Login

सौभाग्यवती 8

Marathi story

आपण मागील भागात पाहिले की सुमन सासरी होती.. ती घरात एकटीच असताना तिच्या दिराने तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला.. त्यातून ती सावध होऊन माहेरी गेली.. तिथे आईबाबा होते तोपर्यंत ठिक होतं.. पण आईबाबांच्या नंतर तिची तेथे घुसमट होऊ लागली.. आणि तिने घर सोडले आणि स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतला.. आता पुढे..

सुमनची प्रगती हळूहळू होत होती.. पण तिच्या प्रगतीसोबतच तिची समाजाकडून घुसमट वाढत होती.. ती जाॅब करत असताना सुरक्षिततेसाठी कपाळावर टिकली आणि गळ्यात मंगळसुत्र घालत होती.. पण या गोष्टीवरून सोसायटीत ती जणू चर्चेचा विषयच बनली होती.. जो तो तिला नावं ठेवत होता..

ऑफिसमध्ये एखादी मिटींग किंवा काही कार्यक्रम असला आणि ती जर नविन ड्रेस घालून थोडी जरी नटली की सगळ्यांच्या नजरा लगेच वळल्या तिच्याकडे.. आणि त्यांच्यात कुजबूज सुरू झालीच.. मग काय तिने नटायच सोडून द्यायचं?? स्वतःसाठी जगायचं सोडून द्यायचं?? तिने कायम जुनेच कपडे घालायचे का?? तिला वाटतं नसेल का की आपण पण नविन कपडे घालून टापटीप रहावं?? तिला काहीच भावना नाहीत का?? तिच्या मनाची कुणी कदर केली का?? तिला कुणी समजून घेतलं का?? असे अनेक प्रश्न निर्माण होतात..

सुमन सोसायटीत आल्यापासून तिला कोणीही हळदी कुंकू किंवा इतर कार्यक्रमाला बोलावले नाही.. उलट ती दिसली चर्चेला उधाण येत होते.. जर कोणी बोलावलेच तर सुमन पण अशा कार्यक्रमांना जायचं मुद्दाम टाळत होती.. या सगळ्या चर्चा करून मोकळे होतं.. पण ती ते ऐकून आतल्या आत तुटत होती.. तिची कुचंबणा होतं होती.. जवळच अस कोणी तिला नव्हतंच.. ती एकटीच होती.. आणि तिच्या मुली..

तिच्या मुली म्हणजेच तिचं सर्वस्व होतं.. तिचं आयुष्य होतं.. ती फक्त तिच्या मुलींसाठी जगत होती.. मुलींना ती घडवत होती.. शिकवत होती.. नविन पिढीला जणू घडवत होती.. त्यांना या सगळ्या गोष्टीतून ती घडवत होती.. ती खूप प्रयत्न करत होती.. त्यांना चांगलं आणि नविन शिकवायची..

हळूहळू मुली मोठ्या होत होत्या.. पण सुमनच्या आयुष्यात काही फरक झालाच नाही.. तिच्या आजूबाजूला बकबकलेले लांडगे नजरा लावून बसलेले होते.. त्यांच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून ती दबकूनच वावरत होती.. लांडग्यांपासून संरक्षण मिळवताना तिची ओळख मोहन सोबत झाली.. मोहन एक खूप चांगला व्यक्ती होता.. जो कोणत्याही अपेक्षेशिवाय सुमनला मदत करत होता.. सुमन आणि मोहनमध्ये फक्त मैत्रीच नात होत.. एक निखळ मैत्री..

एक मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये निखळ मैत्री असू शकत नाही का?? ते दोघे एकत्र असले म्हणजे प्रेमच असतं का?? सुमनच्या मुली आत्ताच्या जमान्यातील असूनही तिच्याविषयी असे बोलत होत्या म्हणून तिला खूप वाईट वाटले.. ती खूप रडत होती.. तशीच झोपून राहिली..

सुमनची मुली प्रिया सुमनला बोलवू लागली.. सुमन तिच्या भूतकाळातच होती.. प्रियाने तिला हलवून उठवले.. तशी सुमन जागी झाली.. ती भूतकाळातून परत आली..

"अगं आई, जेव चल ना.. कधीपासून तुझी वाट बघत आहोत आम्ही??" प्रिया

सुमन फक्त " हं.. " म्हणून न बोलताच निघून जाते.. ती मुलींशी बोलत नाही.. तिची ती ताट करून जेवू लागते..

"आई काय झालं ग?? बोल ना.. त्या बायकांच इतकं मनाला लावून घेऊ नकोस ग.. त्या बायकांना काय कळतंय?? लक्ष देऊ नकोस तू त्यांच्याकडे.." प्रिया

"मला त्या बायकांच्या बोलण्यापेक्षा तुमचं बोलणं जास्त मनाला लागलंय ग.. मी तुम्हाला जे शिकवलय ते तुम्ही साफ विसरून गेलात.. तुम्ही उलट माझ्यावरच संशय घेतलात.. त्या बायकांच्यात आणि तुमच्यात काय फरक ग?? मी आज खूप दुखावली आहे.. कारण तुमच्याकडून अशी अपेक्षा कधी केली नव्हती.. तुम्ही माझं सर्वस्व आहात.. आणि तुम्हीच जर असे बोललात तर कसे होईल.." सुमन मनातच म्हणाली.. ती मनातून खूप दुखावली होती.. मुलींनी तिच्यावथ अविश्वास दाखवला हे तिच्या मनाला खूप टोचत होते.. ती एक अक्षरही न बोलता जेवते आणि जाऊन झोपते..

सकाळी सुमन नेहमीप्रमाणे तिचे आवरून ऑफिसला जात होती.. बाहेर सोसायटीतल्या बायका डोळे लावूनच होत्या.. कधी ही बाहेर येते आणि आम्ही हिला बोलतोय.. सुमनला तर हे नेहमीचेच होते.. ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि ऑफिसला जाते.. ऑफिसला जातानाही सेमच.. बाहेर आसुसलेले लांडगे तिच्या मागावर असायचेच.. त्यात तो बसचा प्रवास.. रिक्षा किंवा टॅक्सी परवडणारी नव्हतीच.. मग काय तसेच जावे लागे.. ते नकोसे स्पर्श.. काय ते बाईच जीवन असतं ना.. ती स्वच्छंदी मुक्त आयुष्य जगूच नये का?? कायम घाबरतच आयुष्य जगायचं का?? पण का तिने घाबरायचं?? ती एक स्त्री आहे म्हणून.. त्यात जर विधवा स्त्री असेल तर बोलायलाच नको.. तिची व्यथा तिचे दुःख कोण समजावून घेणार?? तिने आयुष्यभर कुढतच बसायचं का?? काहीच प्रगती करायची नाही का??

सुमन ऑफिसमध्ये गेली.. ती नेहमीप्रमाणे तिचे काम करू लागली.. तिथेही तिच्याशी बोलण्यासाठी आतुरलेले लोक होतेच.. जर का ती एखाद्या पुरूषाशी मनमोकळी बोलू लागली की लगेच चर्चा सुरू.. काय बाई आहे?? हिला नवर्याची आठवण येत नाही का?? किती बिनधास्त बोलते?? हिला बाॅयफ्रेण्ड नक्की असणार.. किती एक का दोन करून सगळ्या हसत होत्या..

या सगळ्या बोलताना सुमन मात्र मनातून खूप झुरत होती.. नवर्याची आठवण कशी येणार तिला?? तो तर तिच्या मनातच होता.. तो थोडीच तिच्या मनातून गेला.. मग?? सगळीकडे चर्चा असली तरी सुमनचे भाव कधीच बदलत नव्हते.. कारण ती स्वतःसाठी आणि तिच्या मुलींसाठी जगत होती.. पण जेव्हा मुलीच तिच्याविषयी असे बोलल्या त्यामुळे ती खूपच खचली होती..

तिच्याविषयी चर्चा करणं हे रोजचच होतं आणि सुमनलाही त्याची सवय झाली होती.. ती कधीच त्याबद्दल बोलली नाही.. त्यादिवशी सुमन संध्याकाळी ऑफिसमधून घरी गेली.. तिचे सगळं आवरून बसली.. सेजलने स्वयंपाक केला होता त्यामुळे ती थोडी निवांत बसली.. प्रिया अजून आली नव्हती.. सुमन सेजलशी काहीच बोलली नाही.. ती पुस्तक वाचत बसली.. बराच वेळ झाला तरी प्रिया आली नव्हती.. मग दोघीजणी जेवून घेतात..

थोड्या वेळाने प्रिया आली.. ती कोणासोबत आलेली हे सुमनला माहित होतं.. कारण तिने मुलींना तितकं मोकळीक दिले होते.. पण आज ती थोडं बोलणारच होती.. प्रिया आत आली..

"इतका का उशीर??" सुमन

"अगं आई, आज ना निशाचा वाढदिवस होता.. खूप मज्जा आली ग.. निशाचे आईबाबा पण आमच्यासोबत डान्स केले.. कसलं भारी ना.." प्रिया सांगत होती..

"उद्या पासून सातच्या आत घरात यायचं.." सुमन

"अगं पण आई, तूच तर म्हणतीस ना.." प्रिया पुढे बोलणार इतक्यात
"आता मी सांगते तेच ऐकायचं.." सुमन थोडा आवाज वाढवून बोलली..

"आणि हो.. तू आता कोणासोबत आलीस??" सुमन

"अमेय आला होता.." प्रिया

"उद्या पासून कुठल्याही मुलासोबत यायचं नाही.. गरज असेल तर टॅक्सी किंवा रिक्षाने या.." सुमन

मुलींना कळेना आईला अचानक काय झालंय?? ही इतकी का बदलली आहे.. आई अशी कधीच नव्हती.. ती तर आधुनिक विचारांची होती.. मग आता काय झालं असेल??
क्रमशः


🎭 Series Post

View all