स्पर्श.. भाग १६

ही कथा एका मीरेची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची,.


स्पर्श..

भाग- १६


मीरा खूप रडत होती. देवकी तिला कुशीत घेऊन मायेने गोंजारत होती.

“मीरा, शांत हो बेटा, झालं गेलं विसरून जा. ते तुझ्या नशिबाचे भोग होते. ते आता संपून गेलेत. असं समज. आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंद असणार आहे. मीरा, आता हे रडू थांबव, आयुष्यात घडून गेलेल्या घटना आपल्याला बदलता येत नाहीत. म्हणून आपण वर्तमानात जगू. यापुढे प्रत्येक गोष्टींची खबरदारी घेऊ. तुझ्या आयुष्यात जे घडलं त्याला काही अंशी मीसुद्धा जबाबदार आहे. निव्वळ रखमाची शेवटची इच्छा आणि मी तिला दिलेल्या वचनपूर्तीसाठी काहीही जास्त विचारपूस न करता आम्ही तुझ्या काकांच्या आणि वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तुझं लग्न लावून दिलं. चुकलंच माझं.”

देवकी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.

“नाही ओ काकू, तुम्ही आताच म्हणाला होतात ना. माझ्या नशिबाचे भोग होते आता ते सरले आहेत. तेच भोग मी सोसत होते. हे सारं विधिलिखित होतं. ते घडणारच होतं. तुमचा काहीही दोष नाही.”

मीरा देवकीचा हात हातात घेत तिला समजावणीच्या सुरात म्हणाली. तिने शर्विलकडे पाहिलं. त्याचे डोळे भरले होते. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. तो डोळे पुसत त्यांच्याजवळ येत म्हणाला.,

“मीरा, मला पण माफ कर.. तू माझी इतकी जवळची मैत्रीण असूनही मला तुझ्या दुःखाची तिळमात्रही कल्पना नव्हती. आईने मला तुझ्या लग्नाबद्दल सांगितलं. तुझं लग्न धुमधडक्यात झाल्याचं समजलं. मला वाटलं तू लग्न करून सुखात असशील म्हणून मीही थोडा निश्चिंत झालो. पुढे नंतर मी माझ्या कामात, व्यापात व्यस्त झालो. म्हणून कदाचित मला तुझा विसर पडला असेल. मी तुझी चौकशी करायला हवी होती. तू सुखी आहेस ना हे पाहायला हवं होतं. चुकलो गं मी. यापुढे मी तुला कधीच दुःखी होऊ देणार नाही. कायम तुझ्याबरोबर असेन. आता तू आनंदी राहायचं. कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. आता तू आराम कर. आम्ही सगळे इथेच आहोत. तू आता कोणालाही घाबरायचं नाही. आता तू आपल्या माणसांत आली आहेस. काळजी करायचं कारण नाही. आता तुला कोणीही त्रास देणार नाही. तुझा मित्र तुझ्यासोबत आहे आणि कायम राहील. समजलं तुला? आता पूर्ण विश्रांती घ्यायची आणि लवकर बरं व्हायचं. तुझ्या हातचा बदामाचा शिरा खायचा आहे मला लवकर बरी हो.”

शर्विलचं बोलणं ऐकून मीराच्या डोळ्यातलं पाणी वाहू लागलं. तिने होकारार्थी मान हलवली आणि पटकन शर्विलला येऊन बिलगली. शर्विलने तिला जवळ घेतलं आणि मायेने तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. मीराला आधाराची खूप गरज आहे हे तो जाणून होता. दोघांनाही अश्रूंना आवर घालणं कठीण झालं होतं. मीराला पलंगावर झोपवून देवकी स्वयंपाकाच्या कामाला लागली. शर्विलने तिला इंजेक्शन दिलं. औषध दिलं तशी मीराला गुंगी येऊ लागली. शर्विल तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. मीरा हळूहळू झोपी गेली आणि शर्विल आपल्या कामाला लागला.

दिवस सरत होते. हळूहळू मीराची प्रकृती सुधारत होती. देवकी पोटच्या मुलीप्रमाणे तिची काळजी घेत होती. शर्विल तिची खूप काळजी घेत होता. क्लिनिकमध्ये जाताना, घरी आल्यावर तिची चौकशी केल्याशिवाय राहत नसे. तो त्याचा रोजचा दिनक्रम झाला होता. घरी आल्यावर तो तिच्याशी गप्पा मारत बसत असे. तिच्या औषधांच्या वेळा सांभाळत होता. त्याच्या मनोभावी सेवेने मीराच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी टवटवी आली. ती शांत अबोल झाली होती तरीही आता चेहऱ्यावर दुःखाची छटा कमी झाली होती. खरंतर शरीरावर झालेल्या जखमा भरत होत्या पण मनावर झालेल्या घावांची व्यथाच वेगळी होती. कधीतरी जुन्या आठवणी जाग्या झाल्या की ती व्याकुळ होऊन रडायची. कृष्णाच्या नावाने टाहो फोडायची. मनावर झालेल्या जखमांवर मायेचं, प्रेमाचं शिंपण हवं होतं. शर्विल ते शिंपण करत होता. आईच्या शेवटच्या इच्छेसाठी ती विजयशी लग्न करायला तयार झाली होती पण मनातला शर्विल पुसला गेला नव्हता. आता पुन्हा एकदा मनातली प्रतिमा गडद होऊ लागली. लहानपणीचं प्रेम पुन्हा एकदा साद घालू लागलं. तिचा हरवलेला शरू तिला नव्याने भेटला होता. मीरा त्याच्या प्रेमळ स्पर्शाने मोहरू लागली. तिच्या जखमांवर शर्विल हळुवार फुंकर घालत होता. आता मनाला नव्याने आशेचे धुमारे फुटू लागले होते. तिचा हरवलेला शर्विल पुन्हा परतून आला होता. तिचा श्रीरंग नव्याने तिला भेटला होता. हरवलेला तिचा आनंद तिला परत मिळत होता.

जवळ जवळ आठ नऊ महिने होऊन गेले. आता मीरा पूर्वीसारखी ठणठणीत झाली. इतके दिवसांत एकदाही तिने तिच्या खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं नव्हतं. आज पहिल्यांदा तिच्या खोलीच्या बाहेर आली. कितीतरी दिवसांनी ती आज घरभर वावरत होती. हॉल, देवकी आणि राजवाडे साहेबांची खोली पाहत पाहत ती शर्विलच्या खोलीत आली. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या खोलीत बसून खेळलेले बालपणीचे खेळ आठवू लागले. सागर गोटे, काच पाणी, बुद्धिबळ, सारे खेळ आठवू लागले. लहानपणीचे रुसवे फुगवे, शर्विलचं तिची समजूत काढणं तिला सारं आठवत होतं. आठवताना डोळ्यांत पाणी आलं. त्याचं कपाट, त्याच्या वस्तू, त्याचे कपडे यांना स्पर्श करताना तिला त्याचा भास होत होता. ज्या प्रेमाच्या स्पर्शाची तिने आतुरतेने वाट पाहिली होती तो त्याचा स्पर्शाचा भास होत होता. अचानक तिची नजर टेबलवर ठेवलेल्या एका फोटोकडे गेली. तिने फोटो हातात घेतला.

“हा तर शर्विल आहे मग फोटो मधली ही सुंदर मुलगी कोण आहे?”

“अरे मीरा, तू इथे आहेस होय. मी तुला तुझ्या खोलीत पाहून आले. तुझ्यासाठी सूप बनवू का हेच विचारणार होते.”

शर्विलच्या खोलीच्या दारात देवकी उभी होती. तिचा आवाज ऐकताच मीराने मागे वळून पाहिलं. तिच्या हातातला फोटो दाखवत मीराने विचारलं.

“काकू, हा फोटो..?”

तिचं बोलणं अर्धवट तोडत देवकी म्हणाली,

“अगं ही आपली सई, शर्विलची बायको..”

कोणीतरी कानात गरम शिसं ओतावं तसं वाटलं तिला. देवकी सईविषयी बोलत होती पण मीराला देवकीचे पुढचे शब्द ऐकूच येत नव्हते.

आपल्या शर्विलचं लग्न झालंय, या विचारानेच तिच्या मनाला चटका बसला.

“असं कसं करू शकतो शर्विल? माझा शरू माझा नाही? असं का केलं श्रीरंगा..?”

तिच्या डोळयांसमोर अंधार दाटू लागला. डोळे पाण्याने गच्च भरले. सगळं धूसर होऊ लागलं. हातातल्या फोटोकडे ती पहात होती.

“किती सुंदर आहे सई! इतकी सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यात असताना.. तो का माझ्याकडे..”

तिने स्वतःला आरश्यात पाहिलं. स्वतःच्या रंग रूपाबद्दल का कोणास ठाऊक तिला राग येत होता. रापलेला सावळा रंग, खोल गेलेले डोळे, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं, ओठांचा रंग काळवंडलेला, हातापायांच्या काड्या झालेल्या, कृष झालेलं शरीर आणि विखुरलेले केस.

“मनात भरावं असं काहीही नाहीये माझ्यात. ना रूप ना रंग..”

तिचं तिला वाटून गेलं. मनात एक न्यूनगंड निर्माण झाला. पण लगेच दुसऱ्या मनाने कौल दिला.

“असं काही नाही. त्याचं माझ्या रंग रूपावर नाही, तर माझ्या मनावर प्रेम आहे. त्याचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे. प्रेम नसतं तर उगीच त्याने माझी इतकी काळजी केली असती? इतकं जपलं असतं? आपल्या वडिलांच्या हट्टापाई त्याने सईशी लग्न केलं असेल. काकांना तर मी कधीच आवडत नव्हते. म्हणून त्यांनी जबरदस्ती त्याचं लग्न लावून दिलं नसेल कशावरून?”

मीरा विचार करू लागली आणि तिच्या मनाला तिचीच बाजू पटत होती. ते तिच्याच बाजूने कौल देत होतं. पुन्हा तिचं शर्विलवरचं प्रेम उफाळून आलं. शर्विलचं तिच्यासोबतचं वागणं, त्याचं बोलणं, त्याच्या डोळ्यातला तिच्याबद्दल असलेला जिव्हाळा तिला आठवू लागला. तो जिव्हाळा तिला त्याचं प्रेम वाटू लागलं. तिच्या लग्नापूर्वीच्या सगळ्या कल्पना पुन्हा डोकं वर काढू लागल्या. तिच्या कल्पनेतला नवरा नावाचा पुरुष तिला पुन्हा एकदा शर्विलमध्ये दिसू लागला. ती बायकोसारखी त्याची काळजी घेऊ लागली. त्याला हवं नको ते पाहू लागली. मीरा आता देवकीला घरकामात मदत करू लागली. तिने स्वयंपाकघरात पाऊल टाकलं आणि हळूहळू सगळा ताबा घेत देवकीला स्वयंपाकाच्या कामातून निवृत्ती घेण्यास भाग पाडलं. सुनेसारखी सेवा करू लागली. रोजच्या जेवणात शर्विलच्या आवडीचे पदार्थ बनू लागले. शर्विल पहिल्यापासूनच तिच्या पाककौशल्यावर फिदा होता.

“अप्रतिम, कसली भारी चव आहे यार मीरा तुझ्या हाताला! एकदम सॉलिड! खरंच सुगरण आहेस! तुझ्या हातात काय जादू आहे कुणास ठाऊक..”

तो मीराचंं असं भरभरून कौतुक करत. त्याच्या कौतुकाने ती मोहरत होती. रोज ती त्याच्यासाठी हे सारं मनापासून करत होती. राजवाडे साहेबांना ही गोष्ट मुळीच रुचत नव्हती. मीराचा घरातला वावर त्यांना त्रासदायक होत होता. मुलासमोर, देवकीसमोर ते शांत बसले होते. तरी एकदा ते देवकीला म्हणालेच,

“देवकी, हिचं इथे असं राहणं मला मुळीच आवडत नाहीये. उद्या आपली सई घरी येईल. तिला हे आवडेल का? हिच्यामुळे आपल्या मुलाच्या संसारात वितुष्ट नकोय मला. जरा नीट विचार कर.. ती मैत्रीण असली तरी शेवटी एक स्त्री आहे आणि तीही अशी.. हे विसरून नाही चालणार. का असं आपण विस्तवाशी खेळतोय. तिची आपण दुसरीकडे सोय करून देऊ. नाहीतर तिला त्या आशा फाउंडेशनच्या समाजसेविकेकडे पाठवून देऊ. पुन्हा विचार कर.”

“ छे, काहीतरीच काय! अहो असं काही नाही. आपण मीराला अगदी तिच्या लहानपणापासून ओळखतो. ती चांगली मुलगी आहे. तिच्यावर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता कुठे ती तिच्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय. आपण तिला साथ द्यायची का असं काहीतरी मनात आणायचं? मी आणि शर्विल तिला आधार देतोय. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मदत करतोय. शर्विल आणि ती बालपणीचे मित्र आहेत म्हणून इतकी जवळीक आहे. जिव्हाळा आहे. मला तर ती मुलीसारखी. आणि तुम्हाला सांगू का, आपली सई खूप समजूतदार आहे हो.. ती त्यांच्या मैत्रीला नक्की समजून घेईल. पहाच तुम्ही..”

देवकीच्या बोलण्याने राजवाडे साहेबांनी निरुत्तर होऊन फक्त मान डोलावली. मीरालाही माहीत होते की राजवाडे साहेब तिला पसंत करत नाहीत. ती त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करू लागली. मीरा त्या घरात आपलं विशेष स्थान बनवण्याचा प्रयास करू लागली. प्रत्येक क्षणी तिला शर्विलचा ध्यास लागला होता. चुकून होणारे स्पर्श आता जाणीवपूर्वक होऊ लागले. पूर्वीचं तिचं हळवं होऊन बिलगणं आता वारंवार होऊ लागलं. शर्विल घरात असताना सतत त्याच्या भोवती घुटमळत राहणं नेहमीचं झालं. त्याच्या प्रकृतीचं कारण सांगून रुग्णांचे फोन कॉल्स परस्पर बंद केले जाऊ लागले. कधी प्रेमाने तर कधी रागावून ती त्याच्यावर हक्क गाजवू लागली. अगदी एखाद्या पत्नीसारखा! कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शर्विलच्या खोलीत तिच्या फेऱ्या वाढू लागल्या. तो त्याच्या खोलीत असताना त्याच्या राजबिंड्या रुपाला न्याहाळणं सुरू झालं. त्याच्या बाहूपाशात विसावण्याचा मोह होऊ लागला. एव्हाना त्याचे श्वास साऱ्या सर्वांगावर तिला जाणवू लागले होते.

“काय होतंय मला? कसलं हे आसुसलेपण? तनाला मनाला ही इतकी कसली ओढ? का त्याच्येच भास? त्याच्या स्पर्शासाठी का मी इतकी आतुर? कसली ही तळमळ? का श्वासात इतकी थरथर?” असे प्रश्न पडू लागले तिला आणि ती मनोमन हरखून जात होती. तो विवाहित आहे याचा तिला कधीचाच विसर पडला होता. शर्विलच्या प्रेमात ती आकंठ बुडून गेली होती. सर्वत्र फक्त त्याचेच भास. त्या स्पर्शाची अनुभूती घेण्याचा मोह अनावर होऊ लागला. शर्विल फक्त माझा आहे, हा एकच ध्यास तिच्यासाठी महत्त्वाचा होता. बाकी सारं ती विसरून गेली होती.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all