स्पर्श भाग २९

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..


स्पर्श..


भाग- २९

“पण का बाबा? मीराच का? मी तिची ही अशी विचित्र अट मान्य करावी असं वाटतं का तुम्हाला? नाही.. हे कधीच शक्य नाही. मी सईची अशी प्रतारणा मुळीच करू शकत नाही.”

शर्विल संतापून बोलत होता. देवकी, सई एकमेकींकडे पाहू लागल्या. काय बोलावं दोघींनाही समजेना. पण राजवाडे साहेब मात्र शांतपणे म्हणाले,

“शर्विल, मी काय म्हणतो ते शांतपणे ऐकून घे. मीरा लहानपणापासून आपल्या समोर वाढलीय. आपल्या घरात लहानाची मोठी झालीय त्यामुळे आपल्या घरचं वळण, देवकीचे चांगले संस्कार तिच्यावर झालेत. तिच्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती आहे. आपण दुसरी सरोगेट मदर पाहणार. ती कशी आहे? कोण आहे? तिचं चारित्र्य कसं आहे? कोणी कितीही हमी घेतली तरी तिच्याबद्दल पुरेशी माहिती आपल्याकडे कधीच नसेल. आपल्याला काही माहित नसेल. मग अश्या स्त्रीच्या उदरात राजवाडे घराण्याचा वंश? नाही! याउलट मीरा विश्वासू आहे. नाही म्हटलं तरी आपल्या उपकाराखाली दबलेली आहे. ती आपल्याला फसवणार नाही. आपणही कितीही कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या तरी अनोळखी व्यक्तीवर शंभर टक्के विश्वास ठेवणं कठीण आहे आणि असंही सरोगेट मदरची संकल्पना विराजने सुचवली नसती आणि तुला दुसरं लग्न करावं लागलं असतं तर दोघांत वैवाहिक संबंध आलेच असते ना. मग एका अनोळखी स्त्री सोबत संबंध जोडण्यापेक्षा मीराशी संबंध जोडले तर काहीच वावगं ठरणार नाही. आणि तुझ्या दुसऱ्या लग्नासाठी सईसुद्धा तयार होतीच ना.. मीराने लग्नाची अट घातलेली नाही. तिने फक्त कृत्रिम नात्यापेक्षा नैसर्गिक हवंय अशी मागणी केली आहे. म्हणजे दुसरं लग्न करून अजून कोणतीही नवीन जबाबदारी वाढत नाही. सईला कायमची सवत असणार नाही. फक्त मुल होण्याचा प्रश्न आहे. ते झालं की ती आपल्या बाळ देईल. तसं मीराकडूनही आपण सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून घेणारच आहोत. देवकी, तुझं काय म्हणणं आहे यावर?”

देवकीने सईकडे पाहिलं. देवकी आई होती पण त्या आधी ती एक स्त्री. सईच्या मनातली व्यथा देवकीशिवाय कोणाला कळणार? आपलं प्रेम दुसऱ्यासोबत वाटून घेण्याचं धारिष्ट्य कोणती स्त्री करेल?

“आपल्याला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये. हा पूर्णतः सई आणि शर्विलचा निर्णय आहे. त्यामुळे मला वाटतं तो त्यांना घेऊ द्यावा. सई, तू आणि शर्विल शांतपणे विचार करा आणि मग ठरवा काय करायचं ते.. माझं तर काही डोकं चालत नाहीये आता..”

देवकी सईच्या मनाचा विचार करून बोलत होती. सईने शर्विलकडे पाहिलं. तिचे भरलेले डोळे पाहून शर्विलला गलबलून आलं. तिचं मन शर्विलला कधीच कोणासोबत शेअर करायला तयार नव्हतं. तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. तिचा शर्विलवर, त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता पण आईवडिलांच्या आनंदासाठी, राजवाडे घराण्याच्या वंशासाठी शर्विलला हे पाऊल उचलायला भाग पडणार होतं. खरंतर शर्विलच्या प्रेमावर फक्त सईचाच अधिकार होता आणि कायम तिचाच राहणार होता. शर्विलच्या बाबांचं म्हणणं मनाला आवडलं नसलं तरी बुद्धीला पटत होतं. त्यांचं बोलणं तिला व्यवहारिक वाटत होतं पण तिचं मन ते ऐकायला तयार नव्हतं. सई मान खाली घालून शांत बसली. राजवाडे साहेबांनी तिच्याकडे पाहिलं.

“सई, तू शांत बसली आहेस. मग या गोष्टीला मी तुझी मूक संमती समजू? म्हणजे मला पुढच्या गोष्टी ठरवायला.”

सई काहीच बोलली नाही. फक्त डोळ्यांतून पाणी वाहत होतं.

“ठीक आहे मग.. शर्विल, तू मीराला तुझा निर्णय सांग. आता काही कारणं सांगू नकोस. मला राजवाडे घराण्याचा वारस हवाय. बाकी मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. आता या विषयावर मला अजून चर्चा नकोय..”

राजवाडे साहेब इतकं बोलून जाण्यासाठी उठून उभे राहिले आणि देवकीला तिथून निघूया म्हणून खुणावलं. राजवाडे शर्विलच्या खोलीतून बाहेर आले खरं पण त्यांच्या डोक्यात मात्र कट शिजत होता.

“मीरा, तुला काय वाटलं, आम्ही तुझ्या अटीसमोर इतक्या सहजासहजी मान झुकवू? माझ्या शर्विलला तू अश्या रीतीने ब्लॅकमेल करशील? नाही.. कधीच शक्य नाही. इतके दिवस तू माझं चांगलं रूप पाहिलंस आता माझं खरं रूप तुला पाहायला मिळेल. शर्विलला तुझी अट मान्य करायला लावली म्हणजे तू जिंकलीस असं मुळीच नाही. तुला काय वाटलं तुझ्या सारख्या मोलकरीणीची अशी विचित्र मागणी मान्य करायला लावायला मी काय मूर्ख आहे? माझ्या मनातल्या गोष्टी घडवून आणायला मी तुलाच निवडलं कारण तुझ्या इतकी इमोशनली मूर्ख बाई दुसरी शोधूनही सापडली नसती. दुसऱ्या स्त्रिया प्रोफेशनल वागल्या असत्या. कदाचित धूर्तपणे माझ्या शर्विलला आयुष्यभर ब्लॅकमेलही करत राहिल्या असत्या. कायदेशीर गोष्टी पूर्ण करूनही मला ती रिस्क घ्यायची नव्हती. तुला आमच्या आयुष्यातून काढून टाकणं मला सहजसोप्पं आहे म्हणूनच मी तुझी निवड केली. मीरा, मला अजून तू मला नीट ओळखलं नाहीस. माझ्या डोक्यात आधीपासूनच हा प्लॅन शिजत होता. सरोगेट मदर ही कल्पना मान्य करणं हा तर एक बहाणा होता. तुझी इथून कागदपत्रांवर कायमची हकालपट्टी करण्याचा डाव होता. सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून घ्यायच्या. सर्व तुझ्या सह्या घेऊन बाळाच्या जन्मानंतर त्याचा ताबा मिळवण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आणि मग सई आणि तुला शहराबाहेर पाठवायचं. एकदा का तुला दिवस गेले की सईच गरोदर आहे आणि ती आरामासाठी रत्नागिरीला गेलीय अशी अफवा पसरवायची. त्यानंतर तुला मूल झाल्यावर सईला बाळाचा ताबा घ्यायला सांगायचं आणि मग तुझी तिथून हकालपट्टी करायची. सई नाशिकला परत आली की ते सईचंच बाळ आहे हेच सांगायचं. मीरा, हा सुधाकर आजवर कोणासमोर झुकला नाही.. झुकणारही नाही. एकदा का बाळाचा ताबा मिळाला की मग मी तुझी रवानगी कुठे करतो पाहशीलच तू.. तू कुठे आहेस तुलाच कळणार नाही. तुझं नखसुद्धा कोणाला दिसणार नाही याची व्यवस्थित सोय करतो बघच तू. अजून हा सुधाकर राजवाडे काय चीज आहे हे तुला माहित नाही.”

राजवाडे साहेब स्वतःशी बोलत होते. स्वतःच्या कारस्थानी डोक्यावर त्यांना गर्व वाटला. ते छद्मी हसले. तिकडे शर्विल चिंतीत होता. काय करावं त्याला समजेना. सईशी प्रतारणा करणं त्याला शक्य नव्हतं. त्याला विचारत गढलेलं पाहून सईचा जीव तुटत होता. बराच वेळ दोघांचं बोलणं सुरू होतं. शर्विल सईला म्हणाला,

“सई, मीरा वाईट मुलगी नाही गं. लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो, खेळलो. खूप छान, सर्वात जवळची मैत्रीण होती ती माझी म्हणजे आजही आहे. लहानपणापासून माझ्याशिवाय तिला समजून घेणारं कोणी नव्हतं. नंतर मी शिक्षणासाठी मुंबईला आलो आणि ती अजूनच एकटी झाली. त्यानंतर तिच्या आयुष्यात आलेले कटू अनुभव, नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी केलेला छळ, तिचं बाळ गमावणं या साऱ्या गोष्टींमध्ये तिला कधी कोणाचं प्रेम मिळालंच नाही त्यामुळे ती अशी विक्षिप्त वागू लागली आहे. मैत्री आणि प्रेम यात गल्लत करतेय. तिचा गैरसमज झालाय. अगं ती मैत्रीला प्रेम समजतेय. आपल्याला तिला समजून सांगायला हवं की ती ज्याला प्रेम समजतेय ते प्रेम नव्हतंच कधी आणि असं जबरदस्तीने प्रेम मिळवता येतं का? या गोष्टीतून तिला आपल्याला बाहेर काढावं लागेल नाहीतर याचा त्रास तिलाच होणार. आपल्या घरच्यांविषयी तिचा मनात राग, द्वेष संताप आहे तो दूर करायला हवा नाहीतर आयुष्यभर ती आपल्या सर्वांना दोष देत राहील आणि सुडाच्या अग्नीत अशीच जळत राहील. सई, मीराला आपल्या मदतीची खूप गरज आहे. आपण डॉक्टर आहोत. तिच्या अनुषंगानेही विचार करून बघ. शरीराचे आजार औषधपाणी देऊन बरे करता येतील पण मनाच्या आजाराला प्रेमानेच दूर करावं लागेल ना..”


शर्विल बोलत होता. सईला त्याचं म्हणणं पटत होतं. त्याचं बोलून झाल्यावर सई शर्विलला म्हणाली,


“शरू, तू अगदी बरोबर बोलतोयस. मीराला आपल्या मदतीची गरज आहे. आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही. सर्वांनी आपल्यावर फक्त अन्यायच केला. ही भावना तिच्या मनात उफाळून येत आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही हेच खरं. म्हणजे अति द्वेषही हानिकारक आणि अतिप्रेमही.. आणि तिच्याबाबतीत हे दोन्ही झालं आहे. तेव्हा आपण यावर काहीतरी उपाय करायला हवा. काय करता येईल शरू?”

शर्विल विचार करू लागला. आणि एकदम त्याच्या डोक्यात एक कल्पना आली.

“येस्स.. फँटॅस्टिक आयडिया.. हेच योग्य राहील.”

शर्विलने आनंदाने सईचा हात हातात घेतला आणि म्हणाला.

“सगळं ठीक होईल सई, तू बिलकुल काळजी करू नको. मी सगळं ठीक करेन. मीरा लवकरच या सगळ्या दुःखातून बाहेर पडेल. आपली पूर्वीची मीरा आपल्याला परत मिळेल.”

शर्विलच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक सईला दिसली. शर्विल त्याच्या खोलीच्या बाहेर आला आणि त्याने विराजला कॉल केला. विराजशी बोलणं झालं. त्याने फोन ठेवून दिला आणि त्याची पाऊले मीराशी बोलण्यासाठी तिच्या खोलीच्या दिशेला वळली.

इकडे मीरा तिच्या खोलीत बसली होती. विचार करून डोकं फुटण्याची वेळ आली होती. रडून डोळे सुजले होते. डोळ्यांचं वाहणं सुरूच होतं. मनात प्रश्नांची गर्दी होऊ लागली. मनात द्वंद्व सुरू होतं.

“काय होईल पुढे? शरू माझी अट मान्य करेल? कदाचित सईच्या प्रेमासाठी, सुधाकर काका आणि देवकी काकूंच्या आनंदासाठी तयार होईल का? त्याचं खरंच माझ्यावर प्रेम नाही की घरच्याना घाबरून तो नकार देतोय? पण माझं काय चुकलं? माझं प्रेम मिळवण्याचा मला अधिकार नाही? मला शरूला मिळवायचं. मी त्याला माझी अट मान्य करण्यास भाग पाडेन.”

तिचे तिलाच प्रश्न पडत होते आणि दुसरं मन तिला त्याचं उत्तर देत होतं.

“नाही मान्य करणार शरू.. आणि का करेल? सरोगेट मदर होण्यासाठी तर त्याला दुसरी कोणीतरी स्त्री मिळेलच ना.. मीच कशाला हवीय. पैसे घेऊन दुसऱ्याचं बीज स्वतःच्या गर्भात धारण करणाऱ्या कितीतरी गरजू स्त्रिया असतीलच ना.. ते दोघेही डॉक्टर आहेत ते अशी स्त्री नक्कीच शोधून काढतील. माझी काय गरज? माझी अट तो का मान्य करेल? त्याचं सईवर खूप प्रेम आहे तो तिची प्रतारणा नाही करणार. शरू त्याच्या मतांशी, तत्वांशी खूप प्रामाणिक आहे आणि तो म्हणालाही होता की एखाद्यावेळीस तो मैत्री विसरेल पण प्रेमाला नाही. सईच्या आनंदापेक्षा त्याच्या आयुष्यात दुसरं कशालाही स्थान नाही. मग तो कसा तयार होईल? नाहीच तयार होणार. आता मलाच इथून जायला हवं. या घरात माझं असं कोणी राहीलच नाही. मग का राहायचं?”

अश्रुंचे बांध फुटून पाणी वाहू लागलं. मीरा उन्मळून पडली. एकदम तिला एकाकी वाटू लागलं. शर्विलसोबत असलेल्या प्रेमाच्या नात्यामुळे ती आजवर या घरात राहिली होती. आता तोच तिचा राहिला नाही तर इथे राहण्यात काय अर्थ? तिचं तिला वाटू लागलं. पुन्हा एकदा तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. पुन्हा एकदा नियतीने तिच्यावर घाव केला होता. मनात प्रेमाभंगाची सल घेऊन इथे जगण्यापेक्षा निघून जावं असं तिला वाटू लागलं. मीराने तिची बॅग भरायला सुरुवात केली. मोजकेच कपडे आणि श्रीरंगाची मूर्ती इतकंच काय ते तिचं सामान. घर सोडून जाण्याचा तिचा पक्का निर्णय झाला होता. तिने बॅग भरली. डोळे भरून तिच्या राहत्या खोलीला पाहून घेतलं आणि खोलीचा दरवाजा उघडून बाहेर येणार इतक्यात दारात शर्विल उभा होता.

“हे काय.. बॅग घेऊन कुठे निघालीस? घर सोडून चाललीस?”

शर्विलने तिला प्रश्न केला.

“मी तुला आधीच सांगितलं होतं. तुला माझी अट मान्य नसेल तर मी हे घर सोडून जाईन. आणि मला माहित आहे माझी अट तू कधीच मान्य करणार नाहीस. म्हणूनच चाललेय.. तुझं सईवर खूप प्रेम आहे ना.. मग तू कुठचा तयार होशील?”

मीरा कुत्सितपणे स्वतःवरच हसली आणि तिच्या खोलीच्या बाहेर येऊ लागली.

“थांब.. मला तुझ्याशी बोलायचं आहे.”


पुढे काय होतं? शर्विल मीराला काय बोलेल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)

🎭 Series Post

View all