स्पर्श भाग ३२

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..


स्पर्श..

भाग- ३२


अरमाँ दिल के उन्हे हम बता न सके
अल्फाज दिल के उन्हे हम सुना न सके
युही घुट-घुट कर जिते रहे उम्र भर
भरोसा प्यार का उन्हे हम दिला न सके

मीरा जड अंतःकरणाने हॉल मध्ये येऊन बसली. डोळयांतून पाणी वाहत होतं. मन अगदी सुन्न झालं होतं.

“काय चुकलं माझं? कळत्या वयापासून फक्त आणि फक्त शरूवर प्रेम केलं.. अगदी जीवापाड प्रेम केलं. इतका जीव लावला. प्रत्येक श्वासात, माझ्या रोमारोमात तोच सामावलेला होता. नेहमी त्याचाच ध्यास. प्रेम केलं होतं मी. पण त्याने काय केलं? सोडून गेला मला एकटीला टाकून. सईच्या प्रेमात आंधळा झाला. त्याचं माझ्यावर प्रेम नाही. का श्रीरंगा..? माझ्या श्वासात तर कायम त्याच्याच नावाचा जल्लोष होता. त्याच्याच भेटीचा ध्यास होता. मग का माझा शरू इतका बदलला? का माझ्याविषयी त्याच्या मनात इतका द्वेष, तिरस्कार भरला.? जेव्हा मी त्याच्या प्रेमात स्वतःला विसरून जात होते तेव्हा तिकडे माझा शरू माझ्यापासून दूर जात होता माझ्याही नकळत.. कधी आणि कसं घडलं? आणि का? विरहाच्या अग्नीदाहात संपूर्ण आयुष्य जाळूनही मला काय मिळालं रे देवा? उपेक्षा? अवहेलना? तिरस्कार? का श्रीरंगा.. का?”

मीराच्या मनात प्रश्नांची शृंखला फेर धरू लागली. संपूर्ण राजवाडे कुटुंबातील प्रत्येक सदस्याविषयी तिच्या मनात फक्त चीड होती. पण आता तर स्वतःचीच कीव येत होती तिला. हताश होऊन मीरा विचार करत करत हॉल मध्येच सोफ्यावर आसवं गाळत पडून राहिली. रात्री उशिरा केव्हातरी तिला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सई झोपेतून जागी झाली. तिच्या शेजारी शर्विल शांतपणे झोपला होता. त्याचा तो शांत निरागस चेहरा पाहून सईच्या मनात त्याच्याबद्दल अजूनच प्रेम दाटून आलं. तिने हळुवारपणे त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि त्याच्या भाळावर अलगद तिचे ओठ टेकवले. त्या प्रेमळ स्पर्शाने शर्विलची झोप चाळवली. अर्धवट मिटल्या डोळ्यांनी त्याने सईकडे पाहिलं आणि तिचा हात हातात घेऊन तिला जवळ ओढलं.

“आं.. सोड ना शरू, सकाळ झालीय. मला आवरून घेऊ दे पटकन.. कोणीतरी येईल ना.. पागल..”

स्वतःची सुटका करून घेताना लटक्या रागाने तोंड वेडावत सई म्हणाली.

“अरे.. माझ्या लग्नाच्या बायकोचा हात पकडलाय मी.. मला काय कोणाची भीती आहे का?”

मिठी अजून घट्ट करत शर्विल मिश्किलपणे म्हणाला. इतक्यात दरवाज्यावर टकटक झाली. कुणीतरी आलं होतं दारापाशी.

“आता आणि कोण कडमडलं मधेच? जरा लाडात येऊ देत नाही कुणी आम्हाला.."

रंगात आलेला शर्विल उगीच त्रासिकपणे म्हणाला.

“अरे सोड ना.. कोण आलंय ते तरी बघू देत. थांब ना.. बेशरम.. बघू देत.. सोड मला..”

असं म्हणत कशीबशी शर्विलच्या मिठीतून सुटका करून घेत सई दार उघडण्यासाठी बेडवरून खाली उतरली. दरवाजा उघडला. समोर सुधा कॉफी घेऊन उभी होती.

“गुड मॉर्निंग बाईसाहेब, कॉफी आणलीय. आणि तुम्हाला भेटायला बाहेर कोणी डॉक्टर विराज म्हणून आलेत. त्यांच्यासोबत अजून एक कोणीतरी साहेब आहेत.”

सुधाने बोलता बोलता कॉफीचा ट्रे टेबलवर ठेवला.

“काय..? विराज? इतक्या सकाळी..? शरू.. उठ लवकर.. विराज आलाय.. सुधा त्यांच्या नाश्त्याचं बघ पटकन.. मी आलेच.”

सुधाने मान डोलावली आणि खोलीच्या बाहेर पडली. विराजचं नाव ऐकताच शर्विल खाडकन झोपेतून जागा झाला आणि बिछान्यातून उठून बसला. सई पटकन बाथरूममध्ये गेली. आवरून बाहेर हॉलमध्ये आली.

“अरे विराज तू? असा अचानक.."

विराजने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवत तिला शांत बसायला सांगितलं. थोडं बाजूला येऊन विराज म्हणाला.

“थोडं हळू आवाजात बोल. मीरा बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपलीय. तुझ्या आवाजाने जाग येईल तिला. चल तुझ्या खोलीत जाऊन बोलू..”

असं म्हणून विराजने त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तीला हातवारे करून जवळ बोलावलं आणि ते तिघेजण शर्विलच्या खोलीत आले. शर्विल उठून उभा राहिला. त्याने विराज आणि त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तीला बसायला सांगितलं.

“काय चाललंय तुमचं? मला कळेल का? ”

सईने विराजला प्रश्न केला.

“सई, मी तुला ओळख करून देतो. हे डॉक्टर स्वप्नील खानविलकर. माझे सहयोगी मित्र आणि एक उत्तम मानसोपचारतज्ज्ञ आहेत. आणि डॉक्टर स्वप्नील, हे आहेत डॉक्टर शर्विल आणि डॉ. सई राजवाडे.. बरं का, हे दोघेही नाशिकमधले सुप्रसिद्ध डॉक्टर्स आहेत. आणि त्याआधी माझे खूप खास मित्र. सई, माझं आणि शर्विलचं दोन दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. शर्विल तू इथे सईला सविस्तर सांग. तोपर्यंत मी मीराकडे पाहतो. असं म्हणून विराज त्यांच्या खोलीच्या बाहेर आला. मीरा बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपली होती. हळूहळू तिला जाग येऊ लागली होती. तिने डोळे उघडले. समोर विराजला पाहून ती पटकन उठून बसली.

“अरे, डॉक्टर तुम्ही? इथे असे अचानक? शर्विलला भेटायला आला आहात का? आत आहे तो. थांबा मी त्याला सांगते हं.”

असं म्हणत मीरा सोफ्यावरून उठू लागली.

“थांब मीरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी..”

विराजचे शब्द ऐकताच मीरा जागीच बसून राहिली. खरंतर तिची चुळबुळ सुरू झाली होती. सोफ्यावर बसून ती पाय हलवत होती. सैरभैर झालेले तिचे डोळे तिची अस्वस्थता स्पष्टपणे अधोरेखित करत होते. एक विचित्र बैचेनी तिच्या वागण्यात, बोलण्यात दिसत होती. मीरा नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती. काही घडलंच नाही असं दाखवण्याचा तिचा अट्टहास सुरू होता. विराज तिचं बारकाईने निरीक्षण करत होता.

“मीरा, मला तुझ्याशीच का बोलायच आहे? हा प्रश्न तुला पडला असेल. तुझ्या मनातलं वादळ मला ठाऊक आहे. तुझ्या सैरभैर डोळ्यांतले भिरभिरणारे भाव मी जाणतो. तुझ्या आणि शर्विलच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मला माहित आहे. शर्विलने मला सगळं सांगितलं आहे. त्यामुळे तू माझ्याशी स्पष्टपणे बोलू शकतेस. आणि तुझ्या बोलण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. एक मित्र म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. माझ्यावर विश्वास ठेव..”

विराजचं बोलणं मध्येच थांबवून मीरा म्हणाली.,

“नका बोलू मित्र म्हणून. मित्र या शब्दावरूनच माझा विश्वास उडाला आहे. आधीच एक मित्र म्हणून आयुष्यात आला आणि माझं आयुष्यच बनला. पण आज तोच मित्र माझा अव्हेर करतोय. माझ्या प्रेमाला नाकारतोय..”

मीरा डोळ्यांत पाणी आणून म्हणाली. मीराला रडू येत होतं. विराजला शर्विलने याची पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे मीरा उद्विग्न होईल याची विराजला आधीच कल्पना होती. तिला रडताना पाहून त्यालाही वाईट वाटत होतं.

“पण ते प्रेम होतं हेच मुळी सत्य नाही. तुझ्या मनात फक्त एक कृष्ण नावाची संवेदना वाहत होती. ते सारे तुझ्या मनाचे खेळ होते. ते कधीच प्रेम नव्हतं.”- विराज

“काय बोलताय तुम्ही? माझ्या कळत्या वयापासून मी फक्त शरूवर प्रेम केलं. ते माझं प्रेम नव्हतं? प्रत्येक क्षणी मी त्याचाच ध्यास घेतला. त्याच्याच आभासात मी जगत आले. तोच माझ्या रोमारोमात वाहत होता. प्रत्येक ठिकाणी त्याचाच वास होता. माझ्या श्वासांनी कायम त्याच्याच नावाचा जल्लोष केला. ते माझं प्रेम नव्हतं? तर मग काय होतं? का मी इतकी आतुर होतेय? का त्याच्याशिवाय जगता येत नाही? प्लिज डॉक्टर सांगा मला.”

मीराला आगतिक झालेलं पाहून खरंतर विराज हळवा झाला. पण त्याच्यातला डॉक्टर त्याला हळवा होण्याची परवानगी देत नव्हता. तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला,

“हो मीरा, ते तुझं प्रेम नव्हतं. तो एक निव्वळ आभास होता. आणि हे मी सिद्ध करून दाखवू शकतो.”

“ हो का? मग तुम्हीच सांगा ते कसं प्रेम नव्हतं.?”

मीरा हुंडके देऊन रडू लागली. विराज तिच्या मनाचा अंदाज घेत बोलू लागला.

“मीरा, तुझं शर्विलवर प्रेम आहे हे फक्त तुझ्या मनाचे खेळ होते. सगळं मानसिक होतं. हे मी सिद्ध करू शकतो.”

त्याने डॉक्टर स्वप्नीलला आवाज दिला. डॉक्टर स्वप्नील बाहेर आले. शर्विल आणि सईसुद्धा त्यांच्या पाठोपाठ बाहेर हॉलमध्ये आले. सईला समोर पाहून मीराचा राग पुन्हा उफाळून आला पण शर्विलला पाहताच ती हळवी झाली. डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. केविलवाण्या नजरेनं तिने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यांत अपराधी भाव उभे राहिले होते.

“मीरा हे माझे डॉक्टर मित्र आहेत. ते हे सिद्ध करतील की तुझं शर्विलवर प्रेम नव्हतं. तो तुझा केवळ भास होता.” - विराज

“नाही.. तो माझा भास नव्हता. माझं शर्विलवर प्रेम होतं,आहे आणि राहील. कोणत्याही डॉक्टर किंवा इतर कुणापुढे हे सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही.”- मीरा

“पण मला आहे. तुझं प्रेम नव्हतं हे सिद्ध झाल्या खेरीज तुझा त्रास कमी होणार नाही. उगीच जीवाला होणाऱ्या यातना कमी होणार नाहीत. तुझं हे वाटणं मानसिक आहे. त्या तूझ्या मानसिक आजारावर उपचार करण्याची गरज आहे आणि डॉक्टर स्वप्नील ते काम नक्की करतील.” - विराज

“काय बोलताय डॉक्टर तुम्ही? मला काय वेड लागलंय..? मी वेडी आहे का? जे माझ्यावर उपचार करण्यासाठी हे डॉक्टर बोलाव….”

तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विराज मीराला म्हणाला.

“नाही मीरा, असं काही नाही. जसं शरीराचे आजार बरे करण्यासाठी औषधोपचार करावे लागतात तसंच मनालाही ट्रीटमेंटची गरज आहे. जसं शरीर आजारी पडतं तसं मनही आजारी पडू शकतं ना.. आणि दुसरी गोष्ट तुझं शर्विलवर प्रेम नव्हतं, नाहीये हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे आणि तुलाही तुझं प्रेम असल्याचं सिद्ध करून दाखवायचं आहे निदान त्या साठी तरी तुला मी म्हणतो तसं वागावं लागेल. तूच एकदा खात्री करून घे आणि इथे असलेल्यांना पण खात्री पटेल ना तुझं किती प्रेम आहे शर्विलवर ते.."

मीराला विराजचं बोलणं पटलं. शर्विलवर तिचं मनापासून प्रेम आहे हे सिद्ध करण्याचं आव्हान तिने स्वीकारलं.

“आणि माझं शर्विलवरचं प्रेम सिद्ध झालं तर पुढे काय? शर्विल मला स्वीकारेल? ही सई त्याच्या आयुष्यातून जाईल? देताय या गोष्टीची हमी?”

मीराने विराजला प्रश्न केला. तिच्या प्रश्नांनी शर्विल आणि सईने चमकून एकमेकांकडे पाहिलं आणि नंतर आशाळभूत नजरेने विराजकडे पाहिलं. विराजने दोघांकडे पाहून डोळ्यांनीच त्यांना आश्वस्त केलं.

“होय मीरा, तुझं प्रेम सिद्ध झालं तर शर्विल तुला स्वीकारेल आणि सई त्याच्या आयुष्यातून निघून जाईल. याची मी तुला हमी देतो पण जर का माझं बोलणं खरं ठरलं तर मात्र मी म्हणेन तसंच तुला वागावं लागेल. बोल आहे कबूल?”

विराजने मीराला उलटप्रश्न केला.

“हो.. मला मान्य आहे. तुम्ही तुमचा शब्द पाळा म्हणजे झालं.”

मीराने उत्तर दिलं. विराजने हसून मान डोलावली. इतक्यात डॉक्टर स्वप्नील विराजला म्हणाले,

“आपण माझ्या क्लिनिकला जाऊया. तिथेच पुढची ट्रीटमेंट ठरेल.”

विराजने होकार दिला. मीराला तिचं शर्विलवरचं प्रेम सिद्ध करायचं होतं म्हणून तीही फारशी कुरबुर न करता पटकन तयार होऊन बाहेर आली. सर्वजण डॉक्टर स्वप्नील यांच्या क्लिनिकला जाण्यासाठी निघाले. सईने सुधाला दुपारच्या जेवणाच्या काही सूचना दिल्या आणि ती शर्विलसोबत गाडीत बसली. मीराच्या मनात पुन्हा राग उफाळून आला आणि ती शर्विलच्या गाडीकडे जाणार इतक्यात विराजने तिचा हात पकडला.

“मीरा, तू माझ्या सोबत बसतेस? तेवढंच आपल्याला निवांत गप्पा मारता येतील. त्या दिवशी जास्त बोलू शकलो नाही. घाईत होतो ना. स्वप्नील तुम्ही मागे बसा. चल मीरा बस पुढे..”

असं म्हणत विराजने गाडीचा दरवाजा उघडून मोठ्या अदबीने तिला आत बसायला सांगितलं. शर्विल आणि देवकी काकू सोडून पहिल्यांदा कोणीतरी तिच्याशी अदबीने वागत होतं. मीराला थोडं विचित्र पण छान वाटलं. मीरा आत जाऊन बसली. आता दोन्ही गाड्या डॉक्टर स्वप्नील यांच्या क्लिनिकच्या दिशेने धावू लागल्या.

थोड्याच वेळात दोन्ही गाड्या डॉक्टर स्वप्नील यांच्या क्लिनिकसमोर येऊन थांबल्या. सर्वजण आत गेले. मीरा खूप अस्वस्थ वाटत होती. विराजने तिला रिलॅक्स व्हायला सांगितलं. तिचा हात हातात घेऊन आश्वस्त केलं.

“तुम्ही सर्वजण बाहेरच थांबा. मी फक्त मीराशीच बोलेन.”

असं म्हणून डॉक्टर स्वप्नील मीराला घेऊन एका बंद खोलीत आले. सर्व दिवे हळूहळू मंद झाले. एखाद्या जुनाट खोलीत असल्यासारखं वाटू लागलं. तो डार्क रूम होता. तिथे समोर एक मोठी आरामखुर्ची होती. डॉक्टरांनी मीराला खुर्चीत झोपायला सांगितलं आणि दुसरीकडे मोबाईलवर त्यांचं बोलणं रेकॉर्ड करायला सुरुवात केली. डॉक्टर स्वप्नील यांनी बोलायला सुरुवात केली.

“मीरा, हे इथलं वातावरण पाहून अजिबात घाबरायचं नाही. कसलंही दडपण मनावर येऊ द्यायचं नाही. निवांत पडून रहा. हे बघ.. ही प्रक्रिया म्हणजे जादू वगैरे असं काही नसून माझ्या उपचारांचा एक भाग आहे. यात आपण तुझ्या अंतर्मनाला जागृत करणार आहोत. तू फक्त मी सांगतो तसं करत जा. आणि जे विचारेन त्याची उत्तरं देत जा. उपचारांच्या शेवटी तुला खूपच आराम मिळेल. चल आपण सुरुवात करूया. आता मी सांगेन तसं वागायचं. ”

असं म्हणून डॉक्टर स्वप्नील यांनी त्यांच्या खिश्यातून संमोहनचक्र बाहेर काढलं.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all