स्पर्श.. भाग २१

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..


स्पर्श..

भाग- २१

सईला स्पेशल रूममध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांनी देवकी आणि राजवाडे साहेबांना आत जाण्याची परवानगी दिली. खरंतर छोट्या मोठ्या आजारासाठी जवळच्याच दवाखान्यात जाऊन उपचार घेणारी देवकी मुलगा डॉक्टर झाल्यावर तर घरच्या घरीच उपचार करून घ्यायची. पण आज तिच्याच काळजाच्या तुकड्यासाठी पहिल्यांदा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आली होती. आजूबाजूला असे अनेक व्याधीग्रस्त लोक बेडवर पडलेले तिला दिसले. प्रत्येकाजवळ ज्याची त्याची वेगळी वेदना होती. एक वेगळी कहाणी. अपघात झालेल्यांचा एक वेगळा विभाग होता. हॉस्पिटल स्वच्छ असलं तरी औषधांचा वास आणि तिथलं ते वातावरण तिच्या अंगावर आलं. तिच्यासाठी हे सारं वेगळं आणि असहनीय होतं. देवकीला हॉस्पिटलचं ते रूप खूपच त्रासदायक वाटत होता. तिच्या डोळ्यांसमोर सईचा चेहरा आला. नर्सने देवकीला सईचा रूम दाखवला. पेशंटशी जास्त बोलू नका असं बजावत ती तिथून निघून गेली. देवकी आत आली. सईची अवस्था खूपच वाईट झाली होती. अंगभर ठिकठिकाणी पांढऱ्या रंगाचं बँडेज गुंडाळलं होतं. तोंडावर काळे निळे डाग पडले होते. तिचा तो अवतार पाहून देवकीला गळा दाटून आला. डोळ्यांतलं पाणी लपवत देवकीने सईला आवाज दिला.

“सई.. ए बाळा.. डोळे उघड बरं. कोण आलंय बघ. माझ्याकडे बघ सई.. तुझी आई आलीय पिल्ल्या..”

देवकी बोलता बोलता थांबली. कंठात दाटून आलेला उमाळा आवरला आणि तिच्या डोक्यावरून अलगद हात फिरवला. देवकीच्या स्पर्शाने सईच्या चेहऱ्यावर हालचाल झाली. तिने डोळे किंचितसे उघडले समोर देवकीला पाहताच सईचे डोळे पाझरू लागले.

“आई.. आई..”

सईने देवकीला घातलेली आर्त साद तिच्या क्षीण आवाजातून जरी व्यक्त होत नसली तरी तिच्या डोळ्यांत ती आर्तता देवकी पाहू शकत होती. ती हाक आत कुठेतरी तिला हेलावून सोडत होती.

“आई, काय.. झालं ओ हे.. आपलं सरप्राईज..”

सई क्षीण स्वरात अडखळत इतकंच बोलू शकली. तिला बोलतानाही त्रास होत होता. तिचं बोलणं मध्येच थांबवत देवकी म्हणाली,

“काही झालेलं नाहीये बाळा, एक छोटासा अपघात झालाय फक्त. लवकरच बरी होशील तू आणि आपण सगळे मिळून आपल्या घरी खूप दंगा करत असू.. बघ तू.. आता शांत झोपून रहा आराम कर. जास्त बोलायचं नाही. जखमा ओल्या आहेत ना. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. कसलीही चिंता करायची नाही. ”

देवकी सईला समाजावत होती. सईने आजूबाजूला पाहिलं बाबा समोर उभे होते. पण तिला शर्विल कुठेच दिसला नाही. ती बैचेन झाली. तिची नजर शर्विलला शोधत होती. ही गोष्ट देवकीच्या लक्षात आली.

“शरू..”

सईच्या तोंडून पुसटसे शब्द बाहेर पडले.

“हो.. शरू येईल हं बाळा, आताच घरी गेलाय. येईलच इतक्यात. तू शांत झोप बरं.”

इतक्यात तिथे नर्स आली.

“तुम्ही थोडं बाहेर जाऊन बसा. मला यांचं ड्रेसिंग करायचं आहे.”

असं म्हणत तिने सईला लावलेली सलाईन चेक केली. देवकी आणि राजवाडे साहेब रूमच्या बाहेर आले. थोड्याच वेळात शर्वील तेथे आला. देवकीने सईला भेटल्याचं सांगितलं. लवकरच सगळं छान होईल असं म्हणून त्याला आश्वस्त केलं.

“आई किती स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतेय. मला वाटलेलं ती घाबरेल पण इथे तर तीच मला आधार देतेय..”

त्याही परिस्थितीत शर्विलला आपल्या आईचं खूप कौतुक वाटलं. थोड्या वेळाने त्याने त्या दोघांना घरी जायला सांगितलं. आणि तो डॉक्टर नाडकर्णीना भेटायला गेला. त्यांना भेटून सईच्या प्रकृतीबद्दल विचारलं. सगळे रिपोर्ट्स पुन्हा एकदा पाहून घेतले. आणि उपचाराची एक दिशा ठरवली. त्यानंतर शर्विलने सईच्या आईबाबांना त्यांच्या घरी फोन केला. समोर देशमुख बोलत होते.

“हॅलो जावईबापू, कसे आहात? सई सुखरूप पोहचली ना? तिला पोहचल्यावर फोन करायला सांगितला होता पण सासरी गेली आणि आम्हाला विसरली बहुतेक.”

देशमुख हसून म्हणाले.

“बाबा, मी सांगतोय ते फक्त शांतपणे ऐका. रत्नागिरीहून येत असताना इथे नाशिकजवळ सईचा अपघात झाला. ईश्वराच्या कृपेने सई आता सुखरूप आहे. तुम्ही काळजी करू नका. आता सध्या सिटी हॉस्पिटलला ऍडमिट केलं आहे. आता तिची प्रकृती स्थिर आहे घाबरण्याचं काहीच कारण नाही.”-शर्विल

“काय..? हे कधी झालं? आणि तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं कसं नाही?” - देशमुख

“अहो बाबा, मी मुद्दामच नाही सांगितलं तुम्ही काळजी करत बसाल म्हणून. उगीच तुमच्या जीवाला घोर लागून राहिला असता. पण बाबा आता सई एकदम ठीक आहे. तुम्हाला भेटायचं असेल तर जरूर या पण सावकाश या. आईंना पण सांगा काळजी करण्याचं काहीच कारण नाही.”

“पांडुरंगा.. ठीक आहे.. आम्ही लगेच तिकडे यायला निघतो..”

देशमुख कसेबसे म्हणाले. त्यांनी सईच्या अपघाताची बातमी सांगितली तशी सईच्या आईला धक्काच बसला. ती आक्रोश करू लागली. ताबडतोब सगळी तयारी करून ते लगेच त्याच दिवशी गाडीला बसून दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला पोहचले. सईची अवस्था पाहून तिच्या आईबाबांच्या डोळ्यातलं पाणी काही केल्या थांबेना. एकीकडे लेकीला होणाऱ्या वेदनेमुळे जीव पिळवटून निघत होता तर दुसरीकडे आपल्या पोटच्या गोळ्याला असं मृत्यूच्या दारातून परत आलेलं पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. शर्विल त्यांना समजावून सांगत होता. काहीही काळजी करण्याचं कारण नाही. निश्चिन्त रहा. असं वारंवार सांगून धीर देत होता. सईचे आईबाबा दोन चार दिवस सईसाठी नाशिकमध्ये थांबले होते. राजवाडे साहेब त्यांना घरी घेऊन आले. सईची अवस्था आठवून तिची आई देवकीच्या गळ्यात पडून रडू लागली. देवकी तिचं सांत्वन करत होती. काही दिवसांनी ‘सईची काळजी घ्या’ असं म्हणून सईच्या आईबाबांनी सर्वांचा निरोप घेतला आणि ते परत रत्नागिरीला आपल्या घरी परतले. तरी ते रोज फोन करून सईच्या तब्येतीची चौकशी करत होते.

आता रोज शर्विल तिची काळजी घेऊ लागला होता. तिला पुन्हा नव्याने उभं राहण्यास मदत करत होता. वरचेवर विराजला कॉल करून अपडेट्स देत होता. तिची प्रगती सांगत होता. तो स्वतः एक डॉक्टर असल्याने तो सईवर चांगले उपचार आणि तिची योग्य ती काळजी घेत होता. बघता बघता सईला हॉस्पिटल मध्ये भरती होऊन महिना- दीड महिना उलटून गेला होता. सई आता बरी होऊ लागली होती. आता जखमा भरू लागल्या होत्या. शर्वीलच्या प्रेमाने जणू सईला जगण्याची उभारी मिळत होती. शर्विलचं सईवर जीवापाड प्रेम होतं आणि आता तर ते कैकपटीने वाढलं होतं. आता शर्विल सईची जास्त काळजी घेत होता. सतत तिच्या जवळ असायचा. दिवसातल्या थोड्या वेळाकरता तो घरी जाऊन येत असे. बाकी सर्व वेळ तो सई सोबत हॉस्पिटलमध्ये बसून राहत असे. सईला पूर्णपणे बरं वाटेपर्यंत ते दुसरा कोणताच विचार करणार नव्हता. सईसुद्धा स्वतः एक डॉक्टर असल्याने तीही स्वतःची काळजी घेत होती. लवकर बरं होण्यासाठी प्रयत्न करत होती. शार्विलच्या आधाराने सई हळूहळू उठून चालू शकत होती. अजून स्वतःच्या हाताने नीट जेवता येत नव्हतं. पण पहिल्यापेक्षा बरीच सुधारणा होती. शर्विलचं प्रेम, त्याचं काळजीने न कंटाळता मनापासून सर्व करणं तिला त्याचं खूप कौतुक वाटू लागलं आणि इतका चांगला नवरा मिळालाय म्हणून स्वतःच्याच नशिबाचा हेवाही!

आता सईची प्रकृती झपाट्याने सुधारत होती. एक दिवस शर्विल सईजवळ बोलत बसला होता. थोड्या वेळापूर्वी डॉक्टर तिचं रुटीन चेकअप करून गेले होते. इतक्यात सई शर्विलला म्हणाली,

“शरू अजून किती दिवस थांबावं लागणार आहे रे.. मला इथल्या या हॉस्पिटलच्या वातावरणाचा आता कंटाळा आलाय अगदी.. मला घरी जायचं आहे. चल ना आपण घरी जाऊया..”

“अगं पण अजून तू पूर्णपणे बरी झाली नाहीस. तुला धड नीट चालताही येत नाही. कसं घरी जायचं? आता इतके दिवस काढले त्यात अजून थोडेच दिवस ना राणी..”- शर्विल

“बच्चा ऐक ना, आपण दोघेही डॉक्टर आहोत. माझी काळजी घेऊ शकतोच ना.. तू हवंतर डॉक्टर नाडकर्णीना विचार. वाटल्यास घरी गेल्यावर आपण एखादी पूर्णवेळ नर्स ठेवू जी माझी काळजी घेऊ शकेल आणि आईलाही त्रास होणार नाही.”

शर्विलला सईच्या डोळ्यांत घरी जाण्याची ओढ दिसत होती. सईला आईजवळ राहायचं होतं. त्याला तिच्या डोळ्यांतली आर्जवे स्पष्ट दिसत होती.

“बरं बाई, आपण आधी डॉक्टर नाडकर्णीना विचारू. ते म्हणत असतील तर मग आपण लवकरच डिस्चार्ज घेऊ.. मग तर खुश ना?”

शर्विलच्या बोलण्याने सईला खूप आनंद झाला. घरी जायला मिळणार म्हणून ती खूप खुश होती. सईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून शर्विललाही खूप छान वाटत होतं. त्याने सईला जेवण भरवलं. घरी जाण्याच्या आनंदात ती आज पोटभर जेवली. तिला जेवण भरवून त्याने तिला औषध दिलं आणि तिला झोपण्यास सांगून बाहेर येऊन बसला. त्याच्या डोक्यात सईला घरी घेऊन जाण्याचा विचार घुमत होता. इतक्यात राजवाडे साहेब तिथे आले. शर्विलला विचारात गर्क असलेलं पाहून ते म्हणाले,

“काय झालं रे, कसला विचार करतोय इतका?”

बाबांच्या प्रश्नावर शर्विलने सईशी झालेलं बोलणं सांगितलं. राजवाडे साहेबांना सई घरी येणार म्हटल्यावर खूप आनंद झाला होता.

“सईला घरी यायचं आहे तर येऊ दे ना. काय हरकत आहे? आता तर खूप इम्प्रूव्हमेन्ट आहे तिच्यात..”

यावर शर्विल हसून म्हणाला,

“तसं नाही बाबा, सई घरी आली तर मलाही आनंदच होईल पण एकदा डॉक्टर नाडकर्णीशी बोलून घेतो कसं करता येतंय ते.”

शर्विलच्या बोलण्यावर राजवाडे साहेबांनी मान डोलावली. थोडा वेळ त्यांच्याशी बोलून शर्विलने डॉक्टर नाडकर्णी यांची भेट घेतली आणि सईला घरी घेऊन जाण्याबद्दल सांगितलं. तसं दोघेही डॉक्टर असल्याने नकार देण्याचं काहीच कारण नव्हतं. डॉक्टर नाडकर्णी यांनी सईला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यांच्याशी बोलून तो केबिनच्या बाहेर आला. बाबांना डॉक्टरांशी झालेलं बोलणं सांगितलं. आणि थोड्या वेळाने त्यांना तिथे थांबवून घरी निघून आला. घरी आल्यावर थोडा वेळ आराम करून फ्रेश होऊन हॉल मध्ये येऊन बसला. देवकी त्याच्या शेजारी बसून सईच्या प्रकृतीची चौकशी करत होती. इतक्यात स्वयंपाकघरातून मीरा त्याच्यासाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन आली. तिने ट्रे त्याच्या समोरच्या टीपॉयवर ठेवला. देवकीच्या शेजारी जाऊन उभी राहिली. कॉफी घेत घेत शर्विलने देवकीला हॉस्पिटलमध्ये घडलेला सारा वृत्तांत सांगितला.

“आई, सईला घरी यायचं आहे. तशी आपण सगळे आहोतच तिची काळजी घ्यायला. शिवाय ती स्वतः एक डॉक्टर आहे. मी बाकीच्या गोष्टी पाहू शकतो. डॉक्टर नाडकर्णींनीसुद्धा परवानगी दिली आहे. आता उद्या जाऊन कोणी पूर्णवेळ घरी राहणारी नर्स मिळते का पाहतो आणि ठरवूया मग काय ते?”

त्याचं बोलणं ऐकत उभी असलेली मीरा त्याला मधेच थांबवत म्हणाली,

“नर्स कशाला हवीय शरू? मी आहे ना.. मी घेईन तिची काळजी. काही गरज नाही नर्स शोधण्याची.. मी करेन सगळं तिचं.. बरोबर ना काकू..?”

तिच्या बोलण्यावर देवकीने तिच्याकडे कौतुकाने पाहिलं. तिला जवळ कुशीत घेत म्हणाली,

“किती गुणी आहे गं माझी लेक.. या घरासाठी घरातल्या लोकांसाठी स्वतःला वाहून घेतलंस. किती करतेस गं मीरा सर्वांसाठी!”

देवकीच्या डोळ्यांत आसवं उभी राहिली.

“काकू, हे घर का परकं आहे मला.. आणि शरू म्हणाला होता ना, आता हेच तुझं घर आणि हीच तुझी माणसं.. मग सांगा आपल्या माणसांसाठी करताना कसला त्रास? कसले कष्ट? उलट मी सईच्या, तुमच्या कामी आले या गोष्टीचा आनंदच होईल मला..”

असं म्हणून मीराने देवकीच्या मांडीवर आपलं डोकं ठेवलं. देवकी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होती. मीराचं आपल्या घराविषयी, आपल्या माणसांबद्दल प्रेम, आपुलकी पाहून शर्विलच्या मनात तिच्याबद्दल आदर वाटू लागला. सई घरी येणार म्हणून देवकीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. थोडा वेळ देवकीशी बोलून शर्विल पुन्हा हॉस्पिटलला निघून आला. डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण केली. नर्स आणि डॉक्टरांच्या मदतीने तिला अलगद गाडीत बसवलं आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला. आपल्या बाईसाहेबाना सुखरूप घरी घेऊन जाताना ड्राईव्हरच्या डोळ्यांतही पाणी आलं. पटकन डोळ्यांतलं पाणी पुसत तो गाडीत बसला. राजवाडे साहेब ड्राईव्हरच्या शेजारी बसले. आता गाडी राधाई बंगल्याच्या दिशेने धावू लागली.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all