स्पर्श भाग ३५

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..
स्पर्श..

भाग- ३५


विराजने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि हसून मीराकडे पाहिलं. मीरा कसल्यातरी विचारात गुंग होती.

“बोल आता मीरा, माझ्या या वेडेपणाला काय म्हणशील? प्रेमच ना..”

मीराची विचारांची तंद्री भंग झाली आणि तिने विराजला विचारलं.,

“तुम्ही तुमचं हे सिक्रेट मलाच का सांगितलंत? मी कशी चुकीची आहे हे दाखवून द्यायचं होतं का?”

“नाही मीरा, मी तुला सर्व सांगितलं. बिकॉज वुई आर सेलिंग इन द सेम बोट.. आपण एकाच जहाजचे सहप्रवाशी आहोत. दोघांचं दुःख थोड्या फार फरकाने सारखंच पण आपल्या दोघांची व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी.. पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा. बाकी तुला चूक ठरवण्याचा अधिकार मला नाहीच. मी तुला का चुकीचं ठरवू? आणि खरंतर तू चुकीची नाहीच मुळी. ती परिस्थिती तशी होती. परिस्थिती आपल्याला नाचवत असते आणि आपण त्याप्रमाणे वागत असतो. चल सोड तो विषय. सोडून द्यायला शिकूया. मीरा, जे घडून गेलं ते आपल्याला बदलता येणार नाही. पण पुढच्या गोष्टीं तरी ठीक होतील याकडे पाहूया ना.. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिकूया ना. मीरा, मला माहित आहे आतापर्यंत तुझ्या आयुष्यात जे घडून गेलं त्यावरून तुझा प्रत्येक नात्यावरचा विश्वास डळमळीत झाला असेल पण तू माझ्यावर थोडा विश्वास ठेवून बघ. फक्त एकदाच.. तुझ्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. तुला कधीही काही सांगावंसं वाटलं, काही शेअर करावंसं वाटलं तर तू माझ्याशी बिनधास्त बोलू शकतेस. मी कायम तुझ्या सोबत असेन एक मित्र म्हणून..”

त्याने स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड पुढे सरकवलं आणि आपला हात मीरापुढे करत विराज म्हणाला.,

“फ्रेंड्स..? आपण मित्र बनू शकतो? आवडेल तुला?”

विराजच्या प्रश्नाने मीरा गोंधळली. त्या भांबवलेल्या अवस्थेतचं तिने हात पुढे केला आणि विराजच्या मैत्रीचा स्वीकार केला. त्याने दिलेलं व्हिजिटिंग कार्ड हातात घेतलं. त्यानंतर बराच वेळ त्याने मीरासोबत गप्पा मारल्या. विचारांची देवाणघेवाण होत होती. मीरा आता त्याच्याशी सहजपणे बोलत होती. रेस्टोरंटमध्ये बराच वेळ झाला होता. मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत विराजने तिला विचारलं.,

“चल निघूया आता?बराच उशीर झालाय.”

मीराने होकरार्थी मान डोलावली. त्याने कॉफीचं बिल दिलं. आणि दोघे तिथून बाहेर पडले. मीरा आता विराजसोबत पहिल्यापेक्षा संकोच न करता मनमोकळेपणाने वागत होती. दोघेही घरी पोहचले. सई आणि शर्विल आधीच घरी पोहचले होते.

“अरे किती उशीर? जेवायचं थांबलोय आम्ही. चला फ्रेश होऊन या पटकन. लगेच वाढते मी.”

सई मीरा आणि विराजला म्हणाली. सई काही न बोलता तिच्या खोलीत गेली आणि फ्रेश होऊन बाहेर आली आणि खुर्चीत येऊन बसली. विराज तिच्या आधीच फ्रेश होऊन जागेवर आला होता. जेवायला बसला होता. सईने सर्वांसाठी जेवण वाढलं. सुधा होतीच मदतीला. सर्वजण गप्पा मारत जेवण करत होते. मीरा मात्र शांतपणे खाली मान घालून जेवत होती. मधेच एखादा कटाक्ष विराजकडे टाकत होती. विराज शर्विल सोबत चेष्टा मस्करी करत होता. मधेच सईला चिडवत होता. मीराला विराजच्या शर्विल आणि सईसोबतच्या मोकळेपणानं बोलण्याचं कौतुक वाटत होतं. अनेक विचार मनात येत होते.

“विराज इतका शांत कसा राहू शकतो? इतका नॉर्मल कसा वागू शकतो? विराजला नसेल का शर्विलचा राग येत? आपण जिच्यावर जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती आपली नाहीच? तिचं प्रेम आपल्यावर नसून दुसऱ्याच व्यक्तीवर आहे हे दुःख तो कसं पचवत असेल? की सईच्या सुखासाठी तो त्याच्या सुखाला विसरून जात असेल? तिच्या सुखात आपला आनंद शोधत असेल? मला विराजसारखं वागता येईल? सगळं सोडून देता येईल?”

मीराच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. तिला असं विचारमग्न झालेलं पाहून शर्विल म्हणाला.,

“मीरा, कसला विचार करतेय? जेव ना पटकन. जेवण झालं की आपण छान गप्पा मारत बसू.”

मीराने शर्विलकडे पाहिलं आणि नंतर विराजकडे पाहत ती म्हणाली.,

“डॉक्टर, मला घरी जायचंय. काकू माझी वाट पहात असतील. तुम्ही मला घरी सोडाल?”

“हो.. का नाही? नक्कीच सोडेन.. पण तुला अजून काही दिवस राहायचं असेल तर रहा ना.. सुरेख निसर्गाच्या कुशीत वसलेलं लोणावळा पाहून घे. आवडेल तुला. मस्त एन्जॉय कर. मग जाऊ नाशिकला.” - विराज

“नाही.. नको.. मला घरी जायचं आहे. मला देवकी काकूंची आठवण येतेय. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून मला शांत पडून राहायचं आहे. तुम्हांला सांगू.. देवकीकाकूंच्या मांडीवर नुसतं डोकं ठेवलं ना, काकूंनी नुसतं मायेने गोंजारलं ना तरी मनाला खूप शांती मिळते. हवं तर या दोघांना राहू दे. ते येतील नंतर पण आपण जाऊ.. चालेल ना?” - मीरा

“नको, आपण सगळेच घरी जाऊया. मला आणि शरूलाही क्लिनिकला जावं लागेल ना..आमचे पेशंट्स आमची वाट पाहत असतील ना.. आणि आपण पुन्हा येऊया. आईबाबांनाही सोबत आणू. विराज तूही तुझ्या आईबाबांना घेऊन ये. छान गेटटुगेदर करूया. मस्त एन्जॉय करूया. काय म्हणतोस विराज?”

सईने हसून विराजला विचारलं.

“हो, हो. नक्कीच भेटूया. मी येण्याआधी कॉल करेन शर्विलला. आता थोडा वेळ आराम करून निघूया आपण. मलाही काका काकूंशी बोलून परत कोल्हापूरला निघायचं आहे. हो, पण मीरा, तुझ्या हातचं जेवण जेवल्याशिवाय मुळीच जाणार नाही बरं.त्यामुळे माझ्या जेवणाचं तेवढं तुझ्याकडे राहिलं. जेवणाची तेवढी सोय करशील. तुझ्या हातचं जेवण म्हणजे आहाहा.. अप्रतिम.. सई, तुला मीराकडून स्वयंपाक करायला शिकायला हवं बरं..”

तीन बोटांचा मोर करून नाचवत त्याने मीराच्या पाककलेचं कौतुक केलं. मीरा लाजली.

“हो रे विराज, अगदी बरोबर बोललास. आता नं घरी गेले की मीराकडून मी वेगवेगळ्या रेसिपीज शिकणार आहे. मीराच्या सगळ्या रेसेपी मी लिहून ठेवणार आहे बघ. मीरा, शिकवशील ना मला?”

मीरा स्मितहास्य करत हो म्हणाली. सर्वजण तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते. तिला स्पेशल फील करवत होते. थोड्याच वेळात सर्वांची जेवणं आटोपली. सई आणि शर्विल आरामासाठी त्यांच्या खोलीत आले. विराजने मीराला औषध दिलं. तिच्या खोलीपाशी नेऊन सोडलं आणि तोही त्याच्या खोलीत आराम करायला गेला.

थोड्या वेळ आराम करून ते चौघेही नाशिकला जाण्यासाठी निघाले. मीराला कोणीही काहीही न सांगता मीरा विराजसोबत विराजच्या गाडीत बसली. तिचं ते नॉर्मल वागणं पाहून सर्वांना हायसं वाटलं. विराजची गाडी आता नाशिकच्या दिशेने धावू लागली. गाडीत विराज आणि मीराच्या गप्पा सुरू झाल्या. इकडे गाडीत सई आणि शर्विल दोघेही शांतच होते. सई शर्विलला म्हणाली.,

“शरू, मीराने किती सोसलं ना रे.. आयुष्यभर ती फक्त सोसत राहिली. आपल्याला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवं. तिला मानसिक आधार द्यायला हवा. तिला लवकर बरं करायला हवं.”

शर्विलने कौतुकाने सईकडे पाहिलं.

“आपल्या नवऱ्यावर एक स्त्री प्रेम करते. त्याला मिळवण्यासाठी जीवाचं रान करते तिच्याविषयी तिच्या मनात इतक्या उदात्त भावना? तुला मीराबद्दल असुया वाटत नाही? सई खरंच तू ग्रेट आहेस.”

“कारण शरू, मी एक स्त्री आहे आणि एक डॉक्टर सुद्धा. एक डॉक्टर म्हणून मीराला या आजारातून मुक्त करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या सुखाआधी एक डॉक्टर म्हणून आपल्याला आधी मीराच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे.”

सईने त्याच्याकडे पाहून उत्तर दिलं. शर्विलने मान डोलावली. आता गाडीने वेग धरला. ते सर्वजण नाशिकला घरी पोहचले. घरी पोहचताच मीरा धावतच आत आली. समोर बसलेल्या देवकीच्या गळ्यात पडून रडू लागली. कोण जाणे आपल्या कर्माची माफी मागत असावी. देवकीला काहीच कळत नव्हतं. तिने शर्विलकडे गोंधळलेल्या नजरेने पाहिलं. शर्विलने डोळ्यांनीच तिला शांत राहायला सांगितलं. देवकी मीराच्या डोक्यावरून हात फिरवत होती. तिच्याही डोळयांत पाणी आलं. लोणावळ्याला निघताना देवकीच्या मनात मीराबद्दल राग होता. चीड होती तो आता संपूर्णपणे निवळला होता. आता मात्र देवकीच्या मनात मीराबद्दल फक्त प्रेम दिसत होतं कारण आज देवकीला तिची तीच पूर्वीची निरागस मीरा भेटली होती. राजवाडे साहेब मात्र नेहमीप्रमाणे तिच्याकडे तुच्छतेने पाहत होते.

विराज पुढे आला आणि म्हणाला.,

“मीरा, शांत हो. जा.. तुझ्या खोलीत जाऊन थोडा आराम कर. मग तुला स्वयंपाक बनवायचा आहे ना. मी तुझ्या हातचं जेवण जेवल्याशिवाय जाणारच नाही.”

मीराने मान डोलावली आणि निमूटपणे जागेवरून उठून शहाण्या बाळासारखं तिच्या खोलीत गेली. आता हॉलमध्ये राजवाडे साहेब, देवकी, सई शर्विल आणि विराज होता. विराजने बोलायला सुरुवात केली.

“काका, काकू मीराला लोणावळ्याला घेऊन जाण्याचा प्लॅन माझाच होता. मीराविषयी शर्विलने मला याआधी सांगितलं होतं. मीराचं एकंदरीत वागणं थोडं विचित्र वाटलं. हि एक सायकोलॉजिकल केस असावी असा माझा अंदाज होता म्हणून मग मी मीराला माझे डॉक्टर मित्र स्वप्नील यांच्या क्लिनिकमध्ये घेऊन आलो. डॉक्टर स्वप्नील हे मानसोपचारतज्ज्ञ आहेत. तिथे गेल्यानंतर आम्हांला बऱ्याच गोष्टीं समजल्या आणि माझी शंका खरी ठरली. मीरा मनोरुग्ण आहे. मीराला मानसोपचाराची खूप गरज आहे.”

राजवाडे साहेब आणि देवकी आश्चर्याने विराजकडे पाहू लागले. देवकीच्या मनात संभ्रम दाटला होता. मग विराजने तिथे घडलेल्या सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याच्या मोबाईलमध्ये डॉक्टर स्वप्नील यांनी पाठवलेलं रेकॉर्डिंग सर्वांना ऐकवलं. ते ऐकताना पुन्हा सर्वांच्या डोळयांत पाणी आलं. देवकीने रागाने राजवाडे साहेबांकडे पाहिलं. तिच्या नजरेत मीरासोबत वागलेल्या कृत्याबद्दल जाब होता. शर्विल, सई सुद्धा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. प्रत्येकाच्या नजरेत त्यांच्याबद्दल प्रश्न होते. राग होता. स्वतःच्याच बायकोच्या आणि मुलांच्या नजरेत आपण पडलो या विचारांनी राजवाडे साहेब खजिल झाले. शरमेने ते खाली मान घालून बसले.

तिकडे मीरा तिच्या खोलीत गेली. थोडा वेळ झोपल्यानंतर तिला फ्रेश वाटू लागलं. तिला विराजसाठी रात्रीचा स्वयंपाक करण्याची आठवण झाली. ती पटकन फ्रेश होऊन तिच्या खोलीच्या बाहेर आली. हॉलमध्ये बसलेल्या देवकीला आवाज देणार इतक्यात तिच्या कानावर विराजचे शब्द पडले.

“मीराला उपचारासोबत आपल्या सर्वांच्या मानसिक आधाराचीही खूप गरज आहे. तिला या आजारातून आपल्याला पूर्णपणे बरं करायचं आहे. जे झालं त्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हां सर्वांना सांगायची आहे की मीरावर सरोगसीची प्रक्रिया करता येणार नाही. मीरा पूर्णपणे निरोगी नाही.”

“खरंय तुझं.. मीराने खूप सोसलंय. आता मला तिला अजून दुःख द्यायचं नाही. सरोगेट मदरची कल्पना विराजने बाबांच्या हट्टापायी आपल्याला सुचवली होती. आता मी कोणाचंच ऐकणार नाही. मी एखाद्या अनाथाश्रमातून मुल दत्तक घेईन किंवा दुसऱ्या सरोगेट मदरचा विचार करेन पण मी अजून मीराला दुःखाच्या खाईत लोटणार नाही.”

शर्विलच्या डोळयांत पाणी आलं. मीरा शर्विलच्या बोलण्याने हेलावून गेली. शर्विलच्या मनातला स्नेह तिला जाणवत होता. मीरा त्यांच्याजवळ आली. तिला समोर पाहताच देवकीला भरून आलं. दोन्ही हात पसरून तिने मीराला जवळ बोलावलं. मीरा तिच्याजवळ आली.

“माझं बाळ..”

असं म्हणत देवकीने तिला कुशीत घेतलं. डोक्यावरून हात फिरवत मीराला गोंजारत असताना डोक्यावर तिच्या अश्रुंचा अभिषेक होतं होता. मीरा तिच्या कुशीतून उठत विराजकडे पाहून म्हणाली.,

“डॉक्टर, तुम्ही माझ्या सारख्या नोकर माणसांचा विचार करताय हेच खूप आहे. या घराने मला खूप प्रेम दिलं. आधार दिला. पण मी त्यांच्याशी चुकीचं वागले. प्लिज मला माफ करा. पण डॉक्टर, शरू विषयी असलेल्या भावना इतक्या लवकर कश्या पुसल्या जातील? त्यासाठी मला स्वतःला थोडा तरी वेळ द्यावा लागेल ना? मला माहित आहे शरू माझा कधीच होऊ शकत नाही मग निदान त्याचा अंश तरी मला माझ्या उदरात वाढवण्याचं भाग्य द्या. त्या निमित्तानं तरी त्याचा अंश मला स्पर्श करेल. ते स्पर्शसूख तरी मला मिळू द्या. मी लवकरच बरी होईन. मला पुन्हा एकदा आई व्हायचं आहे.”

तिचे ते शब्द ऐकून सई एकदम सद्गदित झाली. धावत येऊन तिने मीराला घट्ट मिठी मारली. शर्विलने तिच्याकडे पाहून कृतज्ञपणे हात जोडले. विराजही खूप भावुक झाला. सईची मिठी सोडवत मीरा पुढे म्हणाली.,

“डॉक्टर, आता मला इथे राहायचं नाही. तुमच्या बाकीच्या प्रक्रियेला मी येईन. माझ्या उपचारासाठीही मी येईन पण आता इथे नको. पुन्हा माझ्या मनात सई विषयी असुया निर्माण होईल. शरू विषयी प्रेमभावना उफाळून येईल. प्लिज डॉक्टर, मला जाऊ द्या.”

मीरा धाय मोकलून रडू लागली. सई तिला कुशीत घेऊन गोंजारत होती.

“नाही.. हे शक्य नाही. तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही. मी तुला जाऊ देणार नाही. मीरा तू जर हे घर सोडून निघून गेलीस तर मी समजेन तू माझ्यावर रागवून जात आहेस. नको असं करू मीरा, मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.”

शर्विल काकूळतीला येऊन बोलत होता. देवकीचेही डोळे झरू लागले.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)

🎭 Series Post

View all