"तू काळजी करू नकोस, तुझ्या पाठिशी कुणीही नसलं तरी तुझी आजी खंबीरपणे उभी आहे"
रडणाऱ्या श्रियाला आजी शांत करत होती. श्रिया खूप वाईट काळातून जात होती, त्यात तिला समजून घ्यायचा ऐवजी तिला समजवणारे लोकं जास्त होते. पण आजीचं असं बोलणं ऐकताच ती आजीच्या गळ्यात पडून रडू लागली.
श्रिया, एक सालस आणि सुंदर मुलगी. चांगली शिकलेली सवरलेली. नातेवाईकातच एक स्थळ बघून तिचं लग्न लावून देण्यात आलेलं. सुरवातीला सगळं सुबक छान दिसे. सासरची मंडळी, नवरा..उत्तम वाटत होते. ते तसे वागायचे सुदधा. पण माणसाच्या मनात काय सुरू असतं हे फक्त देवालाच माहीत!
लग्न करून ती सासरी आली. सुरवातीला छान दिवस गेले. पण हळूहळू तिच्या लक्षात आलं की तिचं नोकरी करणं घरच्यांना आवडत नाही. तिने घरीच राहावं आणि सासू सासऱ्यांकडे बघावं अशी घरच्यांची अपेक्षा. तिचा नवरा मात्र तिला नोकरीसाठी पूर्ण सपोर्ट करत होता. घरच्यांना हे खटकलं, मुलगा बायकोच्या आहारी जातोय, तिच्या हो ला हो मिळवतोय हे बघून सासूच्या मनात सुनेबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला.
सासूबाई मुद्दाम मुलगा घरी आला की डोकं पकडून बसत,
"आई गं, चक्कर येतेय मला...नाही होत आता माझ्याकडून.."
"आई काय झालं? दवाखान्यात जायचं का?"
दवाखान्याचं नाव काढताच आई दचकली.
"नको नको, आई गं.."
"काय होतंय आई तुला?"
"दमले रे मी, तुझी बायको खुशाल नोकरीवर जाते आणि घरात सगळी कामं मला करावी लागतात.."
*****
*****