स्पर्श.. भाग २७

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..

स्पर्श..

भाग- २७

“काय म्हणालो होतो मी आणि आता काय वागतोय?”

शर्विल चिडून म्हणाला.

“अरे, असं काय करतोयस? तूच म्हणालास ना माझ्या बाळाची आई होशील का म्हणून. मग आता असं का वागतोयस? मूल होण्यासाठी लग्न करावं लागेल, दोन जीवांना एकत्र यावं लागेलच ना.. शरू, असा का वागतोयस? असा दूर का लोटतोय मला? असा क्षणाक्षणाला का बदलतोयस?”

मीराच्या डोळ्यात आभाळ भरून आलं. मेघ बरसू लागले. मीरा अगदी काकूळतीला येऊन बोलत होती.

“मूर्ख आहेस का? मी कधी म्हणालो लग्न करशील का म्हणून? हो, मी म्हणालो माझ्या बाळाची आई होशील का? याचा अर्थ मी तुझ्याशी लग्न करेन असा होत नाही.. मीरा, मी तुला आधीही सांगितलं आहे की माझं फक्त आणि फक्त सईवर प्रेम आहे. माझ्या मनावर, तनावर फक्त तिचाच अधिकार आहे. मी तिच्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा विचारही करू शकत नाही. हे तू आधी तुझ्या मनावर पक्क बिंबव. त्यामुळे तुझ्याबद्दल मी तसा कोणताही विचार केलेला नाही. आपल्यात कोणत्याही प्रकारचं वैवाहिक किंवा इतर कुठल्याच पद्धतीचं अनैतिक नातं असू शकत नाही. आपण कधीच फिजिकली एकत्र येऊ शकणार नाही. ते कधीच शक्य नाही. समजलं तुला?”

शर्विल चिडून बोलत होता.

“मग मला असं का विचारलंस? का माझ्या भावनांशी खेळलास? मी म्हणजे काय कुठलं खेळणं वाटते का तुला?

आता मीराच्या सहनशीलतेचा अंत होऊ लागला होता. तिच्या बोलण्यावर शर्विल तिला म्हणाला,

“मीरा, तू सरोगेट मदर व्हावं अशी घरातल्या सर्वांची इच्छा होती. म्हणजे मी तर नाहीच म्हणालो होतो पण सईने, आईबाबांनी मला त्यांचा हा निर्णय ऐकण्यास भाग पाडलं. मग नाईलाजाने मी तयार झालो. मीरा, ही एक प्रगतशील वैद्यकीय क्षेत्रातली मुल होण्यासाठी करण्यात येणारी कृत्रिम प्रक्रिया आहे. यात माझ्यातले शुक्राणू इंजेक्शनद्वारे तुझ्या गर्भात सोडले जातील आणि गर्भधारणा होईल. या प्रक्रियेसाठी तुझ्याइतकी विश्वासू स्त्री दुसरी नाही असं बाबांचं म्हणणं होतं. तू यासाठी तयार आहेस ना? असा प्रश्न मी तुला केला. तू संपूर्ण ऐकून न घेता निघून गेलीस आणि चुकीचा ग्रह करून घेतलास. असा अर्थाचा अनर्थ करून बसलीस. तुझ्या माझ्या लग्नाची स्वप्नं पडू लागली तुला. पुन्हा एकदा तू माझ्या मैत्रीचा अपमान केलास. प्रेम आणि मैत्री यातलं अंतर तुला कधीच दिसलं नाही. दिसणार नाही. मीरा, इथे फक्त गर्भधारणेसाठी तुझ्या गर्भाचा वापर होणार आहे. बाकी आपल्यात कोणतंच नातं असणार नाही., होऊ शकत नाही. तुझ्या शरीराला स्पर्श न करता, कोणत्याही शारीरिक संबंधाशिवाय माझा अंश तुझ्या उदरात वाढवंणं आणि बाळाच्या जन्मानंतर ते मुल सईला देणं इतकं सरळ सोप्प होतं. त्या बदल्यात तुला चांगली मोठी रक्कम देणार होतो. आम्हाला मुल हवं होतं आणि तुला आसरा मिळेल, तुझं स्वतःचं हक्काचं घर होईल. तू तुझ्या पायावर उभी राहशील. तुला कोणावर विसंबून राहण्याची गरज पडणार नाही. या विचारांनी मी तुला सरोगसीबद्दल विचारलं.पण तू…”

“शरू, याचा अर्थ तूला मुल हवंय म्हणून तुझ्या स्वार्थासाठी तू माझ्या गर्भाचा वापर करून घेणार? तू माझा वापर करून घेणार?”

त्याला अडवत मीरा संतापून म्हणाली.

“इतका स्वार्थी कधी आणि कसा रे झालास? शरू, मी तुला काय समजत होते आणि तू..?”

मीराच्या डोळयांत पाणी होतं. प्रत्येक अश्रू त्याला त्याच्या वागण्याचा जाब विचारत होता.

“मीरा, तसं काही नाही. तुझा गैरसमज झाला. मी तुला तसं काही म्हणालो होतो का? त्या दिवशी डॉक्टर विराजने ही कल्पना सुचवली आणि बाबांनी तुझं नाव. मीरा, आजकाल विदेशात किंबहुना भारतातल्या अनेक शहरात अश्या सरोगेट मदर आहेत की ज्या आपल्या गर्भाशयाचा उपयोग दुसऱ्याच्या गर्भ धारणेसाठी करतात आणि त्या बदल्यात एक ठराविक रक्कम घेऊन बाळावरचा आपला हक्क सोडून मूल स्वाधीन करून निघून जातात. तशी कायद्याने तरतूदही करून ठेवली आहे. यात बेकायदेशीर वा गैर काही नाही अगं..”

शर्विल मीराला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता.

“शरू, याचा अर्थ तू मला विकत घेऊ पाहतोयस? माझ्या प्रेमाला पैश्यात मोजतोयस? माझ्या गर्भाचा दर लावतोयस?”

इतका वेळ त्याचं ऐकून घेणारी मीरा आता मात्र उद्विग्न झाली. तिचं प्रेम शर्विलने नाकारलं होतं. त्याने तिचा अव्हेर केला होता. त्यामुळे मीरा खूपच दुखावली गेली होती. मनात संतापाने कधीच प्रेमाची जागा बळकवली होती. उरी राग, संताप, चीड आणि डोळयांत पाणी. आता डोळ्यातलं पाणी अंगार बनून बरसू लागलं. तितक्याच त्वेषाने ती शर्विलशी बोलत होती.

“शरू, तूही इतर पुरुषांसारखाच निघालास. धूर्त, स्वार्थी.. इतकं सोसल्यानंतर वाटलं होतं मनाला. माझा शरू, मला साथ देईल. माझ्या प्रत्येक घावावर मलम लावेल पण तू तर जखमेवर मीठ चोळलंस रे..! तुला माहितीये शरू, आपण लहान होतो ना, तेव्हा मी तोल जाऊन पडले तू मला उठवलंस पाणी दिलंस. तुझ्या हातातलं मोरपीस मला दिलंस आणि त्याच क्षणी तू माझा श्रीकृष्ण झालास. त्या क्षणापासून ते आजच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझाच ध्यास घेतला रे. तू दिलेलं मोरपीस, काचा, सागरगोटे, बुद्धिबळाच्या सोंगट्या, मी काढलेली चित्रे, भातुकलीच्या खेळातली नवरा नवरी झालेली बाहुला बाहुली सारं मी जपून ठेवलंय शरू अजूनही.. त्या प्रत्येक क्षणातला शरू फक्त माझा होता. वेडी होते रे मी.. विसरले होते की माझ्यासारख्या मोलकरणीला प्रेम करण्याचा अधिकारच नाही. माझी लायकीच नाही ती..”

तिचं बोलणं शर्विलच्या मनावर सपासप वार करत होते. तिच्या जहाल शब्दांनी तो घायाळ झाला होता. आजवर मीरा कधीच इतकं बोलली नव्हती. कधीच आपल्या मनातली व्यथा कोणाला सांगितली नव्हती. आज तिने तिचं अव्यक्त प्रेम व्यक्त केलं होतं. लहानपणापासून मनाशी बाळगलेल्या त्याच्याविषयीच्या भावना पहिल्यांदा इतक्या स्पष्टपणे बोलून दाखवल्या होत्या. आज शर्विलला तिच्या प्रेमाची तिने जाणीव करून दिली होती. शर्विलच्या मनात अपराधीपणाची भावना तीव्र होऊ लागली. तो समजवणीच्या सुरात तिला म्हणाला,

“मीरा, तसं नाहीये गं.. मी कधीच तुझ्यामाझ्यात भेदभाव केला नाही. आपण खूप चांगले मित्र होतो, आहोत आणि कायम असू. पण मीरा माझं तुझ्यावर प्रेम नाही अगं.. मी कधीच तुला त्या भावनेने, त्या नजरेने पाहिलंच नाही. कॉलेजमध्ये मला सई भेटली. पाहताक्षणी मी तिच्या प्रेमात पडलो. प्रेम कधी कोणावर कसं होईल हे सांगता येत नाही ना.. त्या भावनेवर तर कोणाचा कंट्रोल नसतो ना.. झालं प्रेम.. म्हणूनच मी तुझ्या मनात माझ्याविषयी असलेल्या प्रेमभावनेचा आदर करतो पण मीरा, माझं सईवर खूप प्रेम आहे गं अगदी जीवापाड. आणि खरं सांगायचं तर मी तिच्यासोबत खूप आनंदी आहे. मीरा, मैत्री आणि प्रेम यातील फरक समजून घे.. तू माझी जिवलग मैत्रीण आहेस आणि सई माझं प्रेम.. आणि माझ्या प्रेमाशिवाय जिवंत राहू शकत नाही. एखाद्यावेळीस मैत्री सोडू शकतो पण प्रेम नाही. सई श्वास आहे माझा. तिच्या आनंदाशिवाय माझ्या जगात दुसरं कशालाच महत्व नाही.”

“आणि मग माझं काय? मी कुठे होते तुझ्या आयुष्यात? माझं काय स्थान होतं, आहे तुझ्या आयुष्यात? की सर्वांनी फक्त माझा वापर करावा आणि निरूपयोगी झाल्यावर कसपटासारखं मला फेकून द्यावं? इतकीच माझी, माझ्या प्रेमाची किंमत? सांग मला.. शरू, मी माझ्या मरण पावलेल्या आईच्या इच्छेखातर लग्न केलं. एका व्यसनी नालायक माणसाला आपला नवरा मानून त्याच्याशी संसार करण्याचा प्रयत्न केला. त्याने केलेला घाणेरडा स्पर्शही सहन केला पण शरू, तो स्पर्श फक्त माझ्या देहाला होतं होता तो कधी मनाला झालाच नाही. मन मात्र तुझ्या स्पर्शासाठी कायम आसूसलेलं. ज्या स्पर्श सुखासाठी माझं मन तुझ्याकडे ओढ घेत होतं त्या स्पर्शाची अनुभूती कधी मिळालीच नाही. शरू, मनात कायम तूच होतास रे..”

मीरा धाय मोकलून रडू लागली. शर्विल मीराला समजावत होता.

“ बघ ना.. आजवर सुधाकर काकांनी माझा कायम राग केला. नाही नाही ते बोलले आणि आज ते माझ्याशी गोड बोलत आहेत. त्यांच्यासोबत जेवायला बसवत आहेत. माझ्याशी प्रेमाने वागत आहेत. मला वाटलं त्यांना माझ्याबद्दल आपुलकी, प्रेम वाटत आहे. सई अपघातात आपलं मातृत्व गमावून बसली म्हणून त्यांना मला या घरची सून करून घ्यायचं आहे. माझ्यापोटी राजवाडे घराण्याचा वारस जन्माला यावा अशी त्यांची इच्छा आहे पण नाही.. तसं नव्हतं. आणि हो.. मला अजून एक प्रश्न पडलेला. सई, तुझी बायको ती कशी तयार झाली तुझ्या आणि माझ्या लग्नाला? ती कसं काय आपली जागा दुसऱ्या स्त्रीला, मला देऊ शकते? तिचं प्रेम, तिचा नवरा शेअर करू शकते? पण सईला आधीच कल्पना होती. तसं काही घडणारच नाही. तिचा नवरा, त्याचं प्रेम कधीच कोणासोबत शेअर होणार नाही. म्हणून ती आनंदाने या सगळ्या गोष्टींसाठी तयार झाली. तिचं काय जाणार होतं? तिचं कोणतंच नुकसान होणार नव्हतं. सर्वात जास्त हानी तर माझी होणार होती. शरू, तू माझा आहेस. तुझंही माझ्यावर प्रेम आहे हा माझाच भ्रम होता. खरंतर तुझ्यासकट सर्वांनी फक्त गरजेपुरता माझा विचार केला. का शरू? फक्त गरज म्हणून? मी म्हणजे एक वस्तू आहे का रे? गरजेपुरती वापर करण्यासाठी? शरू, मी पण एक जिवंत माणूस आहे रे. मलाही मन आहे.. भावना आहेत ना रे..”

मीराचं बोलणं शर्विलच्या जिव्हारी लागत होतं. तिच्या बोलण्याने त्याला अपराधी वाटू लागलं होतं. तरीही स्वतःचं मत मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.

“मीरा, तुझं सगळं म्हणणं मला पटतंय पण तू जसा विचार करते तसं काही नाही गं. आपल्या घरातली माणसं इतकी वाईट नाहीत गं. आई तर तुझ्यावर किती जीव ओवाळून टाकते. सई तुला तिच्या बहिणीसारखी वागवते. कोणीही तुझा तुला वाटत तसं वस्तुसारखा गरजेपुरता उपयोग करत नाहीये. प्लिज गैरसमज करून घेऊ नकोस गं. तू माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस पण मीरा, माझं तुझ्यावर खरंच प्रेम नाही गं. माझं सईवर प्रेम आहे. फक्त सईवर..”

हे बोलताना शर्विलचा गळा भरून आला. डोळे पाण्याने गच्च भरून आले.

“ठीक आहे.. तुझं माझ्यावर प्रेम नाही पण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि माझं प्रेम मिळवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि माझं प्रेम मी मिळणारच. काही झालं तरी मी माझं प्रेम मिळवणारच..”

डोळे पुसत मीरा अत्यंत उद्वेगाने निर्वाणीच्या स्वरात म्हणाली.

“म्हणजे..?”

तिच्या बोलण्याचा अर्थ शर्विलला समजला नाही.

“शरू, तुझं माझ्यावर प्रेम नाही. ठीक आहे. पण ते प्रेम मला हवंय. तू मला विचारलं होतंस ना.. माझ्या बाळाची आई होशील का? आणि माझं उत्तर आताही तेच आहे. मी तुझ्या बाळाची आई व्हायला तयार आहे. पण तू म्हणतोस तसं नाही. ज्या स्पर्शसुखाला माझं मन आसुसलं होतं तो तुझा स्पर्श मला हवाय. ते स्पर्शसुख मला हवंय. सगळं नैसर्गिक.. कृत्रिमरित्या काही नको.. मी रोबोट नाही शरू, तू म्हणशील तसं करायला. माझ्याही इच्छा आकांक्षा आहेत. त्या पूर्ण कर. त्या मिलनाची तृप्तता मला हवीय.. तीही फक्त तुझ्याचकडून.”

मीरा छद्मी हसत म्हणाली. मीराच्या मनात शर्विलविषयी असलेल्या प्रेमाची जागा आता इर्षेने घेतली. त्याला मिळवणं हेच ध्येय तिच्या डोळ्यासमोर होतं.

“तू वेडी झालीयेस मीरा.. हे कसं शक्य आहे? सई माझ्यावर जीवापाड प्रेम करते. त्यामुळे असं वागणं म्हणजे सईसोबत, माझ्या प्रेमासोबत तिच्याही प्रेमाची प्रतारणा करणे होईल. नाही.. हे कधीच शक्य नाही. मी सईला फसवू शकत नाही. तिच्या वाट्याचं प्रेम दुसरं कोणाला देऊ शकत नाही.”

शर्विल निक्षून म्हणाला.

“ओके, मग मलाही तुझ्या बाळाची आई व्हायचं नाही. माझ्या अटीप्रमाणे होणार नसेल तर मी उद्या सकाळीच हे घर सोडून जातेय. सुधाकर काका, देवकी काकू, सईला काय उत्तर द्यायचं तुझं तू ठरव. आजची रात्र विचार कर. तुझा निर्णय बदलला तर सांग. नाहीतर माझा निर्णय मी तुला सांगितला आहे तो मान्य कर..”

असं म्हणून मीरा सूचक हास्य करत तडक खोलीच्या बाहेर पडली. शर्विल मात्र हतबल होऊन खोलीतून बाहेर पडणाऱ्या मीराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसला. ही मीरा त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होती. तिचं हे रूप पाहून त्याला घृणा वाटू लागली होती.

पुढे काय होतं? शर्विल मीराची अट मान्य करेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all