सौभाग्यवती 9

Marathi story

आपण मागील भागात पाहिले की सुमन मनातून खूप दुःखी झाली होती.. ती मुलींशी न बोलता जेवून झोपली.. तिचे सोसायटीतले, ऑफिसमधले अनुभव खूप वाईट होते.. ती घरी आली तेव्हा तिची मुलगी प्रिया अजून आली नव्हती.. आता आपण यांना थोडं कडक होऊन शिकवायचं म्हणून सुमन प्रियाला कडक शब्दात बोलत होती.. आता पुढे..

"अगं आई, काय झालं तुला??" प्रिया

"काही नाही.." सुमन

"मग इतकी स्ट्रिक्ट का झाली आहेस??" प्रिया

"काही नाही.. झोपा आता.." असे म्हणून सुमन आत जात असतानाच प्रिया तिच्या हाताला धरून थांबवते..

"सांग आई, काय झालंय??" प्रिया

"काही नाही.. तुम्ही झोपा आता.. पुन्हा बोलू.." सुमन

"नाही आई, आताच सांग.. काय झालंय??" प्रिया

"काही नाही म्हणाले ना.. जा आता.." सुमन एकदमच चिडून बोलते..

"त्या सोसायटीतल्या बायकांचा राग आमच्यावर का काढतेस??" प्रिया

"मी कुणाचाही राग कुणावर काढत नाही.." सुमन

"मग काय करत आहेस?? कालपासून बघते.. काही बोलत नाहीस.. चूक तू केलीस आणि राग आमच्यावर का??" प्रिया ओघात बोलून गेली..
सुमन "प्रिया.." म्हणून तिच्या गालावर एक मारते.. प्रियाला खूप राग येतो..

"काढ माझ्यावरच सगळा राग काढ.." प्रिया रडत बोलली..

"काल मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय.. त्यामुळे मी अशी वागत आहे.. समजलं.. मी कशी आणि किती तुम्हाला शिकवले हे तुम्हाला माहितच आहे.. तुमचे बाबा गेल्यावर तुमचे पालनपोषण केले.. तुम्हाला चांगलं शिक्षणही दिले.. आजच्या जमान्यात कसे रहायचे कसे वागायचे, लोकांचे कितपत ऐकायचे, पुरूषांच्या बरोबरीने काम कसे करायचे सगळं तुम्हाला शिकवले.. आजच्या जमान्यातल्या तुम्ही मुली ना.. मग तुमच्याच आईवर असा संशय घेता.. लाज वाटते मला तुमची.. इतक्या नेटाने संसार केला.. नवरा गेल्यावर एकटीने दोन मुलींना वाढवणे म्हणजे काय चेष्टा वाटली काय तुम्हाला?? हे सगळे सहज झालं वाटलं काय तुम्हाला?? यामागील माझी मेहनत माझे कष्ट दिसले नाहीत का ग तुम्हाला?? हेच दिवस फक्त शिल्लक होते.. बाहेरचे काही बाही बोलतात.. तिकडे मी दुर्लक्ष केले.. पण आता माझ्या मुलीचं असे बोलताना कुणीतरी खंजीर खुपसलं की काय असं वाटू लागले मला.." असे म्हणून सुमन रडू लागली..

"अगं आई, साॅरी ग.. आम्ही मुद्दाम नाही बोललो.. तू इतर कोणासोबत आलीस तरी चालेल ग.. पण मोहन काकासोबत आली होतीस.. म्हणून आम्ही तसे म्हणालो.. पण तुला जर राग आला असेल तर परत नाही म्हणणार.." प्रिया

"राग आला नाही.. वाईट वाटले.. इतकी मी चुकले का?? असे वाटू लागले.. एक मुलगा एक मुलगी मित्र असू शकतात हे तुम्हीच तर सांगितले ना मला.. मग आता तुम्हीच असे बोललात तर मी काय करायचं ग.. मला तुमच्या शिवाय आहे तरी कोण??" सुमन

"हो ग आई.. पण तो मोहन काका तुला फक्त मैत्रीण मानत नाही ग.. तो मैत्रीच्या पलिकडचा विचार करत आहे.." प्रिया

"म्हणजे ग??" सुमन

"अगं त्याला तू आवडतेस.. तो तुझ्या प्रेमात आहे.." प्रिया

"उगाच काहीतरी बडबडू नकोस.." सुमन

"खरंच ग.. मला साधना मावशीने सांगितले.." प्रिया (साधना ही सुमनच्या ऑफिसमध्ये काम करणारी सुमनची मैत्रीण.. ती सुमनच्या भल्याचाच विचार करत होती..)

"काय??" म्हणून सुमन खाली बसली.. "मी तर त्याला एक चांगला मित्र मानते.. आणि तो.." सुमन

"हो आई, म्हणून तर आम्ही तसे बोललो.. तुला वाईट वाटले म्हणून साॅरी ग.." असे म्हणून दोघीही सुमनला जाऊन बिलगतात..

सुमन खूप रडते.. मुली तिला समजावतात.. थोड्या वेळाने सुमन साधनाला फोन करते..
"हॅलो साधना.." सुमन

"बोल ना राणी.. आताच तर भेटून गेलीस आणि लगेच आठवण आली.. गप्पा मारून कंटाळा आला नाही का ग?? इतकं बोलायच आहे का??" साधना

"तू मला का नाही सांगितलंस??" सुमन रागातच बोलली..

"अगं काय ते?? आणि इतकी का चिडतेस?? व्यवस्थित सांग बघू काय झालंय ते.." साधना

"तो मोहन माझ्यावर प्रेम करतो हे तू मला आधी का नाही सांगितलंस??" सुमन

"तुला कुणी सांगितले??" साधना

"आता मुली म्हणाल्या.. पण तू मला आधी का सांगितलं नाहीस??" सुमन

"मग काय झालं??" साधना

"अगं असे काय बोलतीस?? मी त्याला फक्त एक मित्र मानलं आणि तो असे कसे करू शकतो.. त्याने माझा विश्वासघात केला आहे.. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो असा कसा करू शकतो.. आणि तू तर माझी मैत्रीण ना ग.. मग मला का नाही सांगितलंस.. मला तुम्ही धोका दिलात.." सुमन रागातच बोलली..

"अगं सुमन, तू शांत हो ग.. हे बघ आपण या विषयावर नंतर बोलू.." साधना

"नंतर नको.. मला आताच बोलायचं आहे.. उत्तर दे मला.." सुमन

"तू जरा प्रिया कडे फोन दे.." साधना

"का?? जे काही बोलायचं आहे ते माझ्याशी बोल.. तिच्याशी काय बोलणार आहेस??" सुमन

"दे म्हटलय ना तुला.. तुझ्याशी नंतर बोलते.. आधी तिच्याकडे फोन दे.." साधना थोडी जोरात बोलली.. मग सुमन तिचा फोन प्रियाला दिली..

"हॅलो मावशी, बोल ना.." प्रिया

"तू सुमनला मोहन बद्दल का सांगितलंस?? तुला सांगू नको म्हटलं होतं ना.. बरं आता काही बोलू नकोस.. आपण भेटून बोलू.." साधना

"अगं पण मावशी.." असे प्रिया म्हणत असतानाच साधना लगेच बोलली..
"भेटल्यावर बोलू.. दोघीही या.. मी ठिकाण आणि वेळ मेसेज करते.. आणि हो सुमनला याबद्दल काहीही सांगू नका.. आता तरी माझं ऐका.." साधना

"हो मावशी.." प्रिया असे म्हणून ती फोन ठेवते.. मग त्या दोघी सुमनला शांत करून आवरून जेवायला जातात..
क्रमशः

🎭 Series Post

View all