरात मीरा एकटी होती. तिच्या एकटीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. एका नवीन पर्वाला.. मीराने सईने दिलेला बॉक्स उघडून पाहिला. ते तिला आश्चर्याचा धक्का बसला. सईने तिच्यासाठी मोबाईल गिफ्ट केला होता. मीरा मोबाईल हातात घेऊन पाहत होती. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. एका अनोळखी नंबर वरून कॉल येत होता. मीराने कॉल घेतला.

“ हॅलो.. ”

मीरा म्हणाली आणि पलीकडून आवाज आला.



मीराला कोणाचा कॉल आला होता? कोण होती ती व्यक्ती? काय घडेल मीराच्या आयुष्यात? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)

🎭 Series Post

View all