स्पर्श भाग २०

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..



स्पर्श..

भाग- २०

दुसऱ्या दिवशी सकाळी शर्विल आणि विराज डॉक्टर नाडकर्णी यांच्या केबिनमध्ये बोलत असताना नर्स धावत त्यांच्या केबिनमध्ये आली.

“डॉक्टर, पेशन्ट शुद्धीवर आलाय..”

तिचं बोलणं ऐकताच ते दोघेही जागेवरून उठले आणि तडक सईकडे निघाले. इतक्यात डॉक्टर नाडकर्णीसुद्धा त्यांचा तपासणीचा राऊंड संपवून आले. केबिनच्या बाहेर तिघांची गाठ पडली. ते तिघे त्या नर्ससोबत सईच्या रूममध्ये गेले. सईला शुद्ध येत होती. तिच्या हातापायांची हालचाल जाणवली. हळूहळू डोळे उघडत होती.

“थँक गॉड! नाऊ एव्हरीथिंग इज फाईन.. थोडा वेळ लागेल पूर्ण शुद्ध यायला. बट शी इज परफेक्टली आऊट ऑफ डेंजर..”

विराजच्या तोंडून शब्द बाहेर पडले. चेहऱ्यावर आनंद उमटला. त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. अथक प्रयत्नांनी सईचे प्राण वाचले होते. त्याने शर्विलकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं. काही तासांपूर्वी सईला हरवल्याची भीती आणि आता तिला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणल्याचा आनंद या मिश्र भावनेने त्याला भरून आलं. आनंदावेगाने त्याने सईच्या कॉटला घट्ट पकडलं. आणि तो लहान मुलासारखा हमसून रडू लागला. विराजने जवळ घेताच त्याने घट्ट त्याला मिठी मारली. दोघांनाही खूप आनंद झाला होता.

“थँक्यू सो मच विराज.. तुझे हे उपकार कधीच विसरू शकणार नाही.”

शर्विल त्याला मिठी मारतच म्हणाला. त्याच्या डोळयांतून धारा वाहत होत्या.

“अरे वेडा आहेस का? अरे आपण डॉक्टर आहोत. काय हे उपकार वगैरे? आपण आपलं कर्तव्य करत असतो. सई माझीसुद्धा मैत्रीण आहे. तिचा जीव वाचला याचाच खूप आनंद झालाय मला..”

शर्विलला त्याने आजवर एक निष्णात, प्रचंड हुशार डॉक्टरच्या रूपात अनेकदा पाहिलं होतं. तो संवेदनशील आहे हे त्याला ठाऊक होतं पण त्याला इतकं हळवं झालेलं कधीच पाहिलं नव्हतं. विराजने मिठी सोडवत शर्विलच्या खांद्याला पकडून त्याला समोर उभं केलं. त्याच्या बोलण्यावर शर्विलने मान डोलावली.

“बरं, चल मी निघतो आता, तू पण बाबांना घेऊन घरी जा. फ्रेश होऊन ये. सईला पाहायला इथे डॉक्टर्स,नर्सेस आहेत. त्यामुळे माझी काळजी मिटली. तूही तिची अजिबात काळजी करू नकोस. आणि अरे बाबांना सांगायला हवी ही बातमी. आहेत कुठे ते?

“ते झोपलेत तिथे वेटिंग रूममध्ये. रात्रभर जागे होते. पहाटेच डोळा लागला त्यांचा.. मग मी नाही उठवलं.. आता सांगतो. घरीही आईला कॉल करतो. पण खरंच रे विराज, मी खूप पॅनिक झालो होतो अरे.. फॉर्मॅलिटी नाही पण मनापासून थँक्स.. आय कान्ट थँक यू मोअर..”

बोलत बोलत दोघे वेटिंग रूममध्ये आले. राजवाडे साहेब सोफ्यावर झोपले होते. शर्विलने त्यांना जागे करत सईबद्दल संगितलं. त्यांनी ते ऐकताच वर पाहत हात जोडले आणि ईश्वराचे आभार मानायला सुरुवात केली. त्यांच्यासारख्या स्थितप्रज्ञ माणसाच्या डोळ्यांत पाणी पाहून सगळेच भावूक झाले.

“कम ऑन नाऊ एव्हरीवन चिअर अप.. मी निघतो आता.. आता इथलं काम झालं माझं.. आणि तिकडेही गरज आहे माझी. काही वाटलं तर कॉल कर मला. मी डॉ. नाडकर्णींच्या संपर्कात असेनच. आईंना नमस्कार सांग माझा आणि नंतर निवांत येईन म्हणावं जेवायलाच. चलो बाय.. टेक केअर..”

शर्विलने त्याचा हात हातात घेऊन आभार मानत निरोप दिला. रात्रभर राजवाडेसाहेब आणि शर्विल वेटिंग रूममध्ये बसून होते. त्यांचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांच्याकडे पाहत शर्विल म्हणाला,

“बाबा, तुम्ही ड्राईव्हरला घेऊन घरी जा. थोडा वेळ आराम करून या.. तोपर्यंत मी थांबतो इथे. काही लागलं तर मी असलो पाहिजे ना इथे.”

“पण तूही दमला आहेस. तुलाही आरामाची गरज आहे. रात्रभर धावपळ करतोयस. मी थांबतो इथे. तू जाऊन ये पटकन.”

राजवाडे साहेब शर्विलला घरी जाण्यास सांगत होते. पण शेवटी शर्विलच तिथे थांबला आणि राजवाडे साहेब ड्राईव्हरसोबत घरी गेले. साहेबांना खुश पाहून ड्राइव्हरसुद्धा खुश होऊन डोळे पुसत म्हणाला,

“मला ठावं हुतं साहेब.. आपल्या धाकल्या बाईसाहेबास्नी काय बी हुनार न्हाई.. इतक्या भल्या हायती बाईसाहेब.. देव कधी वाईट न्हाई करनार त्यांच्यासंगट..”

राजवाडे साहेब पाहतच राहिले त्याच्याकडे. सईने आपल्या लाघवी स्वभावाने प्रत्येकाला आपलं केलं होतं. दारात उतरताच राजवाडे साहेबांनी ड्राइव्हरकडे काही पैसे दिले. आणि खिशात थोडे पैसे कोंबत म्हणाले,

“याची मिठाई वाट.. आणि या पैशांची मिठाई तुझ्या घरी घेऊन जा हरी..”

देवकी त्यांची वाट पाहतच बसली होती. ते आल्याबरोबर देवकीने सईच्या प्रकृतीची विचारपूस केली. सईच्या जिवावरचा धोका टळला आहे, हे ऐकून तिला खूप आनंद झाला. तिने मीराला देवासमोर ठेवण्यासाठी गोड करायला सांगितलं. काही वेळाने राजवाडे साहेब आंघोळ करून नाश्त्याच्या टेबलावर आले तशी त्यांना खीर देत ती म्हणाली,

“ऐका ना.. मला हॉस्पिटलला घेऊन चला. मला माझ्या लेकीला बघायचंय. आधीच दोन वर्षांनी मला ती दिसणार होती. भेटणार होती. आणि आता हे होऊन बसलं. तिला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मला चैन नाही पडणार..”

“अगं हो हो.. धीर धर.. ती आता कुठे शुद्धीवर येतेय. पूर्णपणे शुद्धीत नाही आली अजून. त्यामुळे संध्याकाळपर्यंत सईला भेटण्याची परवानगी अजून डॉक्टरांनी दिली नाही आपल्याला..”

राजवाडे साहेब देवकीला समजावण्याच्या स्वरात म्हणाले.

“नाही, तरीही मला यायचं तुमच्यासोबत. दुरून का होईना पण मला पहायचं आहे तिला. आई आहे ओ मी.. असं कसं माझ्या पोरीला न पाहता राहू..?”

देवकीच्या डोळ्यांत पाणी आलं. देवकीचं बोलणं ऐकून राजवाडे साहेबांना गलबलून आलं.

“ठीक आहे. तू रडू नको. मी थोडा वेळ आराम करतो. मग आपण निघूया. तोपर्यंत तू तुझं सगळं आवर..”

असं म्हणून ते आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. देवकीने मीराला आवाज दिला.

“मीरा, मी तुझ्या काकांसोबत हॉस्पिटलला जाणार आहे. तू जेवणाचं बघ पटकन. तुझे काका उठतीलच थोड्या वेळात.”

देवकीला थांबवत मीरा म्हणाली,

“काकू, तुम्ही नका काळजी करू. मी आहे इथे. तुम्ही निश्चिन्त जाऊन या. इथे लक्ष ठेवायला मी आहे. मी आता सगळा स्वैपाक करते. आणि शरूच्या डब्याची तयारी पण करते..”

देवकी फक्त हसली. थोड्याच वेळात राजवाडे साहेब आवरून बाहेर आले. मीराने कॉफी थर्मासमध्ये भरली. एका डब्यात जेवण भरलं. आणि ते एका बॅगेत भरून देवकीच्या हातात बॅग देत मीरा म्हणाली,

“काकू, हे शर्विलसाठी.. कालपासून त्याने काहीच खाल्लेलं नाहीये. आता खा म्हणावं हे तरी. तुमच्यासाठी गरम पाण्याची बाटली वगैरे सगळं ठेवलंय व्यवस्थित..”

तिच्या गालावर कौतुकाने हात फिरवत देवकीने बॅग कारमध्ये ठेवली आणि राजवाडे साहेबांसोबत ती हॉस्पिटलला निघाली. कधी एकदा सईला भेटतेय असं तिला झालं होतं. सईच्या विचाराने तिचे डोळे झरत होते. थोड्याच वेळात गाडी हॉस्पिटलजवळ पोहचली. राजवाडे साहेब आणि देवकी आत आले. शर्विल रूमच्या बाहेर बसून होताच. देवकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. समोर आईला पाहून शर्विल खूप हळवा झाला. दोघे एकेमेकांना मिठी मारून रडू लागले.

“शरु, मला तिला पाहायचं रे.. कसं आहे माझं बाळ?”

“ती ठीक आहे आता. तू काळजी करू नकोस. अजून तिला पूर्ण शुद्ध आलेली नाही. पण आता काळजीचं काही कारण नाही.”

शर्विलने देवकीला आय.सी.यू.च्या दरवाज्याजवळ नेलं. तिने दरवाज्याच्या काचेतून आत पाहिलं. सईची अवस्था पाहून तिला खूप भरून आलं. पण आता शर्विलला धीर देण्याची गरज होती म्हणून तिने तिच्या डोळ्यातलं पाणी आवरलं. इतक्यात नर्स बाहेर आली आणि म्हणाली,

“शरू कोण आहे? पेशंट शुद्धीवर आलाय. आणि सारखं शरू.. शरू.. म्हणताहे.”

तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच शर्विल उठून उभा राहिला.

“हो सिस्टर, मीच शर्विल..मलाच बोलवतेय ती..”

“सर तुम्ही आत या.. पण जास्त बोलू नका. पेशन्टला त्रास होईल असं..”

इतकं म्हणताना तिच्या लक्षात आलं की आपण एका डॉक्टरशी बोलत आहोत. तिने तात्काळ जीभ चावत हसून माफी मागितली आणि ती पटकन आत गेली. क्षणभर सगळेच हसले.

“आईबाबा, तुम्ही थांबा.. मी आलोच.”

असं म्हणत तो पटकन आत गेला. सईला शुद्ध येत होती. तिच्या तोंडून ‘शरू.. शरू..’ पुसटसे शब्द त्याच्या कानावर पडत होते. तो तिच्याजवळ आला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला,

“सई.. मी आलोय अगं.. डोळे उघड बघू.. सई.. ए सई..”

त्याचा आवाज तिच्या कानावर पडताच तिच्या माथ्यावरची रेष पुसटशी हलली. तिने डोळे किलकले करून उघडण्याचा प्रयत्न केला. शर्विल समोर उभा होता. त्याचा होणारा स्पर्श तिला जाणवत होता.

“शरू… शरू..”

तिने त्याला आवाज दिला. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. सगळं शरीर ठणकत होतं. थोडीशी हालचाल करताच तिला त्रास होत होता. ते पाहून तिला अडवत शर्विल म्हणाला,

“अंहं.. सई! शांत पडून रहा. सगळं ठीक आहे. तू लवकर बरी होशील आणि आपण लवकरच घरी जाऊ..”

त्याने तिच्या केसांत चुंबन दिलं तशी तिची कळी खुलली. तो बोलत होता पण सईला निदान महिनाभर तरी इथून हलता येणार नाही याची त्याला कल्पना होती. थोडावेळ बोलल्यावर तिला आराम करण्यास सांगून तो डोळ्यातलं पाणी आवरत पटकन बाहेर आला. देवकीजवळ येऊन बसला. देवकीने त्याचा हात हातात घेत विचारलं,

“कशी आहे ती?”

त्याने तिचा हात हातात घेत तिला आश्वस्त केलं सईच्या प्रकृतीबाबत.

“हो ना..? मग आता एक काम कर.. बेटा, दोन दिवस झाले तू इथे बसून आहेस. आता तू घरी जा. फ्रेश हो, थोडा आराम कर. मग ये पुन्हा..”

“नको आई, मी ठीक आहे. मी सईला सोडून नाही जाणार कुठे.. मी थांबेन इथे.”

पण राजवाडे साहेबांनी सांगितल्यावर शर्विल घरी जाण्यास तयार झाला. ड्राईव्हर सोबत शर्विल घरी आला. गाडी बंगल्याच्या पार्किंगमध्ये येताच मीरा धावतच दारात आली. शर्विल घरी आलेला पाहून तिला बरं वाटलं. तो दारात येताच मीराने प्रश्न केला,

“शरू, कशी आहे रे सई?”

“हो, ठीक आहे ती.”

शर्विलने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं आणि त्याच्या खोलीत निघून गेला. रात्रभर जागं असल्याने त्यात सईची काळजी असल्याने तो खूप दमला होता. तो खोलीत येताच फ्रेश होऊन पलंगावर पडून होता. सईचा जखमी चेहरा नजरेसमोर येत होता. ती आता कधीच आई होऊ शकणार नाही. तिला हे सहन होईल का? या विचारांनी तो अस्वस्थ झाला. पलंगावरून उठून खुर्चीत जाऊन बसला. सईच्या काळजीने त्याचे डोळे पुन्हा एकदा रिते होऊ लागले. इतक्यात जेवणाचं ताट घेऊन मीरा त्याच्या खोलीत आली. त्याला असं व्यथित झालेलं पाहून तिचं हृदय पीळवटून निघत होतं. एकदम तिला बालपणीचा शरू आठवला. दहावीच्या परीक्षेच्या निकालाचं टेन्शन घेणारा शरू. असाच कोपऱ्यात मान खाली घालून बसायचा. लहानपणी छोट्या छोट्या गोष्टी मीराला सांगणारा तिचा शरु आता तिला काहीच सांगत नव्हता. एकटाच कुढत बसला होता. जेवणाचं ताट टेबलवर ठेवत ती शर्विलजवळ आली,

“शरू, काळजी नको करू. सगळं ठीक होईल. माझा श्रीरंग सगळं सांभाळून घेईल. तू आजवर कायम तुझ्या रुग्णांची मनोभावे सेवा केलीस. तर मग तो असा कसा तुझ्यावर अन्याय करेल? शरू काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत कायम असेन..”

मीराच्या बोलण्याने शर्विलला उमाळा दाटून आला. पुन्हा एकदा त्याला तिच्यात हरवलेली बालपणीची मीरा दिसली. इतके दिवस दाबून ठेवलेलं सगळं दुःख उफाळून आलं. त्याला भावना अनावर होऊ लागल्या आणि शर्विल तिच्या कुशीत शिरून रडला. ती त्याच्या आसवांना वाट मोकळी करून देत होती. त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याचं सांत्वन करत होती.

इकडे देवकी आणि राजवाडे साहेब बाहेर बसले होते.

“थोड्याच वेळात पेशंटला दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत. तेव्हा बाकीचे लोक भेटू शकता. पण पेशन्टला त्रास होणार नाही याची काळजी घ्या..”

इतकं सांगून नर्स निघून गेली. थोड्याच वेळात सईला स्पेशल रूममध्ये हलवण्यात आलं.

मीरा तिच्या कामाला निघून गेल्यावर शर्विल विचार करू लागला.

“एखाद्या प्रसंगावरून ती व्यक्ती पूर्णतः वाईट किंवा पूर्णतः चांगली ठरवणं योग्य नाहीच. ती वेळच तशी होती. गैरसमज चुका प्रत्येकाकडून होत असतात. पण आता तिने किती छान घर सांभाळलं. सगळं कसं आपलं मानून केलं..”

मीराच्या प्रेमळ विचारपूस करण्याने शर्विलला भरून आलं. बालपणीची तीच निरागस मीरा डोळ्यांसमोर तरळू लागली. त्याला साद घालू लागली. इतक्यात मीरा त्याच्यासमोर खीर घेऊन आली. दोघे तिथेच बसून खीर खात खूप वेळ सईविषयी बोलत बसले.


पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all