स्पर्श.. भाग १४

हि कथा एका मीरची.. तिच्या अलौकिक प्रेमाच्या स्पर्शाची..


स्पर्श..

भाग- १४

शर्विलने मीराला उचलून तिच्या खोलीत आणलं आणि बेडवर झोपवलं. देवकी तिच्या शेजारीच बसून होती. शर्विलने लगेच तिला इंजेक्शन दिलं. अजून मीराला शुद्ध आली नव्हती. शर्विल तिच्या पायाशी बसून होता. तिला शुद्ध येण्याची वाट पाहत होता. हे सारं करत असताना त्याने तिच्या डॉक्टरांना कॉल करुन बोलवून घेतलं होतं. तेही थोड्या वेळाने तिथे आले. दोन तास उलटून गेले होते पण अजूनही मीरा बेशुद्ध होती. साधारण अडीच तासांनी मीराला शुद्ध येऊ लागली. तिने डोळे किलकिले करून पाहिलं. तिच्यासमोर ओळखीचे दोन चेहरे देवकी आणि शर्विल उभे होते.

“काकू.. शरू..”

तिच्या तोंडून आपली नावं ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला. समोर दोघांना पाहून मीरा उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. तिला अडवत शर्विल म्हणाला,

“थांब मीरा, उठू नकोस.. झोपून रहा. तुला आरामाची गरज आहे.”

पण तरीही मीरा उठून बसली. हात पसरून रडवेल्या आवाजात तिने देवकीला आवाज दिला.

“काकू..”

देवकी लगेच तिच्याजवळ आली. तिला घट्ट मिठी मारली. मीरा धाय मोकलून रडू लागली.

“काकू, तुम्ही कुठे होतात.. मला तुमची खूप आठवण आली. मी खूप एकटी होते. एकटीच लढत होते, काकू..”

मीरा खूप रडत होती. देवकीलाही अश्रू अनावर झाले. देवकीने तिला रडू दिलं. मोकळं होऊ दिलं. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत देवकी म्हणाली,

“मीरा बाळ आधी शांत हो बरं.. शांत हो.. आणि काय झालं नेमकं ते सांग बरं.. तुझी ही अवस्था कशी झाली? काही आठवतंय का?”

मीरा कसंबसं डोळ्यांतलं पाणी पुसत तिची कर्मकहाणी सांगू लागली. सर्वजण तिचं बोलणं ऐकत होते.

“काकू, खरंतर मला शिकायचं होतं. मोठं ऑफिसर व्हायचं होतं पण माझ्या इच्छांपुढे आईची इच्छा, आईची स्वप्नं जास्त मोठी होती माझ्यासाठी.. लग्न करण्याची इच्छा नसतानाही निमूटपणे मी लग्नाला उभी राहिले. मनाला समाधान इतकंच की आईची शेवटची इच्छा पूर्ण करू शकले पण मनातल्या इच्छांचा, स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला होता. मन मरून गेलं होतं..”

बोलताना मीरा क्षणभर थांबली आणि तिने अश्रूपूर्ण डोळ्यांनी शर्विलकडे पाहिलं.

“शरू, तू येणार होतास ना.. वचन दिलं होतंस तू मला. पण तू आला नाहीस.. का शरू?”

तिच्या डोळ्यांतली आसवं जणू त्याला जाब विचारत होती. पण शर्विल भरलेल्या डोळ्यांनी आणि दाटलेल्या कंठाने तिच्याकडे निरुत्तर होऊन पाहत राहिला फक्त. मीरा पुढे सांगू लागली.

“माझं लग्न झालं. डोक्यावर अक्षता पडल्या आणि सर्वांसाठीच मी परकी झाले. वयाची सतरा अठरा वर्ष ज्या नात्यांना मी गोंजारत राहिले, माया करत राहिले ती नाती अचानक परकी वाटू लागली. पण कदाचित हेच प्रत्येक मुलीचं प्राक्तन असावं. काकू, तुम्हां सर्वांना सोडून जाताना मला खूप वाईट वाटत होतं. माझं घर, तुमचं घर सोडून मी कुठेच वावरले नव्हती. आपली गल्ली सोडून कधीच बाहेर पाऊल ठेवलं नव्हतं. पण सर्वांना सोडून जायचं होतं. पाय निघत नव्हता. काहीतरी मागे सुटत चाललं होतं. मागे वळून पाहत मी पाय रेटत चालले होते. इतक्यात सासू रागाने अंगावर खेकसली.

“ काऊन असी चालून राहिली बे कासवागत. पायात जीव नाहीये काय तुह्या? चाल बिगीबिगी.”

आमची पहिली ओळख आणि आमचा पहिला संवाद हा असा. मी मनातून घाबरले होते. पण मग म्हटलं होतं असं.. आई नाही का रागवायची. मनाची समजूत घातली. गाडी निघाली. कुठे जातोय काहीच कल्पना नव्हती. आपलं गाव मागे पडलं आणि नातीही. सगळी अनोळखी माणसं. आता हीच आपली माणसं.. हेच आपलं सर्वस्व.. मी मनाशीच बडबडले. आम्ही नागपूरला आलो. गाडी दारात येऊन उभी राहिली. दोन खोल्यांचं घर.. सर्वत्र अंधार. ना रोषणाई, ना पाहुणेमंडळी.. ना कसलं स्वागत.. लग्नघर आहे असं मुळीच वाटत नव्हतं. काका म्हणाला होता तसं काहीच नव्हतं. माझा भ्रमनिरास झाला होता. आम्हा दोघींना दारात सोडून तो माझा नवरा “आलो लगेच..” असं सांगून निघून गेला. वाटलं होतं मला, धान्याने भरलेलं माप ओलांडून माझा गृहप्रवेश होईल पण तसं काही स्वागत माझं झालं नाही. मी उंबरठा ओलांडून आत आले. तो उंबरठा जणू हीच तुझी चौकट असं सांगू पाहत होता. फार विचित्र वाटलं ते सगळं तरी उंबरठ्याच्या आत एक वादळ दबा धरून बसलं होतं, याची मला तसूभरही कल्पना नव्हती.

“अशी कावून उभी आहेस वं घुमे. सैपाकाले लाग. पोटात कावळे बोंबलून राह्यले. तुह्या मायनं तुले कईच शिकवलं नहीं का वं?.”

त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. मी निमूटपणे स्वयंपाकाला लागले. मी नवी नवरी. हातावरच्या मेहंदींचा रंग अजूनही ओला होता. पण तरीही कामाला लागले. स्वयंपाक झाला. सासूबाईंना जेवायला वाढलं. पहिला घास तोंडात घातला अन्‌ त्या खसकन अंगावर खेकसल्या.

“कशी भाजी बनवली व ह्ये! केवढालं मीठ टाकलं त्यात. तुह्या आईनं तुले असंच शिकवलं काय? कोणती औदसा सुचली नं ही भवानी गळ्यात पडली देवं जाने!”

त्या बडबडत होत्या. जेवण करता करता मला रागवत होत्या. मी काहीच न बोलता निमूटपणे आसवं गाळत बसले. त्यांचं जेवण झालं आणि त्या झोपायला दुसऱ्या खोलीत गेल्या. जाता जाता त्या म्हणाल्या,

“जाय. तिकडंच्या खोलीत जउन बस. विजय आला म्हणजे त्याले जेवन वाढजो. बह्याड सारखी उभी रहु नको..”

मी मान डोलावली आणि खोलीत जाऊन बसले. बरीच रात्र झाली होती. तो अजूनही घरी आला नव्हता. मी त्याची वाट पाहत पलंगावर बसले होते. नकळत माझा डोळा लागला. रात्री उशिरा कधीतरी अचानक मला जाग आली कोणीतरी जोरजोरात दार ठोठावत होतं. मी पटकन जाऊन दार उघडलं. समोर तो उभा होता. त्याला धड उभं राहता येत नव्हतं. तो दारूच्या नशेत झोकांड्या घेत होता. त्याचा तोल जात होता. त्याच्या तोंडाचा दारूचा घाणेरडा दर्प मला जीवघेणा वाटला. मी खूप घाबरले होते. काय करावं कळत नव्हतं. त्याने माझ्या हाताला धरलं आणि ओढत पलंगाजवळ आणलं आणि मला पलंगावर ढकललं आणि धाडकन तो माझ्या अंगावर कोसळला. मला नेमकं काय चाललंय ते समजत नव्हतं. तो काय करतोय मला कळत नव्हतं. काकू, मी लहान असताना तुम्ही सांगितलं होतं. ते कायम माझ्या लक्षात होतं. कोणी नावडता स्पर्श केला तर मोठ्याने ओरडायचं. आईला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला येऊन सांगायचं. पण काकू, मी कोणाकडे जाणार होते? माझ्याजवळ कोणीच नव्हतं. मी एकटी होते. मला तो घाणेरडा स्पर्श करणारा दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा होता. मी त्याला माझ्यातली संपूर्ण शक्ती लावून त्याला दूर करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्या ताकदीपुढं माझं काहीच चालत नव्हतं. माझं असं त्याला विरोध करणं त्याला खूप अपमानस्पद वाटलं. त्याच्या पुरुषार्थाला आव्हान जणू. काही समजायच्या आत त्याने माझ्या एक जोराची कानाशिलात लगावली. मी जोरात ओरडले पण तिथे माझा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं. तो माझ्याशी विचित्र वागत होता. मी नको नको म्हणून आक्रोश करत होते. माझ्या अंगावरचे कपडे ओढून फाडून तो माझ्यावर तुटून पडला एखाद्या जनावरासारखा.. एक नराधम शरीरातला सैतान शांत होईपर्यंत माझ्या देहाशी खेळत राहिला. तो स्पर्श किळसवाणा.. त्याला स्पर्शाला मायेचा, प्रेमाचा बिलकुल गंध नव्हता. त्याचं सुख त्याने ओरबाडून घेतलं. अमानुषपणे एका अबोध कळीला त्याने कुस्करून टाकलं. देहाबरोबर मनावरही जखमा झाल्या होत्या. माझ्या नाजूक मनातल्या सगळ्या अलवार भावनांचा अगदी चक्काचूर झाला होता..”

मीराच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं. तिची करुण कहाणी ऐकताना देवकी आणि शर्विलचेही डोळे वाहू लागले होते.

“मी रात्रभर तशीच पडून राहिले. अगदी निपचित.. आणि तो शेजारी घोरत पडला होता. नवरा नावाचं श्वापद.. एक नीच नराधम.. खुशाल घोरत पडला होता. माझा बलात्कार करून.. हो.., तो बलात्कारच होता.. समाजमान्य बलात्कार.. माझ्या हातातल्या बांगड्या फुटल्या होत्या. बांगड्यांची काच लागल्याने माझ्या हातातून रक्त येत होतं आणि डोळ्यांतून पाणी.. आजवर जी स्वप्नं रंगवली होती सुखाची ती सगळी त्या आसवांसोबत वाहून गेली. काय होतं ते? इतका घाणेरडा स्पर्श.. मी पूर्णपणे हादरून गेले होते. सकाळ झाली. माझं सगळं अंग दुखत होतं. मी तशीच धडपडत उठले. जेमतेम अंघोळ केली. कपडे बदलले आणि तडक सासूबाईंच्या खोलीत गेले. त्या नुकत्याच उठल्या होत्या. मी रडत होते. मला रडताना पाहून रागाने म्हणाल्या,

"काय झाल वं तुले सकाळ सकाळ रड्याले ? तुह्या माहेरचं कोणी मेलं की काय वं ? माय ले त पहिलेच खाऊन घेतलं आता आम्हाले ई खाईचा इचार हाहे का? अवदसा कुठची !"

मला अजूनच रडू येत होतं. मी भीतभीत रात्री घडलेला सारा वृतांत सांगितला.

“मंग काय झालं व इतकं कराले? नवरा सगळेयचा असाच राह्यतो. लगन झाल्यावर असंच होते सगळेयचं. थो अधिकारचं असते त्याचा. अन एक ध्यानात ठेव, घरातल्या गोष्टी घरातल्या चार भिंतीतचं राह्यल्या पाह्यजेत. पाह्य तू कुठं बोललीस तं! आता तुह्य लगन झालं त्याच्याशी. त्याले सुखात ठेवनं, त्याच्या मर्जीचा,अपेक्षेचा इचार करणं तुह्य कर्तव्यचं आहे. आता तू हे सारं सहन कराले शिक. आता ह्या घराचा उंबरठा तू ओलांडशील ते तुह्या अंतिम यात्रेतच, तुह्या मुर्दा झाल्यावर..”

सासूबाईचं बोलणं ऐकून मी थक्क झाले. माझं कर्तव्य, जबाबदाऱ्या त्या सांगत होत्या. पण नवऱ्याच्या, त्यांच्या मुलाच्या कर्तव्याबद्दल, जबाबदाऱ्यांबद्दल त्या काहीच बोलल्या नाहीत. माझ्याकडे हे सारं सहन करण्यापलीकडे कोणताच मार्ग नव्हता. रोज रात्री हेच घडतं होत. त्याचं रोज दारू पिऊन येणं, रोज होणारा अत्याचार.. मला ओरबाडून चोळामोळा करणं अगदी रोजचंच झालं होतं. त्या गोष्टीला माझा नकार आणि त्यामूळे त्याचं मला मारहाण करणं अगदी रोज घडू लागलं. इतकं मार खाऊन, रात्रभर जागे राहूनसुद्धा मी सकाळी लवकर उठत होते. मारहाणीने अंग ठणकत असतानाही मी सासूबाईंना चहा फराळ, नवऱ्याला जेवणाचा डबा द्यायचे. तो उपाशी राहू नये म्हणून काळजी घेत होते. पण त्या पाषाणहृदयी माणसानं कधीच माझी काळजी केली नाही की कधी विचारपूस केली नाही.. कायम स्वतःच्याच विचारात गुंग.. दारू पिऊन नशेत.. ना त्याला कोणाची भीती होती.. ना कसली काळजी.! एक दिवस न राहवून मी सासूबाईंना म्हणाले,

“मला बबनकाकाचा मोबाईल नंबर द्या. मी बोलते त्याला. मला नाही सहन होत हे.. मी जाते परत माझ्या घरी नाशिकला.”

तशा सासूबाई हसल्या. म्हणाल्या,

“तुह्या काका कायचा वापस येते आता. त्यानंच पैसे घेतले आमच्याकडून, तुह्याशी लगन कराले. तुह्या काका नं बाप दोघंही आले होते हात पाय जोडत माह्या घरी. तेयन तुले विकलंय मले एक मजूर म्हणून अन मजुरी घेऊन पयाले ते दोघयं.”

हे ऐकून मी अवाक् झाले. माझी, आईची फसवणूक झाली होती. परतीचे सगळे दोर माझ्या काकांनी, माझ्या जन्मदात्याने कापून टाकले होते. काकू, तुम्हाला हे सारं कळवण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. माझी सासू सतत माझ्यावर लक्ष ठेवून असायची. पण तरीही मी एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी शरूच्या नावाने पत्र लिहलं. आणि पोस्टात टाकायला निघाले. ही गोष्ट सासूबाईच्या लक्षात आली. त्यांनी ते पत्र माझ्या हातातून हिसकावून घेतलं आणि मला खोलीत डांबून ठेवलं. नवरा घरी आल्यावर त्यांनी ही गोष्ट त्याला सांगितली. त्याने मला गुरासारखं बेदम मारलं. अगदी तो दमत नाही तोपर्यंत.. मी रडत होते आक्रोश करत होते पण कोणीच ऐकणारं नव्हतं. कोणालाच माझी दया येत नव्हती. शेजारीपाजरी हळहळ करायचे पण सासूबाई त्यांना हुसकवून लावायच्या. माझ्याशी कोणाला बोलू द्यायच्या नाहीत. मग मीही कोणालाच काही बोलेनाशी झाले. मन मारून जगू लागले होते.

एक दिवस अचानक माझी तब्येत बिघडली. सारख्या उलट्या होत होत्या. साधं पाणीही पचत नव्हतं. चक्कर येत होती. सासूबाईंना तर माझ्यासाठी वेळ नव्हता किंबहुना त्यांना काळजीच नव्हती. शेजारच्या काकूंना माझी अवस्था पाहवली नाही. मला त्या दवाखान्यात घेऊन गेल्या. डॉक्टर मॅडमनी मला तपासलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली. शेजारच्या काकूंना त्यांनी बातमी सांगितली. त्यांनाही आनंद झाला. घरी येताच त्या माझ्या सासूबाईंना हसून म्हणाल्या,

“आवं विजयची माय, तुमच्या सुनेजवळ गोड बातमी हाये तुम्ही आजी व्हणार हाये. पेढे आणून ठेवाजी.”

“काय सांगतीस ! खरं हाये का ? आणि का वं तुले मले सांगाले काय झाल व्हतं. नजर लागीनां वं तिची.”

सासूबाई त्या काकूंसमोरच त्यांना बोलत होत्या. पण त्यांना याची सवय होती. काही न बोलता त्या हसून निघून गेल्या. सासूबाईंना आनंद झाला होता. वंशाच्या दिव्याची त्या आतुरतेने वाट पाहत होत्या. माझा नवरा घरी आल्यावर सासूबाईंनी ही बातमी सांगितली. कायम दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या त्याला याचं काहीच सोयरसुतक नव्हतं ना माझं कोडकौतुक करायला माझ्यासाठी वेळ.. निसर्गाने मला संकेत दिला होता. मला मातृत्वाची चाहूल लागली. त्याच्याविषयी कधी प्रेम, आपुलकी नव्हतीच मला. त्यामुळे प्रेमाचं प्रतीक वगैरे असं काही नव्हतं. समाजमान्य बलात्कारातून जन्माला येणारा जीव माझ्या कुशीत अंकुरत होता. पण तरी आईपणाच्या भावनेने मी मोहरले. दुःखाच्या आभाळाला सुखाची किनार मिळावी. ग्रीष्मात पावसाची एक सर यावी अगदी तसं झालं होतं मला. मी माझ्या पोटातल्या अंकुरासोबत माझं आईपण जगत होते.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all