स्पर्श.. भाग २२

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..


स्पर्श..

भाग- २२

सई घरी येणार म्हणून राधाई बंगला छान सजला होता. मीराने आणि देवकीने सईच्या स्वागताची छान तयारी केली. दारावर फुलापानांचे तोरण लावले. दारात सुबक रांगोळी काढली. मीराने छान पंचपक्वान्नाचा बेत केला. त्यात सईच्या आवडीची खीर आणि शर्विलच्या आवडीचा बदामाचा शिरा बनवला. पंचारतीचं ताट तयार केलं आणि दोघीजणी त्यांच्या येण्याची वाट पाहू लागल्या. थोड्याच वेळात शर्विलची गाडी राधाईच्या बंगल्यात शिरली. शर्विल आणि राजवाडे साहेब आधी खाली उतरले. त्यानंतर शर्विलने अलगद सईला बाहेर काढलं. राजवाडे साहेब आणि शर्विल दोन्ही बाजूने तिला पकडून हळूहळू चालत होते. दोघांच्या आधाराने हळूहळू पाऊल टाकत ती दारापाशी आली. देवकीने मीराला पंचारतीचं ताट आणायला सांगितलं. देवकीने तिचं औक्षण केलं. भाकरीचा तुकडा सईवरून ओवाळून टाकला. धान्याच्या राशीचं भरलेलं माप उंबरठ्यावर ठेवलं आणि तिला आत येण्यास सांगितलं.

“स्वागत बेटा, एका नवा जन्म घेऊन आलीस. वाईट नजरेपासून ईश्वर तुझं कायम रक्षण करो. लवकरात लवकर बरी हो गं पोरी.. तुझ्या मनातल्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण होवोत. सुखी रहा गं बाळा..”

देवकीने सईला भरभरून आशिर्वाद दिला. सईने गोड स्मित हास्य करत पुन्हा एकदा माप ओलांडून गृहप्रवेश केला. आत येताच तिची नजर मीरावर पडली. ती हसून म्हणाली,

“तू मीरा ना.?”

“हो..”

“खूप ऐकलंय शरूकडून त्याच्या या गोड मैत्रिणीविषयी. शरूची अगदी खास जवळची मैत्रीण..”

मीरा हसत पुढे आली तिचा हात हातात घेऊन म्हणाली,

“हो.. आणि आतापासून तुझीसुद्धा मैत्रीण. यापुढे तुझी सगळी जबाबदारी माझी. मी घेईन तुझी काळजी. तुला काय हवं नको ते तू मला सांगत जा..”

तिच्या या अनपेक्षित उत्तराने सईला मीराचा स्वभाव एकदम भावला. मीराच्या गोड आणि प्रेमळ बोलण्याने सई एकदम प्रभावित झाली. पहिल्याच दिवशी मीराच्या बोलण्याने तिला तिच्याबद्दल प्रेम, आपुलकी वाटली. देवकी शर्विलला म्हणाली,

“शरु.. सईला तुमच्या खोलीत घेऊन जा. मीरा, शरूला मदत कर बेटा..”

“हो काकू..”

असं म्हणत तिने एका बाजूने सईला पकडत दोघांनी तिला सावरत हळूहळू त्यांच्या खोलीत नेलं आणि बेडवर झोपवलं. मीरा सईला म्हणाली,

“सई, तू आराम कर. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते.”

“नको गं.. मला आता भूक नाही वाटल्यास कॉफी आणलीस तर बरं होईल.”

“हो आणते ना.. तुला आवडते तशी एकदम स्ट्रॉंग.. मला माहितेय बरं..”

मीरा हसत शर्विलकडे पाहत म्हणाली आणि खोलीच्या बाहेर जाण्यास निघाली. इतक्यात तिला काहीतरी आठवलं आणि ती मागे वळली. शर्विलने सईला जवळ घेतलं आणि तिच्या माथ्याचे चुंबन घेतलं. ते पाहून मीरा अस्वस्थ झाली. पटकन त्यांच्या खोलीच्या बाहेर आली.

त्यानंतर हे अगदी रोजच घडू लागलं. शर्विलचं सईला त्यांच्या सांकेतिक भाषेत बोलणं आणि त्यावर सईचं मोहरून जाणं नेहमीचं होत होतं. सईची आणि मीराची मैत्री झाली खरी पण त्यांचं एकत्र वावरणं मीराला व्याकुळ करत होतं. शर्विल आणि सई एकत्र हसताना, थट्टा मस्करी करताना दिसू लागले. घरात हसण्या खिदळण्याचे स्वर ऐकू येऊ लागले. मीरा त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांना एकमेकांना बिलगून बसलेलं पाहून मीराला वाईट वाटू लागलं. एकदा तर ती नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांचा ब्रेकफास्ट घेऊन त्याच्या खोलीचं दार ढकलून सरळ आत आली. समोर सई शर्विलच्या मिठीत होती आणि शर्विल तिच्या ओठांचं दीर्घ चुंबन घेत होता आणि तिची बोटे त्याच्या केसात गुंतली होती. शर्विलचे हात तिच्या सर्वांगावर फिरत होते. दोघेही एकमेकांच्या स्पर्श सुखात गुंग होते. आजूबाजूच्या जगाचा जणू त्यांना विसर पडला होता. दोघेही भान हरपून आवेगाने एकमेकांना चुंबन करत होते. मिठी घट्ट होत होती. समोरचं दृश्य पाहून मीराच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. आणि पुढच्या क्षणाला तितकीच असुया दाटून आली. ती पटकन मागे फिरली. एक विचित्र भावना मनात दाटून आली. मीराला असं अचानक खोलीत आलेलं पाहून दोघांची एकदम धांदल उडाली. सई एकदम ओशाळून खाली पाहू लागली. तिचं असं अचानक आलेलं शर्विलला मुळीच आवडलं नव्हतं. तो तिच्यावर चिडून म्हणाला,

“तुला खोलीत येण्याआधी नॉक करता येत नाही का? आता ही साधी गोष्टही तुला सांगायला हवी का?”

शर्विलचं असं तोडून बोलणं मीराच्या जिव्हारी लागलं. तिचे डोळे भरून आले.

“सॉरी, चुकलंच माझं.. पुन्हा नाही असं होणार.”

दाटल्या कंठाने ती इतकंच म्हणू शकली. त्यांचा ब्रेकफास्ट बाजूच्या टेबलवर ठेवला आणि तडक खोलीतून बाहेर निघून आली. मीरा शर्विलच्या बोलण्याने दुखावली गेली होती. पण त्याहीपेक्षा सईला त्याच्या इतकं जवळ पाहून तिच्या मनात प्रचंड उलथापालथ झाली होती. तिचं तिलाच समजलं नाही पण आत काहीतरी ढवळलं गेल्याचा भास झाला. मीरा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा जितका प्रयत्न करत होती तितक्याच तीव्रतेने तो प्रसंग तिला आठवत होता. डोळ्यांत पाणी येत होतं. पण ते चित्र धूसर होण्याऐवजी जास्त गडद होत होतं. तिच्या मनाबरोबर तनाला शर्विलच्या स्पर्शसुखाची ओढ पुन्हा उफाळून येऊ लागली होती. आपलं ज्याच्यावर इतकं प्रेम आहे तो आपल्या मिठीत नसून दुसऱ्या कोणाच्यातरी मिठीत आहे या कल्पनेने तिला रडू कोसळत होतं. ज्या स्पर्श सुखावर तिचा अधिकार आहे तो तिला न मिळता ते सुख दुसरं कोणीतरी उपभोगतंय हे मीराला सहन होत नव्हतं पण तिचा नाईलाज होता. ज्या घराने आसरा दिला, आजन्म तिच्यावर उपकार केले त्यांना, देवकी काकूला दुखवून त्यांना अडचणीत टाकून ती अशी घर सोडून जाऊ शकत नव्हती. त्यामुळे हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता.

दिवसांमागून दिवस सरत होते. सईची प्रकृती सुधारत होती. मीरा तिची काळजी घेत होती. घरातली सर्व कामे करून तिला काय हवं नको ते सारं काळजीने पाहत होती. शर्विलचं ‘देवकी क्लिनिक’ पुन्हा सुरू झालं. सई आता पूर्वीसारखी चालू बोलू लागली. सर्वांशी पूर्वीसारखी मिळून मिसळून राहू लागली. देवकीला स्वयंपाक घरात मदत करू लागली. सगळं पूर्वीसारखं सुरळीत सुरू झालं. सुनेच्या बरं होण्याने राजवाडे साहेब आणि देवकीची काळजी मिटली होती. सर्वजण आनंदात होते पण शर्विल मात्र सतत कसल्यातरी चिंतेत असायचा. सईच्या काळजीने चिंतीत व्हायचा. एक दिवस सई त्यांची खोली आवरत होती. तिने शेजारी बसलेल्या शर्विलला दोनदा आवाज दिला पण त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. आपल्याच विचारात तो गुंग होता.

“ शरू, काय झालंय तुला? कधीपासून तुला आवाज देतेय लक्ष कुठेय तुझं?”

सईने त्याला हलवून विचारलं तशी त्याची तंद्री भंग पावली.

“काय.. काय गं?”

“तुझं काय सुरु आहे ते सांग आधी.. शरू, काय झालंय सांग. बऱ्याच दिवसांपासून पाहतेय तू कसल्यातरी विचारात गर्क असतोस. काही टेन्शन आहे का तुला? क्लिनिकमध्ये काही झालंय का? सांग मला..”

सईने त्याला असं चिंतीत पाहून विचारलं.

“नाही गं.. खरंच काही नाही. तू उगीच काळजी करू नकोस. सगळं ठीक आहे..”

हे बोलताना मात्र तो सईची नजर चोरत बोलत होता. तो काहीतरी लपवत आहे. हे सईच्या ध्यानात आलं होतं पण नेमकं काय आणि का? हेच तिला समजत नव्हतं. त्याच्या जवळ येत त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली,

“शरू, हेच तू माझ्या डोळ्यांत पाहून सांग. काय लपवतोयस तू माझ्यापासून? तुला असं चिंतीत पाहून मला खूप त्रास होतो रे..”

हे बोलताना तिचा आवाज थरथरला डोळे भरून आले. ते पाहून शर्विललाही वाईट वाटलं तिला कुशीत घेत तो म्हणाला,

“काही नाही बच्चू, सगळं ठीक आहे..”

पण त्याचा कातरलेला स्वर ऐकताच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

“काहीतरी मोठं घडलंय आणि शरू माझ्यापासून लपवतोय. पण काय? कोणाला माहित असेल? आईला? की मीराला? त्यांनाच विचारून पाहते.. हा काही सहज सांगायचा नाही..”

त्याच्या कुशीत बिलगून असलेल्या सईच्या डोक्यात अनेक विचार फेर धरू लागले. ती शांत झाली. पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. शर्विल तिला समजावत म्हणाला,

“पिल्लू तू रडू नको गं. तुझ्या डोळयांत मी कधीच पाणी पाहू शकत नाही. मी सांगेन तुला वेळ आली की.. तू आधी शांत हो.. आणि ऐक ना, माझं डोकं खूप दुखतंय. मला कॉफी करून आणतेस का आणि गोळी पण दे ना..”

तिने होकारार्थी मान डोलावली आणि कॉफी बनवण्यासाठी खोलीतून बाहेर पडली. ती बाहेर गेल्यावर त्याने विराजला कॉल केला. शर्विलने हॅलो म्हणताच विराज बोलू लागला.

“हॅलो शर्विल बोल रे, कसा आहेस? सई कशी आहे?”

“मी ठीक आहे. सईसुद्धा आता बरी आहे. हळूहळू घरातली सर्व कामे करतेय. लवकरच क्लिनिकला यायचं म्हणतेय.. सगळं ठीक आहे पण मी तुला वेगळ्या कारणासाठी कॉल केला होता.” - शर्विल

“हं बोल ना.. तसं मी एक दोन दिवसात सईच्या रुटीन चेकअपसाठी येणारच आहे तरीपण तू सांग आता काय झालंय?” - विराज

“विराज, मला खूप टेन्शन आलंय रे.. आता सई बरी झालीय तरी तिला अजून मी काहीच सांगितलेलं नाहीये. कसं सांगू कळत नाहीये रे मला पण तिच्यापासून लपवून चालणार नाही ना. कधीतरी तिला हे सत्य उमजेलच की.. त्याआधी आपण तिला हे सांगायला हवं.. ती आई होऊ शकत नाही, या सत्याला ती कशी सामोरी जाईल, या कल्पनेनेच मनाचा थरकाप उडतो रे..”

दोघांचं बोलणं सुरू असतानाच कसलातरी आवाज झाला. त्याने मागे वळून पाहिलं. सई दारात उभी होती. तिच्या हातातला ट्रे खाली पडला होता. ती स्तब्ध झाली. डोळ्यांत पाणी साठू लागलं.

“विराज, मी तुझ्याशी नंतर बोलतो.”

असं जेमतेम म्हणून त्याने पटकन फोन ठेवून दिला आणि धावत सईजवळ आला. सईला भोवळ येऊन ती कोसळणार इतक्यात शर्विलने पुढे येऊन तिला सावरलं. त्याने तिला आत आणून बेडवर झोपवलं. भांडी पडल्याच्या आवाजाने मीरा धावत त्यांच्या खोलीच्या दारात आली.

“अरे, हे काय झालं?”

असं म्हणत ती आत येऊन कपाच्या फुटलेल्या काचा गोळा करू लागली.

“अगं काही नाही.. सईच्या हातून ट्रे पडला.”

शर्विलने उत्तर दिलं. सई शांतच बसून होती. मीराला तिचं वागणं थोडं विचित्र वाटलं पण काही न बोलता तिने सगळं साफ केलं आणि तिथून निघून गेली. सईचे डोळे पाण्याने गच्च भरले. शर्विलने तिचा हात हातात घेतला.

“सई, मी तुला सगळं सांगणारच होतो पण धीर होत नव्हता. तुझ्या प्रकृतीची काळजी वाटत होती. तुझा झालेला अपघात खूपच भीषण होता. संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या होत्या. जबर मार लागला होता तुझ्या पोटाला आणि ओटीपोटालाही. शिवाय कारच्या काचा पूर्णपणे शरीरात घुसल्या होत्या. पोटाजवळच्या संपूर्ण भागाला खूप गंभीर इजा झाली होती. त्यामुळे तुझं गर्भाशय काढून टाकण्याशिवाय डॉक्टरांकडे कोणताच पर्याय उरला नव्हता. तुझा जीव वाचवणं जास्त महत्वाचं होतं. म्हणून तो निर्णय घ्यावा लागला. तू एक डॉक्टर आहेस. तू हे सारं समजू शकतेस.”

एका दमात शर्विलने सगळं सांगून टाकलं. सई सारं शांतपणे ऐकत होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

“सई, बोल ना गं.. अशी गप्प राहू नकोस.. माझा जीव कासावीस होतोय. प्लिज बोल ना..”

शर्विल काकुळतीला येऊन बोलत होता. सई काहीच बोलत नव्हती. सईचं असं गप्प राहणं शर्विलला खूप त्रास देत होतं. शेवटी तिने डोळे पुसले आणि म्हणाली,

“शरू, हे काय झालं रे.. आणि माझ्याचसोबत का? किती स्वप्नं पाहिली होती रे मी.. मला माफ कर. मी आता आई होऊ शकणार नाही. मी तुला बाबा होण्याचं सुख देऊ शकत नाही.. मला खरंच माफ कर..”

तिला पुढचं काही बोलवेना. दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवत सई धाय मोकलून रडू लागली. तिचे दोन्ही हात चेहऱ्यावरून बाजूला करत शर्विलने तिचा चेहरा ओंजळीत घेतला. तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकवले आणि म्हणाला,

“अगं वेडी आहेस का? मला तुझ्याशिवाय काहीच महत्त्वाचं नाही. सई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत माझं प्रेम कमी होऊ शकत नाही. जे घडलं ते आपण बदलू शकत नाही. त्यामुळे त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाहीये राणी.. जे होईल त्याला आपण दोघांनी मिळून सामोरं जायचं. दोघांनी मिळून संकटाचा सामना करायचा. समजतंय ना तुला?”

शर्विलने तिला कुशीत घेत प्रेमाने तिच्या केसांत चुंबन केलं.

“हे आईबाबांना माहित आहे?”

शर्विलने नकारार्थी मान हलवली.

“मग ही गोष्ट सर्वात आधी आईबाबांना सांगायला हवी..”


शर्विल काय म्हणेल? देवकी आणि राजवाडे साहेबांना समजल्यावर पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात.


क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all