स्पर्श.. भाग १८

हि कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..



स्पर्श..

भाग- १८


मीरा खोलीच्या बाहेर गेली. अचानकपणे ओढवलेल्या प्रसंगामुळे शर्विल अजूनही धक्क्यात होता. तो बाथरूममध्ये गेला. तोंडावर पाणी मारलं आणि पुन्हा बाहेर पलंगावर येऊन बसला.

“काय झालंय मीराला? ती अशी का वागली? माझ्या मैत्रीला ती प्रेम समजत होती. पण का? तिच्याबाबतीत माझं वागणं चुकलं असेल का? मी तिला आधार देत होतो. त्या जिव्हाळ्याला, मायेला ती प्रेम समजत होती? माझं लग्न झालंय याचाही तिला विसर पडला? मीरा, का असं वागलीस गं? एक चांगली मैत्री गमावलीस. का मीरा..? हे काही बरोबर नाही घडलं. माझं फक्त सईवर प्रेम आहे. खूप प्रेम आहे तिच्यावर. दूर असूनही ती कायम माझ्या जवळच असते. तिच्या आठवणीच तर होत्या इतके दिवस सोबतीला. सई, कधी येणार तू? लवकर ये ना यार.. खूप आठवण येतेय तुझी. प्लीज लवकर ये राणी..”

सईच्या आठवणीने त्याचे डोळे पाझरू लागले. तो रात्रभर विचार करत होता. डोळ्यावरची झोप केव्हाच उडून गेली होती. मोबाईलमधले सईचे फोटो पाहता पाहता पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला.

सकाळी मोबाईलच्या आवाजानेच देवकीला जाग आली. तिने चाचपडत बाजूच्या टेबलावरील आपला चष्मा लावला आणि मोबाईल पाहिला. स्क्रीनवर सईचं नाव झळकत होतं. तिने पटकन कॉल घेतला. उत्साहाचा खळाळता झरा बोलत होता.

“हॅलो आई.. गुड मॉर्निंग, मी रत्नागिरीहून निघते आहे आता. संध्याकाळपर्यंत पोहचेन घरी. कॅब केली आहे. लवकरच येईन. शर्विलला सांगू नका हं आई, आपलं सरप्राईज लक्षात आहे ना? ही अशी मी आलेच..”

“हो गं बाई, सगळं लक्षात आहे तुझं सरप्राईज.. तू मात्र सावकाश ये. ड्राईव्हरला गाडी सावकाश चालवायला सांग. घाई करू नकोस. तू आल्यावर खूप बोलायचं मला तुझ्याशी. मी वाट पाहतेय.”

देवकी सईशी बोलत असताना राजवाडे साहेब झोपेतून जागे झाले. देवकीने सईचा फोन असल्याचं खुणेनेच सांगितलं. ते उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. थोडं बोलून झाल्यावर सईने फोन ठेवून दिला. आणि दारात उभ्या असलेल्या कॅबच्या डिकीत तिच्या दोन्ही बॅग्स ठेवून दिल्या. सईचे आईबाबा, तिचे एक-दोन सहकारी आणि गावातली काही माणसं तिला निरोप देण्यासाठी आली होती. सई आत जाऊन बसली. सईच्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं. डोळे पुसत आई म्हणाली,

“सई बेटा, काळजी घे स्वतःची.. सगळं सामान घेतलं ना व्यवस्थित? पोहचल्यावर फोन कर आणि शर्विल आणि आईबाबांना नमस्कार सांग आमचा. आणि येत जा गं वरचेवर.. आम्हाला विसरू नकोस तिकडे गेल्यावर..”

सर्वांनी साश्रू लोचनांनी सईला निरोप दिला. सईच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. इतके दिवस राहिल्यावर एकीकडे शर्विल आणि घरची ओढ असली तरी या क्षणाला मात्र तिचा पाय निघत नव्हता. कार सुरू झाली. नाशिकच्या दिशेने धाव घेऊ लागली. आज तब्बल दोन वर्षांनी सई नाशिकला चालली होती. शर्विलला भेटण्याची ओढ मनात. कधी एकदा घरी पोहचतेय आणि त्याला घट्ट मिठी मारतेय, असं तिला झालं होतं. त्याच्या प्रेमळ स्पर्शासाठी मन आसुसलेलं होतं. दोन वर्षांपूर्वीचा काळ तिच्या डोळ्यांसमोर तरंगत होता. कालचक्र त्याच्या वेगाने फिरत होतं पण आठवणींचा परिमळ कायम तसाच दरवळत होता.

हनिमूनचे ते मंतरलेले दिवस तिला आठवू लागले. गालावर लाजेची लाली पसरली.

“किती मोहरलेले क्षण होते ना ते!”

ती मनातल्या मनात पुटपुटली आणि नकळत तिच्या अंगावर शहारा आला. त्या गंधाळलेल्या दिवसांत रमून गेली. आठवणींशी बोलता बोलता तिचा डोळा कधी लागला तिचं तिलाच समजलं नाही. गाडी तिच्या वेगाने धावत होती.

सकाळी खूप उशिरा शर्विलला जाग आली. डोकं जड झालं होतं. पुरेशी झोप न झाल्याने डोळे चुरचुरत होते. झोपेतून भानावर येताच त्याला रात्रीचा प्रसंग आठवला आणि त्याचं डोकं दुखायला लागलं. तो पुन्हा अस्वस्थ झाला.

“मी याविषयी आईशी बोलू का? की बाबांशी बोलू? कोणीतरी विश्वास ठेवेल का? आईचा किती जीव आहे तिच्यावर. तिला सहन तरी होईल का हे सगळं?”

त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली. काय करावं त्याला काहीच कळत नव्हतं. बाबांशीच बोलतो असं मनाशी ठरवून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला.

इकडे देवकीने देवपूजा आटोपली. राजवाडे साहेब आणि तिच्यासाठी चहा ठेवला. राजवाडे साहेब हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत बसले होते. देवकीने त्यांना चहा दिला आणि स्वतःही घेतला. दोघांचा चहा घेऊन झाला तरी अजून मीरा तिच्या खोलीच्या बाहेर आली नव्हती.

“एरव्ही सर्वांच्या आधी उठणारी मीरा आज इतका उशीर कशी झोपली. तिची तब्येत तर बरी आहे ना? कधी इतका उशीर होत नाही. जाऊन बघतेच एकदा..”

विचार करत करत देवकी उठून मीराच्या खोलीकडे जाऊ लागली. तिच्या खोलीच्या दारावर थाप मारणार इतक्यात मीराने दरवाजा उघडला. समोर देवकीला पाहून तिचा गळा भरून आला. तिने पटकन तिला मिठी मारली. डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या.

“काय झालं बाळा, तू ठीक आहेस ना? बरं वाटत नाही का? का रडतेय काही दुखतंय का?”

मीराच्या असं अचानक गळ्यात पडून रडण्याने देवकी घाबरली. ती का रडतेय? देवकीला काहीच कळेना. देवकी तिच्या पाठीवरून हात फिरवत विचारू लागली.

“काही नाही काकू, आईची खूप आठवण आली. ती आता असायला हवी होती. एक हक्काची कूस मिळाली असती..”

मीरा रडतच बोलत होती. देवकी तिचे डोळे पुसत म्हणाली.,

“ए वेडाबाई, मी आहे ना..! कायम तुझ्यासोबत. तुझ्या हक्काची कूस. मला माहित आहे आईची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही पण मी पण तुझी आईच आहे ना बाळा..?”

देवकी तिला समजावत होती. पण तिच्या मनाची घालमेल देवकीला कशी कळणार? मनातला आक्रोश ती देवकीला कशी सांगणार?

“आज आई असती तर खूप बरं झालं असतं. तिच्या कुशीत शिरून मनसोक्त रडले असते. आईजवळ नक्कीच मन मोकळं केलं असतं. आई, का गेलीस गं? मला अशी एकटीला सोडून?”

मीराचं मन आक्रंदत होतं. इतक्यात शर्विल त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याला पाहून तिला अजूनच उमाळा दाटून आला. तिने डोळे पुसले.

“काकू, मी आवरते. आधीच उशीर झालाय उठायला. बरीच कामं राहिलीत.”

शर्विलकडे पाहत ती म्हणाली. त्याच्या नजरेत झाल्या प्रकाराने आलेलं अवघडलेपण साफ दिसत होतं. तो तिची नजर टाळू पाहत होता. मनात तिच्याबद्दलचा राग आणि काही अंशी तिरस्कार उफाळून आला. त्यामुळे तो तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करून नाश्त्याच्या टेबलावर गेला. मीरा तिथे त्याच्या जवळ जाऊ पाहत होती पण तो जणू ती अदृश्य असल्यासारखं वागत होता. ते पाहून मीराचा जळफळाट होत होता. तिने स्वतःचं सगळं आवरलं आणि ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली. काही वेळाने सगळा स्वयंपाक झाला. सर्वजण जेवायला बसले. नेहमी बडबड करणारा शर्विल खूपच शांतपणे जेवत होता. राजवाडे साहेब आणि देवकीला थोडं आश्चर्य वाटलं.

“काय चॅम्प, सगळं ठीक आहे ना? आज असा का गप्प गप्प? काही झालंय का?”

“नाही बाबा, काही नाही..”

“नाही कसं? कधीपासून पाहतेय ताटातलं अन्न चिवडत बसलायस. सईची आठवण येतेय का?”

आई चेष्टेने म्हणाली तसं तो कसनूसं हसला. मीरा शर्विलच्या ताटात भाजी वाढत होती. हाताने नकार देत त्याने तिला अडवलं. आणि काहीसा त्रासिकपणे तो म्हणाला,

“आई, सारखं काय गं तेच तेच जेवायला.. कधीतरी वेगळं काही खायला पण आवडेल मला.. इतरही माणसं राहतात या घरात. रोज अगदी माझ्याच आवडीचं जेवण बनवलं पाहिजे असा काही नियम नाही आपल्या घरात..”

“अरे.. असं काय बोलतोयस बाळा? आम्हालाही आवडतं की हे जेवण. तुला काही वेगळं हवं असेल तर सांग ना.. मीरा बनवून देईल की.. खुश..?” - देवकी.

“नको! मला तुझ्या हातचं खायचं आहे. बरेच दिवस खाल्लं नाही काही तुझ्या हातचं..”

शर्विल काहीशा रागाने पण सावरत म्हणाला.

“पण तू का इतका चिडचिड करतोयस? काही झालंय का क्लिनिकमध्ये?”

राजवाडे साहेबांनी प्रश्न केला.

“नाही बाबा.. काही नाही.. रात्री झोप नाही झाली ना त्यामुळे थोडं डोकं दुखतंय.. बाकी काही नाही..”

शर्विल उगाच हसत म्हणाला. त्याला असं उद्विग्न झालेलं पाहून दोघांनाही खूप आश्चर्य वाटलं. मीरा व्यथित होत होती. त्याच्या असं वागण्यामागचं कारण फक्त तिलाच माहीत होतं. त्याचं असं तुसड्यासारखं वागणं तिला त्रास देत होतं पण ती शांत होती. देवकीने राजवाडे साहेबांना डोळ्यांनी खुणावत शांत रहायला सांगितलं.

“सई आली की होईल ठीक सगळं..”

वातावरण निवळण्याचा प्रयत्न करत देवकी म्हणाली. सईचं नाव ऐकताच शर्विल काहीसं हसला पण मीराला मात्र अजूनच वाईट वाटू लागलं. तिचा हुंदका अनावर झाला. ती पटकन स्वयंपाकघरात आली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

“आता या घरात राहण्याचा मला कोणताच अधिकार नाही. कशाला राहू इथे? का राहू? आणि कोणासाठी? इथे ज्याच्यासाठी संपूर्ण आयुष्यभर आस लावून बसले. जो फक्त माझा आहे असं मला वाटत होतं तो तर माझा भ्रम होता. तो माझा नव्हताच कधी. मग आता मला निघायला हवं. त्यानेच वसवलेल्या स्वप्नांच्या गावातून हद्दपार व्हावं लागेल कायमचं!”

मीरा स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होती. डोळ्यांतून पाणी झरत होतं. ती न जेवताच तशीच बसून राहिली. देवकी आणि राजवाडे साहेब जेवण आटोपून आरामासाठी त्यांच्या खोलीत निघून गेले. मीराने भांडीकुंडी झाली. सगळं स्वयंपाकघर आवरलं. तिच्या खोलीत येऊन बसली. मनात विचारचक्र सुरू होतं आणि ती एका निर्णयापर्यंत येऊन पोहचली. मोजकेच कपडे आणि गरजेपुरते सामान तिने बॅगेत भरले. तिच्या खोलीला डोळे भरून पाहून घेतलं आणि ती बाहेर आली. बॅग तिथेच हॉलमध्ये एका कोपऱ्यात ठेवली.

एव्हाना संध्याकाळ झाली होती. विचार करत बसलेली मीरा उठली आणि तिने सर्वांसाठी चहा बनवला. राजवाडे आणि देवकी वामकुक्षी घेऊन बाहेर येऊन बसले होते. मीराने दोघांना चहा आणून दिला.

“मीरा, शर्विल उठला असेल तर बघून ये बरं. त्यालाही चहा घ्यायला आम्ही इथेच हॉलमध्ये बोलावलंय सांग. एकच तर दिवस असतो रविवारचा.. नंतर पुन्हा आठवडाभर व्यस्त.. जा पटकन.”

मीराने मान डोलावली आणि शर्विलला बोलावण्यासाठी त्याच्या खोलीत आली. शर्विल पलंगावर गाणी ऐकत पडला होता. मीराला समोर पाहताच तो खूप संतापला.

“का आली आहेस इथे? मला तुझं तोंडही बघायचं नाहीये.. जा निघ बरं तू..”

तो चिडून म्हणाला. तिच्या डोळ्यात आसवं उभी राहिली. ती अजूनच दुखावली गेली. ती काहीशा रागानेच म्हणाली,

“हो जाणारच आहे.. नाही दाखवणार माझं तोंड तुला कधीच. कायमची निघून जाईन. पण आता बाहेर ये. काकू बोलावताहेत. आणि मलाही जे सांगायचं ते तिथेच सर्वांसमोर सांगेन म्हणतेय. तेव्हा ये लवकर.”

असं म्हणत ती त्याच्या खोलीचं दार धाडकन ओढून बाहेर आली. तिच्या डोळ्यांत उद्विग्नता आणि चीड दिसत होती. तिच्या मागोमाग शर्विलही बाहेर आली. मीराने त्याला चहा आणून दिला. सर्वांचा चहा झाला. मीराने देव्हाऱ्यातल्या देवासमोर दिवा लावला. श्रीरंगाला नमस्कार केला. कोपऱ्यात ठेवलेली कापडी पिशवी हातात घेतली.

“काकू, मी हे घर सोडून जातेय.”

मीराचं बोलणं ऐकताच सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. देवकी पटकन उठून उभी राहिली.

“अगं पण.. हे असं मधेच काय खूळ भरलं तुझ्या डोक्यात? सकाळी आपण बोललो ना बाळा.. हे असं घर सोडून काय होणार आहे? आणि घर सोडून जाण्याचं मुळात कारण काय? कोणी तुला काही बोललं का?”

असं म्हणत देवकीने शर्विलच्या बाबांकडे पाहिलं.

“नाही काकू, मला कोणीच काही बोललं नाही. पण मला जायचं आहे. माझं मन लागत नाही इथे. भूतकाळातल्या आठवणी त्रास देतात. आईची खूप आठवण येते. इथून बाहेर पडेन तर थोडं फार विसरू शकेन.”

मीरा कशीबशी बोलत होती. तिने शर्विलकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं. पण तो मात्र तिच्याकडे पाहतसुद्धा नव्हता.

“अगं पण कुठे जाशील? काय करशील? काय वेडेपणा आहे हा? अरे, शर्विल तू तरी बोल हिला काहीतरी..”

देवकी रडवेली होऊन बोलत होती.

“तिने निर्णय घेतला आहे तर काहीतरी विचार करूनच घेतला असेल आई.. आणि तिचा निर्णय झाला असेल तर आपण काय बोलू शकतो?”

शर्विल तोंडदेखलं पण सूचक बोलला.

“अरे पण..”

देवकी पुढे काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला. डोळे पुसत तिने फोन उचलला. सईचा कॉल होता. आवाज ठीक करत कॉल घेत ती म्हणाली,

“हां सई.. बोल बाळा..”

पुढच्या क्षणाला मात्र तिचे डोळे विस्फारले गेले. आणि तिच्या चेहर्‍याचा रंगच उडाला. तिच्या हातून फोन गळून पडला आणि तीही भोवळ येऊन पडणार इतक्यात राजवाडे साहेबांनी तिला सांभाळलं आणि खाली सोफ्यावर बसवलं. शर्विल आणि मीरा तिच्याकडे धावले.

असं काय ऐकलं होतं देवकीने? काय घडलं होतं? पाहूया पुढील भागात.

क्रमशः

निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all