स्पर्श भाग २

ही कथा एका मीरेची.. तिच्या अलौकीक प्रेमाच्या स्पर्शाची..
स्पर्श..

भाग-२

म्हणतात ना, ‘बालपणीचा काळ सुखाचा’ अगदी तसंच झालं होतं. हळूहळू मीरा आणि शर्विलची छान गट्टी जमू लागली. शर्विलचे घराशेजारचे, शाळेतले असे अनेक मित्रमैत्रिणीं होते पण मीरासाठी शर्विल हा एकमेव मित्र होता. त्याच्याशिवाय तिला दुसरं कोणी ठाऊक नव्हतं. जणू तोच तिचं मैत्रीचं जग बनला होता. शर्विल आणि मीरा एकत्र खेळत. काचपाणी,सागरगोटे, बुद्धिबळ अगदी भातुकलीच्या खेळातही शर्विल आणि मीराची जोडी असायची. भातुकलीच्या खेळात नेहमी ते दोघेच नवरा नवरी असायचे. भातुकलीचा संसार छान फुलायचा. शर्विल आणि मीरा यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट रुजू लागली होती.

दिवस भुर्रकन उडून जात होते. लहानगी मीरा हळूहळू मोठी होत होती. एके दिवशी देवकी रखमाला म्हणाली,

“रखमा, यावर्षी तुला मीराचं नाव शाळेत घालायला हवं”

“होय देवकी वहिनी मीही तोच विचार करत होते.”

शाळेचं नाव काढताच मीरा हरकून गेली. आणि आनंदाने म्हणाली,

“हो,हो काकू, मला पण शरूसोबत शाळेत जायचं आहे. आम्ही दोघे एकत्र शाळेत जाऊ.”

तिचं हे बोलणं ऐकून दोघीही खळखळून हसल्या.

मीराला शर्विल सोबतच शाळेत जायचं होतं. तो तिला कायम तिच्यासोबत हवा होता. पण शर्विल शहरातल्या सर्वात मोठ्या नामांकित शाळेत शिकत होता. शर्विलच्या शाळेची फी, खर्च खूपच जास्त होता आणि तसंही कोणत्याच शाळेचा खर्च रखमा करू शकत नव्हती म्हणून रखमाने तिच्या शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष केलं होतं पण देवकी मीराच्या आयुष्यात एक आशेचा किरण बनून आली. देवकीने स्वतः पुढं येऊन, रखमाला सांगून मीराचं नाव सरकारी शाळेत घातलं. तिची वह्या पुस्तकं, गणवेश सारा खर्च राजवाडेंच्या नकळत देवकीने केला. शर्विलचा जुना टिफिन आणि पाण्याची बाटली मीराला दिली. शर्विलने स्पर्श केलेल्या वस्तू पाहून मीरा हरखून गेली. मीरा शाळेत जाऊ लागली. सुरुवातीला शर्विल शाळेत सोबत नाही म्हणून थोडी मनातून हिरमुसली होती. पण लवकरच ती शाळेतल्या वातावरणात रमून गेली. आणि तिच्या शालेय जीवनाला सुरुवात झाली.

मीरा दररोज शाळेत जाऊ लागली. अभ्यास करू लागली. दिवसेंदिवस मीरा प्रत्येक विषयांत तरबेज होऊ लागली होती. प्रत्येक विषय आत्मसात करत होती. ती हुशार होती. सारेच शिक्षक तिच्या बुद्धीमत्तेवर खुश होते. ती सर्वांची लाडकी विद्यार्थिनी बनली. शाळेतून घरी परत आल्यावर शर्विल आणि मीरा अभ्यास करत बसत. तो तिला शिकवत असे. मीराही मन लावून अभ्यास करत होती. मीराला लहानपणापासूनच चित्रकलेची खूप आवड होती. ती खूप सुंदर चित्र काढायची. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत तिचाच पहिला क्रमांक ठरलेला. सर्व विद्यार्थ्यांना तिचं फार कौतुक वाटायचं. एक एक गड सर करावा तसं मीरा प्रत्येक वर्गात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होती पुढच्या वर्गात जात होती. शर्विलचा अभ्यासही उत्तम सुरू होता. उत्तरोत्तर त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात बदल होत होता. शर्विलला क्रीडा क्षेत्रात जास्त रस होता. प्रत्येक खेळात त्याचं नाव असायचंच. तो हॉकी छान खेळायचा. शाळेच्या वतीने तो आणि त्याची टीम कायम अग्रेसर असायचे. हॉकीच्या खेळामुळे ‘शर्विल राजवाडे’ हे नाव संपूर्ण नाशिक जिल्हात असलेल्या सर्व शाळांमध्ये दुमदुमत होतं.

ऋतूचक्र वेगाने फिरत होतं. मुलं मोठी होत होती. मीरा आपल्या आईला घरकामात मदत करू लागली. हरीच्या वागण्यात काहीच सुधारणा नव्हती.
दिवसेंदिवस तो जास्तच पिऊ लागला होता. दारू पिऊन कुठेतरी रस्त्याच्या कडेला पडलेला असायचा. लोक त्याची खिल्ली उडवायचे. मग रखमा आणि मीरा त्याला घरी घेऊन यायचे. रोजचा नित्यक्रम झाला होता. रोजची भांडणं, अपशब्द सारंच असह्य होतं. नशिबाचे भोग समजून त्या दोघी जीवन व्यतीत करत होत्या. दिवस पुढे सरकत होते. बालपण हळूहळू सरत होतं. मीरा आता आठवीत गेली आणि एक दिवस तिला ऋतुचक्राचा कौल आला. मीराच्या आईने ही गोष्ट शर्विलच्या आईला, देवकीला सांगितली. देवकी गालातल्या गालात हसली. तिने तिच्या कपाटातली हिरव्या रंगाची साडी, हिरव्या बांगड्या, बागेतली चाफ्याची फुलं आणून रखमाच्या हाती दिली. मीराला तयार करायला सांगितलं. रखमाने मीराला छान तयार केलं. इवलीशी मीरा साडी नेसल्यावर क्षणार्धात मोठी भासू लागली. आईने मायेने दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून फिरवला. कोणाची दृष्ट लागू नये म्हणून कानाच्या मागे काळा तीट लावला. इतक्यात देवकी औक्षणाचं ताट घेऊन बाहेर आली. तिने मीराला पाटावर बसवलं. हळदीकुंकू लावून तिचं औक्षण केलं. खणा नारळाने तिची ओटी भरली. देवकीने मायेने तिला जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवत ती बोलू लागली.

“मीरा, ईश्वराने तुला बाईपणाचा ऐवज बहाल केला आहे. आणि तो तुला जीवापाड जपायचा आहे. साधारणपणे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा दिवस येतोच ग. तुझ्या वयाचे असताना माझ्या, तुझ्या आईच्या आयुष्यातही आला होता आणि आम्हीही असेच तुझ्यासारखे गोंधळून गेलो होतो. पण हळूहळू साऱ्या गोष्टी समजत गेल्या. तुलाही नक्की समजतील. बेटा, आता एका छोट्याश्या कळीचं फुलात रूपांतर होत आहे. यापुढे तुला स्वतःला अधिक जपावं लागेल बरं. आता तु शहाणी झालीस. मोठी झालीस. हळूहळू तुला तुझ्या शरीरात वेगवेगळे बदल जाणवतील. काही स्पर्शांची ओळख होईल. काही आवडते तर काही नावडते स्पर्श. काही जाणीवा जिवंत होतील. हळूहळू चांगल्या वाईट स्पर्शांची तुला कल्पना येत जाईल. आता तुझा बाईपणाचा प्रवास सुरू झाला आहे. काही चांगल्या वाईट पुरुषांच्या नजरा तुझ्याकडे वळतील. वेगवेगळी आमिष दाखवून तुला भुलवतील. तुला संयमी राहावं लागेल. त्या अमिषांना तुला आजिबात बळी पडायचं नाही. कोणी तुला चॉकलेट, खाऊ, गिफ्ट देईल. आजिबात घ्यायचं नाही. कोणी एकटीला कुठे बोलवलं तर जायचं नाही. कोणाही पुरुषाला तुझ्या शरीराला स्पर्श करू द्यायचा नाही. घरात किंवा कामाच्या त्या ठिकाणी तुझी आई नसताना कोणी तुझ्या शरीराला तुला आवडत नसलेला स्पर्श केला तर लगेच मोठ्याने ओरडायचं. ताबडतोब आईला, किंवा तुझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीला येऊन सांगायचं. मीरा, या ऋतुचक्राच्या रूपानं ईश्वराने तुला आई होण्याची देणगी दिली आहे. काळजी घे स्वतःची. समजतंय का मी काय बोलतेय ते?”

देवकी मायेने हे सारं सांगत होती. मीराने होकारार्थी मान डोलावंली. पण मीराला नीटसं काही समजत नव्हतं. भांबावलेल्या नजरेने ती कधी देवकीकडे तर कधी तिच्या आईकडे पाहत होती. काही समजत नसलं तरी आपल्या मोठ्या माणसांनी सांगितलं आहे ना! मग निमूटपणे ऐकायचं इतकंच तिला माहित होतं. देवकीने मीराच्या काळजी पोटी काही सूचना दिल्या खऱ्या पण रखमाच्या मनात चिंता डोकावू लागल्या. आता मीराकडे अधिक लक्ष द्यावे लागणार होते. तिचं निरागस बाल्य तिला हरवू द्यायचं नव्हतं. गरिबाकडे असलेला शील नावाचा एकमेव दागिना तिला जपायचा होता. मीराच्या आयुष्यातही एक आमूलाग्र बदल होत होता तो तिच्या वागण्या बोलण्यात दिसू लागला. ती एकदम मोठी झाली होती. अगदी परिपक्व. अबोल मीरा अजूनच अबोल झाली. परकर पोलक्यातली मीरा आता पंजाबी चुडीदार ड्रेसमध्ये दिसू लागली. शर्विलची आई त्याच्या चुलत बहिणीचे, आभाचे जुने कपडे मीरा साठी काढून ठेवत असे. मीरा त्या जुन्या कपड्यातही उठून दिसत असे.

यंदाच्या वर्षी शर्विल दहावीच्या परीक्षेची तयारी करत होता. चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी तो दिवसरात्र मेहनत घेत होता. त्याच्या बाबांना त्याला डॉक्टर झालेलं पाहायचं होतं. म्हणून तेही त्याच्या शिक्षणात कोणताच कसूर ठेवत नव्हते. खाजगी शिकवण्या सुरू होत्या. घरी शिकवायला शिक्षक येत होते. देवकी आपल्या मुलाच्या प्रकृतीची, सात्विक आहाराची काळजी घेत होती.

एकीकडे शर्विल आणि मीरा यांची मैत्री दिवसेंदिवस दृढ होत चालली होती आणि दुसरीकडे शर्विलच्या वडिलांना, राजवाडेंना आपल्या मुलाचं, पत्नीचं, देवकीचं वागणं मुळीच पटत नव्हतं. मीरासोबत देवकीने गोड बोलणं, तिच्यावर माया करणं त्यांना आवडायचं नाही. मीरा आणि शर्विलची मैत्री शर्विलच्या वडिलांना मुळीच रुचत नव्हती. ते नेहमी मीराचा राग राग करायचे. तिला शर्विल सोबत राहू द्यायचे नाहीत. ते शर्विलला नेहमी सांगत असत.

“शर्विल, आपण नेहमी आपल्या स्टेट्सप्रमाणे राहावं. मैत्री बरोबरीच्या लोकांशी असावी. आपली आणि नोकरांची कधीच मैत्री होऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणेच ठेवावं नाहीतर ते डोक्यावर बसतात. मग ते खाल्या मिठाला जागत नाहीत. त्यांना आपल्या बरोबरीने वागवलं तर ते त्यांची पायरी सोडून वागतात. म्हणून नोकरांच्या मुलांशी कधीही मैत्री करू नये.”

राजवाडे साहेब शर्विलला वारंवार समजावून सांगत. कधी रागाने तर कधी प्रेमाने. पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. शर्विलच्या वागण्यात काहीच बदल होत नव्हता. शर्विल आणि मीराच्या मैत्रीत कधीही अंतर आलं नव्हतं. शर्विल आणि मीरा कायम एकत्र असायचे. एकत्र गप्पा गोष्टी, अभ्यासालाही एकत्रच. देवकीही आपल्या पोटच्या मुलीसारखं मीरावर प्रेम करत होती.

दिवस पुढे सरकत होते. शालान्त परीक्षा झाल्या. आणि सर्वांना निकालाचे वेध लागले. जसजसा निकालाचा दिवस जवळ येत होता तसतसा शर्विल अस्वस्थ होऊ लागला. शर्विलच्या मनात धाकधूक वाढली होती. खरंतर पेपर्स छान गेले होते पण तरीही त्याला भीती वाटत होती. त्याची ही अस्वस्थता मीराच्या नजरेतून सुटली नाही. ती त्याच्या जवळ येऊन बसली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली,

“शांत हो शरू, सगळं ठीक होईल. तु पेपर्स छान सोडवलेत ना! मग तु नक्की चांगल्या मार्कांनी पास होशील. अजिबात काळजी करू नकोस. परमेश्वर नक्कीच तुला यश देईल.”

“तसं नाही मीरा, मला फक्त पास व्हायचं नाही तर चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे ग. माझं संपूर्ण करियर त्यावर अवलंबून आहे. तुला माहीत आहे ना,
मला मेडिकलला जायचं आहे. डॉक्टर व्हायचं आहे. त्यासाठी मला खूप चांगल्या गुणांनी पास होण्याची गरज आहे. तरच मला चांगलं कॉलेज मिळेल नाहीतर मग ‘दुधाची तहान ताकावर’ भागवल्यासारखं होईल. कॉलेज निवडण्यात तडजोड करावी लागेल. म्हणून मला भीती वाटते”

शर्विल काळजीने बोलत होता. मीरा त्याला समजावत म्हणाली,

“काही काळजी करू नको. तु नक्की चांगल्या गुणांनी पास होशील आणि मला छान पार्टी पण देशील. मला ती अमृतभेळ खायची आहे तुझ्यासोबत.”

“हो हो, नक्की देणार. नाहीतर तु माझ्या मानगुटीवर बसशील.”

त्याच्या या वाक्यासरशी मीरा खळखळून हसली. आणि अखेरीस निकालाचा दिवस येऊन ठेपला. शर्विल निकालाची साईट उघडून बसला होता. थोडासा धास्तावलेला.त्या दिवशी शर्विलचे बाबा घरीच थांबले होते. बाहेरच्या खोलीत येरझऱ्या घालत होते. आई देवापुढे बसून नामस्मरण करत होती. मीराही तिच्याबरोबर येऊन बसली. शर्विलच्या यशासाठी देवाला साकडं घालू लागली. इतक्यात बाहेरून आवाज आला.

“ शर्विल, राजवाडेसाहेब कोणी आहे का?”

सर्वांच्या नजरा दाराकडे वळल्या. सर्वजण बाहेरच्या खोलीत आले. समोर शर्विलच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्याचे वर्गशिक्षक उभे होते. त्यांनी दारातूनच शर्विलला आवाज दिला.

“अरे, राजगुरू सर तुम्ही? या, या ना आत..”

राजवाडे साहेबांनी हसून त्यांचं स्वागत केलं.

“ते तर मी येणारच आहे हो पण आधी पेढे काढा. अभिनंदन राजवाडे साहेब, आपला शर्विल ९८% गुण मिळवून साऱ्या नाशिक जिल्हात दुसरा आला आहे. आहात कुठे? म्हणून मी स्वतः आलोय निकाल घेऊन. राजवाडे साहेब जंगी पार्टी झाली पाहिजे बरं का! शर्विल बेटा, तुझंही मनापासून अभिनंदन. खूप छान. आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलंस. आम्हाला तुझा अभिमान आहे.

त्यांचे हे शब्द ऐकताच शर्विलच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शर्विलच्या कष्टाचं चीज झालं होतं. त्याने पटकन वाकून आपल्या उपस्थित गुरुजनांना, आई बाबांना नमस्कार केला. सर्वांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिला. शर्विलला इतका आनंद झाला होता की, त्याने आनंदाने शेजारी उभी असलेल्या आईला घट्ट मिठी मारली. देवकीच्या डोळयांच्या कडा पाणावल्या. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. भरभरून आशीर्वाद दिला. सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. राजवाडे साहेबांनाही खूप आनंद झाला.

“वेल डन माय बॉय, काँग्रट्स..”

असं म्हणून त्यांनी आपल्याला मुलाला प्रेमाने अलिंगन दिलं. मीरालाही खूप आनंद झाला होता. तिचा शर्विल संपूर्ण नाशिक जिल्हात दुसरा आला होता. निकाल घेऊन चक्क मुख्याध्यापक आणि त्याचे वर्ग शिक्षक घरी आले होते. याहून मोठा आनंद तो काय! तिच्या श्रीकृष्णाला घातलेलं साकडं त्याने ऐकलं होतं. ती तिच्या श्रीरंगावर आज प्रचंड खुश होती. तिचा आनंद तिच्या डोळ्यातून वाहत होता. तिने शर्विलचं अभिनंदन केलं. इतक्यात रखमा स्वयंपाकघरातून सर्वांसाठी नाश्ता घेऊन बाहेर आली. घरी आलेल्या शर्विलच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना नाश्ता, चहा दिला. रखमाने शर्विलचं भरभरून कौतुक केलं. अभिनंदन केलं. दुपारच्या स्वयंपाकात गोड पदार्थाचा बेत आखून ती पुन्हा स्वयंपाकघरात आपल्या कामासाठी निघून गेली. पुन्हा एकदा शर्विलचं अभिनंदन करून आणि पार्टीचं आश्वासन घेऊन मुख्याध्यापक राजगुरू सरांनी सर्वांचा निरोप घेतला. शर्विलने यशाची एक पायरी ओलांडली होती.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)

🎭 Series Post

View all