स्पर्श भाग ३३

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..



स्पर्श..

भाग- ३३


मीरा आरामखुर्चीत टेकून बसली. मन अजूनही स्थिर नव्हतं. एका वेगळ्या प्रक्रियेतून ती जात होती. हृदयात धडधड सुरू होती. डॉक्टर स्वप्नील यांनी शांत सौम्य आवाजात बोलायला सुरुवात केली.

“मीरा, आधी तुझं शरीर सैल सोड आणि मन एकाग्र कर. आता या पेंड्युलमवर लक्ष केंद्रित कर. तुला हळूहळू आराम वाटू लागेल. डोळे बंद होतील. आणि तुला तुझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी आठवतील. त्यावर मी तुला काही प्रश्न विचारेन त्याची उत्तरं देत जा.. बस्स! बाकी काही नाही. तुला यानंतर खूप रिलॅक्स वाटेल. ठीक आहे? रेडी?”

मीराने होकारार्थी मान हलवत पेंड्युलमवर लक्ष केंद्रित केलं. तिचे डोळे हळूहळू झाकले जाऊ लागले. आता तिला आजूबाजूला काहीच जाणवत नव्हतं. फक्त डॉक्टर स्वप्निल यांचा आवाज ऐकू येत होता.

“मीरा.. आता मला जरा आठवून सांग, काल रात्री तू कुठे होतीस? आणि तिथे काय झालं?”

मीराच्या कपाळावर एक हलकीशी आठी पडली. हळू आवाजात ती बोलू लागली.

“मी शरूच्या खोलीत आहे. नवरी सारखी नटलीय. मी छान दिसतेय. शरू आत आला. तो खूप छान दिसतो. आवडतो मला. मी त्याला घट्ट मिठी मारली. पण.. पण.. त्याच्या डोळ्यांत माझ्याबद्दल प्रेम नाही. त्याचा तो स्पर्श अनोळखी.. मला हवा होता तसा नाही. कोरडा स्पर्श.. त्याचं माझ्यावर प्रेम नाही. त्याचं सईवर प्रेम आहे. सई चांगली आहे. माझी मैत्रीण आहे पण मला सईचा खूप राग येतोय.”- मीरा

“आणि सईचा राग का येतोय तुला मीरा?” - डॉक्टर स्वप्नील

“ती शरूच्या खूप जवळ असते. त्याच्या मिठीत. शरूचं प्रेम आहे तिच्यावर. तो तिला स्पर्श करतो. तिला किस करतो. मला नाही आवडत. तो माझा आहे फक्त माझा.”

मीराचा आवाज बदलला. गळा भरून आला. डॉक्टर स्वप्नील यांनी पुढे विचारलं.

“ओके.. बरं मीरा, गेल्या आठवड्यात काय झालं? तू काय करतेय आता?”

“मी सुधाकर काका आणि देवकी काकूंच्या खोलीबाहेर आडोश्याला उभी आहे. सुधाकर काकांना मी आवडत नाही. ते माझा राग राग करतात. त्यांनी माझी लायकी काढली. माझा फक्त उपयोग करायचा आहे त्यांना.. वारस हवाय फक्त त्यांना. काकांनी मुद्दाम शरूला बाहेरगावी शिकायला पाठवलं होतं.. शरूला माझ्यापासून दूर केलं. त्यांनी कट केला. काका माझ्याशी वाईट वागतात. मला मोलकरीण म्हणून हिणवतात. त्यांनी मुद्दाम शरूला लांब ठेवलं. मी खूप रडले.”

मीराच्या बंद डोळ्यातूनही पाणी वाहू लागलं. कोपऱ्यात उभे असलेले सई शर्विल आणि विराज सगळं पाहत होते.

“मीरा.. दोन महिन्यांपूर्वी तू काय करतेय? कुठे आहेस तू? - डॉक्टर स्वप्नील.

“मी शरूच्या खोलीत आहे. शरूने माझा हात पकडला आणि म्हणाला माझ्या बाळाची आई होशील? मला खूप आनंद झाला आणि त्याच आनंदात मी काही न बोलता तिथून निघून गेले. मला खरंच वाटत नाहीये की तो माझ्याशी लग्न करणार आहे. माझं स्वप्नं पूर्ण होणार आहे.”

हे सांगत असताना मीराचा चेहरा खुलला होता. ती लाजत होती. डॉक्टर स्वप्नील सूक्ष्म निरीक्षण करत होते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होते.

“मीरा, आता सांग गेल्या एक वर्षभरापूर्वी तू काय करतेय? कोण आहे तुझ्या सोबत?” - डॉक्टर स्वप्नील

“माझा शरू, माझ्या आयुष्यात परत आलाय. अपघातानंतर तो माझी किती काळजी घेतोय.. पूर्वीचा शरू परत मिळालाय मला.. मला खूप आवडू लागलाय. त्याचा स्पर्श हवाहवासा वाटतोय. त्याच्या स्पर्श सुखाची मनाला ओढ लागलीय. मला त्याला स्पर्श करायचा आहे. त्याला सर्वस्वी माझं बनवायचं आहे. मनाने.. शरीराने.. मी त्याच्या खोलीत आहे. त्याच्या पलंगावर त्याच्या छातीवर डोकं ठेवलंय. मी त्याच्या अंगावरून हात फिरवतेय. माझा श्वासांचा वेग वाढलाय. मी त्याला किस करणार पण इतक्यात तो जागा झाला. शरूला माझं जवळ येणं नाही आवडलं. तो माझ्यावर खूप चिडला. मला म्हणाला,

“माझं तुझ्यावर प्रेम नाही. माझं फक्त सईवर प्रेम आहे. तू निघून जा इथून.

“त्याने मला त्याच्या खोलीतून हाकलून दिलं. मला.. त्याच्या जिवलग मैत्रिणीला.. त्याचं माझ्यावर प्रेम आहे पण तो खोटं बोलतोय. शरू असं का करतोय मला कळत नाही. आता तो रोजच माझ्यावर सारखा चिडतोय. त्याला सई आवडते. मला सईचा खूप राग येतो. ती माझ्या आणि शरूच्या मध्ये आली. तिने माझं प्रेम हिरावून घेतलं. काका काकू पण सारखं तिचंच कौतुक करतात. तिने माझी जागा घेतली. शरूवर फक्त माझा अधिकार होता पण तिने तो अधिकार हिरावून घेतला. तिच्यामुळे शरू माझा राग राग करतोय. तू जा सई.. माझा शरू माझा आहे.. फक्त माझा..”

मीराच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. हातांच्या मुठी आवळल्या जाऊ लागल्या.

“हं.. बरं मीरा, आता तू वीस वर्षाची आहेस. आता तू कुठे आहेस? काय करतेयस?” - डॉक्टर स्वप्नील

“मी ट्रकमध्ये बसलेय. माझ्या पिल्लूला दूध पाजता पाजता मला झोप लागली. तो माझ्या गालाला स्पर्श करतोय. घाणेरडा किळसवाणा स्पर्श. त्याचा हात माझ्या.. माझ्या.. मांडीवर.. पुढे पुढे सरकतोय. मी जागी झाली.. त्याला ढकलून गाडीतून उडी मारली आणि धावत सुटले. समोरून गाडी आली.. आणि माझं बा..ळ.. ”

मीराने जोराची किंकाळी फोडली. आणि ती रडू लागली. तिचे बंद डोळे पाझरू लागले. डॉक्टरांनी पुन्हा मीराला शांत करत विचारलं,

“मीरा.. बघ आता तू अठरा एकोणीस वर्षाची आहेस. म्हणजे साधारण वर्ष दीड वर्षांपूर्वी काय करतेय तू? कुठे आहेस तू?”

“आज माझं लग्न आहे. माझ्या आईसाठी, तिच्या वचनासाठी मी त्याच्याशी लग्नाला तयार झाले पण मला त्याची लग्न करायचं नाहीये. मला शरूशी लग्न करायचं आहे. मला रोज त्याचीच स्वप्नं पडतात. त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाची नाही होऊ शकत. मला सर्वस्वी शरूचं व्हायचंय. मी खूप वाट पहिली त्याची. तो परतून येणार होता. त्याने मला वचन दिलं होतं पण शरू आला नाही. मी खूप रडले. असं का केलं शरूने? शरू.. ये ना रे..”

मीरा बोलता बोलता थांबली. एक आवंढा गिळला. डोळ्यांचं वाहणं सुरूच होतं.

“पुढे काय झालं मीरा.? तुझं लग्न झाल्यानंतर पुढे काय झालं?”

डॉक्टर स्वप्नीलने विचारलं.

“मी लग्न करून नागपूरला आलेय. मी माझ्या खोलीत माझ्या नवऱ्याची वाट पाहत बसलेय. खूप रात्र झालीय. मला खूप झोप येतेय. आता तो जोरजोरात दार वाजवतोय. मी दार उघडलं. तो दारू पिऊन आलाय. त्या वासाने मला खूप मळमळतंय. त्याने माझ्या दंडाला धरून मला ओढत पलंगावर ढकलून दिलं आणि माझ्या अंगावर धाडकन कोसळला. त्याने माझा ब्लॉउज फाडला. त्याचा तो स्पर्श घाणेरडा, किळसवाणा.. मी त्याला खूप विरोध केला. त्याने माझ्या मुस्काटात जोरात वाजवली. मी रडतेय. नको.. नको.. त्याने सारं काही ओरबाडून घेतलं. माझ्या बांगडया फुटल्या. हातातून रक्त येतंय. तो काय करतोय मला काहीच कळत नाहीये पण मला खूप दुखतंय.. त्रास होतोय.. नंतर तो रोज तेच करायला लागला.. माझ्या शरीराचा रोज चोळामोळा होतोय.. मला आवडत नाही. तो मला रोज मारतो. सासूपण सारखी रागावते. टाकून बोलते. मला आईची, काकूंची खूप आठवण येतेय.. आई.. आई..”

मीराच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती. शर्विलच्या ओढीने जो भूतकाळ ती विसरली होती तो सर्व आता ती एकप्रकारे पुन्हा अनुभवत होती. ती पुढे सांगू लागली.

“आई मला सोडून गेली. आई खूप आजारी आहे. बाबा खूप त्रास देतात. डॉक्टरांनी मला तिची काळजी घ्यायला सांगितली पण आई मला सोडून गेली. देवकी काकूंकडे मला सोपवून गेली. मला आईची खूप आठवण येते. तिचा मायेचा स्पर्श मला आठवतोय. आई, तू मला का सोडून गेलीस?”

मीरा रडू लागली. डॉक्टर स्वप्नील यांनी पुन्हा मीराला विचारलं.

“मीरा, तू आता पंधरा वर्षाची आहेस. आता तू कुठे आहेस?”

मीरा अस्वस्थ झाली. बंद पापण्यातूनही अश्रू वाहत होते.

“मी इथे बंगल्याच्या बाहेर आहे. शरू शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात चालला आहे. राजवाडे काकांनी मुद्दाम त्याला दुसरीकडे शिकायला पाठवलं. माझ्यापासून दूर केलं. तो कारमध्ये बसलाय. मी धावत अंगणात गेले. मोगऱ्याची फुलं तोडून आणली. तो जाताना त्याच्या ओंजळीत दिली. शरू खूप खुश झाला. जाताना त्याच्या डोळयांत पाणी आलं. त्याने माझा हात हातात घेतला होता. तो परत येईल असं म्हणाला. शरू, मी वाट पाहतेय तुझी.. लवकर ये..”

डॉक्टर स्वप्नील मीराला प्रश्न विचारत होते. तिच्या मनाची अवस्था टिपून घेत होते. ते खूप सौम्य स्वरात बोलत होते. त्या त्यांच्या शांत लाघवी बोलण्याने मीरा सर्व सांगत होती. मोकळी होत होती. डॉक्टर स्वप्नील यांनी हळुवारपणे मीराला विचारलं,

“मीरा, आता तेरा वर्षाची आहेस. आता तू काय करतेय?”

“आज शरू मला भेळ खायला ‘हॉटेल अमृतभेळ’ मध्ये घेऊन आलाय. तिथे ओली भेळ खूप छान असते. शरू दहावीत संपूर्ण नाशिक शहरात दुसरा आला. काकांनी खूप मोठी पार्टी दिली. खूप लोकं आली होती. मग शरूने मला भेळ पार्टी दिली. भेळ खाताना मला ठसका लागला. शरूने मला पाणी पाजलं. बराच वेळ तो माझ्या पाठीवरून हात फिरवत होता. किती घाई करतेस म्हणून मला रागावला. त्याचं असं रागवणं आवडलं मला. पाठीवर फिरणारा त्याचा मायेचा स्पर्श छान वाटला. तसा स्पर्श मला कोणत्याच पुरुषाकडून व्यक्ती कडून मिळाला नाही अगदी माझ्या बाबांनीही नाही कधी पाठीवरून हात फिरवला. नेहमी रागवायचे. मला मारायचे. आईला पण ते खूप मारायचे.”

बाजूला उभे असलेले शर्विल आणि सई एकमेकांना पाहू लागले. शर्विलचे डोळे भरून आले होते. सईने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत त्याला शांत केलं. डॉ. स्वप्नील पुढे विचारू लागले.

“बरं मीरा, आता तू दहा वर्षाची आहेस. आता काय दिसतंय तुला?”

मीरा आठवू लागली. भाळावरच्या आठ्या कमी झाल्या. चेहरा खुलला आणि खुदकन हसत ती सांगू लागली.

“बंगल्याच्या अंगणात भातुकलीचा खेळ सुरू आहे. शरू नवरा झालाय आणि मी नवरी. दोघांच्या हातात बाहुला बाहुली आहेत. संकेत आणि मन्याने आमच्या दोघांत अंतरपाट धरलाय. माधव पुजारी झालाय. त्याने शुभमंगल सावधान म्हटलं मग सर्वांनी आमच्यावर अक्षता टाकल्या. सुमू माझी सासू झाली आणि सागर माझा सासरा झाला. मग मी लाजत लाजत उखाण्यात शरूचं नाव घेतलं.. आमच्या दोघांची वरात निघालीय. सगळे हातात असलेले डबे, डफली वाजवत निघालो. काही मित्र मैत्रिणी वरातीत नाचत आहेत. आम्ही आमच्या अंगणातल्या छोट्या घरात माप ओलांडून गृहप्रवेश केलाय. आम्ही सगळे खूप आनंदी आहोत. मग त्या भातुकलीच्या खेळात मला आणि शरूला बाळ झालं. आम्ही आई बाबा झालो. शरू बाळाचे खूप लाड करतोय. मी बाळाला अंगाई गाऊन जोजवतेय..”

“मीरा, आता तू पाच वर्षाची आहेस. तुला काही आठवत आहे का? कोण आहे तुझ्या सोबत..?"

“शरू, जिन्यावरून खाली उतरतोय त्याच्या हातात मोरपीस आहे. त्याच्याकडे पाहून मला खूप आनंद झालाय. तो माझा श्रीकृष्ण आहे. मी त्याच्याकडे धावत चालले होते पण माझा पाय अडकला आणि मी पडले. गुडघ्याला लागलं. रक्त आलं. मी रडत होते. शरू माझ्याकडे धावत आला त्याने मला मोरपीस दिलं. चॉकलेट दिलं. पाणी पाजलं. आई म्हणाली की, ज्यांना कोणी मित्र नाही त्याचा श्रीकृष्ण मित्र आहे. तो कोणत्याही रूपात येतो. आपल्याला मदत करतो. शरूने मला मदत केली. जखमेला मलम लावलं. फुंकर मारली. आई म्हणाली शरू माझा मित्र आहे. पण तो तर माझा कृष्ण आहे. तो मला कधीच सोडून जाणार नाही. आईला पण सांगितलं मी की तो कायम माझ्यासोबत राहील. मी पण कधीच शरूला दूर जाऊ देणार नाही. शरू माझा श्रीरंग आहे. माझा प्राण आहे.”

“मीरा, अजून काय आठवतंय तुला? अजून कोण आहे तिथे?” - डॉक्टर स्वप्नील

“देवकी काकू, आई आहे. दोघी माझ्यावर खूप माया करतात. काकू मला खाऊ देतात. चांगले कपडे देतात. त्या खूप चांगल्या आहेत. काकांना मी आवडत नाही. ते मला शरूसोबत खेळू देत नाहीत. माझा राग राग करतात. मी आणि शरू त्याच्या खोलीत बुद्धिबळ खेळतोय. ते आत आले आणि जोरात माझ्या गालावर चापट मारली आणि दंडाला धरून खोलीच्या बाहेर काढलं. शरू काकांना खूप घाबरतो. मला मारताना पाहून शरू रडू लागला. मी पण रडतेय. ”

मीरा तिच्या सुप्त मनातलं सगळं सत्य सांगत होती. वयाच्या प्रत्येक वळणावर तिला शर्विलच्या होणाऱ्या स्पर्शाची जाणीव होत होती आणि ती तिच्या परीने त्याचे अर्थ काढत होती. तिचं संपूर्ण आयुष्य फक्त शर्विलभोवती फिरत राहिलं. शर्विलविषयी असलेली ओढ दिवसेंदिवस तीव्र होत गेली. डॉक्टर स्वप्नील मीराचं नीट निरीक्षण करत होते. आतापर्यंत मीराने जे जे सांगितलं ते सर्व मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं.

“मीरा, आता आपल्याला पुन्हा वर्तमानात यायचं आहे हां.. आता तू दहा.. पंधरा.. सोळा.. वीस बावीस वर्षाची आहेस. आता मीरा तू शांतपणे हळुहळू तुझे डोळे उघडशील. शांत.. एकदम सावकाश.."

डॉक्टर स्वप्नील मीराला पुन्हा पूर्वपदावर आणत होते. मीरा झोपेतून जागी होऊ लागली. मीराने हळूहळू डोळे उघडले. खूप गाढ झोपेतून जागी झाल्यासारखी ताजीतवानी वाटत होती.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all