स्पर्श.. भाग २४

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..

स्पर्श..

भाग- २४


सई आनंदात राहण्याचा अतोनात प्रयत्न करत होती. कधीही आई होऊ शकणार नाही हे तिचं दुःख खूप मोठं होतं. हे दुःख कधीही सरणारं नव्हतं. घरात आता भयाण शांतता असायची. एकमेकांतला संवाद लोप पावत चालला होता. सर्वकाही पूर्ववत व्हावं आणि घरात सौख्य नांदावं म्हणून शेवटी सईने स्वतःच्या आनंदाला तिलांजली द्यायचं ठरवलं. शर्विल आणि आईबाबांच्या सुखासाठी सईने शर्विलशी बोलायचं ठरवलं. रात्रीच्या वेळी सर्व कामे उरकून सई झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत आली. शर्विल पुस्तक वाचत बसला होता. सई त्याच्या जवळ आली आणि शर्विलला म्हणाली.

“शरू, आपले आईबाबा वाईट नाहीत रे.. त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा योग्यच आहेत. त्यांच्या सुखाचा विचार करणं आपलं कर्तव्य आहे. शरू, राजवाडे घराण्याला तुझ्या रक्ताचा, तुझा अंश हवा आहे. ते दत्तक मूल स्वीकारणार नाहीत. शरू, माझं ऐकशील? तू दुसरं लग्न कर. त्यांच्या मनासारखं होऊ दे. मी जाईन परत रत्नागिरीला..”

“काय? आर यू आऊट ऑफ युअर माईंड? शुद्धीत आहेस का? हे कधीच शक्य नाही. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आणि कायम राहील अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत.. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. माझ्या प्रेमावर फक्त तुझा आणि तुझाच अधिकार आहे. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे तू माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करणं प्लिज सोडून दे..”

शर्विल आधी रागाने पण नंतर सईला प्रेमाने जवळ घेत हळवा होत म्हणाला. काही क्षण सईला स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटला. इतकं जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला या गोष्टीचा आभिमानही वाटला. शर्विल स्वतःच्या मतांवर ठाम होता आणि राजवाडे साहेब स्वतःचा हेका सोडायला तयार नव्हते. रोज घरात तणावाचं वातावरण असायचं. रोज कोणत्या ना कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. राजवाडे साहेब कधी देवकीला, कधी सईला तर कधी मीराला रागावून बोलत असत. सगळी चिडचिड त्यांच्यावर निघत होती. रोज राजवाडे साहेबांच्या खोलीतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येऊ लागला. आजही तसंच झालं. मीरा घरात साफसफाई करत होती आणि अचानक तिला राजवाडे साहेबांच्या मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला.

“देवकी, तुला माझं बोलणं समजतंय का? आपल्या घराण्याला वारस हवाय. एक दत्तक मुल राजवाडे घराण्याचा वारस होऊ शकत नाही. आपण शर्विलचं दुसरं लग्न करून देऊ. दोष सईमध्ये आहे. सईला मूल होऊ शकणार नाही. या जन्मात ते शक्यच नाहीये. पण आपल्या शर्विलमध्ये दोष नाही त्यामुळे दुसऱ्या मुलीला त्याच्यापासून मूल होऊ शकेल ना.. एकाच्या प्राक्तनाचे भोग आपण सर्वांनी का भोगायचे? आपल्या घराला वारस मिळालाच पाहिजे. आणि तोही आपल्या रक्ताचा.. मला बाकी काही माहित नाही.. माझा निर्णय ठरलाय.. आपण त्याचं दुसरं लग्न लावून द्यायचं..”

“अहो पण हे इतकं सोपं वाटलं का तुम्हाला? सईचं काय? ती कशी राहील? तिच्या मनाचा थोडा तरी विचार करा.. आपण आपली लेक म्हणून आणलीये तिला या घरात..”

देवकी त्यांना समजावत होती. पण राजवाडे साहेब काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शर्विलच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट मीराच्या कानावर पडली. माणसाचं मन ही प्रचंड क्लिष्ट गोष्ट आहे. कोणत्या परिस्थितीत कोणत्या क्षणाला मन काय विचार करेल कुणीही सांगू शकत नाही. इतके दिवसांत सईची मैत्रीण बनलेल्या मीराच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या. हल्ली हे कायम घडू लागलं. या सर्व संकटातून सुटका व्हावी आणि सईसाठी केलेला नवस पूर्ण करावा म्हणून देवकीने पूजा घालण्याचा निर्णय घेतला. गुरुजींनी चांगला मुहूर्त पाहून पूजेचा दिवस ठरवला. सई उत्साही वाटत नव्हती पण आईंच्या इच्छेखातर ती पूजेला बसायला तयार झाली होती. देवकी पूजेच्या तयारीला लागली होती. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे श्रावणातल्या शनिवारी पूजा करण्याचं ठरलं. देवकीची लगबग सुरू झाली. घरातल्या साफसफाईपासून ते बंगलाच्या खिडक्यांचे पडदे बदलण्यापर्यंत, सजावटीपासून ते बंगल्याच्या रंगरंगोटीपर्यंत सर्व तयारी सुरू झाली. देवकी घराला पुन्हा एकदा प्रसन्न करण्याचा, हरवलेलं चैतन्य पुन्हा मिळवून देण्याचा शक्य तो हरेक प्रयत्न करत होती. मोजक्या लोकांना आमंत्रणं देऊन झाली. आता फक्त उद्याच्या पूजेचं साहित्य आणणं बाकी राहिलं होतं. देवकी आणि मीरा ते आणण्यासाठी बाजारात निघाल्या होत्या.

“मीरा, आवरलं का तुझं? चल लवकर बरीच खरेदी करायची आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजेचं सगळं साहित्य आणायचं आहे. बाकीचं काम नंतर कर आल्यावर.. आता लवकर चल बरं..”

देवकी मीराला आवाज देत होती. देवकीने बंगल्याबाहेर येऊन ड्राईव्हरला गाडी काढायला सांगितलं.

“मीरा.. ए मीरा.. झालं का बेटा?”

देवकीने पुन्हा आवाज दिला.

“हो काकू, आले आले.. दोन मिनिटं फक्त..”

इतक्यात देवकीला बंगल्याच्या आवारात विराजची गाडी येताना दिसली. विराज गाडीतून खाली उतरला आणि चालत देवकीच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. तिला पाहून विराजने स्मितहास्य करत वाकून नमस्कार केला. देवकी पाठीवरून हात फिरवत आशीर्वाद देत म्हणाली,

“औक्षवंत हो.. कसा आहेस बाळा?”

“मी ठीक आहे काकू? तुम्ही कशा आहात? मी सईच्या रुटीन चेकअपला आलो होतो. तुम्ही कुठे बाहेर निघालात का?”

“अच्छा, मी पण ठीक आहे. जरा बाजारात जाऊन येते. उद्या पूजा आहे ना.. त्याचीच तयारी सुरू आहे. पूजेचं साहित्य आणायचं आहे. मी आलेच. शर्विल आणि सई आहे आत. तू थांब हं.. जाऊ नकोस मी आल्याशिवाय. मस्त जेवण करूनच जा.” - देवकी

विराजने होकार दिला आणि देवकीकडे पाहत आत घरात जाऊ लागला. इतक्यात मीरा मागे बघत घाईने दरवाजाच्या दिशेने येत होती. घरातून बाहेर पडताना तिची विराजसोबत टक्कर झाली. थोडंसं त्रासिकपणे तिने त्याच्याकडे पाहिलं.

“सॉरी, माझं लक्ष नव्हतं.. शर्विल?”

विराज मीराकडे पाहून म्हणाला.

“आहे आत.. आपण? ” - मीरा

“मी विराज.. सईच्या चेकअपसाठी..” - विराज

“अरे विराज.. ये.. ये ना आत.”

इतक्यात शर्विल बाहेर आला आणि त्याने विराजला आवाज दिला. तो त्याला घेऊन त्याच्या खोलीत आला. सई तिथेच खोली आवरत होती. विराजने तिचं चेकअप केलं. चालू असलेली औषधं तपासून पाहिली.

“व्वा..! एक्सेलन्ट..! छान प्रगती आहे सई.. ”

विराज आनंदाने म्हणाला. सईची प्रकृती सुधारत आहे पाहून विराजला आनंद झाला. सईने हसून विराजकडे पाहिलं. चेकअप झाल्यानंतर शर्विल विराजला बाहेर हॉलमध्ये घेऊन आला आणि दोघे गप्पा मारत बसले. पण विराजला शर्विल चिंतीत वाटला. सईसुद्धा त्याला थोडी नाराजच दिसत होती. कारण विचारलं तेंव्हा शर्विलने घरात घडलेला प्रसंग सांगितला.

“आता तूच सांग विराज, बाबांचं म्हणणं मी कसं मान्य करू? त्यांना माझं म्हणणं पटत नाही आणि मी त्यांचं ऐकू शकत नाही. आणि तुला माहितेय बाबांना समजावणं म्हणजे महाकठीण काम..”

त्या दोघांचं बोलणं सुरू होतं इतक्यात राजवाडे साहेब तिथे आले. शर्विलचं बोलणं त्यांच्या कानावर पडलं.

“चुकीचं काय आहे त्यात? आणि मला समजून सांगण्याचा प्रश्नच येत नाही. तुला समजत नाहीये.”

राजवाडे साहेब चिडून म्हणाले. शर्विलही रागावला होता. विराज मात्र काही वेगळाच विचार करत होता. त्या दोघांना शांत करत विराजने त्यांना समोर बसवलं आणि तो बोलणार इतक्यात सई विराज आणि शर्विलसाठी कॉफी घेऊन आली. राजवाडे साहेबांचा चढलेला पारा पाहून टीपॉयवर कॉफी ठेवून ती तिथून निघून जाऊ लागली.

“थांब सई, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. म्हणजे मी आता जे यांना बोलणार आहे त्यात तुझं मत सुद्धा खूप महत्वाचं आहे.. ”

विराजचं बोलणं ऐकून सई तिथेच बाजूला थांबली. एक दीर्घ श्वास घेत विराज बोलू लागला.

“काका, शर्विल आणि सई आता मी जे बोलतोय ते आधी शांतपणे ऐकून घ्या. लगेच उद्विग्न होऊ नका. काका, तुम्हांला शर्विलचं म्हणणं मान्य नाही. अनाथाश्रमातून दत्तक घेतलेलं मूल तुम्हाला वारस म्हणून नकोय आणि दुसरं लग्न करायला शर्विलचा नकार आहे. या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर आपापल्या जागी तुम्ही मला पटता. त्यामुळे आपण काहीतरी सुवर्णमध्य काढायला हवा. शर्विल आणि सई तुम्हांला जास्त समजावून सांगावं लागणार नाही. तरीही सांगतो. शर्विल, आपण ‘सरोगेट मदर"चा पर्याय निवडला तर..? म्हणजे मग तुला दुसरं लग्न करावं लागणार नाही आणि काकांची जी इच्छा आहे तिचाही प्रश्न मिटेल.”

शर्विल आणि सईने विराजकडे थोडं आश्चर्यचकित होऊन पाहिलं. आणि पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. राजवाडे यांना बहुतेक ही गोष्ट समजली नसावी. ते साशंक नजरेने विराजकडे पाहू लागले. विराजने ते ओळखलं आणि तो त्यांना समजावू लागला.

“काका, सरोगसी म्हणजे थोडक्यात आपल्या शर्विलचा अंश दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात वाढणार. पूर्वी परदेशात पण हल्ली इथे भारतातही हा पर्याय अगदी सहज सुचवला जातो. मला आश्चर्य वाटतं आहे की डॉक्टर असूनही या दोघांना हा पर्याय का नाही सुचला..”

“म्हणजे मला नीट समजावून सांग बेटा, अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांग.”

“सांगतो काका, अगदी सोप्या भाषेत सांगतो.. वैद्यकीय क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे ना काका की हल्ली फार कमीवेळा कोणत्याही समस्येवर पर्याय उपलब्ध नसतो. कितीतरी जोडपी सुखाने आपला संसार फुलवत आहेत याच मार्गाने.. पुरुषामध्ये जर काही समस्या नसेल आणि फक्त स्त्रीमध्ये गर्भधारणेसाठी काही समस्या येत असेल. तर पुरुषाचे बीज कृत्रिमरित्या अशा स्त्रीच्या गर्भात सोडले जाते जी गर्भधारणेसाठी अगदी निरोगी आहे. यामध्ये प्रत्यक्ष मिलन होत नसल्याने कसलाच तिढा येत नाही.अशा स्त्रिया आजकाल सहज उपलब्ध होतात ज्या आपले गर्भ अशा कामासाठी भाड्याने देतात. या प्रक्रियेला सरोगसी आणि अशा स्त्रियांना सरोगेट मदर म्हणतात. त्या मोबदल्यात त्यांना एक ठराविक रक्कम आपण द्यायची. नऊ महिने गर्भ धारण करून बाळाला जन्म दिल्यावर बाळ आपल्या ताब्यात दिलं जातं.”

“अरे पण त्या बाईने हक्क सांगितला तर नंतर बाळावर?”

मन लावून विराजचे बोलणे ऐकताना राजवाडे साहेबांनी शंका उपस्थित केली.

“कसं आहे काका, मुळात ना ही सगळी प्रक्रिया कायदेशीर करता येते. लिखित स्वरूपात प्रतिज्ञापत्र वगैरे कायदेशीर मार्गानेच जायचं असतं. त्यामुळे आपल्याला सर्व अटी मान्य करवून घेता येतात आधीच. तरीही आपण शक्यतो आपल्या विश्वासातल्या एखाद्या स्त्रीला तयार केल्यास पुढे कुठलीच अडचण येत नाही.”

विराजने त्यांची शंका दूर करत पुढे बोलायला सुरुवात केली.

“यात अट तशी एकच की मुलाला जन्म देणारी स्त्री शारीरिकदृष्ट्या निरोगी असावी. आणि तिने याआधी किमान एका निरोगी बाळाला जन्म दिलेला असावा. म्हणजे थोडक्यात तिला गर्भधारणेचा आणि बाळाला जन्म देण्याचा अनुभव हवा. म्हणजे मग झालं.”

विराजचं बोलणं ऐकून शर्विल आणि सई खूप आनंदून गेले. विशेष म्हणजे ही कल्पना राजवाडे साहेबांना सुद्धा आवडली. शर्विलचा अंश आपल्या घरी येणार. दत्तक मूल घेण्याची गरज पडणार नाही या भावनेने ते सुखावले. पण अशी विश्वासू स्त्री कुठे शोधायची? जी शर्विलच्या बाळाला जन्म देऊन विनातक्रार इथून निघून जाईल. ते विचार करू लागले. आणि एकदम त्यांचा चेहरा आनंदाने फुलून आला. जणू काही त्यांना त्यांच्या सुखाची चावी मिळाली होती.

“मिळाली ती स्त्री? तुमच्या भाषेत ‘सरोगेट मदर’.. ”

राजवाडे साहेब आनंदाने जवळ जवळ किंचाळलेच. सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

“कोण बाबा?”

शर्विलने प्रश्न केला.

“अरे आपली मीरा..”

“काय? बाबा काय बोलताय तुम्ही? मीरा? कसं शक्य आहे हे? नाही बाबा.. शक्य नाही हे..” - शर्विल

“का नाही? काय वाईट आहे? - राजवाडे साहेब.

“पण बाबा ती का तयार होईल या सर्व गोष्टींसाठी?”-शर्विल

“राजवाडे घराण्याचा अंश स्वतःच्या उदरात वाढवण्याचं भाग्य ती का नाकारेल? सी शर्विल, आपल्याला आपला वारस हवाय आणि तिचं बाळ याआधी गेलंय. त्यामुळे तिचं दुःख हलकं होईल. तिला पुन्हा एकदा आई होण्याची संधी मिळेल.. ती का नाही म्हणेल..?”


पुढे काय होतं? शर्विल, सई या गोष्टीला तयार होतील? मीरा या प्रसंगी कशी वागेल? राजवाडे यांचा यामागे कोणता डाव तर नसेल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे ( अनुप्रिया)

🎭 Series Post

View all